॥ श्रीएकनाथमहाराजकृत
15.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय पंधरावा ॥
लक्ष्मणाचे सांत्वन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांची हाक ऐकून सीता घाबरते :
श्रीरामस्वरासमान । मारीचानें केले आक्रंदन ।
ऐकोनि सीता करी रुदन । श्रीराम आपण सांपडला ॥१॥
राम रणरंगधीर संपूर्ण । विकट योद्धा अति दारुण ।
तरी तो आक्रंदे दीनवदन । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥२॥
श्रीरामाचे आक्रंदन । ऐकोनिया दीनवदन ।
उगाचि राहिला लक्ष्मण । याचे का मन द्रवेना ॥३॥
अतृस्वरं तु तुं भर्तुर्विज्ञाय सद्दशं वने ।
उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥१॥
सखायं भ्रातरं ज्येष्ठं रामं पंथानमागतम् ।
काक्रंदमान तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ॥२॥
तं क्षिप्रमभिधावं त्वं भ्रातरं शरणैषिणम् ।
रक्षसां वशमापन्नं सिहानामिव गोवृषम् ॥३॥
परंतु लक्ष्मण मात्र स्वस्थचित्त असलेला पाहून सीतेला खेद व चिंता :
सीता म्हणे लक्ष्मणासी । आजि का निष्ठुर झालासी ।
राक्षसी रोधिलें रामासी । तू का न धांवसी धांवण्या ॥४॥
तू जिवलग बंधु सखा । रणांगणींचा पाठिराखा ।
ऐकोनि श्रीरामाच्या हाक । धांवण्यां तू का न धांवसी ॥५॥
जैसा व्याधिग्रस्त केसरी । वनी वेढिजे वानरी ।
श्रीराम तैसा वनांतरी । निशाचरीं वेढिला ॥६॥
श्रीराम रणरंगधीर पूर्ण । तोही आक्रंदे आला शरण ।
शरणागताचें रक्षण । केंवी आपण न करिसी ॥७॥
ऐसे बोलोनिया सीता । लक्ष्मणचरणीं ठेवी माथा ।
श्रीराम पावला अति आकांता । धांवणे तत्वता करी वेगी ॥८॥
श्रीरामांच्या सामर्थ्याचे महिमान :
ऐकोनि सीतेचे वचन । सौमित्र घाली लोटांगण ।
ऐक माते सावधान । रघुनंदननिजमहिमा ॥९॥
देवि देवमनुष्येषु गंधर्वेषु पततत्रिषु ।
राक्षसेषु पिशाचेषु किन्नरेषु मृगेषु च ।
अशक्यस्तव वैदेहि भर्ता जेतुं न संशयः ॥४॥
सुरासुर नर किन्नर । दानव मानव निशाचर ।
यक्ष राक्षस विद्याधर । पळती सत्वर श्रीरामबाणें ॥१०॥
पिशाच गुह्यक गंधर्ववीर । त्रैलोक्यींचे निधडे शूर ।
पक्षी पन्नग विखार । पळती सत्वर श्रीरामबाणें ॥११॥
विरिंच्यादि सुरेश्वर । कांपती देखोनि श्रीरामशर ।
पिनाकपाणि श्रीशंकर । तोही श्रीरामासमोर होऊं न शके ॥१२॥
देखोनि श्रीरामाचा बाण । शंकर घाली लोटांगण ।
त्या श्रीरामासी मारील कोण । व्यर्थ रुदन का करिसी ॥१३॥
तुज देखता त्रिशिरा खर । मारिले चवदा सहस्र निशाचर ।
त्या श्रीरामासी मृग किंकर । केंवी साचार मारवे ॥१४॥
श्रीरामबाणाच्या निजनेटें । मेरुमांदारपर्वतफुटें ।
कळिकाळाचे पोट फाटे । घाये उतटे ब्रह्मांड ॥१५॥
सीतेला लक्ष्मणाचे आश्वासन :
ऐसिया श्रीरामासी देख । मृग बापुडे एकले एक ।
केंवी मारुं शकेल रंक । वृथा दुःख तू का करिसी ॥१६॥
श्रीराम वध्य नव्हे कोणासी । श्रीराम वधील सर्वांसी ।
तू का रडसी आक्रंदेसी । मृत्यु श्रीरामासी असेना ॥१७॥
वसिष्ठें सांगितले निजवर्म । अजरामर श्रीराम परब्रह्म ।
हे नाठविसी तू मूर्ख परम । रुदनधर्म तो मिथ्या ॥१८॥
लक्ष्मणा धांव धांव सत्वर । हा तंव नव्हे श्रीरामस्वर ।
राक्षस वदती मावकर । ते तू साचार मानिसी ॥१९॥
ऐक आता माझे उत्तर । मृग मारोनियां सत्वर ।
आतांचि येईल तुझा भर्तार । धरी धीर जानकिये ॥२०॥
श्रीरामांनी जातेवेळी दिलेल्या आज्ञेचे लक्ष्मण स्मरण देतो :
राक्षसांचिये छळणवचनीं । तुज एकले सांडोनि वनी ।
न वचे श्रीरामाच्या धांवणीं । सत्य वाणी हे माझी ॥२१॥
श्रीराम सांगे वारंवार । जीवावरी आलिया दुर्धर ।
तरी न सांडावी सीता सुंदर । तुजसमोर नेमिलें ॥२२॥
माझेंविशींची कांही चिंता । लक्ष्मणा तुम्ही न करावी सर्वथा ।
श्रीराम बोलिला तुजदेखता । अति सावध सीता रक्षावी ॥२३॥
पुनःपुनः सांगे कानी । राक्षस मायावी ये वनी ।
सीता नेतील छळोनी । सावधानीं राखावी ॥२४॥
छळावया वनांतरी । जाली शूर्पणखा अति सुंदरी ।
राक्षस येतील तैसियेपरी । सीता तिळभरी न विसंबे ॥२५॥
श्रीरामाची शिकवण ऐसी । आणिक मी केंवी करु तुझ्या बोलासी ।
तुज सांडोनि वनवासी । रामापासी न वचे मी ॥२६॥
उल्लंघोनि श्रीरामवचन । तुझेनि बोले जाता आपण ।
राक्षसी केलिया तुझे हरण । रोकडें मरण मज आले ॥२७॥
आत्मबुद्धिर्हितार्थाय गुरबुद्धिर्विशेषतः ।
परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धिः प्रलयं गतः ॥५॥
सर्व अनर्थाचे मूळ कारण स्त्रीबुद्धी :
निजात्मबुद्धि ते हितासी । सद्गुरुबुद्धि सुखैकराशी ।
परबुद्धि ते विनासासी । मूळ प्रळयासी स्त्रीबुद्धि ॥२८॥
ऐकता स्त्रीवचन जमद्ग्नी । तो निमाला तत्क्षणीं ।
रेणका घायवटें पडे धरणी । क्षत्रियां रणी निर्दाळिले ॥२९॥
तीन सप्तकें वधिले क्षत्री । रुधिरपूर वाहे धरित्रीं ।
स्त्रीवाक्याची हे थोरी । जे चराचरी आकांत ॥३०॥
ऐसी स्त्रीवाक्याची परी । हितोपदेशीं अनर्थ करी ।
तुज साडोनि गुंफेमाझारी । तळभरी दुरी मी न वचे ॥३१॥
अति कठिण माझा भावो । मज नाही श्रीरामस्नेहो ।
तुज एकले सांडोनि पहा हो । शोधूं श्रीरामरावो न वचे मी ॥३२॥
मज काढावया गुंफेबाहेरी । धांव धांव म्हणिजे निशाचरी ।
ऐसी मायिक हाक मारी । तुजहूनि दूरी मी न वचे ॥३३॥
सीतेचा संताप व लक्ष्मणाला अभिशापः
ऐसे बोलता लक्ष्मणा । सीतेसी कोप आला चौगुणा ।
सांडोनि मर्यादेची गणना । कठिण वचना अनुवादे ॥३४॥
नैव चित्रं सपत्नेषु पापं लक्ष्मण यद्भवेत् ।
त्वव्दिधेषु नृशंसेषु नित्यं प्रच्छन्नचारिशु ॥६॥
प्रत्यक्ष श्रीरामाची हांक । ते म्हणसी तू नायिक ।
माझे ठायी तुझा अभिलाष । पापी निष्टंक तू एक ॥३५॥
माझा अभिलाष धरोनि मनी । वनासी आलासी सेवक होऊनि ।
श्रीराम राक्षसी वधिल्या वनी । मज निजपत्नीं करु पाहसी ॥३६॥
सापत्नांची हेचि बुद्धी । बंधूंसी बंधु छळोनि वधी ।
त्याची भोगावीं भोगसमृद्धी । हे दृष्टबुद्धि तुजपासी ॥३७॥
संवचोराचें सांजणें । तैसी सेवा केली लक्ष्मणे ।
नाना युक्ती श्रीराम मारवणें । मज आपण भोगावया ॥३८॥
श्रीरामसेवा केली प्रबळ । त्या सेवेचें हेंचि फळ ।
पत्नी करावी जनकबाळ । सेवा सफळ येणे तुझी ॥३९॥
परदारकामिक दुष्ट । सेवा करोनि अति शठ ।
आजि कळला भाव स्पष्ट । महानष्ट तू पापी ॥४०॥
श्रीराम सन्नि देखोनी । म्हणसी जानकी माझी जननी ।
श्रीरम राक्षसी वधिलिया वनी । सीता पत्नी करु पाहसी ॥४१॥
मी तंव श्रीरामाचे रंक । परपुरुषाचें न शिवे अंक ।
जळो तुझे काळे मुख । माझा अभिलाष करु पाहसी ॥४२॥
तू तंव माझा अभिलाषी । मजपासोनि दुरी न वचसी ।
मीच जाईन श्रीरामापासीं । काय त्यासी वर्तले ॥४३॥
अश्रुपूर्णमुखी सीता तथोक्त्वा पुनरब्रवित् ।
गोदावरीं प्रवेक्ष्यामि हीना रमेण लक्ष्मण ॥७॥
पिबामि वा विषं तीक्ष्ण प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥८॥
आत्मघात करण्याची सीतेची धमकी :
लक्ष्मणा ऐके सावधान । श्रीरामवेगळीं मी आपण ।
होईन गंगेमाजी मग्न । की हुताशन प्रवेशे ॥४४॥
किंवा करीन विषभक्षण । अथवा पर्वतपतन ।
अथवा वृक्षाग्री वेंघोन । देईन प्राण अधःपतनें ।
अथवा वृक्षाग्री वेंघोन । देईन प्राण अधःपतनें ॥४५॥
परी तुजसी अंगसंग । नाही करणे विषयभोग ।
बोलणें हेंचि माझे निर्व्यंग । तू निःसंग विषयार्थी ॥४६॥
श्रीरामावेगळें आणिकाते । नाही स्पर्शणें जीतें ।
ऐसे जाणोनि निश्चिते । भजें भावार्थे श्रीरामा ॥४७॥
ऐकोनि सीतेची दुष्ट वाणी । सौमित्र बोटे घाली कानी ।
श्रीरामनाम स्वये स्मरोनी । अति उद्विग्न संतप्त ॥४८॥
लक्ष्मणाचा मनःक्षोभ, सीतेला रामाज्ञेची स्पष्ट जाणीव :
जानकीचे वर्मी वाग्बाण । साहों न शकेचि लक्ष्मण ।
दृढ खोचलें अंतःकरण । वचनें प्राण सोडूं पाहे ॥४९॥
ऐसे बोलोनि अति कठिण । सीता आक्रोशे करी रुदन ।
ते देखोनि लक्ष्मण । बोले दारुण क्षोभोनी ॥५०॥
स्वभावोऽयं हि नारीणां त्रिपु लोकेषु कथ्यते ।
विमुक्तधर्माश्चपलास्तीक्ष्णा भेदकराःस्त्रियः ॥९॥
उपशृण्वंतु मे सर्वे साक्षिभूता वनेचराः ।
न्यायवादी यथावाक्यमुक्तोऽहं प्रुरुषं त्वया ॥१०॥
स्त्रीस्वभावेन दुष्टेन दुरुक्तेन न्यवस्थितम् ।
यास्यामि यत्र काकुत्स्थः स्वस्ति तेऽस्तु वरानने ॥११॥
स्त्रीस्वभाव दुष्ट अदभुत । जे नवमास वाहे उदरांत ।
जे सोसी सदा नरक मूत । त्या मातेसी सुत पारखा करी ॥५१॥
बंधुबंधुंसीं वैराकार । वाढवावया मुख्य साचार ।
स्त्रीसंगाचा बडिवार । वेगळाचार सुहृदांसीं ॥५२॥
मी बोले नित्य नित्य निष्पाप । तो त्वा छळोनि श्रीरामप्रताप ।
मजवरी घालिसी अभिशाप । हे महापाप जानकिये ॥५३॥
सांडोनि मर्यादा धर्मार्गळा । स्त्रिया होती उत्सृंखळा ।
ते म्या आजी देखिले डोळा । जनकबाळा अभिशापें ॥५४॥
मज तुज साक्ष येथे । ऐकताती समस्त भुते ।
उल्लंघावया श्रीरामाज्ञेतें । अभिशापोक्तें भज छळिले ॥५५॥
तुज सांडोनि वनांतरी । तिळभरी म्या न व्हावे दूरी ।
हे श्रीरामाज्ञा वंदितां शिरी । नानापरीं त्वा छळिले माते ॥५६॥
त्वा मज घातला अभिशाप । तुझे तुज फळेल पाप ।
श्रीराम न भेटे सद्रुप । भोगिसी संताप षण्मास ॥५७॥
तू जननी मी अपत्य । हा तंव माझा दृढ भावार्थ ।
तुझा तुज फळेल वचनार्थ । अति अनर्थ पावसी ॥५८॥
लक्ष्मणाच्या शपथा व निरुपायाने जाणे :
मी अपत्य तू जननी । हा सद्भाव माझे मनी ।
तरी राम भेटे मृग वधोनी । द्वंद्वबंधनीं निर्मुक्त ॥५९॥
श्रीरामाज्ञेचें रक्षण । तुजपासी होतो जाण ।
म्या केलिया वनाभिगमन । राक्षस हरण तुज करिती ॥६०॥
पुढे श्रीरामाची दृष्टादृष्टी । सहसा तुजसी न होईल भेटी ।
सोशिल्या विघ्नांचिया कोटी । श्रीराम दृष्टी देखसी तू ॥६१॥
तुज सांडोनि निर्बधन । माझेनि न करवेची गमन ।
माझे निजसत्व संपूर्ण । संरक्षण तुज असो ॥६२॥
आश्रमातून जाताना रेषाबंधन व ती रेषा न ओलांडण्याचा सीतेला दंडक :
तू न मानसी माझा भावो । मज पुसेल श्रीरामरावो ।
त्यालागीं रक्षणनिर्वाहो । करोनि पाहो मी जातो ॥६३॥
श्रीरामाचा निजसखा । निर्विकल्प शुद्ध नेटका ।
तरी हे माझी मर्यादा देखा । ब्रह्मादिका अनुल्लंघ्य ॥६४॥
माझे मर्यादेची रेखा । कळिकाळासी अटक देखा ।
तेथे राक्षसा पै रंका । केंवी आवांका करवेल ॥६५॥
राक्षसा न करवे हरण । ऐसे ठेविले निजरक्षण ।
तुवा पाळावें येगढें वचन । रेखाउल्लंघन न करावे ॥६६॥
योगी संन्यासी तापसवेषी । भिक्षेसी येतील आश्रमासी ।
तू विश्वासूं नको तयांसीं । मर्यादेसी नुल्लंघी ॥६७॥
उल्लंघोनिया रेखेसी । जरी तू भिक्षा देऊं जासी ।
तरी तू राक्षसी हरिजेसी । दुःखी होसी जानकिये ॥६७॥
ऐसे सांगोनि लक्ष्मण । करावया श्रीरामगवेषण ।
सवेग निघाला आपण । धनुष्यबाण सज्जोनी ॥६९॥
त्यक्त्वा सदुस्त्यजसुरेप्सितराजलक्ष्मीं
धर्मिष्ठ आर्यवचसा सदगादरण्यम् ।
मायामृगं दयितयेप्सितमन्वधाव
व्दंदे महापुरुष ते चरणारविंदम् ॥१२॥
श्रीराम व लक्ष्मण यांची भेटः
देव वांछिती राज्यवैभव । पितृवाक्यें त्यजोनि सर्व ।
चरणचालीं श्रीराघव । आला स्वयमेव वनवासा ॥७०॥
सीताप्रियेचें पियवचन । ऐकोनिया श्रीरघुनंदन ।
मायामृगीं करी धांवन । ते श्रीरामचरण वंदी सौमित्र ॥७१॥
ध्वजवज्रांकुशरेखा । श्रीरामपदें पाहत देखा ।
चालिला लक्ष्मण निजसखा । स्वानंदे देखा डुल्लत ॥७२॥
श्रीरामपदीं प्रेमपूर्ण । पद दो लोटांगण ।
श्रीरामचरण लागल्या जाण । धन्य प्राण पै माझा ॥७३॥
श्रीरामचरण लागल्या जाण । तृण पर्ण मुक्तिका पाषाण ।
मस्तकी वंदी तो रजःकण । धन्य चरण रामाचे ॥७४॥
श्रीरामपदें देखतं दृष्टी । सौमित्रासी आनंदकोटी ।
गाता नाचत चालता दृष्टी । तंव श्रीराम जगजेठी देखिला ॥७५॥
मृग मारोनि गंगातटी । अश्वत्थतरुच्या तळवटीं ।
स्वस्थ बैसला श्रीराम जगजेठी । तंव देखिला दृष्टी सौमित्रे ॥७६॥
कुमित्रा गेल्या कल्पकोटी । श्रीरामासी नव्हेचि भेटी ।
तो सौमित्रे देखिला दृष्टी । स्वानंदपुष्टी सदोदित ॥७७॥
नाही श्रीरामी युद्धकंदन । नाही राक्षस ना बंधन ।
नित्यमुक्त श्रीरघुनंदन । सुखसंपन्न देखिला ॥७८॥
लक्ष्मणा धांव धांव सत्वर । हे तंव मायिक उत्तर ।
सौमित्रे जाणोनि सत्वर । श्रीरघुवीर वंदिला ॥७९॥
दोघा जाली दृष्टादृष्टी । आनदें ओसंडली सृष्टी चरण ।
वंदोनियां उल्लाटीं । पडली मिठी आलिंगनीं ॥८०॥
दोनी दीपक एक होती । दोहींची मिळोनि एक दीप्ती ।
श्रीरामसौमित्र तैसिया रीती । क्षेम देती एकत्वे ॥८१॥
समुद्री रिघतांचि लवण । स्वये समुद्र होय आपण ।
तेंवी श्रीरामलक्ष्मण । जाले परिपूर्ण पूर्णत्वे ॥८२॥
श्रीरामा नाठवे रामपण । येरा नाठवे भक्तपण ।
खुंटले बोल तुटले मौन । आनंदी निमग्न सदोदित ॥८३॥
सीतें छळिले अभिशाप-वृष्टीं । ते नाठवे लक्ष्मणा गोष्टी ।
आणि ठाकोनि जावे पंचवटी । हेंही श्रीरामपोटी नाठवे ॥८४॥
ऐसे स्वानंदाचे पोटी । दोघा पडली एक मिठी ।
संरक्षावया सृष्टी । सुटली मिठी प्रेमाची ॥८५॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । एकले सांडोनि सीतेसी ।
तू का येथे धांवलासी । ते मजपाशीं सांग वेगे ॥८६॥
ततो लक्ष्मणमायातं ददर्श विगतप्रभम् ।
विषण्णः सविषण्णेन दुःखितो दुःखभागिना ॥१३॥
सीतेच्या रक्षणाविषयी विचारल्यावर लक्ष्मण गहिवरतो :
पुसतां सीतेचे रक्षण । निवांत जाला लक्ष्मण ।
दुःखे दुःखी अति दारुण । अश्रुपूर्ण मुख दिसे ॥८७॥
पुसों जाता सीतेची गोष्टी । लक्ष्मणासी दुःखकोटी ।
देखोनिया मुखसान्निष्टीं । श्रीराम पोटी धाकिन्नला ॥८८॥
स्वये सीतेनें सौमित्रासी । दृष्ट दुरुक्तीं अति संत्रासीं ।
धांवण्या धाडिला मजपासीं । अति दुःखेंसी दुःखित ॥८९॥
सौमित्र नुल्लंघी माझे वचना । परी वर्मस्पर्शाची संज्ञा ।
सीतेनें करविली आज्ञा । श्रीरामे सर्वज्ञा कळो सरलें ॥९०॥
स्त्रीवाक्याच्या कठोरपणामुळे सीतेला एकाकी सोडणे भाग पडले :
स्त्रीवाक्याचे दारुण बाण । हृदयी खोचलें संपूर्ण ।
तेणे अति दुःखी लक्ष्मण । आला धांवोन मजपासीं ॥९१॥
सीता सांडोनि का आलासी । ऐसे पुसता लक्ष्मणासी ।
लक्ष्मण लागला पायांसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥९२॥
आलिया विघ्नांच्या कोटी । परी मी न सांडितों पंचवटी ।
परि सीताभिशापगोष्टी । ऐकून उठाउठी मी पळालों ॥९३॥
ऐसे बोलली दारुण । जेणे तत्काळ ये मरण ।
करिता तुझे नामस्मरण । माझे प्राण वांचले ॥९४॥
जरी न करितो तुझे नामस्मरण । तरी तात्काळ मज येते मरण ।
देखोनिया तुझे चरण । सावधान पावलों ॥९५॥
सीतेच्या मर्मभेदक बोलण्याचा परिणाम :
जानकी अनुवादकथक । ऐके स्वामी सावधान ।
जे जे विंधले वाग्बाण । ते ते प्रकरण अवधारी ॥९६॥
लक्ष्मणा धांव धांव ऐसे गर्जन । मायामारीचाक्रंदन ।
ऐकोनि सीता करी रुदन । युद्धबंधन श्रीरामा ॥९७॥
जानकी म्हणे धावं सत्वर । राक्षसी वेढिला रघुवीर ।
त्याचा करी रणोद्धार । तू सहोदर पाठिराखा ॥९८॥
म्या दिधले प्रतिवचन । राक्षस बापुडे मशक कोण ।
त्यासी नाटोपे रघुनंदन । ऐके महिमान रामाचे ॥९९॥
मिळाल्या दैत्यदानवांच्या थाटी । आलिया राक्षस कोट्यनुकोटी ।
श्रीराम नाटोपे जगजेठी । नळी निवटी बाणे एके ॥१००॥
सीता न मानी तुझा प्रताप । अति आक्रंदे करी संताप ।
धांवण्या धांव सकृप । राम सद्रूप पाहत दृष्टी ॥१॥
श्रीरामाज्ञा माझे शिरी । तुजपासोनि तिळभरी ।
परता नव्हे धांवण्या बाहेरी । निजनिर्धारी बोलिलो ॥२॥
तुज सांडोनि एकली नारी । मज जाता धांवण्यावारी।
तुज हरिल्या निशाचरीं । तिघांचे शिरी दुर्नाम ॥३॥
श्रीराम सांगे आळवूनी । सीता राखावी सावधानीं ।
तो मी धांवण्या न धावे वनी । तुजपासोनी दुरी न वचे ॥४॥
ऐसा ऐकोनि माझी वाणी । सीता क्षोभली शतगुणीं ।
पूर्वमर्यादा सांडोनी । वर्मी खोंचोनी अनुवादे ॥५॥
श्रीराम धांवण्या न धांवोनी । दुरी नव्हेसी मजपासोनी ।
राम राक्षसी वधिल्या वनी । मज निजपत्नी करु पाहसी ॥६॥
माझा अभिलाष धरोनि मनी । सेवा करिसी संवचोरपणीं ।
श्रीराम राक्षसी वधिल्या वनी । मज निजपत्नी करु पाहसी ॥७॥
परदारिया अति लंपटा । सेवकवर्गामाजी महानष्टा ।
मुख न दावी मज पापिष्ठा । दुष्टा भ्रष्टा चांडाळा ॥८॥
होवोनि श्रीरामाचा सवता । वना आलासी मजभोवतां ।
येणे वाक्यें सांडोनि सीता । आलो रघुनाथा तुजपासी ॥९॥
महामारक जे का विख । ते मज घेता निजपीयूख ।
परी सीतावाक्याचें असुख । परम दुःख श्रीराम ॥११०॥
पित्यानें गांजिल्या शांतवी माता । मातेने गांजिल्या शांतवी पिता ।
येणेंचि भावे श्रीरघुनाथा । आलो तत्वता मी तुजपासी ॥११॥
श्रीरामाचे लक्ष्मणाला अलिंगन :
ऐकोनि सौमित्राचे वचन । श्रीरामे दिधले अलिंगन ।
तेणे जाले समाधान । सुखसंपन्न तेणे दोघे ॥१२॥
साकर विरोनि होय जीवन । जिवना आले गोडपण ।
तेंवी दोघे राकलक्ष्मण । सुखसंपन्न येरयेर ॥१३॥
लोह परिसासीं पडता गाठी । तत्काळ काळिमेसी होय तुटी ।
तेंवी सौमित्रेंसीं श्रीरामभेटी । दुःखकोटी निमाल्या ॥१४॥
श्रीरामांना खर्या रहस्याची कल्पना असल्यामुळे सीतेच्या वर्तनाची त्यांना जाणीव होती :
ऐकोनि सीतेचे वचन । विस्मित श्रीरामाचे मन ।
मायामृगाचें विंदान । जाणे संपूर्ण श्रीराम ॥१५॥
मायामृगें आक्रंदोन । धांवण्या आणिला लक्ष्मण ।
मागे येवोनि रावण । सीताहरण करील ॥१६॥
ऐसा जाला कृतकार्यार्थ । जाणोनिया श्रीरघुनाथ ।
सुख मानिलें पोटांत । राक्षस अंत करावया ॥१७॥
जाणोनि मायामृगाची गोष्टी । बाइलेचिया बोलासाठीं ।
राम का धांवला मृगापाठी । श्रोती पोटी न मानावे ॥१८॥
स्त्रीकामाच्या अति प्रीती । मायामृगीं श्रीरघुपती ।
नाही धांवला कामासक्तीं । गूढ ग्रंथोक्तीं अवधारा ॥१९॥
सीता केवळ नव्हे पत्नी । परमभक्तशिरोमणी ।
चरणचालीं आली वनी । सेवेलागोनी श्रीरामा ॥१२०॥
राज्यी असता श्रीरामासी । सेवा वांटली सेवकांसी ।
स्वये करावया सेवेसी । उल्हासेसी वना आली ॥२१॥
सीता निर्विकार भक्त । श्रीराम जाणे मनोगत ।
तिचा पुरवावया भावार्थ । स्वये धांवत मृगामागे ॥२२॥
भक्ताचिया वचनासाठी । प्रकटला कोरडे काष्ठी ।
तो श्रीराम धावें मृगापाठी । सुखसंतुष्टी सीतेच्या ॥२३॥
भक्ताचें भावे वचन । कदा नुल्लंघी श्रीरघुनंदन ।
सीतासद्भावें आपण । करी धांवणे मृगापाठी ॥२४॥
जैसा भाव तैसा देव । यदर्थीं नाही संदेह ।
देखोनि सीतेचा निजसद्भाव । धांवे श्रीरामराव मृगापाठी ॥२५॥
मायामृगीं करी धांवन । समूळ सांगितले आपण ।
सीता निर्भत्सीं लक्ष्मण । तेंही निरुपण अवधारा ॥२६॥
त्रैलोक्यपावन श्रीरामख्याती । वाढवावया अगाध कीर्ती ।
लक्ष्मणा दवडी सीता सती । नाना वक्रोक्ती छळोनी ॥२७॥
मुख्य सीतेचे मनोगत । श्रीरामे वधावा लंकानाथ ।
तेची साधावया कार्यार्थ । केला छळणार्थ सौमित्रा ॥२८॥
श्रीराम सीता सौमित्र । तिन्ही मूर्ती अति पवित्र ।
प्रकटावया श्रीरामचरित्र । कथाविचित्रानुवादु ॥२९॥
अवताराचे नटनाट्य । प्रगट करावया सष्ट ।
कथानुवाद दिसे बिकत । तोचि निर्दिष्ट परमार्थ ॥१३०॥
सीता सती स्वये सद्रूप । ते लक्ष्मणा लावी अभिशाप ।
हे मूर्खांचे मूर्ख जल्प । कथानुरुप अति गूढ ॥३१॥
येरयेरांचे मनोगत । जाणोनिया स्वये वर्तत ।
अगाधकीर्ति श्रीरघुनाथ । जग पुनीत श्रीरामनामें ॥३२॥
श्रीरामकथेचें अक्षर । क्षराक्षरातीत पर ।
श्रोते वक्ते अति पवित्र । कथाचरित्र अनुवादू ॥३३॥
केवळ जपतां श्रीरामनाम । नामे वक्ता होय परब्रह्म ।
त्याचा चरित्रसंभ्रम । आनंद परम परमार्थी ॥३४॥
एकाजनार्दना शरण । भेटेल श्रीराम लक्ष्मण ।
येरीकडे सीताहरण । स्वये रावण करु पाहे ॥३५॥
सीता साधावया पंचवटीं । रावण येवोनियां कपटी ।
त्या दोघांच्यां धर्मगोष्टी । कथाकसवटी अनुपम्य ॥१३६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामलक्ष्मणानुवादो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
॥ ओंव्या १३६ ॥ श्लोक १३ ॥ एवं १४९ ॥
