वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऐका हरिभक्ताचा महिमा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076065 · अभंग क्र. ५७४

574.
ऐका हरिभक्ताचा महिमा ।
केली पुंडलिके थोर सीमा ।
गवसणी घातली व्योमा ।
पुरूषी सर्वोत्तमा साधिले ॥१॥
पुंडलिकाऐसा पतित ।
नसे त्रिभुवनी अपवित्र ।
पितरांची मर्यादा न पाळित ।
गालिप्रदाने समर्पी ॥२॥
पितरे जे सांगावे ।
ते पुंडलिके न ऐकावे ।
शिव्यागाळीस द्यावे ।
आणि संपादावे पापासी ॥३॥
ज्या पितरांचेनि हा संसारू ।
सुखाचे भोगिजे सुखतरू ।
त्या पितरांचे मांडिले चारू ।
ऐसा पुत्र निजपला ॥४॥
ऐसे करिता किती एक दिवशी ।
असोनि चालिला वाराणशी ।
सवे कर्मभोग घेउनी पुत्र विवशी ।
क्रमित वाट चालिला ॥५॥
तव भाग्योदयकाळ आला ।
पापाचा संग्रह तुटला ।
उभयांचा भोग सरला ।
दिवस उदेला पुण्याचा ॥६॥
जेवी गाय सापडे वाघा ।
तै हरी वळे पै गा ।
अवचट धावणे पावे वेगा ।
तेवी या उभयवर्गी देव पावला ॥७॥
जेवी पाषाण फुटे झरा ।
की वांझ प्रसवली पुत्रा ।
तल्हाति केस अंतरा ।
उपजला मोह पुंडलिका ॥८॥
देखोनि अपवित्राचरण ।
पुंडलिक त्रास घेत मानून ।
म्हणे मी घोर पापी गहन ।
चुकले भजन पितरांचे ॥९॥
कोण पाप होते पोटी ।
पाय कवटाळी पितरांचे ॥१०॥
म्हणे काय करावी वाराणशी ।
मातापितर हेचि माझी काशी ।
मुरडोनी आला मान देशासी ।
अटक वनासी प्रार्थिले ॥११॥
सभोती बारा योजन ।
देखोनि अंती दंडकारन्य ।
स्वनी येती पक्षी जाण ।
न पडे कदा दृष्टीसी ॥१२॥
अत्यंत वृक्षांची दाटणी ।
झेपावल्या दिसती गगनी ।
जेथे सूर्याचे दर्शनी ।
मोकळीक अयेचिना ॥१३॥
ऐसे भयानक वन ।
तेथे पुंडलिक राहिला जाण ।
पाहोनी सरोवराचे जीवन ।
केले नामग्रहण चंद्रभागा ॥१४॥
तेथे आरंभिली सेवा ।
पुंडलिका उपजला भावा ।
मानित मातापिता देवा ।
जडला सद्भावा चरणी त्यांच्या ॥१५॥
ऐसे जाले कितीएक काळ ।
तव देखिले नारदे एके वेळ ।
म्हणे हा तो येथे प्रबळ ।
कोण भक्तराव उदेला ॥१६॥
देखोनि पुंडलिकाची निष्ठा ।
जडली देहा पूर्ण काष्ठा ।
दृष्य सारूनिया अनिष्ठा ।
नेणो हृदयस्था भेटी जाली ॥१७॥
देखोनिया भरतमुनि ।
जाला हर्षयुक्त अंतःकरणी ।
थोर कौतुक वाटले मनी ।
अश्रु नयनी लोटता ॥१८॥
नारदे देखोनी निष्ठा ।
त्वरे गेला वैकुंठा ।
म्हणे नवल देखिले भगवंता ।
हर्ष चित्ता न समाये ॥१९॥
सप्रेम दाटंला कंठ ।
बोलता कापती ओठ ।
नयनी होत अश्रुपात ।
म्हणे भगवंत काय जाले ॥२०॥
देवे आलंगिला हृदयी ।
नारदासी म्हणे सांग काही ।
नवल वर्तले लवलाही ।
ते गुज काही सांग पा ॥२१॥
तंव नारद म्हणे नारायणा ।
मी गेलो होतो भ्रमणा ।
तेथे देखिले नवल जाणा ।
त्या वचना ऐकावे ॥२२॥
मृत्युलोकाठायी ।
दंडकारण्य नाम पाही ।
मानदेश अभिधानेही ।
तेथे ठायी देखिले ॥२३॥
भ्रमण करिता गेलो तेथे ।
तव अवचिता देखिले नवलाते ।
संतोष वाटला चित्ताते ।
ते तुज हृदयी ठाउके ॥२४॥
तया अरण्यामाझारी ।
द्विज एक पितृसेवा करी ।
त्याची देखोनिया भजन-कुसरी ।
काय वानू थोरी तयाची ॥२५॥
वायू उफराटा नेववेल ।
हे भूगोल पालथे घालवेल ।
अग्निप्रवेशही करवेल ।
परी तद्भक्ति-नवल सांगवेना ॥२६॥
विषाचे कवल घेववती ।
सहा समुद्र कोरडे करवती ।
परी तद्भक्तीची अपार शक्ती ।
ते चोज तुजप्रती काय सांगो ॥२७॥
वरकड साधन ते काये ।
कोण त्यांचे नवल पाहे ।
साधनरापरीस या पाहे ।
मज तो नव्हे साध्यता ॥२८॥
त्याची भक्ती देवा पहाता ।
नेणे पावाल दातात्म्यता ।
की हे ब्रह्मसायुज्यता ।
आली तत्त्वता रणांगणासी ॥२९॥
ऐकोनी भक्तीचे रहस्य ।
देवाचे उचंबळले मानस ।
हाती धरूनिया नारदास ।
गुप्त रूपेसी निघाले ॥३०॥
सेजी होती रूक्मिणी ।
तीसही साकळण करूनी ।
गरूडासही सोडुनी ।
निघाले चक्रपाणी नारद ॥३१॥
पहा हा देव, भक्त-शिरोमणी ।
भक्तासाठी चालिला चरणी ।
उडी घातली वैकुंठाहुनी ।
आले क्षणी मानदेशी॥३२॥
सवे नारद माझारिया ।
वन उपवन दावितसे देवराया ।
अवचित देखिले भक्तराया ।
तया पुंडलीकासी॥३३॥
देवे देखोनी पुंदलीकासी ।
विस्मित झाला थोर मानसी ।
पुंडलीक न देखेचि तयासी ।
चाड मानसी धरीचना॥३४॥
मग नारद बोलिला मात ।
पुंडलिका आले रे भगवंत ।
जयासाठी येवढे क्लेशार्थ ।
तो धावत आला पाहे॥३५॥
पुंडलीक जाला एकनिष्ठ ।
फिरोनी न करीच दीठ ।
दिली भिरकावुनी वीट ।
तीवर वैकुंठ उभे ठेले॥३६॥
ठेवोनिया हात कटी ।
ठाकले ब्रह्म विटी ।
नखाग्री लावुनी दृष्टी ।
ब्रह्म सृष्टी न्याहाळीत॥३७॥
नेणो मुद्रा लागली खेचरी ।
तटस्थता लागली शरीरी ।
दृष्टी ठेवूनी पुंडलीकावरी ।
जाला अंगभरी श्रीविठ्ठल॥३८॥
जयाच्या अंतरी प्रवेशे देव ।
तयासी पुसी संसाराचा ठाव ।
व्यापकपणे नांदे स्वयमेव ।
देखोन सद्भाव भक्तीचा॥३९॥
पुंडलीकाची देखोन भक्ती ।
धावोनि आला वैकुंठपति ।
पुंडलीकाची निजस्थिती ।
प्रवेशला चित्ती हरी त्याचे॥४०॥
देखोन पुंडलिकाचा भावो ।
वास केला तया ठावो ।
वाहविला कीर्तीचा महिमा वो ।
पंढरी नाम स्थापियले॥४१॥
येरीकडे वैकुंठभुवनी ।
उठोनी पाहे जव रूक्मिणी ।
तव न दिसे चक्रपाणी ।
थोर चिंतनी पडियेली॥४२॥
गरूडासी जव पाहे ।
तव तो द्वारीच उभा आहे ।
मग म्हणे कटकटा माये ।
काय झाले कळेना॥४३॥
कोणीकडे निजे केले ।
नेणो कोणाचे धावणे काढिले ।
ऐसे कोण सांकडे पडिले ।
मौनेच गेले श्रीपती॥४४॥
गरूडासी म्हणे रूक्मिणी ।
आज विपरीत गमते गा मनी ।
न पुसता गेले चक्रपाणी ।
भक्ताशिरोमणी कोण भेटला॥४५॥
तव जाला हाहाःकार ।
देव मिळाले सबळ ।
म्हणती थोर जाले नवल ।
नेणो गोपाळ कोठे गेले॥४६॥
नित्य-दर्शना पडिले पाणी ।
उदास झाली वैकुंठभुवनी ।
जैसी विधवा अलंकरोनी ।
कोण जनी मंडिता॥४७॥
देव करिताती रूदन ।
रूक्मिणी आक्रंदती गहन ।
थोर प्रळय मांडिला जाण ।
न लगे मार्ग भगवंताचा ॥४८॥
तव अकस्मात नारदमुनी ।
रूक्मिणीने देखिला नयनी ।
पुसती जाली तयालागुनी ।
दीनवाणी जगन्माता॥४९॥
वैकुंठीचे सकळ देव ।
हाहाकृत देखिला भाव ।
मग सांगितला निर्वाह ।
चिम्ता न करा म्हणतसे॥५०॥
मृत्युलोकाचे ठायी ।
पुण्यशील देश पाही ।
पुंडलिक नामे द्विज देही ।
करी निर्वाण अनुष्ठान॥५१॥
महावृक्षांची दाटणी ।
अग्रे झेपावती गगनी ।
रवी पाहाता नयनी ।
सर्वकाळ अंधारू॥५२॥
ऐसिया वनाचे ठायी ।
पुंडलीक ब्राह्मण पाही ।
पितृसेवा निर्वाही ।
चंद्रभागासरोवरी॥५३॥
त्याचा पहावया भाव ।
गेला वैकुंठीचा राव ।
देखोनि भक्तिभाव ।
देवाधिदेव रहिवासले॥५४॥
देखोन पुंडलीकाची निष्ठा ।
नेणो चांगली पूर्ण काष्ठा ।
उणे आणुनी वैकुंठा ।
रहिवासले देखा वैकुंठपती॥५५॥
ऐकोनी नारदाची मात ।
धावोनि आले देव तेथ ।
विटी देखोनि भगवंत ।
मौन-मंडित राहिले॥५६॥
श्रुतिशास्त्रश्रवण ।
करिती ब्रह्मादिक गण ।
परी तो नारायण ।
अणुमात्र वदेना॥५७॥
मग म्हणती रे कटकटा ।
कोणी देखिली पुंडलिकनिष्ठा ।
उभे केले वैकुंठा ।
चमत्कार मोठा भक्तीचा॥५८॥
नाना उग्र साधने ।
एक साधिती प्राणापाने ।
ब्रह्मांडी नेला आत्मा जाणे ।
तेथेही नारायण साधेना॥५९॥
यावेगळे अनेक ।
करिती साधने सोसून दुःख ।
परि भगवंत न सापडे देख ।
तो कोणे सुखे रातला॥६०॥
ऐसा करिता विचार ।
ज्ञाने निवडिता सारासार ।
तव सापडला भक्तीचा आगर ।
सेवा थोर पितरांची॥६१॥
मग म्हणती हा भक्तिराणा ।
जाणे ब्रह्मप्राप्तीच्या खुणा ।
प्रत्यक्ष साधिला वैकुंठराणा ।
खिळून वदन उभा केला॥६२॥
पहा ते मूळ दंडकारण्य ।
त्याही वरते ब्रह्मारण्य ।
तीर तरी चंद्रभागा जाण ।
देखोनि मन आनंदे॥६३॥
ऐसियावरी हा भक्तराणा ।
उदेला दिसे रवी जाणा ।
देवे जाणुनी पुंडलीक-खुणा ।
रहिवास जाणा केला सुखे॥६४॥
ऐसा जाणोनी अंतर्भाव ।
देवेही केला निर्वाह ।
ठेविले पंढरपूर नाव ।
बसविले गाव पुंडलीकाचे॥६५॥
रूक्मिणीसहवर्तमान ।
आले समस्त ऋषिगण ।
दुजे केले वैकुंठभुवन ।
केले नामग्रहण भूवैकुंठ॥६६॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ।
ऐसे वाळुवंट पुंडलीक भक्तवीर ।
ऐसे देव ऐसे नगर ।
जयजयकार कोठे महाद्वाई॥६७॥
ऐशा पताका ऐशी निशाणे ।
शंखभेरी वाजती गहने ।
ढोल ढमामे तुरे जाणे ।
टाळ मृदंग वाजती॥६८॥
घरोघरी तुळसीवृंदावन ।
पद्मांकित रांगोळी जाण ।
कुंकुमार्चित सडे गहन ।
त्रिकाळ जाण पूजा करिती॥६९॥
धन्य धन्य तेथीचे लोक ।
नगर नागरिक देख ।
पतंग भृंग पशुपक्ष्यादिक ।
तरूवर धन्य झाले॥७०॥
क्षेत्रावरून जाती येती ।
हो का नर-पशु-पक्षि याती ।
पंचक्रोशीमाजी जे सापडती ।
त्यासी अधोगति नसेचि॥७१॥
या पंढरीचा महिमा ऐकता नासे कोटी ब्रह्महत्या ।
या पंढरीस वास करिता ।
चिंता तयासी कासयाची॥७२॥
ऐसी कथा ऐसे निरूपण ।
या पंढरीचे करिता श्रवण ।
होय बेचाळीस-कुळ-उद्धरण ।
जन्ममरण चुकले त्या॥७३॥
इतुका पुंडलिकाचा महिमा ।
वाढला भक्तिरसप्रेमा ।
थोर केली भक्तीची सीमा ।
पुरूषी पुरूषोत्तमा साधिले॥७४॥
बहिणीचा निजभाव ।
जाला पंढरीसी निर्वाह ।
पांडुरंगी जडला भाव ।
जाला ठाव निजपदी॥७५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग