मी मज माझे याची केली
174.
मी मज माझे याची केली वो निरास ।
वीण आपणा येणे आणियेला त्रास ।
नेदी आड येऊ दुजियाचा आभास ।
कैसे काय करु सांगा मज यास वो ॥१॥
ऐसे जाजावोनी बोले एक नारी ।
हरीचा सुखानंद भरुनी अंतरी ।
लटिकाची वालभाचा भाव लोकाचारी ।
दाऊनि एकांती हरिसी काम सारी वो ॥२॥
म्हणे वृत्ति माझी नुरे देहावरी ।
क्षणही न कंठे वो सासुरामाहेरी ।
काय करु मी वो न गमे घरदारी ।
नेऊनी घाला जेथे अनंग मुरारी वो ॥३॥
यावरी गेले आता माझे माणुसपण ।
करिता उपचार ते हरिती माझे प्राण ।
गेले होऊनिया होते ते निर्माण ।
सोडा आस माझी दया वो मोकलून वो ॥४॥
ऐशी देहगेही होऊनि उदास ।
गेले तुटोनिया अवघे आशापाश ।
निद्रा जागृती ना स्वप्नाचा आभास ।
एक लागला त्या हरीचा निजध्यास वो ॥५॥
निळा म्हणे नेणे आपपर दुसरे ।
भरली निजानंदी न पाहे माघारे ।
कैचे येईल तेथे अविदयेचे वारे ।
झाले ह्रदयी स्वानुभवचेईरे वो ॥६॥
