नावडे वैकुंठ शेषशयन
1389.
नावडे वैकुंठ शेषशयन । वैष्णव संतजन आवडले ॥१॥
रमा म्हणे कैसी नवल परी । देव भुलले वैष्णवाघरी ॥२॥
जो नातुडे ध्यानीं समाधीसाधनीं । तो स्वानंदे कीर्तनी नाचतसें ॥३॥
जो यज्ञावदानीं कांही नेघे माये । तो द्वादशीं क्षीराब्धी उभ उभ्या खाये ॥४॥
लक्ष्मी म्हणे देव आतुडे कवणें बुद्धी । वैष्णवांची सेवा करावी त्रिशुद्धि ॥५॥
वैष्णवाघरें लक्ष्मी कामारी । एका जनार्दनी देव दास्यत्व करी ॥६॥
