॥ श्रीएकनाथमहाराजकृत
57.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्तावन्नावा ॥
राक्षसांच्या आवरणाचा भेद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लक्ष्मण व बिभीषणाच्या भाषणाने श्रीरामांना
क्रोध व बिभीषणाला रावणाच्या शोधाची आज्ञा :
बहुतांपरी लक्ष्मण । विनविता झाला रघुनंदन ।
तैसेचि बिभीषणही जाण । करी विनवण बहुतांपरी ॥१॥
विनविला वानरी । महावीर कपिकेरी ।
ऐकता तिखट उत्तरीं । कोप रघुवीरीं पै आला ॥२॥
त्रिपुरवधालागीं झडकरीं । क्रोध आला त्रिपुरारी ।
त्याहूनि क्रोध रघुविरीं । दशशिरा वधावया ॥३॥
मुरु दैत्य दुर्धर भारी । त्यालागीं खवळे मुरारी ।
त्याहूनियां कोप रघुवीरीं । दशशिरा मारावया ॥४॥
सृष्टिप्रळयाचे वेळे । संहारकाळ अति खवळे ।
तेंवी छेदावया रावणशिसाळें । क्रोध खवळें श्रीरामी ॥५॥
ज्याची विक्षेपभृकुटी । क्षणे विध्वंसी ब्रह्मांडकोटी ।
तो निवटावया दशकंठी । राम जगजेठी खवळला ॥६॥
अत्यंत कोपे कोपायमान । बोले बिभीषणासी वचन ।
कोठे आहे तो दशानन । वेगे शोधून मज सांगा ॥७॥
धर्मयुद्धा ॥८॥ आता तुवा करावे एक । चार पाठवून आवश्य्क ।
कोठे आहे दशमुख । वृत्त सकळिक आणावें ॥९॥
क्वासौ लंकेश्वरः क्षुद्रो रावणो दुर्मदः खलः ।
रणभूमि परित्यज्य कुत्रास्ते किंच चेष्टितम् ॥१॥
बोद्धव्यः स त्वया वीर शिघ्रमेव ममज्ञया ।
राघवस्य वचः श्रुत्वा चारैरन्विष्य सर्वतः ॥२॥
बिभीषण सर्वज्ञ । शिष्ट चार पाठवून ।
कोठे आहे तो रावण । काय आचरन करिताहे ॥१०॥
कपटी दुरात्मा रावण । अहंमते मातला पूर्ण ।
शेखी रणभूमी सांडून । जीव घेऊन पळाला ॥११॥
त्याचे समूळ ताळतंत्र । क्रियाविधानसमाचार ।
मानसी आणून समग्र । सविस्तर मज सांगा ॥१२॥
बिभीषणाने चार दूतांमार्फत रावणाचा शोध करुन वृत्तांत सांगितला :
बिभीषणा अति त्वरेंसी । वेगी आणीव वृत्तांतासी ।
ऐसे सांगता श्रीरामासी । येरु मानसी तोषला ॥१३॥
तंव श्रीरामाज्ञेपूर्वी जाण । चार वेगी पाठवून ।
लंकेमाजी झाडा घेऊन । वृत्तात पूर्ण आणविला ॥१४॥
ते रावणाचे चेष्टित । श्रीरामापुढे सांगत ।
विनविता झाला यथातथ्य । अति विनीत बिभीषण ॥१५॥
उवाच वचनं धीमान्राममेतदबिभीषणः ।
शक्त्या निर्भिद्य सौमित्रिं क्रूरकर्मा स रावणः ॥३॥
स विवेश पुरी तूर्णं लंकामेव सहानुगः ।
सोऽवतीर्य रथत्तूर्णं वधमिच्छति तेऽनघ ॥४॥
चिंतयामास काकुत्स्थो वरदानं महात्मनः ।
दत्तं स्वयंभुवा पूर्व सर्वशत्रुविनाशनम् ॥५॥
अजेयं सप्तभिर्लोकैः ससुरासुरमानवैः ।
रथं सर्वायुधोपेतं दिव्यमद्भुतदर्शनम् ॥६॥
युक्तमस्त्रैर्महावेगैः कामगैः कामरुपिभिः ।
अभेद्यकवचं चापि सर्वास्त्रेरभिसंगतैः ॥७॥
घालोनिया लोटांगण । विनविता झाला बिभीषण ।
रावणचेष्टा संपूर्ण । श्रीरघुनंदन परिसत ॥१६॥
कपटी क्रूरकर्मा रावण । सौमित्रासीं शक्ति भेदून ।
युद्ध न करिता आपण । गेला पळोन लंकेमाजी ॥१७॥
उतरोनि रथाखालता । तुझ्या ध्यानीं लंकानाथा ।
अति आकांत वर्तला चित्ता । श्रीरघुनाथा ते ऐक ॥१८॥
करु जाता भोजन । गोड न लागे तया अन्न ।
त्यासी दिसे रघुनंदन । अति दारुण शस्त्रपाणी ॥१९॥
करु जाता उदकपान । राम जीवना जीवन ।
देखोनिया दशानन । चळकांपें जाण कांपत ॥२०॥
तांबूल घेता लंकानाथा । सेवकांमाजीं देखे रघुनाथा ।
हाती धनुष्य पाठीसी भाता । झाला देखता रावण ॥२१॥
स्त्रीगृहामाजी पाही । राम देखे सर्वा ठायी ।
शयनशेजेतेंही । दिसे लवलाही श्रीराम ॥२२॥
स्नान मार्जन सकळ भोग । गमनागमनवेग ।
कर्माकर्माचें अंग । भासे सवेग श्रीराम ॥२३॥
भयेंकरोनि लंकानाथा । प्राण जावा सर्वथा ।
भाग्य फळासी आले तत्वता । शंकर चित्ता आठवला ॥२४॥
रामभय अति खडतर । रावणा लागले अति दुर्धर ।
तेणे आठवला शंकर । चित्तचमत्कार वचन ज्याचे ॥२५॥
पूर्वी उग्र तप करुन । रावणे हर केला प्रसन्न ।
मागितले वरदान । शत्रुहनन करावया ॥२६॥
तेंचि ये काळी आता । सांगितले लंकानाथा ।
तेणे पावोनि उल्लासता । होम करिता पै आला ॥२७॥
त्या होमामाजी रथ । साश्वशस्त्रास्त्रीं संयुत ।
अभेद्य कवच अद्भुत । समवेत दिव्यायुधें ॥२८॥
विचित्र कामग अस्त्रे । सकळलोकसंहारकरें ।
प्रेरिलिया वैरिसंहारें । येती उपसंहारें हातासी ॥२९॥
ऐसे शिवाचें वरदान । अनुस्मरोनि रावण ।
करिता झाला हवन । तुझे हनन करावया ॥३०॥
परी त्याहीमाजी अतर्क्य चिन्ह । शिव सर्वात्मा सर्वज्ञ ।
प्रकट सांगितली खूण । मूर्ख रावण जाणेना ॥३१॥
अविकळ सिद्धि पावे होम । तै वैरियाचें होय भस्म ।
अल्प विकळ होता परम । अति दुर्गम कर्त्यासी ॥३२॥
विकळ होता यागासी । समूळ घात अर्त्यासी ।
ऐसे सांगोनि रावणासी । गेला निजधामासी शंकर ॥३३॥
मूर्खा रावणा अहंबुद्धी । म्हणे अविकळ पाववीन सिद्धी ।
राम सौमित्र माझे द्वंद्वी । बाणवेधीं निवटीन ॥३४॥
ऐसा करोनि निर्धार । करितसे कमतंत्र ।
अति सावध एकाग्र । यज्ञोपचार घेवोनी ॥३५॥
अति उग्रें सप्तावरणें । रावणे रचिली दारुणे ।
कोणा न करवती गमनें । अति दारुणे परीस पा ॥३६॥
अहंबुद्धि रावण । आपणासी अति गूढ रक्षण ।
पंचकोश पंचावरण । रचिले जाण श्रीरामा ॥३७॥
आणिकही महादारुण । मंत्रावरण शस्त्रावरण ।
भूतप्रेत पिशाच जाण । अति दारुण किळकिळित ॥३८॥
शाकिनी डाकिनी महाशक्ती । अहर्निशी सावचित्तीं ।
रावणाचा याग राखिती । महासर्प देती धुधुःकार ॥३९॥
रावणाच्या होमामध्ये विघ्न आणण्याचा बिभीषणाचा श्रीरामांना सल्ला :
ऐसा अति बळे बळवंत । रावण यास असे करित ।
वधावया रघुना । अति उद्यत साक्षेपे ॥४०॥
अविकळ सिद्धी गेले हवन । तरी कोणासी नागवे रावण ।
वैरी निर्दळोनियांजाण । विजयी पूर्ण होईल ॥४१॥
ऐके स्वामी रघुनाथ । होम करिता लंकानाथा ।
विघ्न करावे जाऊनि आता । विलंब सर्वाथा नये करु ॥४२॥
तस्य होमस्य कालोऽयं देवायतनमास्थितः ।
जुहोत्यग्निं समाधिस्थो रौदैंर्मत्रैर्महायशाः ॥८॥
तस्य पापस्य तत्कर्म न सिध्यति दुरात्मनः ।
तस्य तावत्वया वीर विघ्नं कार्य बलीयसा ॥९॥
अवध्यः स भवेत्तस्मिन्कृते कर्मणि राक्षस ॥१०॥
आजि होमाचा होमकाल । रावण साधितसे अविकळ ।
आपण होवोनि निश्चळ । विघ्न तत्काळ करावे ॥४३॥
केवळ रुद्र क्रोधान्वित । ऐसे उग्र कर्म आचरत ।
रुद्रमंत्रें होम करीत । सावचित्त रावण ॥४४॥
होमाचा समीप काळ । आणि फळप्राप्तिवेळ ।
रावणा साधो आली सकळ । साश्वरथसंयुक्त ॥४५॥
येचि काळी आपण । रावणासी करोनि विघ्न ।
विध्वंसिलिया हवन । निजकार्य जाण साधेल ॥४६॥
ऐसे न करिता आपण । जरी सिद्धी गेले हवन ।
तरी सर्वथा अवध्य रावण । सत्य जाण रघुनाथा ॥४७॥
ऐकता बिभीषणवचन । सर्वांगी दाटले स्फुरण ।
एकला आक्रमी त्रिभुवन । ऐसा रघुनंदन भासत ॥४८॥
बिभीषणस्य तद्वाक्यं घोरं श्रुत्वा भयावहम् ।
ततो रामो महाअतेजाः सबलं चापि विक्ष्य च ॥११॥
माल्यवंतं सुषेणं च गवाक्षं गवयं तथा ।
आज्ञापयामास तदा विघ्नार्थं दश यूथपान् ॥१२॥
अंगदं च हनूमंतं शरभं गंधमादनम् ।
ऋक्षं सेनापतिं चैव नीलं चापि महाबलम् ॥१३॥
लब्धसंज्ञा महावीर्या यूथपाः कृतनिश्चयाः ॥१४॥
श्रीरामांनी वानरसेनापतीला लंकेमध्ये पाठविले :
सकळलोकभयकारक । रावणाचे कर्म देख ।
येतांचि रघुकुळटिळक । निजबाहुकौतुक पाहू इच्छी ॥४९॥
उसण्या घायी रावणासीं । भिडावया निजमानसीं ।
अति उल्लास राघवासीं । बाहेर त्यासी काढू पाहे ॥५०॥
बाहेर काढावया रावण । सेनापति दहा जण ।
अति बळियाढे वानरगण । श्रीरघुनंदन धाडित ॥५१॥
ज्यांचा ऐकता प्रताप । काळासीं सुटे चळकांप ।
रावण बापुडे ते अल्प । त्याचा प्रताप तो किती ॥५२॥
जयांचा अंतका भेदारा । काम जयांचा तोडरा ।
यम कांपे थरथरां । ते दशशिरावरी चालले ॥५३॥
जे राक्षसांते करिती अंत । जे दृष्टी दानवांतें नाणित ।
भूतगण चळी कांपत । शक्ति येत लोटांगणी ॥५४॥
महावीरा दृष्टी नाणित । तो निघाला माल्यवंत ।
ज्याचा लागता घात । होय भस्मांत राक्षसा ॥५५॥
देखोनिया महारण । रणमदें डुले आपण ।
युद्धी सुखावे संपूर्ण । तो सुषेण निघाला ॥५६॥
दृष्टी पडतांचि अल्प । पळती गाईंचे कळप ।
ते केवी साहती झडप । तो सिंहप्रताप गवाक्ष ॥५७॥
गवयही तैसाचि जाण । गायींचे परी वैरिगण ।
वाळितां न लगे अर्ध क्षण । तोही आपण निघाला ॥५८॥
वानरसैन्याचें मंडण । तो युवराज आपण ।
जेणे अपमानिला रावण । तो अंगद जाण निघाला ॥५९॥
वणवा लागल्या डोंगरीं । जळती टोळांचिया हारी ।
तेंवी निवटिता राक्षसवैरी शरभ निर्धारी चालिला ॥६०॥
ऋक्षसेना आणि वानर । उभयसेनेचे सेनाधर ।
नीळा आणि जांबवंत वीर । ज्यांचा धाक थोर रावणा ॥६१॥
सकळ वीरांमाजी मुखरणी । जो रणयोद्ध्यांचा अग्रगणी ।
जो राक्षसा करितसे भंगाणी । मुख्य रावणी धाक ज्याचा ॥६२॥
जो श्रीरामाचा लाडका । अत्यंत प्रिय रघुनायका ।
ज्याचा भेदरा दशमुखा । जो तिही लोका निजपूज्य ॥६३॥
जो श्रीरामाचे अंगत्राण । जो जानकीशोकविध्वंसन ।
जो वानरांचा निजप्राण । तो हनुमान जाण चालिला ॥६४॥
जो सौमित्रप्राणरक्षिता । जो बिभीषणा अभयदाता ।
जेणे घोळसिलें लंकानाथा । तो हनुमान तत्वता चालिला ॥६५॥
जेंवी साधनचतुष्टयसंपत्ती । अधिष्ठात्रीं वश्य होती ।
तेंवी बिभीषणसाह्यार्थी । दहाही सेनापती निघाले ॥६६॥
श्रीरामाज्ञा वंदोनि शिरी । यूथपसेना वानरहारीं ।
करावया रावणबोहरी । कपिकेसरी चालिले ॥६७॥
श्रीरामकाजीं निश्चय पूर्ण । धरुनिया वानरगण ।
निघते झाले आपण । गेलियाही प्राण न सरती ॥६८॥
जयजयकारें गर्जत । शिळा पर्वत झेलित ।
रामनामे किराण देत । वीर उपरमत द्रुमपाणी ॥६९॥
जेंवी अक्षोभ्य सागर । तेंवी अक्षोभ्य वानरभार ।
करीत रामानामाचा गजर । वानरभार चालिला ॥७०॥
मर्यादें नेमिला सागर । अमर्याद वानरभार ।
सागरी लहरीं अपार । तेंवी उठावले थोर वानर ॥७१॥
सागरी कांसवांचे भार । तेंवी वानरी गिरिवर ।
सागरी तळपती महानक्र । शिळाशिखरें वानरी ॥७२॥
सागरी तळपती महामीन । सैन्यसागरीं द्रुम जाण ।
वानरे देवोनि किराण । तळपती पूर्ण सैन्यांत ॥७३॥
ऐसा उद्भट सैन्यसमुद्र । गर्जत चालिले वानरभार ।
करीत नामाचा गजर । वानरवीर चालिले ॥७४॥
रामनामाचा कल्लोळ । तेणे व्यापिला भूगोळ।
नादे कोंदलें अंतराळ । दिग्मंडळ गर्जत ॥७५॥
नाम भरतांचि गगनी । गेले शून्यत्व उडोनी ।
चैतन्यघन होउनी । आले पिकोनी रामनाम ॥७६॥
स्वर्गपाताळांच्या ठायी । नाम कोंदलें लवलाही ।
गेले बुडोनि लोकत्रयीं । नाम पाही रामाचे ॥७७॥
श्रीरामाची निजशक्ती । वानरांअंतरी रामनामकीर्ती ।
तेणे कळिकाळा न गणिती । करीत ख्याती निगाले ॥७८॥
क्षणात्संप्राप्य नगरी लंकां रावणपालिताम् ।
प्राकारदथ चोत्पत्य विविशुस्ते प्लवंगमाः ॥१५॥
वानरसेनापतींचा लंकेमध्ये प्रवेश व धुमाकूळ :
श्रीरामबळे बळवंत । कळिकाळा दृष्टी नाणित ।
निघाले नामे गर्जत । रावणा अंत करावया ॥७९॥
क्षणामाजी वानरगण । पावते झाले लंकाभवन।
अतिशये शोभयमान । देखता मन विस्मित ॥८०॥
जियेसीं न तुके अमरावती । कुबेराची अलकावती ।
तेथे उपमा सांगो कोणती । विस्मित चित्ती सुर सिद्ध ॥८१॥
इतकें कृति नाही केली । स्वये विश्वकर्म्यानें रचिली ।
शंकरकृपें रुपा आली । ते केंवी बोली बोलवेल ॥८२॥
पताका पल्लव छत्रे । मुक्तघोसें परिकरे ।
रत्नखचित गोपुरे । अति विचित्रें भासती ॥८३॥
चौबारे हाटवटिया । पाचू पेरोजे मोहटिया ।
हिरेनिबद्ध उथाळिया । खांब तया गोमेदाचे ॥८४॥
माणिक पाचू हिरकणें । कांचननिबद्ध अंगणें ।
दोही बाही गुढिया तोरणे । तेणे दुकानें शोभती ॥८५॥
वर्णिता तेथींची महिमा । मन विसरे मनोधर्मा ।
स्वये कर्ता विश्वकर्मा । तेथे उपमा काय द्यावी ॥८६॥
वरी कृपा शंकराची । अनुपम उपमा तेथींची ।
आणि वस्ती रावणाची । सीमा भाग्याची कोण जाणे ॥८७॥
एवढा भाग्याचा बडिवार । जेणे धिक्कारुन कुबेर ।
वसविले लंकापुर । प्रसन्न शंकर करोनी ॥८८॥
वरदमदे पूर्ण मातला । सेव्यासेव्यातें विसरला ।
निजमूळातें चुकला । तेणे तयाते क्षोभला शंकर ॥८९॥
माझा स्वामी श्रीरघुनाथ । त्याची कांता चोरोनि नेत ।
समूळ याचा करीन घात । म्हणोनि प्रेरित वानर ॥९०॥
जेथे परिघ सागराचा । गुढ पर्वत त्रिकूटाचा ।
वरी कोट लंकेचा । तेथे वानरांचा प्रवेश ॥९१॥
रिघोनि लंकेभीतरीं । पताका फाडिल्या वानरी ।
ध्वजा पाडिल्या झडकरीं । अपांपरी तोरणां ॥९२॥
सांदींबिदीं मुक्ताघोस । तत्ने विखुरलीं असमसाहस ।
वानर न पाहती त्यांस । विरक्त रत्नांस रामनामे ॥९३॥
श्रीरामभजनी जे विमुख । त्यांसी द्रव्यदारेचें अति सुख ।
जिही सेविला रघुकुळटिळक । त्यांसी नित्य सुख श्रीरामे ॥९४॥
राजहंसापुढे शेण । तेंवी रामभक्ता द्रव्य जाण ।
त्यापुढे न पाहती ढुंकोन । तेथे अभिलाषण ते कैचे ॥९५॥
जेंवी श्वान भक्षी वमन । देखता कंटाळे मन ।
तेंवी न पाहीत ढुकोन धन । भक्तजन रामाचे ॥९६॥
त्याचपरी निश्चिती । स्त्रीलोभाचीही गती ।
भक्त दृष्टी नाणिती । जडली वृत्ती श्रीरामी ॥९७॥
यापरी भक्त जाण । महावीर वानरगण ।
दृष्टी न पाहती ढुंकोन । करीत कंदन निघाले ॥९८॥
तोरणे तोडिताती एक । एक फाडिती पताक ।
ध्वजा उपडोनियां देख । मारीत लोक निघाले ॥९९॥
एक हाणोनिया लाताडें । फोडून सांडिती कवाडे ।
केले दारवंटे उघडे । आली माकडें मारीत ॥१००॥
एक उपरमाया उडती । दुर्गीचे धोंडे उचटिती ।
पाडोनि सांडिल्या भिंती । अद्भुत शक्ती वानरा ॥१॥
करीत आले महामारी । रोधोनि राहिले पाणबारी ।
आकांत होत नरनारी । दसशिरी निमाला ॥२॥
मारीत आले वानरसैन्य । केले नगरासीं कंदन ।
बाहेर् निघेना रावण । अद्यापि हवन ते कायी ॥३॥
बोंब सुतली घरोघरी । स्त्रियां बाळा अपांपरी ।
देखोनिया निशाचरीं । वानरभारी मिसळलें ॥४॥
तंव अति बळी कपिकुंजर । पुढे करोनि पवनपुत्र ।
युद्धा मिसळले सत्वर । केला संहार राक्षसा ॥५॥
हनूमंतं पुरुस्कृत्य सर्वे युद्धाय तस्थिरे ।
राक्षसाश्च महावीर्यः प्रासासिपरिघशयुधाः ॥१६॥
दंशितास्तस्थिरे सर्वे युद्धायामितविक्रमाः ।
बलेनान्योन्यमासाद्य युयुधुस्ते परस्परम् ॥१७॥
परिघपट्टिशगदापाणी । लहुडिमुद्गलधनुर्बाणी ।
खड्ग त्रिशूळ तोमर घेउनी । राक्षसश्रेणी निघाल्या ॥६॥
परिघ हाणिती निशाचर । वृक्ष झेलिती वानरवीर ।
हात लचकोनि सत्वर । भूमीवर आदळले ॥७॥
वानर वृक्ष हाणिती । राक्षस मारिती परिघाप्रती ।
करोनि परिघाची उपहती । हात मोडिती राक्षसांचे ॥८॥
श्रीरामनामें उपरमती । राक्षसा संहार करिती ।
राक्षस गदा हणिती । वानर झेलिती शिळाशिखरें ॥९॥
शिळाघातें गदा पाहे । पीठ होवोनियां जाये ।
वानर वांकुल्या दाविती स्वये । न धरिती भय राक्षसांचें ॥१०॥
एक चालिला शूळ घेउनी । वानर देखोनि शिळापाणी ।
हाणितांचि वानरगणी । घेती हिंसडोनी शूळातें ॥११॥
शिळा हाणिता अवचितीं । राक्षस अंगेसहित अस्थी ।
मिळोनि जाती अव्यक्ती । जाती व्यक्ती उरेना ॥१२॥
एक घेवोनि येती भाले । खड्गतोमरेंसी एक आले ।
कुठारहस्तीं एक चालिले । एकी मांडिलें द्वंद्वयुद्ध ॥१३॥
एक हाणिती मुसळें । वानर हाणिती शालताळें ।
तेथे घोरांदर मांडलें । कंदन झाले तुंबळ ॥१४॥
भाले ओपिती निशाचर । अंगें भिडती वानर ।
घाय न मानोनि समग्र । करिती संहार राक्षसा ॥१५॥
खड्ग हाणिती निशाचर । दुधडे होती वानर ।
प्रबाहे रुधिरधार । ते कपिकुंजर न गणिती ॥१६॥
श्रीरामनामते जे करी । अतिप्रताप कपिकेसरी ।
दुधड झाले शरीरी । ते पुच्छेंकरीं गुंडिती ॥१७॥
सवेंचि मिसळती युद्धासीं । हिरोनि घेती खड्गांसी ।
तेणेंचि मारिती राक्षसांसी । वानरी ऐसी ख्याती केली ॥१८॥
मारोनियां निशाचर । नामे देती भुभुःकार ।
तेणे गर्जत अंबर । आकांत थोर राक्षसा ॥१९॥
हाणिता भिंडिमाळा पांगोरे । गुंडे झेलिती वानरे ।
फिरवोनि तेणेंचि करे । निशाचर मारिती ॥२०॥
नानापरींचीं आयुधे । आणिक शस्त्रास्तें विविधे ।
मंत्रतंत्रादि सन्नद्धें । अति सुबद्धें वर्षती ॥२१॥
वानरांच्या निजचित्तीं । श्रीरामतेजे दुर्धर शक्ती ।
तेणे कळिकाळा नागवती । केली शांती सकळांची ॥२२॥
युद्धी खवळले वानर । करीत उठिले संहार ।
निवटिले राक्षसभार । वाहे रुधिर भडभडा ॥२३॥
एकांचे करचरण तुटले । एकांचे कटी भंगले ।
एकांचे ऊर फुटले । उघडे पडिले कोथळे ॥२४॥
मल्लयुद्ध परस्परीं । झोंटधरणी महावीरी ।
गुडघे कोंपर टोले शिरी । महामारी राक्षसा ॥२५॥
मुद्रिकांसाठीं बोटे मोडिती । अंगदांसाठीं बाहु तोडिती ।
कुंडलांसाठीं कान उपडिती । माथे तोडिती मुकुटांसाठीं ॥२६॥
करोनिया घोरांदर । खवळले वानरेश्वर ।
मारिले निशाचर । रक्तनदी दुस्तर लोटली ॥२७॥
निपेतुर्भतले भिन्नाः केचिदुधिरकर्दमे ।
रक्षांसि च तथा पेतुर्वानरैर्भीमविक्रमैः ॥१८॥
चूर्णिता विविधैः शैलैः पादपैर्मुष्टिभिस्तदा ।
दारिताश्च नखैस्तीक्ष्णैर्दंतैरपि सुदारुणैः ॥१९॥
तत्र वृत्तं महायुद्धं कबंधीभूतसंकुलम् ।
शूराणां हर्षजननं भीरुणां च भयावहम् ॥२०॥
तर्षणं सुरनारीणां सर्वदुःखविमोक्षणम् ।
तस्मिन्युद्धे महाघोरे रक्षोवानरसंक्षये ॥२१॥
प्रावर्तत नदी घोरा शोणितोदकवाहिनी ॥२२॥
वानरी केले महारण । कबंधी दाटले नभस्थान ।
नखी केले विदारण । मांसे रणांगण कोंदले ॥२८॥
दांती डसून गोळांगुळे । काढोनि घेती अन्त्रमांळे ।
तेणे ओविती शिसाळें । पाळिती लळे भूतांचें ॥२९॥
वर्षातां शिळापाषाण । द्रुमांचे घाय दारुण ।
केले राक्षसांचे चूर्ण । कर्दम पूर्ण रणांगणी ॥१३०॥
गजांचिया करवडी । त्याचि रणनदीसीं दरडी ।
कर्दम दाटला बुडी । मांसरक्तपरवडीमिश्रित ॥३१॥
रुधिर वाहे भडभडा । तो नदीस पूर गाढा ।
वोसणे दाटली दोही कडां । विचित्र युद्ध बहुवस ॥३२॥
सचक्र वाहती रथ । तेंचि तारुं नदीआंत ।
सपल्लव ध्वज शोभत । शीड तेथे तेंचि देखा ॥३३॥
गजकरवडी पडिल्या तळी । त्याचि सुसरी विक्राळी ।
भयानक मुखें पसरिलीं । दिसती अवाळीं चाटित ॥३४॥
सलंब भाले वाहती । ते महानक्र नदीप्रती ।
सपिच्छ बाण तळपती । तेचि निश्चिती महामीन ॥३५॥
महावीरांची वोढणें । तींच कांसवे पै दारुणे ।
अंबारें वाहती वितानें । तेणे फेणें दाटली नदी ॥३६॥
विकासली मुखकमळें । वाहती नरशिसाळें ।
तींच नदीमाजी उत्पळें । केश उभारले केशरप्राय ॥३७॥
जे पळोनि जाती रणी । त्यांसी जैसी वैतरणी ।
भासतसे क्षणक्षणीं । भयवाहिनी दारुण ॥३८॥
श्रीरामभक्तांचे हाती । जे समरांगणी निमती ।
त्यांसी सुरांगना वानिती । ओंवाळिती आरत्या ॥३९॥
महापाप्याते दुस्तर । निजकर्मे उतरावया पार ।
तेथे तारूं श्रीरामचंद्र । नामे परपार पाववी ॥१४०॥
श्रीरामनामें निजनेटीं । वानरी मारिल्या कोट्यनुकोटी ।
कोणी संमुख न राहती नेटीं । उठाउठी पळाले ॥४१॥
निवटून राक्षसगण । विजयी झाले वानरसैन्य ।
भेदिले विरांचें आवरण । रणनदी पूर्ण वाहवोनी ॥४२॥
रण देखोनि घारी गीध । करिते झाले आल्हाद ।
भोजन मिळालें अगाध । मांस विविध भक्षिती ॥४३॥
ऐसे करोनिया रण । भेदोनि असुरांचे आवरण ।
पुढे चालिले वानरगण । तंव महादारुण ओढवले ॥४४॥
नभीं गुप्त शस्त्रावरण । भूत प्रेत पिशाच जाण ।
भेदितील वानरगण । रघुनंदननिजकृपा ॥४५॥
एका जनार्दना शरण । दुर्धरक्रिया रावाण ।
रची जितकी दारुण । तितकी श्रीरामगण भेदिती ॥१४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने युद्धकांडे एकाकारटीकायां
राक्षसावरणभेदो नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥५७॥
ओंव्या ॥१४६॥ श्लोक ॥२२॥ एवं ॥१६८॥
