अदळ कमळी कमळ विकसले
573.
अदळ कमळी कमळ विकसले ।
ते म्या गगनी उफराटे देखिले॥ध्रु०॥
बाइये स्वानुभवे पाहा कैसे ।
जेणे आत्माराम भेटे तैसे ॥१॥
मनाच्या उल्हासे कमळी कमळ भेटे ।
आनंदाचा पूर लोटे गे बाई ॥२॥
तेथे काय कारण सरले शेवटीचे एक उरले ।
बहिणी म्हणे ते म्या देखिले गगनाचे माथा ॥३॥
