॥ श्रीएकनाथमहाराजकृत
12.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय बारावा ॥
शूर्पणखा-रावण संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पंचवटीतील राक्षससंहारामुळे राक्षसस्त्रियांचा विलाप :
खरत्रिशिरादि बळांवर्ती । राक्षसांची जातिव्यक्ती ।
रामे रणी पाडिले क्षिती । शरसंपातीं निवटोनिया ॥१॥
ततःशूर्पणखा दृष्ट्वा सहस्त्राणि चतुर्दश ।
हतानि रामेणैकेन मानुषेण पदातिना ॥१॥
एकला श्रीराम धनुष्यपाणी । युद्धी विचरता चरणी ।
चवदा सहस्त्र वीरश्रेणीं । पाडिले रणी शरघातें ॥२॥
बोंब सांगावया पुरती । राक्षसांची पुरुषव्यक्ती ।
नाही उरली रणाप्रती । बाणावर्ती निवर्तले ॥३॥
बोंब सांगावया देख । उरली शूर्पणखा एक ।
घेवोनि लक्ष्मणाचा धाक । मारोनि हाक पळाली ॥४॥
रणी विमर्दाची धुकधुक । अति आक्रोशे करी शंख ।
जनस्थान आली देख । नकटें मुख घेवोनी ॥५॥
खरादिकांच्या पत्नी । हांसती शूर्पणखेतें देखोनी ।
वोहिनीस गौरवीत रणी । नाकीं सुपाणीं बाणले ॥६॥
समस्त राक्षसींचा शूर्पणखेला शाप :
दोघे माणसे ती किती । खरादिक मारोनि येती ।
हा निश्चयो स्त्रियांचे चित्ती । तेणे हांसती शूर्पणखे ॥७॥
फे फे करीत सांगे मात । रणी क्षोभोनि रघुनाथ ।
सोडोनि बाणांचा आवर्त । केला निःपात राक्षसा ॥८॥
त्रिशिरा खर दूषण । चवदा सहस्र राक्षसगण ।
श्रीरामे मारोनी आपण । दिधले जनस्थान द्विजांसी ॥९॥
ऐसी ऐकतांचि गोष्टी । जनस्थानी बोंब उठी ।
वीर निर्दाळोनि जगजेठी । निर्लज्ज नकटी का आली ॥१०॥
करिता नकटीचा कैवार । त्रिशिरादूषणादिखर ।
चवदा सहस्र निशाचर । सहपरिवार मारिले ॥११॥
नकटें भेटलिया ख्याती । पुरुषांच्या जातिव्यक्ती ।
इयें गिळिले अपशकुनार्थी । आम्हाभोवतीं रडों आली ॥१२॥
बोंब उठिली घरोघरी । दिर्घ स्वरें रडती नारी ।
कोण कोणाते निवारी । समभरी समदुःखी ॥१३॥
जनस्थान ब्राह्मणांना आंदण दिले :
आम्ही रडो घरोघरी । राखता नाही कोणी कैवारी ।
द्विज निघोनि घरोघरी । क्षणामाझारी नागविती ॥१४॥
राक्षसी भक्षिलें द्विजांसी । हाडद्वंद्व ब्राहमणांसीं ।
ते येवोनि अति आवेशी । सर्वस्वेंसी नागविती ॥१५॥
ब्राह्मणांचे दादुलेपण । माहेविणयांभोवतें पूर्ण ।
त्यांसी दिधले जनस्थान । आली नागवण रांडांसी ॥१६॥
ब्राह्मणांचा ब्रह्मदंड । रांडादंडणी अति प्रचंड ।
शूर्पणखेचे काळे तोंड । केली रांड अवघियांई ॥१७॥
ऐसिया रडती पडती । एकी कान केश तोडिती ।
एकी अत्यंत हडबडती । एकी आरडती आक्रोशे ॥१८॥
शूर्पणखेच्या सांगण्यावरुन सर्वांचे लंकेस प्रयाण :
शूर्पणखा बोले पुढती । तुम्ही येथे रडाल किती ।
लागवेगें ब्राह्मण येती । ते नागविती समस्ता ॥१९॥
पडलिया ब्राह्मणांचे बंदीं । सुटका नाही कल्पांतसंधी ।
मग कांही न चले बुद्धी । निघावें त्रिशुद्धी लंकेसी ॥२०॥
येथे मारविले महाबळी । निगाली करावया लंकेची होळी ।
नकटी लागली राक्षसमूळी । रावण सकुळीं निर्दाळावया ॥२१॥
द्विजां दिधले जनस्थान । शिष्यसह धांवले ब्राह्मण ।
राक्षसी गजबजिल्या पूर्ण । पलायमान समुदाये ॥२२॥
द्विज धांवले पूर्वद्वंद्वार्थी । विमान हिरोनि सहसंपत्ती ।
तेणे राक्षसई बहुत भीती । मग येती काकुळती शूर्पणखे ॥२३॥
ब्राह्मण येती दाटोदाटी । विक्राळरुपे धांवे नकटी ।
तुम्ही अवघियांतें मी घोटीं । म्हणोनि पाठी लागली ॥२४॥
ब्राह्मणांची धांदल :
ब्राह्मण पळती उपराउपरी । शंख करी दोही करी ।
एक मुतती धोत्रांतरीं । एका बोहरीं होंसरली ॥२५॥
एकापुढें एक पळे बळी । पळतां बैसली दांतखिळी ।
नागवे आले श्रीरामाजवळी । धोत्रे फिटली शुद्धि नाही ॥२६॥
मागे राहिलियापाठीं । शूर्पणखा गिळील नकटी ।
शंख करिती तये संकटी । धांव जगजेठी श्रीरामा ॥२७॥
धाप न समाये पोटी । मार्ग लक्षेना भयें दृष्टी ।
ब्राह्मण अतिशय संकटीं । पंचवटीं पावले ॥२८॥
श्रीरामा धांव पाव झडकरी । शूर्पणखेने गांजिलें भारी ।
गिळिलो गिळिलो निशाचरी । भय निवारीं श्रीरामा ॥२९॥
श्रीराम लक्ष्मणाला शोध करण्यास सांगतातः
निर्भय दे गा ब्राह्मणां । दान दिधले जनस्थाना ।
रामराज्या आले विघ्ना । गोब्राह्मणां गांगिलें ॥३०॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । म्या निर्दळिलें राक्षसांसी ।
कोणे भेडसाविले ब्राह्मणांसी । त्या भयासी निवारीं ॥३१॥
शूर्पणखेने केलेला प्रलय :
पहिले ब्राह्मण पळवू गेली । लोभे शूर्पणखे आली भुली।
ब्राह्मणांचें मांस खाऊ धांवली । तीते देखिली लक्ष्मणे ॥३२॥
निजसानिका विटंबिली । राक्षसांची समाप्ति जाली ।
शूर्पणखा ते विसरली । भक्षूं आली द्विजमांस ॥३३॥
जेंवीं का मत्स्य आमिषा गिळी । गळ ओढिलिया तो तळमळी ।
याहूनि शूर्पणखेसी भुली । भक्षूं आली द्विजमास ॥३४॥
बाप विषयांचे आवडी । नाठवती दुःखकोडी ।
विसरोनि मरणओढी । विषयगोडी वाढविती ॥३५॥
लक्ष्मणाने तिचे कान कापले :
तैसी शूर्पणखा जाण । भक्षूं धांवे ब्राह्मण ।
लक्ष्मणे सोडोनियां बाण । दोनी कान छेदिले ॥३६॥
करु नये स्त्रियेचें हनन । ते पाळिले श्रीरामवचन ।
तिचे छेदिता दोनी कान । पलायमान शूर्पणखा ॥३७॥
राक्षसस्त्रियांसह तिचे लंकेला विमानाने प्रयाण :
राक्षसपत्न्या सवे घेवोनी । शूर्पणखा बैसे विमानी ।
लंकाभुवन अनुलक्षोनी । जीव घेवोनी पळाली ॥३८॥
शूर्पणखा मुख्य विमानी । माशा घोंगाती नाकी कानी ।
सगें स्त्रियांची शंखध्वनी । आक्रंदोनी जल्पती ॥३९॥
स्त्रियांकडून शूर्पणखेचा धिक्कार :
येथे मारविल्या राक्षसथाटी । पुढे मारवील कोट्यनुकोटी ।
नकटी परतली उफराटी । रावणा संकटीं घालावया ॥४०॥
पहिली ख्याती नकटीची । नळी निमटिली खरादिकांची ।
आता नकटी जाली बुच्ची । उरी रावणाची केंवी उरे ॥४१॥
इणेंची वाढविली कळी । चवदा सहस्त्रां केली होळी ।
नकटी लागली राक्षसमूळी । रावण सकुळीं निर्दाळावया ॥४२॥
दुःख न समाये पोटी । रागे बोलती विरोधगोष्टी ।
रडतां जालिया हिंपुटी । तंव लंका दृष्टी देखिली ॥४३॥
जगाम परमोद्विग्ना लंकां रावणपालिताम् ।
सा ददर्श विमानाग्रे रावणं दीप्ततेजम् ॥२॥
उपोपविष्टं सचिवैर्मरुद्भिरिव वासवम् ।
आसीनं सूर्यसंकाशे कांचने परमासने ॥३॥
तिचा उद्वेग, लंकेस आगमन व रावणाची भेटः
लक्षोनिया लंकाभुवन । शिघ्रगती आले विमान ।
शूर्पणखा आली उद्विग्नमन । विरुद्धवचन स्त्रीवाक्यें ॥४४॥
रावण देखिला लंकाभुवनीं । जैसा इंद्र मरुदगणीं ।
तैसा परिवारित प्रधानीं । सिंहासनी शोभत ॥४५॥
ऐसा रावण देखता दृष्टी । देखिली नकटी शूर्पणखा ॥४६॥
तिचा रावणापुढे आक्रोश; तिचे विडंबन पाहून सर्वांस आश्चर्य :
शूर्पणखा स्वये आपण । दिर्घस्वरें करी रुदन ।
रावणाचे धरोनि चरण । मूर्च्छापन्न पति दुःखे ॥४७॥
ऐसा कोण महाबळी । नासिका छेदोनि समूळी ।
उघडी पाडिली दातांवळी । केली कर्णमूळीं बुचाट ॥४८॥
शूर्पणखेचें विटंबन । देखोनि गजबजिला रावण ।
प्रधासनसेना कंपायमान। चकित जन लंकेचे ॥४९॥
रावणाचे निजदळीं । शूर्पणखा महाबळीं ।
तेही विटंबिली समूळी ।
तेही विटंबिली समूळी । ऐसा आर्तुबळी तो कोण ॥५०॥
तिच्याकडून वृत्तांतकथन, रामाचे वर्णन व त्याने केलेला संहार :
तू ज्येष्ठ असता रावण । मज शूर्पणखे विटंबन ।
त्रिशिरा मारिला खर दूषण । रण कंदनें श्रीरामे ॥५१॥
चवदा सहस्र वीर अनिवर्ती । रामे मारिले वाणावर्ती ।
राक्षसांची जातिव्यक्ती । रणसमाप्ती श्रीरामे ॥५२॥
रणी राक्षसा रणसमाप्ती । वार्ता सांगावया पुरती ।
मी एक उरले प्रमदाजाती। रामे शास्त्रोक्तीं सोडिले ॥५३॥
श्रीरामशास्त्रार्थी सर्वज्ञ । करु नये स्त्रियेचें हनन ।
म्या छळितां रामलक्ष्मण । तेणे नाक कान छेदिले ॥५४॥
करिता पुढिल्यासी छळण । छळणें छळे स्वये आपण ।
ते मज जाले प्रमाण । विटंबन मुख्य मुखा ॥५५॥
छळें छळिले मी कैसी । मुख दाखवू नये कोणासी ।
श्रीरामाची ख्याती ऐसी । राक्षसांसी अंतक ॥५६॥
माझे घेवोनि नाक कान । द्विजा दिधले जनस्थान ।
ब्राह्मणी विमान घेता हिरोन । मी पळोन येथे आले ॥५७॥
श्रीराम निर्लोभी संपूर्ण । घेवोनिया जनस्थान ।
स्वये द्विजांसी दिधले वरदान । श्रीराममहिमान अगाध ॥५८॥
तिने रावणाला दिलेला धोक्याचा इशाराः
प्रतापतेजे श्रीरघुनंदन । तुझे घेवोनि लंकाभुवन ।
तेंही सवेंचि देईल दान । ऐसे चिन्ह दिसताहे ॥५९॥
तुझ्या राज्या आले विघ्न । गर्वे नेणसी तू अज्ञान ।
माझे ऐकोनि वचन सावधान हो वेगी ॥६०॥
ततःशूर्पणखां दृष्ट्वा वदंतीं परुषं वचः ।
अमात्यमध्ये संक्रुद्धः परिपप्रच्छ रावणः ॥४॥
कश्च रामः कथंवीर्यः किंरुपः किंपराक्रमः ।
किमर्थं दंडकारण्यं प्रविष्टश्च सुदुस्तरम् ॥५॥
त्यामुळे रावण अस्वस्थ :
ऐकता शूर्पणखेची गोष्टी । स्वयंवरीं देखिला श्रीराम दृष्टी ।
तो राम आठवितां पोतीं । थरकांप उठी रावणासी ॥६१॥
धनुष्यें घोळसिलें माते । ते भंगिले श्रीरघुनाथें ।
तै त्यासी बाळपण होते । आता पुरतें तारुण्य बाणले ॥६२॥
याचा तारुण्यबाणप्रताप । सहावया चवदा सहस्त्र अल्प ।
त्रिशिरा खर दूषण स्वल्प । महाकंप रावणा ॥६३॥
वार्ता वदतांची नकती । रावणे धाक घेतला पोटी ।
बाह्य लौकिकाचारदृष्टी । गर्जत उठी अति क्रोधे ॥६४॥
वरपांगी धैर्याचा देखावा करुन रामांची माहिती विचारतो :
माझी भगिनी प्रिय पूर्ण । दंडोनि केले विटंबन ।
श्रीराम कोठिला कओणाचा कोण । समूळ लक्षण सांग त्याचे ॥६५॥
कोण वीर्य़ कैसी शक्ती । किती सैन्य कोण सारथी ।
दंडकारण्यीं का केली वस्ती । आयुधे किती श्रीरामा ॥६६॥
त्रिशिरा आणि खर दूषण । मारावया काय कारण ।
तुझे का केले विटंबन । समूळ कथन मज सांगे ॥६७॥
इत्युक्ता राक्षसेद्रेण राक्षसी क्रोधमूर्च्छिता ।
रामें तस्मै यथातत्वमाख्यातुमुपचक्रमे ॥६॥
दिर्घबाहर्विशालाक्षश्चीरकृष्णाजिनाम्बरः ।
कंदर्पसमरुपश्च रामो दशरथातमजः ॥७॥
शक्रचापनिभं चापं विकृष्य कनकांगदम् ।
दिप्तान्क्षिपति नाराचान्सर्पानिव महाविषान् ॥८॥
आददानं शरान्घोरान्विमुंचतं महाबलम् ।
राक्षसां भीमवीर्याणां सहस्त्राणि चतुर्दश ॥९॥
निहतानि शरैस्तीक्ष्णैस्तेनैकेन पदातिना ।
अर्धाधिकमुहूर्तेन खरश्च सहदूषणः ॥१०॥
रावण जो का लंकानाथ । तेणे पुसिला श्रीरघुनाथ ।
त्याचे स्वरुप इत्यंभूत । असे सांगत शूर्पणाखा ॥६८॥
शूर्पणखेने केलेले रामाचे वर्णन :
शूर्पणखा व्यथामृत । विटंबिली क्रोधयुक्त ।
श्रीरामाचे निजवृत्त । असे सांगत यथान्वये ॥६९॥
श्रीराम श्याम अति सुंदर । रमारमणीय मनोहर ।
सुस्वरुप सुखसार । ब्रह्म साकार श्रीराम ॥७०॥
कमलनयन कमलपत्र । सुखैकघन श्रीरामवक्त्र ।
मुख देखिल्या निवती नेत्र । सुखशृंगार श्रीराम ॥७१॥
जटा मुकुट मनोहर । चीरकृष्णजिनांबर ।
आजानुबाहु धनुर्धर । बाणतूणीर अक्षय्य ॥७२॥
कर्पूरयुक्त पिंवळा टिळा । कर्णी कुंडले कमळमाळा ।
कांसे मिरवे सोनसळा । वीर मंगळ श्रीराम ॥७३॥
ध्वजवज्रांकुशरेखा । दोही पायी पद्में देखा ।
पाउले सुकुमार रघुकुळटिळका । अति नेटका पदांबुजें ॥७४॥
सावळे अंगी सुभ्र उटी । ते देखता न पुरे दृष्टी ।
मना नयना आनंदकोटी । वीर जगजेठी श्रीराम ॥७५॥
अंगी खुपती चंद्रकर । ऐसा श्रीराम अति सुकुमार ।
रणरंगी रणरंगधीर । परशूराम श्रीराम ॥७६॥
शक्रचापासम चाप । सुवर्णभूषणीं भासें सद्रूप ।
श्रीरामाचा निजप्रताप । सत्यसंकल्प श्रीराम ॥७७॥
पाहता श्रीरामाचे रुप । कोटी कंदर्पां हरे दर्प ।
लावण्याचा परम दीप । सुखस्वरुप श्रीराम ॥७८॥
केव्हा ओढी केव्हा जोडी । केव्हा बाण सवेग सोडी ।
मारिल्या राक्षसांच्या कोडी । रणनिर्वडी श्रीराम ॥७९॥
श्रीरामासी नाही रथ सारथी । नाही सैन्य साह्यसंपत्ती ।
श्रीराम एकला एक पदाती । राक्षसघाती अंतक ॥८०॥
त्रिशिरा खर दूषण शूर । अनुवर्ती चवदा सहस्त्र ।
श्रीराम न घेता दुसरे शस्त्र । केला संहार बाणग्रें ॥८१॥
पुरुषाची जातिव्यक्ती । रणी श्रीरामे केली समाप्ती ।
बोंब सांगावया पुरती । तुम्हांप्रती मी आले ॥८२॥
जैसा सांगितला श्रीरामचंद्र । तैसाचि सखा सौमित्र ।
तोही रणरंगधीर । परमशूर अति योद्धा ॥८३॥
समान बळ समान शीळ । दोघे समानरुपे निर्मळ ।
दोघे सर्वार्थीं अति कुशळ । दोघे प्रबळ रणमारा ॥८४॥
प्रतिपाळावया पितृवचन । दोघीं सेविले दंडकारण्य ।
सवे सीता सती जाण । बळवाहन पै दोघे ॥८५॥
लक्ष्मण श्रीरामाचा भक्त । अनन्यभावें उठविलें ठाणें ।
तुम्ही काय जिता जिणें । करा धांवणे ससैन्य ॥८७॥
धांवणे करु जाता खर । मारिले चवदा सहस्त्र वीर ।
तैसी येथे मी नव्हे पामर । श्रीरामचंद्र नाटोपे ॥८८॥
ते ऐकून रावणाची प्रतिक्रिया :
ऐसे विचारोनि रावणे । नाही केले धांवणे ।
शूर्पणखेचें गार्हाणे । जीवे प्राणें उपेक्षिले ॥८९॥
देखोनि रावणाचे चिन्ह । शूर्पणखा अति उद्विग्न ।
प्रलोभावया त्याचे मन । काममोहन प्रतिपादी ॥९०॥
रामस्य तु विशालाक्षी धर्मपत्नी यशस्विनी ।
सीता नाम वरारोहा पूर्णेदुसद्दशानना ॥११॥
नैव देवी न गंधर्वी न यक्षी नैव किंनरी ।
तथारुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥१२॥
या सुशीला वपुःश्लाघ्या रुपेणाप्रतिमा भुवि ।
तवानुरुपा भार्या सा त्वं च तस्याः पतिर्वरः॥१३॥
शूर्पणखेने हेतुपूर्वक केलेले सीतेचे रुपवर्णन :
श्रीरामापासीं सीता सुंदरी । तैसी नाही दुसरी नारी ।
मज पाहता या चराचरी । तिची सरी न पवती ॥९१॥
रमा उमा न पवे सरी । तेथे कोण पुसे सावित्री ।
देवी गंधर्वी ना असुरी । तिच्या घवकारीं खद्योत ॥९२॥
पद्मिनी स्त्रिया मृदुशरीर । त्यांहूनी तिचीं नखे अरुवार ।
ऐसी सुंदर सुकुमार । मनोहर जानकी ॥९३॥
ठाणमाण गुणलक्षण । घवघवित निजलावण्य ।
तिचे देखतांचि वदन । मूर्च्छापन्न कंदर्प ॥९४॥
वर्तुळ वदन विशाळ नयन । देखता जाय भूक तहान ।
तिचे देखता बरवेपण । मनमोहन विरक्तां ॥९५॥
सीता देखता सौभाग्ययुक्त । फिकें होय पंचामृत ।
तीपासोनि न उठे चित्त । लोलंगत तत्कामें ॥९६॥
तिचे देखता श्रीमुख । मनाची खुंटे चकमक ।
लगे टकमक डोळिया ॥९७॥
श्रीराम वनवासी । वीतराग योगी । सीता न शोभे त्याचे अंगी ।
ते तंव भार्या तुजजोगी । तीसीं तू भोगी लंकानाथा ॥९८॥
ते तुवा देखिलियापाठीं । सत्य मानिसी माझी गोष्टी ।
ते पडावी तुझ्या दृष्टी । हे माझ्या पोटी वर्तत ॥९९॥
बुद्धिपूर्वक आपण । सीता पहावी अनर्घ्य रत्न ।
तेव्हा मानिसी माझे वचन । साक्षेपे प्रयत्न करशील ॥१००॥
सीता सांगता शूर्पणखेसीं । स्वयंवरीं देखिली होती जैसी ।
चांफेगोरटी लावण्यराशी । तैसी मानसी ठसावली ॥१॥
ततः शूर्पणखावाक्यं शृत्वा तद् रोमहर्षणम् ।
सचिवानभ्यनुज्ञाय जगाम स्वं निवेशनम् ॥१४॥
मत्कायार्थ विदित्वा च यथावदुपलभ्य च ।
दोषाणां च गुणानां च संप्रधार्य बलाबलम् ॥१५॥
इति कर्तव्यमित्येव कृत्वा निश्चयमात्मनः।
स्थिरबुद्धिस्ततो रम्यां यानशालां जगामह॥१६॥
रावणाची अवस्था :
ऐकता शूर्पणखेचे वचन । आणि होता सीतेची आठवण ।
शरीरी रोमांचित रावण । लागले ध्यान सीतेचे ॥२॥
करिता गमनागमन । सीतामय त्याचे मन ।
करिता भोजन शयन । अखंड ध्यान सीतेचे ॥३॥
रावण निजल्या शेजेवरी । स्वप्नीं देखे सीता सुंदरी ।
तिची अवस्था लागली थोरी । कैसिया परी आतुडे ॥४॥
श्रीराम प्रतापी परिपूर्ण । त्यासी न करवे मज रण ।
तरी त्यासी करोनिया छळण । सीता आपण आणावी ॥५॥
छळोनियां रघुनंदना । त्यासी आणावी अंगना ।
कळूं देऊं नये जना । गोष्टी प्रधाना सांगू नये ॥६॥
मग विसर्जोनियां सभास्थाना । रावण आला निजभुवना ।
सीताप्राप्तीची विवंचना । निजमना विवंची ॥७॥
भावी कार्याची दिशा निश्चित करुन मारीचाकडे प्रयाण :
निद्रा न लागे शेजेआंत । आता सारथि पाचारुं त्वरित ।
पिशाचखरीं योजिला रथ । निघे लंकानाथ मारीचापासीं ॥८॥
मारिचरावणा भेटी गोष्टी । मायामृगाची कामिकदृष्टी ।
दोघे येती पंचवटीं । सीतागोटीहरणार्थ ॥९॥
लागता श्रीरामाचा बाण । मारीच पावेल मरण ।
मरतामरता करील छळण । धांव लक्ष्मणा गर्जोनी ॥११०॥
मोडोनि धनुष्येंसीं रथा । जटायु जिणोनि लंकानाथा ।
त्यापासोनि सोडवील सीता । अपूर्व कथा अवधारा ॥११॥
एकाजनार्दना शरण । पुढे अपूर्व निरुपण ।
कथाकल्पषविध्वंसन । सावधान अवधारा ॥१२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखारावणसंवादो नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ ओंव्या ११२ ॥ श्लोक १६ ॥ एवं १२८ ॥
