॥ श्रीएकनाथमहाराजकृत
19.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय एकोणिसावा ॥
श्रीरामांचा सीताशोक
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सीतेवर राक्षसिणींचा पाहारा असतो त्याचे वर्णन :
अशोकवनी सीतेपासी । दुष्ट दुर्धर राक्षसी ।
रावण ठेवी भेडसावयासी । भयें आपणासी वश होईल ॥१॥
अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिती ।
तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः परिवारिता ॥१॥
सीतासंरक्षणीं नित्यवासी । विकटा विकृता समयेंसी ।
विरुपा विक्राळा राक्षसी । अशोकवनासी त्या आल्या ॥२॥
नानारुपा नानाकारा । विक्राळा कराळा अति उग्रा ।
भिंगुलवण्या भयासुरा । आल्या समग्रा सीतेपासीं ॥३॥
एकीचें विक्राळ वदन । सर्वांगासी एकचि कान ।
तीसी कानचि आच्छादन । येरवी नग्न कराळी ॥४॥
लागता कानाचा फडकारा । नक्षत्रे पडती जैशा गारा ।
जयाचे भय सुरसुरा । सीतेसी भेदरा देऊं आल्या ॥५॥
एकींचे उटकंटक कपाळा । थडक हाणिती लोकपाळां ।
कपाळावरी विकट डोळा । जनकबाळा छळू आल्या ॥६॥
एकींस एक कान आंथरुण । दुसरा कान तो प्रावरण ।
कानें कापती त्रिभुवन । सीतेसी छळण करु आल्या ॥७॥
एकी स्तनायुधा दुर्धरा । एकैक थान गांवें बारा ।
स्तनघातें मारी असुरां । सीतेसी भेदरा देऊ आली ॥८॥
भ्यासुर मुख दीर्घ दांताळी । दांतीं दिग्गजा करी रांगोळी ।
वीर निर्दाळी दांतांतळीं । सीतेजवळी भय दावी ॥९॥
एकीचे केश सलंव पूर्ण । तेंचि नेसणें तेंची पाघरुण ।
केश तिखट जैसे बाण । केशाभेणें जग पळे ॥१०॥
अजामुखी गजमुखी । सिंहश्वानशूकरमुखी ।
व्याघ्रवानरतरसमुखी । घोडमुखी विक्राळा ॥११॥
खरोर्ष्ट्रवक्त्रा सलंब ओष्ठ । होटें प्राण्याचा भरिती घोट ।
अवघ्या आलिया सीतेनिकट । भय उद्भट दावावया ॥१२॥
विक्राळ मुख दीर्घ चांभाडी । कंटकी जिव्हा तांबडी ।
ते देखता प्राणी प्राण सांडी । भक्षी मडीं राक्षसांची ॥१३॥
राक्षस भक्षिती मनुष्यांसी । विक्राळा भक्षिती राक्षसांसी ।
तिसी रावण धाडी सीतेपासी । भयें आपणासी वरावया ॥१४॥
वांकडें मुख दीर्घ नाक । तेंही लांबवावें विशेख ।
जिचे श्वासावर्ती जग देख । शतानुशतक तळमळत ॥१५॥
नाकींचिया केसांआंत । म्हैसे गुंतले ओरडत ।
सिंह गुंतले तडफडित । गजावर्त विकटास्या ॥१६॥
नखायुधा क्रूरमुख । सलंब नखे अति तिख ।
तींही लांब क्रोश एक । इंद्रादिक कांपती ॥१७॥
नखाघात अति उद्भट । घाये शस्त्र करी पीठ ।
नखे पर्वत करी सपाट । दुर्धर दुष्ट नखायुधा ॥१८॥
एकपादा आणि त्रिपादा । पंचपादादि हस्तपादा ।
शस्त्रास्त्रीं सन्नद्धबद्धा । आलिया उन्मादा राक्षसी ॥१९॥
वाल्मीकरामायणाप्रती । राक्षसी बोलिल्या आहेत बहुती ।
तो विस्तारु न धरवे हाती । कथा ग्रंथीं वाढेल ॥२०॥
पुढील कथेची संगती । कृपा करावी साधुसंती ।
स्वये रावण राक्षसीप्रती । काय उपपत्ति बोलिला ॥२१॥
तथा च तर्जनैर्घोरैः पुनः सांत्वेश्च मैथिलीम् ।
आनयध्वं मम वशे वन्यां गजवधूमीव ॥२॥
रावण सांगे राक्षसीसी । दुर्धर भेडसावा सीतेसी ।
गर्जन तर्जन अति आवेशी । अट्टहासेंसीं गर्जोनी ॥२२॥
ऐसे करावे गर्जन । तिचे चळकांपे मन ।
अत्यंत होवोन उद्विग्न । मूर्च्छापन्न भयभीत ॥२३॥
सुखे वरीन मी रावण । ऐसे बोले जंव आपण ।
तंववरी भय दाविजे संपूर्ण । जंव शरण मज होय ॥२४॥
सीतेला भीती निर्माण करण्याची राक्षसिणींना आज्ञा :
मज आलिया अनन्यशरण । तिसी करावे सुखशांतवन ।
सीते तुझे भाग्य धन्य । जे दशानन तुज कांत ॥२५॥
ऐसे सांगोनि तयांसी । धाडिल्या अशोकवनासी ।
वश जालिया सीतेसी । आणावी गजरेंसीं मजपासीं ॥२६॥
मग राक्षसी मिळोनि समस्ती । कोइत्या मुद्गल त्रिशूळ हाती ।
आल्या अशोकवनाप्रती । हाक देती दुर्धर ॥२७॥
हाकीं गर्जले अंबर । स्वर्गी कांपती सुरवर ।
भूतळीं गर्जती नर किन्नर । ऋषीश्वर भयभीत ॥२८॥
राक्षसी करिती दीर्घ रवो । सीता मारोनि मांस खावो ।
तुझे कंठीचें रुधिर पिवों । आणि हार लेवों हाडांचें ॥२९॥
तुझे सर्वांगचिया शिरी । करु शेवयांची खिंरी ।
काळी काढोनि बाहेरी । कोशिंबिरी करु आम्ही ॥३०॥
ऐशिया गर्जती राक्षसी । अवघ्या आल्या सीतेपासीं ।
तंव ते भय भासेना सीतेसी । श्रीरामस्मरणें निःशंक ॥३१॥
देखता सीतेचे दर्शन । राक्षसी झाल्या कंपायमान ।
सीतेनें पाहिल्या क्षोभोन । आमचा प्राण घेईल ॥३२॥
सीता देखतांचि दृष्टी । भयें पळाल्या उठाउठी ।
राक्षसी भयभीत पोटी । गोष्टी उफराटी येथे जाली ॥३३॥
सर्व प्रयत्न वाया गेल्यामुळे दुःख :
भेडसावूं जाता सीतेसी । भयभीत जाल्या राक्षसी ।
श्रीरामस्मरणाचा महिमा ऐशी । द्वंद्व भक्तांसी बाधीना ॥३४॥
मग रावणा सांगती निशाचरी । सीता आमुचे भय न धरी ।
आम्हा सीतेचे भय भारी । सर्वांपरी निःशंक ॥३५॥
तंव रावण म्हणे सती सीता । निःशंक निधडी पतिव्रता ।
हे मज भोगवेना सर्वथा । कष्ट वृथा गेले माझे ॥३६॥
राम व लक्ष्मण आश्रमाकडे येतेवेळी त्यांना मार्गांत अपशकुन होतात :
तंव येरीकडे श्रीराम सौमित्र । दोघे होवोनि एकत्र ।
आश्रमी एकली सीता सुंदर । दोघे सत्वर निघाले ॥३७॥
व्रजतस्तत्र तस्याथ वामलोचनमस्फुरत ।
प्रास्फुरच्चास्खलद्रामो वेपथुश्चास्य जायते ॥३॥
उपालभ्य निमित्तानि सोऽशुभानि मुहुर्महुः ।
अपि सीताश्रमे सा स्याद्व्याजहार पुनःपुनः ॥४॥
सीतेचे भेटीस जाता जाण । अशुभ लवें वाम नयन ।
पदोपदीं रघुनंदन । अडखळे आपण क्षणक्षणां ॥३८॥
सौमित्रा ऐके सावधान । अशुभ होताती अपशकुन ।
आजि सीतेचे दर्शन । केंवी देखो हे न कळे ॥३९॥
लक्ष्मणा एकली सीता । आश्रमी असेल काय आता ।
वारंवार होय् पुसता । प्रबळ चिंता सीतेची ॥४०॥
आश्रमात सीतेला एकटी ठेवून आल्याबद्दल लक्ष्मणाला दोष :
आश्रमी एकली सीता सांडोनी । का येथे आलासी धांवोनी ।
हरोनि नेतां राक्षसी पत्नी । कोण तिजलागोनी सोडवील ॥४१॥
स्त्रियेच्या क्षुद्र बोलासाठीं । त्वा का रागे सोडिली पंचवटी ।
सीता हरील रावण हट्टी । बुद्धि खोटी तुवा केली ॥४२॥
अशुभ होताती अपशकुन । तेणे मी अत्यंत उद्विग्न ।
सीता मागुती देखेन । हे सहसा मन मानीना ॥४३॥
ददर्श पर्णशालां च सीतया रहितां तदा ।
श्रिया विरहितां ध्वस्तां हेमंते पद्मिनीमिव ॥५॥
रुदंतमिव वृक्षैश्च ग्लानपुष्पमृगद्विजम् ।
श्रिया विहीनं विध्वस्तं संत्यक्तं वनदेवतैः॥६॥
पंचवटीत कोठेच सीता आढळेना म्हणून सर्वत्र शोधाशोध :
ऐशा मार्गी करिता गोष्टी । दोघे आले पंचवटी ।
सुंदर कपाळेशानिकटीं । सीता गोरटी दिसेना ॥४४॥
शोधोनि पाहिली पंचवटी । शोधिली उभय गंगातटी ।
वनी धुंडिता परम कष्टीं । जाले जगजेठी अति श्रांत ॥४५॥
दोघे आले पंचवटीं । तंव रिती दिसे पर्णकुटी ।
जनी वनी हिंडतां दृष्टी । सीता गोरटी दिसेना ॥४६॥
जरी शुद्धि पुसावी ऋषिजनी । तरी ते पळाले जीव घेवोनी ।
मनुष्यमात्र न दिसे वनी । तंव लक्ष्मण मनी धाकत ॥४७॥
श्रीराम धाकत होता पोटी । तेचि येथे घडली गोष्टी ।
अपेशपात्र जालो सृष्टी । लक्ष्मणापोटी अति चिंता ॥४८॥
लक्ष्मणे हारविली सीता । हे अपेश बैसलें माथा ।
काय मी सांगों रघुनाथा । शोधिता सीता दिसेना ॥४९॥
शुद्धि पुसों जाता वनी । तव वृक्ष खांकरले फळपुष्पांनीं ।
जेंवी अंतरल्या जननी । दीनवदनी अपत्यें ॥५०॥
वृक्ष स्रवती संपूर्ण । पशु पक्षी करिती रुदन ।
वनश्री गेली पळोन । अवदशा पूर्ण वना आली ॥५१॥
पक्षिणी पडल्या पारधियाहाती । पिल्लीं चरफडती फडफडितीं ।
तेंवी नेलिया सीता सती । जाली उपहती आश्रमी ॥५२॥
सीतेचेनि दुःखे जाण । सर्वांगी द्रवती पाषाण ।
थेंबटे गाळो लागले तृण । दुःख दारुण सर्वांसी ॥५३॥
ऐसी देखोनि उपहती । श्रीराम सुखावला चित्ती ।
करावया अवतारख्याती । निजपुरुषार्थी उद्दतु ॥५४॥
रामाचा अनावर क्रोध :
सज्ञान माझी सीता सती । जे ससैन्य रावणवधार्थी ।
स्वये गेली लंकेप्रती । राक्षसा ख्याती लावावया ॥५५॥
समुद्री तारुन पाषाण । मारीन रावण कुंभकर्ण ।
श्रीरामा आले स्फुरण । कुळनिर्दळण राक्षसांचे ॥५६॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । सोडवीन देवांची बाधवडी ।
रामराज्याची निजगुढी । जगी रोकडी उभवीन ॥५७॥
ऐसा श्रीराम सर्वज्ञ । जाणोनि भविष्याचें ज्ञान ।
सीतासुद्ध्यर्थ आपण । भ्रमलेपण स्वये दावी ॥५८॥
जैसी अवताराची गती । तैसी अवताराची स्थिती ।
श्रीराम निघाला तैसियां रीती । सीताशुद्ध्यर्थी विलापत ॥५९॥
श्रीराम अवतार सुनिश्चित । त्यासीही लोकसंग्रहार्थ ।
वसिष्ठे नेमिला परमार्थ । तेंचि रघुनाथ संपादी ॥६०॥
अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडः ।
अंतरत्यागी बहिःसंगी लोके विहर राघव ॥७॥
बहिः कृत्रिमसंरंभो हृदि संरंभवर्जितः ।
अकर्ता च बहिःकर्ता लोके विहर राघव ॥८॥
अंतर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखो हि वा ।
बहिस्तप्तोंऽतराशीतो लोके विहर राघव ॥९॥
श्रीरामांची मानसींची भूमिका :
अंतरी जाणोनी परब्रह्म । बाह्य सीतार्थी विरहभ्रम ।
अंतरी स्वतःसिद्ध निष्काम । बाह्य दुःखधर्म सीताशुद्धि ॥६१॥
अंतरी अद्वैतप्रतीती । बाह्य सीता पुसे जीवांप्रती ।
वृक्षवल्लींस ये काकुळती । सीता निश्चिती मज सांग ॥६२॥
अंतरी निजबोध अति गोड । बाह्य सीतादुःखे अति जड ।
अंतरी निर्विषय सुरवाड । बाह्य धुमाड विषयांचा ॥६३॥
अंतरी अद्वैत्वें सर्वत्यागू । बाह्य सीतेसी विषयसंगू ।
अंतरी सुनिश्चित चांगू । बाह्य लगबगू धांवण्या धांवे ॥६४॥
अंतरी अणुमात्र नाही चाड । बाह्य सीतार्थी अति चरफड ।
अंतरी निजसुखसुरवाड । बाह्य दुर्वाड अति दुःखी ॥६५॥
अंतरी नित्य नैराश्य । बाह्य सीतेचा आशापाश ।
तिचेनि दुःखे अति संत्रास । पिशाचभास जगी दावी ॥६६॥
अंतरी संतापनिवृत्त । बाह्य संतापें अति संतप्त ।
अंतरी सर्वार्थनिर्मुक्त । बाह्य विषयासक्त सीतार्थी ॥६७॥
अंतरी भूतकृपा चोखडी । बाह्य युद्धार्थ पुरुषार्थपरवडी ।
मारोनि राक्षसांच्या कोडी । गजकरवडी पाडितु ॥६८॥
अंतरी बोध अकर्त्रात्मता । बाह्य दिसे युद्धकर्ता ।
मारोनि राक्षसा समस्ता । लंकानाथा निर्दळील ॥६९॥
सदगुरु वसिष्ठाचे युक्ती । श्रीराम वर्ते निजात्मस्थिती ।
हे न कळे लोकांप्रती । श्रीराममूर्ति परब्रह्म ॥७०॥
वाल्मींकमुनीचें भाषित । सत्य करावया श्रीरघुनाथ ।
विलपत सीताशुद्ध्यर्थ । स्वये बोलत ते ऐका ॥७१॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । वेगी बोलावी सीतेसी ।
माझी आज्ञा का न मानिसी । तुज काय तिसी अबोला ॥७२॥
तू तंव सीतेसी क्षोभलासी । रागे तिसी न बोलसी ।
तरी मीच पाचारितो तिसी । अतिसंभ्रमेंसीं अनुवादे ॥७३॥
कि धावसि प्रिये दूरं दृष्टासि कमलेक्षणे ।
वृक्षेणावृत्य चात्मानं कस्मान्न प्रतिभाषसे ॥१०॥
तिष्ठ तिष्ठ वरारोहे न तेऽस्ति करुणा मयि ।
नात्यर्थं हास्यशिलासि किमर्थ मामुपेक्षसे ॥११॥
सीतेसाठी शोक व करुणाद्र चित्तः
मी तुज देखतो वो सुंदरी । तू का पळतेसी दुरिचे दुरी ।
रिघोनि वृक्षगुल्मांमाझारीं । नेत्रोंतरी का लपसी ॥७४॥
उभी वो राहे येथे । तू जाशील जेथे जेथे ।
मी येईन तुजसांगाते । सांडोनि माते जाऊ नको ॥७५॥
मृगकंचुकीसाठीं । मजसी रुसलीसी गोरटी ।
मज न देसी दृष्टिभेटी । माझी गोष्टी का नाइकसी ॥७६॥
माझे सेवेची तुझ आवडी । मज न विसंबसी अर्धघडी ।
ते तू आजि कडोविकडी । वृक्षाबुडीं का लपसी ॥७७॥
मृग मारोनि मज येता । विलंब लांगता तत्वता ।
तेणे क्षोभ जाला चित्ता । क्षमा सर्वथा मज करी ॥७८॥
लक्ष्मण न करी तुझे वचन । तेणे जालीस क्षोभायमान ।
तदर्थीं माझे लोटांगण । क्षमा पूर्ण मज करी ॥७९॥
कृपेनें मज द्यावी भेटी । सांगे जीवींची गुजगोष्टी ।
तू एकाकी गोरटी । वन दिक्पुटीं का जासी ॥८०॥
तुजलांगीं मी आर्तभूत । तुझे का वो निष्ठुर चित्त ।
कृपेनें येवोनियां येथ । माझे आर्त पुरवावे ॥८१॥
ऐसेनि न भेटे निजकांता । वृक्षवल्लीतें होय पुसतां ।
पशुपक्ष्यादि समस्ता । पुसे सीता श्रीराम ॥८२॥
तुम्ही न बोला सकोपता । तुमचे चरणी माझा माथा ।
केउती आहे माझी सीता । मज तत्वता सांगावी ॥८३॥
देखोनि पर्वत पाषाण । श्रीराम घाली लोटांगण ।
तुम्ही तरी कृपा करुन । सांगावी आपण सीताशुद्धि ॥८४॥
ऐसी न देखता सीता । श्रीरामासी परम चिंता ।
लक्ष्मणासी होय सांगत । गता मृता जानकी ॥८५॥
अव्रवील्लक्ष्मणं दीनो मुखेन परिशुष्यता ।
हता मृता गता सीता भक्षिता वा तपस्विनी ॥१२॥
वाटेत सीतेचा शोध व रामांचा विलाप :
श्रीराम म्हणे सीता एकली । राक्षयभये पळोन गेली ।
किंवा आपभयें निमाली । अथवा मारिली राक्षसी ॥८६॥
राक्षसी सीता मारुन । स्वेच्छा केले भक्षण ।
ऐसे बोलोनि रघुनंदन । मुर्च्छापन्न अति दुःखी ॥८७॥
सीता सीता म्हणता वेळोवेळां । वाळले ओंठ सुकला गळा ।
अश्रु पूर्ण आले डोळा । जनकबाळ केउती आहे ॥८८॥
मूर्च्छापन्न मूर्च्छे आंत । हाय हाय सीता म्हणत ।
सीताविरहे श्रीरघुनाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥८९॥
पडे अडखळे उठे बैसे । सीता सीता म्हणे आवेशें ।
सीताविरहे लागले पिसे । क्षणक्षणां पुसे जानकी ॥९०॥
क्व गता मां परित्यक्त्वा हा सीतेति पुनःपुनः ।
इत्येवं विलापंरामः पर्यधावव्दनाव्दनम् ॥१३॥
क्वचिदुद्भ्रमते योगात्क्वचिद्विभ्रमते बलात् ।
क्वचिनमत्त इवाभाति कांतान्वेषणतत्परः॥१४॥
क्वचित्स्खलन्क्वचिव्दीक्षन्क्वचिद्धावन्क्वचित्पतन् ।
उच्चैनीचैश्च विक्रोशन्सीता सीतेति वा वदन् ॥१५॥
चराचर सृष्टीलाच सीतेविषयी पृच्छा :
आता काय सीतेची आशा । म्हणोनि धांवे दाही दिशा ।
सीतेलागीं झाला पिसा । अति आक्रोशे विलपत ॥९१॥
हा हा सीते हा हा सीते । म्हणोनि पाहे सभोवतें ।
न देखोनिया सीतेते । वनी वनातें परिभ्रमे ॥९२॥
कोठे अडखळे कोठे उडे । कोठे रडे कोठे पडे ।
सीताविरहे जाले वेडें । पाहे चहूंकडे जानकी ॥९३॥
सीता सीता म्हणोनि देखा । अति आक्रोशे मारी हाका ।
लक्ष्मणा तू माझा सखा । उगाचि तू का पाहतोसी ॥९४॥
सीते वेगी तू धांव पाव । अति संभ्रमेंसीं देई खेंव ।
मी गर्जोनि घेतों नांव । माझी करुणा का हो नुपजेचि ॥९५॥
का रुसलील्स सांगतिणी । म्हणोनि आंग टाकी धरणी ।
सवेंचि धांवे उन्मत्तपणीं । वनी काननीं गिवसित ॥९६॥
तस्य शैलस्य सानूनि गुहाश्च शिखराणि च ।
प्रयत्नेन विचिनवतौ नेव तामधिजग्मतुः ॥१६॥
विचिंत्य सर्वतः शैलं रामो लक्ष्मणमव्रतीत् ।
न तां पश्यामि सौमित्रे वैदेहीं पर्वते शुभाम् ॥१७॥
दर्या दरकुटें पर्वतशिखरें । गिरिगव्हरें गुहाकंदरें ।
शोधिता श्रीरामसौमित्रें । सीता सर्वत्र दिसेना ॥९७॥
श्रीराम म्हणे सौमित्रासी । शोधिता पर्वत देशोदेशीं ।
सीता न भेटे आम्हांसी । शुद्धि कोणासी पुसावी ॥९८॥
शुद्धि पुसावया जाण । हे केवळ वन विजन ।
शोधिता न भेटे जन । काय आपण करावे ॥९९॥
ऐसे बोलता श्रीरघुनाथा । सीताविरहे संभ्रांतता ।
पुसों धांवे तो पर्वत । पर्वतामाथां वृक्षांसी ॥१००॥
रे वृक्षाः पर्वतस्था गिरिगहनलता वायुना विज्यमाना ।
रामोऽहं व्याकुलात्मा दशरथतयः शोकवृत्तश्च दग्ध ।
बिंबोष्ठी चारुनेत्रा सुविपुलजघना वद्धरत्नाढ्यकांची ।
हा सीता केन नीता मम हृदयगता को भवान्केन दृष्टा ॥१८॥
पर्वताग्रीं वृक्ष हो । तुम्ही दुरीं देखता पाहाहो ।
तरी माझ्या हृदयींचा संदेहो । निःसंदेहो तुम्ही करा ॥१॥
म्हणाल तू कोण कोणाचा । तरी मी राम दशरथाचा ।
सीतावियोगविरहाचा । अति दुःखाचा पर्वत ॥२॥
सीता म्हणाल आहे कैसी । तिचिया निजस्वरुपासी ।
मी सांगेन तुम्हांपासीं । यथार्थेसी सुचिन्हे ॥३॥
आरक्त नेत्र आरक्त अधर । सुंदर सुनासिका सुकुमार ।
कटी रत्नाढ्य कुटिसूत्र । पीतांबरधर जानकी ॥४॥
ऐसिया लावण्याची खाणी । तुम्हांमाजी देखिली कोणी ।
ते सांगावी मजलागोनी । तिची धांवणी मी करीन ॥५॥
वायूनें वृक्षपल्लव डोलती । श्रीराम म्हणे मज वृक्ष बोलाविती ।
ऐसे म्हणोनिया तयांप्रती । धांवोनि वेगवृत्तीं स्वये जाय ॥६॥
तेथे न भेटतां सीता । परम दुःख श्रीरघुनाथा ।
मूर्च्छित पडे मागुता । हा हा सीता विलपत ॥७॥
सीता न सांगती पर्वत । तेणे क्षोभला श्रीरघुनाथ ।
भस्म करावया गिरी समस्त । धनुष्या हात घातला ॥८॥
धनुष्य लावोनियां गुण । गुणीं लाविला वज्रबाण ।
तंव लक्ष्मणे धरिले चरण । विरुद्ध आपण न करावे ॥९॥
निरपराध हे पर्वत । यांचा करु नये घात ।
शांत करोनि श्रीरघुनाथ । पुढे वनांत चालिले ॥११०॥
इमे लक्ष्मण वैदेह्यास्तपनीये विभूषणे ।
जपापुष्पनि काशैश्च चित्रक्षत जबिन्दुभिः ॥१९॥
मन्ये लक्ष्मण वैदेही राक्षसैः कामरुपिभिः ।
नीत्वा च्छित्वा विभक्ता वा भक्षिता वा तपस्विनी ॥२०॥
मार्गात सोन्याचा अलंकार दिसतो :
मार्गी जाता रघुनंदन । देखे सीतेचे सुवर्णभूषण ।
लक्ष्मणा धांव म्हणोन । सीता येणे मार्गे नेलीसे ॥११॥
आतं माग लागला खरा । धांवणे करु सौमित्रवीरा ।
तंव रक्तांकित देखोनि धरा । श्रीरामचंद्रा अति चिंता ॥१२॥
कपटरुपें राक्षसी । येथवरी आणोनि सीतेसी ।
छेदोनी मारोनी तिसी । विभागेंसीं भक्षिली ॥१३॥
गेले सीतेऐसें रत्न । अति दुःखित श्रीरघुनंदन ।
तंच पुढे देखतसे आपण । महारण वीरांचें ॥१४॥
रपोपकरणं सर्व विध्वस्तं धरणीतले ।
मुक्तामणिनिभं दिव्यं तपनीयविभूषितम् ॥२१॥
पतितं भुवि पश्य त्वं भ्रातःसौम्य महाद्भुतम् ।
विशालं पतितं भूमौ कवचं यस्य कांचनम्॥२२॥
जरासे पुढे चालून गेल्यावर मोडलेले धनुष्य, रथ, छत्र, भाता व बाण इत्यादी आढळते :
ते रणभूमी अवलोकिंता नयनी । धनुष्य भंगिले हेमाभरणी ।
कवच पाडिले दिसे धरणी । मुक्ताभरणीं लखलखित ॥१५॥
रथ भंगिला सचक्र । मारिले पिशाचवदन चर ।
दंडभंगें पाडिलें छत्र । युद्ध विचित्र वीरांचें ॥१६॥
सतूणीर विखुरलें बाण । मुकुट पाडिला देचीप्यमान ।
थोर जाले रणकंदन । सीता संपूर्ण मारिली ॥१७॥
सीता अतिशये सुंदर । नितनिमित्त निशाचर ।
भिडिन्नलें परस्पर वीर । युद्ध दुर्धर तयांचे ॥१८॥
ऐसिया युद्धसंकटीं । सीता मारिली गोरटी ।
राक्षस तंव महाकपटी । मांसासाठी मारिली ॥१९॥
सीता मारिली राक्षसी । काय मुख दावू अयोध्येसी ।
काय सांगों जनकापासी । क्षत्रियधर्मासी हे लाज ॥१२०॥
किंनु लक्ष्मण वक्ष्यामि समेत्य जनकं वचः ।
मातरं चैव वैदेह्या विनतामहमप्रियम् ॥२३॥
काय सांगो सीतेचे मातेसी । काय सांगों निजजनन्यांसी ।
सीता हरविली वनवासी । काय सुहृदांसी मी सांगो ॥२१॥
लाज लागली यशःकीर्तीसी । लाज लागली क्षात्रवृत्तीसी ।
लाज लागली मज मानसी । सीता वनवासी हरविली ॥२२॥
लाजविला निजपुरुषार्थ । स्वर्गी लाजेल श्रीदशरथ ।
लाज जाली तिही लोकांत । तेणे श्रीरघुनाथ क्षोभला ॥२३॥
सुमित्रा पाहेंआंगवण । म्हणोनि घेतलें धनुष्य़बाण ।
सीतेनिमित्त पै जाण । वाणे निर्दळीन तिन्ही लोक ॥२४॥
तमुवाच ततो रामश्चित्र विस्फार्य कार्मुकम् ।
अरक्षसीमिमां लंका जगत्पश्याद्य लक्ष्मण ॥२४॥
सीतेला राक्षसांनीच पळविले अशा भावनेने श्रीरामांना आलेला क्रोध व त्याचे अविष्करण :
राक्षसी नेलिया सीता सुंदरा । सकुल सपुत्र सपरिवारा ।
अराक्षसी करीन धरा । शरधारा निवटोनी ॥२५॥
सीता पाताळी नेतां जाण । पन्नगांतें निर्दाळीन ।
दानवमानवातें विंधीन । घोळसीन त्रिदशातें ॥२६॥
राक्षसी मारिली सीता । तिसी जरी यम होय नेता ।
त्याचे करीन मी घाता । यमदूतासमवेत ॥२७॥
यम दंडितो जगासी । बाणी मी दंडिन त्यासी ।
आणूनि नेदी जरी सीतेसी । तरी मी त्यासी दंडीन ॥२८॥
यमाची मी नळीं निमटीं । कळिकाळाची फोडीन कवटी ।
दमूनियां सकळ सृष्टी । सीता गोरटी ॥२९॥
मी तंव काळाचा आकळिता । अंतकातें निर्दळिता ।
मर्दोनि लोका समस्ता । आणीन सीता निमेषार्धे ॥१३०॥
नयनाग्रीचें कल्लोळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ ।
धनुष्य ओढिलें विक्राळ । स्वर्गी खळबळ देवांसी ॥३१॥
देव दानव ऋषीश्वर । भेणे कांपती थरथर ।
आंदोळलें चराचर । श्रीराम दुर्धर क्षोभला ॥३२॥
सीतेचिया शुद्धीसाठी । क्रोधे जाळूं पाहे सृष्टी ।
भयें उमा झोंबे कंठी । धाके पोटी सदाशिव ॥३३॥
अद्दष्टपूर्वं सक्रुद्धं द्दष्ट्वा रामं सलक्ष्मणः ।
अब्रवीत्प्रांजलिर्वाक्यं मुखेन परिशुष्यता ॥२५॥
पुरा भूत्वा मृदुर्दान्तः सर्वभूतहिते रतः ।
न क्रोधवशमापन्नः प्रकृतिं हातुमर्हसि ॥२६॥
चंद्रे लक्ष्मीःप्रभा सूर्ये गतिर्वायौ भुवि क्षमा ।
एकश्च नियतं नित्यं त्वयि चानुत्तमं यशः ॥२७॥
लक्ष्मणाने क्रोध शांत केला :
श्रीराम काळाग्निरुप । ते देखोनि धाके लक्ष्मण ।
तोंडीचे पाणी गेले पळोन । कंपायमान भयभीत ॥३४॥
मारिली ताटका सुबाहू । तै हा दुर्धर क्षोभ नव्हता बहूण् ।
विराध सीताग्रहणराहू । क्रोधोद्भवु तै नव्हता ॥३५॥
होरोनि राज्यवस्त्राभरणा । पायी कैकेयीने धाडिले वना ।
तै हा क्षोम नव्हता जाणा । श्रीरघुनंदनालागोनी ॥३६॥
एक रामे आपन । वधिले त्रिशिरा खर दूषण ।
तै ऐसा क्रोध दारुण । नाही आपण देखिला ॥३७॥
सीतेचिये शुद्धींसाठीं । श्रीराम क्षोभला प्रबळ सृष्टी ।
स्वर्गी देवा हडबड मोठी । धाके पोटी कळिकाळ ॥३८॥
दानव मानव ऋषीश्वरा । धाके चळकांप ।
क्षोभला देखोनि श्रीरामचंद्रा । वसुधरा चळीं कांपे ॥३९॥
श्रीराम क्षोभला निर्वाण । देखोनि सौमित्र आपण ।
धांवोनि धरिले दोन्ही चरण । क्षमा संपूर्ण करी रामा ॥१४०॥
सावध ऐके कृपामूर्ती । भूतां कृपाळु तू रघुपती ।
तुवा निर्मिली भूरसृष्टीची स्थिती । ते वेदिक्ती अवधारी ॥४१॥
प्राण राखोनिया भूतीं । तुझेनि वायूची गती ।
चंद्रीं तुझेनि श्रीराघुपती शोभा शोभती सर्वदा ॥४२॥
तुझियेनि निजतेजस्थितीं । सूर्यासी तेज अति दीप्तीं ।
तुझिया क्षमेनें क्षिती । ते भूते वाहिती सर्वदा ॥४३॥
समुद्र वेळा राखे सर्वदा । काळ तुझ अधीन सदा ।
अकाळ प्रळयो न करी कदा । निजमर्यादा हे तुझी ॥४४॥
तो तू आजि स्थिति काळासी । अकाळप्रळयोअ करु पाहसी ।
विचारुनि निजमानसीं । क्षमा क्षोभासी करी रामा ॥४५॥
तू सृष्टीचा आदिकर्ता । तुझेनि बाळक विधाता ।
आपली परिपूर्ण पूर्णता । श्रीरघुनाथा आठवीं ॥४६॥
ऐसे ऐकोनि सौमित्रवचन । निजक्षोभातें स्वये प्राशून ।
संतोषोनि श्रीरघुनंदन । दिधले अलिंगन सौमित्रा ॥४७॥
संतोषोनि श्रीरघुपती । दोघे बैसले सुखस्थिती ।
जालीं पूर्णिमा पूर्णराती । उदयप्राप्ती चंद्राची ॥४९॥
एकाजनार्दना शरण । आठविता पूर्णपण ।
श्रीराम सुखे सुखावोन । केले शयन तृणशय्ये ॥१५०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसीताशोकविलापनं नाम एकोनविंशतितमोऽध्यायः ॥१९॥
॥ ओव्या १५० ॥ श्लोक २७ ॥ एवं १७७ ॥
