झाला विरह अंतरी कामि
214.
झाला विरह अंतरी कामिनीसी ।
न ये सांगता बोलता कोणापासी ।
मुख सुकले वो तापली विशेषी ।
आंग कापे तेणे झाली कासाविसी वो ॥१॥
हदई आठवे रीरंगसावळा ।
मनचि गुंतले तयापासि डोळा ।
कोण आणिल वो तया याचि वेळा ।
दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥
कोठे न गमे वो नावडे आणिक ।
जिविं जिवामाजि पडियले ठक ।
उघडे नयन वो लागलि टकमक ।
कोण आणिल तो हरिल माझे दु:ख वो ॥३॥
जालि अवस्था ते नकळे कोणासी ।
जाता सांगो होईल हांसे पिसुणासी ।
होईल लाज वो कारण उपहासासी ।
कांहिंची न सुचे मी काय करु यासी वो ॥४॥
कोण जिवलग वो येईल धावती ।
माझे जिविचे आर्त उगविल निगुती ।
नेदिता कळो कोण आणिल श्रीपति ।
संग त्याचा माझा करिल एकांति वो ॥५॥
ऐसि विरहानळे पिडियलि बाळा ।
ह्रदयी आठविते हरि वेळोवेळा ।
जाणोनी अंतरी तो कृपेचा कोवळा ।
येउनि निवविले तिये म्हणे निळा वो ॥६॥
