केली कटकट गाऊ नाचो न
4011.
केली कटकट गाऊ नाचो नेणता । लाज नाही भय आम्हा पोटाची चिंता ॥१॥
बैसा सिणलेती पाय रगडू दातारा । जाणवू द्या वारा उब झाली शरीरा ॥धृपद॥
उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप काही न धरावा ॥२॥
तुझिये संगती येऊ करू कोल्हाळ । तुका म्हणे बाळे अवघी मिळोन गोपाळ ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमच्यापुढे आनंदाने नाचेन गाईन आणि अज्ञानात आम्ही जी तुमच्यापुढे बडबड केली ती तुमच्यापुढे कटकटच झाली आहे. देवा मला कोणाचीही लाज किंवा भय नाही आम्हाला तुमचे उच्चिष्ट शेष भाग प्रसाद म्हणून मिळाला आहे त्यामुळे आम्हाला पोटाची देखील चिंता नाही. हे दातारा तुम्ही खाली बसा तुम्ही फार दमला आहात तुमचे पाय आम्हाला रगडू दयावे तुमच्या शरीराला फार उब म्हणजे गरमास झाले आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला थोडासा वारा घालू दयावा. जरी आमच्याकडून तुमची सेवा करण्यास थोडा जरी उशीर झाला तरी तुम्ही इतका उशीर का झाला असे का म्हणावे कारण मातेने बाळकावर कधीही राग धरु नये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुझी बालके व सर्व गोपाळ मिळून देवा तुझ्या सोबतीत राहून तुझ्या नामाचा गजर करु.
