गांजविसी देह भ्रतारा
562.
गांजविसी देह भ्रताराचे हाते ।
माझिया तो चित्ते नेम केला ॥१॥
न सोडी भजन प्राणही गेलिया ।
आता देवराया दीनबंधु ॥२॥
पाहातोसी काय आता माझा अंत ।
होतसे देहान्त पती-हाते ॥३॥
करू काय मज मांडले साकडे ।
नाही देहाकडे हेत माझा ॥४॥
पडो देह परी राहतसे हेत ।
पहावा अनंत ज्ञानदृष्टी ॥५॥
करावी हे भक्ति स्वधर्म-आचारे ।
तुज ज्ञानद्वारे ओळखावे ॥६॥
राहील हे काय शरीर पीडेने ।
का रे हे वचन नायकसी ॥७॥
हेत राहे तया जन्म घडे पुन्हा ।
वेदाच्या वचना आयकिले ॥८॥
आता या संकटी तुझे-शिरी हत्या ।
राखावी अपत्या आपुलिया ॥९॥
बहिणी म्हणे हरी बहिरा आंधळा ।
का रे विश्वपाळा झालासी तू ॥१०॥
