॥ श्रीएकनाथमहाराजकृत
2.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय दुसरा ॥
श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन :
पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।
शार्दूळ आला रुधिरोक्षित । तयासी पुसत लंकेश ॥१॥
वीक्ष्यमाणो विषण्णं तु शार्दूलं शोककर्षितम् ।
उवाच प्रहसन्नेव रावणो भीमदर्शनः ॥१॥
अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।
नासि कश्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥२॥
इति तेनानुष्टस्तु वाचं मंदमुदीरयत् ।
न ते चारयितुं शक्या राजन्वानरपुंगवाः ॥३॥
नापि संभावितुं शक्यं संप्रश्र्नोपि न लभ्यते ॥४॥
शार्दूळ देखोनि अति दुःखीत । त्यासी पुसे लंकानाथ ।
वैरिसासी जालासी हस्तगत । रुधिरोक्षित दिसतोसी ॥२॥
सादरें पुसतां रावण । शार्दूळ बोले अति कुंथोन ।
असंख्यात वानरांचे सैन्य । संख्या कोण करु शके ॥३॥
अमुके एक वानर असती । ऐसी भावना न करवे चित्ती ।
संख्या पुसतां वानरांप्रती । तेही सांगती असंख्य ॥४॥
वाचस्पतीची वाचा मुरडे । वेदवाचा बोबडी पडे ।
रामसैन्याची संख्या न घडे । निजनिवाडे लंकेशा ॥५॥
श्रीरामसैनाचें गणित । करावया ब्रह्मा नसे समर्थ ।
आम्ही काय मशक तेथ । संख्या समर्थ करावया ॥६॥
श्रीरामकतकीं चारपण । सर्वथा न करवे जाण ।
मुख्य वैरी आम्हा बिभीषण । तो ओळखोन धरितसे ॥७॥
बिभीषणेन ज्ञातोऽहं वानरैश्च प्रधर्षितः ।
परिणीय च सर्वत्र नीतोऽहं रामसंसदि ॥५॥
हरिभिर्वध्यानश्च याचमानः कृतांजलिः ।
राघवेण परित्रातो जीवन्नेव विमोचितः ॥६॥
आम्ही अति गुप्त मायावेषीं । माव न चले बिभीषणापासीं ।
तेणे धरोनि अति वेगेंसी । वानरांपासीं दिधले ॥८॥
वानरी नेतां कटकाआंत । स्तोमें स्तोमें हींडवीत ।
लाता बुक्य़ा टोले देत । तेणे कल्पांत मज जाला ॥९॥
बळ सांगावया रावणापासी । दळ दाखविता मजसी ।
वानरी करोनि कासाविसी । रामसभेसीं मज नेलें ॥१०॥
हेर मारल्या कोण पुरुषार्थ । ऐसे बोलिला रघुनाथ ।
तेणे मज केले निर्मुक्त । जीवे जीत मग जालो ॥११॥
श्रीरामांची सूचना :
श्रीरामांचे प्रतापबळ । असंख्य त्याचे दळ सबळ ।
त्यासी न चले युद्धकल्लोख । जनकबाळ अर्पावी ॥१२॥
सीता अर्पिल्या श्रीरघुनाथा । मरणोन्मुक्तीं लंकानाथा ।
स्वस्थता राक्षसा समस्ता । निर्भयता तिही लोकी ॥१३॥
पुरप्राकारमायांति क्षिप्रमेकतरं कुरु ।
सीतां वा संप्रयच्छाशु युद्धं वा संप्रदीयताम् ॥७॥
शार्दूलस्य महद्वाक्यं श्रुत्वोवाच स रावणः ।
यदि मां प्रतियोत्स्यंति देवगंधर्वदानवाः ॥८॥
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकक्षयादपि ॥९॥
उडोनिया वानरवीर । लंका घेती सप्राकार ।
अझुन कायसा विचार । शिघ्रतर करी एक ॥१४॥
युद्धा निघावे लंकानाथा । की श्रीरामा द्यावी सीता ।
येविषयीं विलंबू करिता । कुळक्षयार्था पावाल ॥१५॥
ऐकोनि शार्दूळवचन । रावण झाला कंपायमान ।
मिथ्या धरोनि दुरभिमान । स्वये गर्जोन बोलत ॥१६॥
आदि करोनि श्रीराघव । युद्धा आलिया देवदानव ।
साह्य दैत्यादि गंधर्व । सीता स्वयंमेव मी न सोडी ॥१७॥
राक्षस मारिल्या समस्त । श्रीरामे केल्या कुळघात ।
मजही मांडल्या प्राणांत । तरी मी सीता सोडींना ॥१८॥
मज रावणा जिवे जिता । सर्वथा मी न सोडी सीता ।
ऐसे बोलणें बोलता । परम चिंता पावला ॥१९॥
चार मारणे नाही रघुनाथा । तेथूनि चार येथे येता ।
श्रीरामा अर्पी शीघ्र सीता । मज तत्वता सांगती ॥२०॥
ऐसा बोलिला बिभीषण । तैसंचि बोलिला शुकसारण ।
शार्दूळ सांगतो आपण । भय दारुण रामाचे ॥२१॥
वानरवीरांचे वर्णन :
श्रीरामापासीं वानरवीर । कोण धुरा थोर थोर ।
आतुर्बळीं कोण झुंजार । दशशिर पूसत ॥२२॥
तदपारमसंख्येयं वानराणां महद्बलम् ।
निशम्य रावणो राजा शार्दूलं पर्यपृच्छत ॥१०॥
एवं के वानराः शूराः के मुख्याः के महाबालाः ।
के पूर्वमभिवर्तंतः के महोत्साहसंस्थिताः॥११॥
क्षिप्रमाचक्ष्व शार्दूल सप्रधानाः प्लवंगमाः ।
श्रुत्वा तद्राक्षसेंद्रस्य वचनं परिपृच्छतः ॥१२॥
संख्यातुमुपचक्राम प्राज्ञो मुख्यन्प्लवंगमान् ॥१३॥
रावणे पुसिले जुत्पत्ती । वीर झुंजार आहेत कीती ।
शार्दूळ आपुल्या व्युत्पत्तीं । संकळित सांगत ॥२३॥
नळ नीळ रंभ पनस पन्नक । मैंद द्विविद सुमुख दुर्मुख ।
केशरी शतबळी दधिमुख । गवय गवाक्ष महावीर ॥२४॥
विनीत प्रमाथी क्रोधन । ऋषभ शरभ गंधमादन ।
फरश नाग सुषेण । इंद्रजानु जाण महावीर ॥२५॥
गज गोरभ तार तरळ । उन्नाह सन्नाह कुमुद कुशळ ।
क्रकच कराळ विकराळ । गोळांगूळ रणयोद्धे ॥२६॥
जांबवंताचा ज्येष्ठ बंधु । धुम्राक्षनामा अति प्रसिद्धु ।
रीससमुदाय सन्नद्धु । अतत अन्नद्धु रणमारा ॥२७॥
श्रीरामाजवळी जांबवंत । आतुर्बळीं बुद्धिवंत ।
मशकें राक्षसा मानित । कुंभकर्णा तृणप्राय ॥२८॥
वीर दुर्धर हनुमंत । लंकेंत केला अति आकांत ।
तो अग्रणी सैन्यांत । त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा ॥२९॥
ऋषिरामायणीं वीर । सांगितले अति अपार ।
तितुका न धरींच मी विस्तार । कथा अपार वाढेल ॥३०॥
हनुमंताचेनि नांवे । रावण दचकला जीवे भावे ।
इतर महावीरांचे यावे । कोण साहे लंकेशा ॥३१॥
श्रीरामांचे प्रतापबळ । ऐकोनि वानरसेना सबळ ।
रावणा लागली तळमळ । जनकबाळ जिरेना ॥३२॥
एवमुक्त्वा महातेजा रावणः पुनरब्रवीत ।
चारिता भवता सेना शूराः के तत्र वानराः ॥१४॥
किंप्रजाः किदृशाः स्ॐय वानरा ये दुरासदाः ।
कस्य पुत्राश्च पौत्राश्च तत्वमाख्याहि राक्षस ॥१५॥
अथैवमुक्तः शार्दूलो रावण पुनरब्रवीत ।
इदं वचनमारेभे वक्तुं रावणसंनिधौ ॥१६॥
वानरवीर अति अपार । कोण कोणाचा पुत्र पौत्र ।
सत्कूळ किंवा वनचर । हेंही समग्र मज सांगा ॥३३॥
मुख्य ब्रह्मयाचा सुत । आतुर्बळी बुद्धिवंत ।
नांवे जांबवंत ऋक्षनाथ । अति विख्यात रणयोद्धा ॥३४॥
सूर्याचा निजसुत । सुग्रीवराजा वीर विख्यात ।
करावया राक्षसांचा घात । लंकेआंत रिघो पाहे ॥३५॥
अंगद युवराज विख्यातु । जो का स्वये शक्राचा नातु ।
लंका उपडून न्यावया शक्तु । काळकृतांतु रणयोद्धा ॥३६॥
धर्मसुत सुषेण देख । सोमसुत दधिमुख ।
दोघे वीर अति नेटक । अंतका अंतक रणमारा ॥३७॥
समुख दुर्मुख मृत्यूपुत्र । केवळ मृत्यूचाच अवतार ।
रणी मर्दिती निशाचर । यांसमोर कोण राहे ॥३८॥
अग्निपूत्र नामे नीळ । त्या अधीन वानरदळ ।
सेनापति स्वये प्रबळ । राक्षस कुळ मारावया ॥३९॥
मैद द्विविद महावीर । अश्विनौदेवांचे कुमर ।
यमाचें पंच पुत्र । अति दुर्धर ते ऐका ॥४०॥
गज गवाक्ष गवय जाण । शरभ आणि गंधमादन ।
वैवस्वतपुत्र पांचही जाण । वीर दारुण रणमारा ॥४१॥
विश्वकर्म्याचा नळ सुत जाण । जेणे बांधिलें सेतुबंधन ।
उतरोनि वानरसैन्य । लंकादहन करु आला ॥४२॥
केशरीचा क्षेत्रज सुत । वायुपुत्र जो का विख्यात ।
दोहों बापांचा हनुमंत । ज्याचा पुरुषार्थ तिही लोकी ॥४३॥
हनुमान वीर अति बळी । लंका करु पाहे रांगोळी ।
शिरे खेळत चेंडूफळी । रणरवंदळी राक्षसा ॥४४॥
दशवानरकोट्याश्च सुराणां युद्धकांक्षिणाम् ।
श्रीमतां देवपुत्राणां शेषं नाख्यातुमुत्सहे ॥१७॥
वानरांची संख्या व व्यक्तिशः वर्णन :
दशकोटी वानरवीर । श्रेष्ठ अग्रणी सेनाधर ।
याहुनि अपार । सांगावया वक्त्र सरेना ॥४५॥
गणवेल पृथ्वीच्या अंकुरां । सुखें गणपती पर्जन्यधारा ।
तरी न गणवे वानरभारां । दशशिरा हे सत्य ॥४६॥
वानरांचा सबळ सद्भावो । एकैकातळीं सैन्यसमुदावो ।
कोट्यनुकोटी अर्बूदे खर्व । सेना सर्व वागविती ॥४७॥
वीरानुवीरीं सैन्यवृत्तांत । प्रत्येकें लिहितां वाढेल ग्रंथ ।
आता सांगेन मुख्यार्थ । सैन्यसख्यार्थ दोघांचा ॥४८॥
अंगद युवराजा कपिपती । सुग्रीव महाराजा भूपती ।
त्या दोघांची सैन्यसंपत्ती । संकळितार्थी सांगेन ॥४९॥
एवं वानरराजेन सुग्रीवेणाभिभाषितः ।
वीरपद्मसहस्त्रेण वृत्तः शंकुशतेन च ॥१८॥
युवराजोंऽगदो नाम त्वामाहृयति संयुगे ॥१९॥
श्रीरामाज्ञा यथोचित । अंगदा युवराज्य प्राप्त ।
सुग्रीव राजा अभिषिंचित । मंत्रयुक्त उल्लासे ॥५०॥
अंगदाची सैन्यसंपत्ती । ऋषि वाल्मीक वदला ग्रंथी ।
तेचि सांगेन उपपत्ती । यथानिगुती अवधारा ॥५१॥
शतसहस्त्रीं लक्ष म्हणती । शतलक्षीं कोटी गणिती ।
शतकोटी अर्बूद ख्याती । निर्बुद म्हणती तच्छतें ॥५२॥
शत निर्बुदीं खर्व गणिती । शतखर्वीं निस्त्रर्व म्हणती ।
शतनिखर्वीं पद्म वदती । जाण निश्चिती महाराजा ॥५३॥
पद्मसहस्त्र वीर रणरंगीं । चालती अंगदाच्या वामभागी ।
दक्षिणभागींच्या प्रयोगीं । वीरविभागी अवधारा ॥५४॥
पद्मशताच्या गणती । शंकुशद्ध त्याते म्हणतीं ।
शंकुशते वीर विख्याती । दक्षिणहस्तीं अंगदा ॥५५॥
अंगद बोलिला पुरुषार्थी । सैन्य प्रधान मशक किर्ती ।
रणी मारीन लंकापती । तुज युद्धार्थी पाचारी ॥५६॥
अंगद सेनासंख्यास्थिती । पद्मसहस्र वामभागार्थी ।
शंकुशते दक्षिणहस्तीं । रणकंदनार्थी महाबळी ॥५७॥
ऐकता अंगदसैन्यसंपत्ती । राक्षस महाशंख करीती ।
रावण दचकला चित्ती । चिंतावर्ती प्रधान ॥५८॥
शार्दुळ म्हणे दशानना । रानचिन्ही गडगर्जना ।
आली सुग्रीवराजसेना । तिची गणना तू ऐके ॥५९॥
सुग्रीव श्रीरामाकिंकर । रामे केला राज्यधर ।
त्याचा सैन्याचा संभार । सविस्तर अवधारी ॥६०॥
रामेण वालिनं हत्वा तस्य राज्येऽभिषेचितः ।
सुग्रीवस्तस्य यत्सैन्यं तत्सर्वं कथायामिते॥२०॥
शतं शतसहस्त्राणां कोटिमाहुर्मनीषीणः ।
शतं सहस्त्रकोटीनां शंकुरित्यभिधीयते ॥२१॥
शतं शंकुसहस्त्राणां वृंदमाहुर्मनीषिणः ।
शतं वृंदसहस्त्राणं महावृंदभिहोच्यते ॥२२॥
महावृंदसहस्त्राणां शतं पद्ममिति स्मृतम् ।
शतं पद्मसहस्त्राणां महापद्ममिति स्मृतम् ॥२३॥
एवं कोटिसहस्त्रेण पहापद्मशतेन च ।
एवं वृंदसहस्रेण महावृंदशतेन च ॥२४॥
एवं पद्मसहस्रेण महापद्मशतेन च ।
सुग्रीवः सहितो राजा संप्रहारार्थमुद्यतः ॥२५॥
श्रीरामे मारुनि वाळीसी । राज्य दिधले सुग्रीवासी ।
ते राजसेना तयापासी । समुदायेंसीं सन्नद्ध ॥६१॥
सहस्रांचें जे शत । त्याते लक्ष ऐसे बोलत ।
लक्षाचें जे शत गणित । त्याते म्हणत कोटि ऐसे ॥६२॥
वाल्मीक बोलिला येथ । तोच श्लोकींचा श्लोकार्थ ।
सहस्रकोटी शतसंख्यात । शंकु निश्चित त्या नांव ॥६३॥
शतशंकूंचें सहस्र गणित । वृंद ऐसे त्याते म्हणत ।
वृंदशतें सहस्र संख्यात । महावृंद निश्चित त्या नांव ॥६४॥
महावृंदशतसहस्री । पद्मसंख्या निजनिर्धारी ।
पद्मशतें सहस्रवरी । ते संख्या खरी महापद्म ॥६५॥
सहस्रकोंटी आणि शंकुशतक । सुग्रीवापुढें नित्य संमुख ।
वीर वाढिवें चालती देख । एक एक रणयोद्धे ॥६६॥
सहस्रवृंदें वीर नेटक । महावृंदें शतानुएक ।
दक्षिणबाहू सुग्रीवा देख । येती सुमुख दशमुखा ॥६७॥
गणितां सहस्रपद्में पद्म । सुग्रीवाचे बाहू वाम ।
वीर वाढिवें प्लवंगम । अति दुर्गम रणयोद्धे ॥६८॥
शतसंख्या महापद्म । सुग्रीवासाठी कपिसत्तम ।
चालती वीर निरुपम । रणकर्दम करावया ॥६९॥
आणिक वानर अति उद्भट । सुग्रीवा मागेंपुढें थाट ।
वाम सव्य घनदाट । भट सुभट महाबळी ॥७०॥
याही समुदायीं वीर वानर । सुग्रीवासवें अति दुर्धर ।
ठाकोनि आले लंकापुर । दशशिर मर्दावया ॥७१॥
करावया राक्षसांचें दळण । लंकाशिखरावरी उड्डाण ।
करिताति वानरग्ण । मुख्य रावण दंडावया ॥७२॥
ऐसेंचि वेगळे वेगळे वीर । सांगों जाता सैन्यसंभार ।
कथा वाढूं पाहे फार । तरी वानर न गणवती ॥७३॥
यदत्रानंतरं कार्यं तद्भवान्कर्तुमर्हति ।
इत्युक्तो रावणः क्रुद्ध उत्थितः परमासनात् ॥२६॥
आरुरोह ततः श्रीमान्प्रसादं हिमपांडुरम् ।
बहुतालसमुत्सेधं रावणो यद्दिदृक्षया ॥२७॥
ताभ्यां चराभ्यां सहितः स ददर्श महाबलम् ॥२८॥
रावण उंच जागी गोपुरावर जाऊन वानरसैन्य पाहतो :
शार्दूल म्हणे दशानना । सांगितली वानरसेना ।
याउपरी जे येईल मना । त्या साधना शीघ्र साधी ॥७४॥
ऐकोनि वानरांची सेना । कोप आला दशानना ।
सांडोनिया निजसिंहासना । पहावया नयनी ऊठिला ॥७५॥
सातखणी प्रासाद थोर । त्याहीवरी दीर्घ गोपुर ।
तेथे चढला दशशिर । वानरभार पहावया ॥७६॥
उंची सप्तताळ अधिक । पांडुरवर्ण प्रासाद चोख ।
तेथ चढला दशमुख । कपिकतक पहावया ॥७७॥
हेर चार साही प्रधान । गोपुरीं चढला दशानन ।
पाहू चढले लंकाजन । वानरसैन्यसमुदावो ॥७८॥
समुद्रतटी लंकानिकटीं । दातली वानरांची थाटी ।
सुवेळेपुढे वानरदाटी । रिती सृष्टी दिसेना ॥७९॥
लंकेसभोंवता वेढा । वानरी घातला गाढा।
सरों नयें मागा पुढा । हडोहुंडां वानर ॥८०॥
मुंग्या झोंबती गुळासीं । तेंवी वानर लंकेच्या चौपासी ।
झोंबताती अति आवेशी । रावणासी लक्षूनी ॥८१॥
वानरी कोंदलें जळ स्थळ । वानरी कोंदलें कुलाचळ ।
दशदिशा गोळांगूळ । नभीं कपिकुळ कोंदलें ॥८२॥
अति साक्षेपे पाहता वानरसेना । दृष्टी टणकली दशानना ।
मूर्च्छा आली विसां नयना । वानरसेना असंख्य ॥८३॥
पाहता वानरसेना गाढी । दृष्टि मागली बापुडी ।
पडली डोळियां झांपडी । रिती सवडी दिसेना ॥८४॥
वानरसेना देखोनि दृष्टी । लंकेमाजी बोंब उठी ।
अति विस्मय दशकंठीं । राक्षसकोटी किलकिलिती ॥८५॥
वानरसेना अपरिमित । पाहता रावण तटस्थ ।
घरोघरी अति आकांत । चळीं कापत राक्षस ॥८६॥
रावणाच्या छत्राची छाया पडलेली बिभीषणाने पाहून ती श्रीरामांना दाखविली :
दहाही छत्रे रावणशिसीं । छाया पडली कपिकटकासीं ।
श्रीराम पुसे बिभीषणासी । अभ्रें कायसीं अकाळी ॥८७॥
बिभीषण म्हणे रघुनाथ । तुझा शत्रु सेना पाहत ।
त्याचे छत्रांची येथ । छाया पडत समस्तांवरी ॥८८॥
ऐकोनि बिभीषणाचे वचन । कोपा चढला रघुनंदन ।
सज्जोनिया धनुष्यबाण । काय आपण बोलत ॥८९॥
रामांचे शरसंधान व रावणाचे छत्र दुभंगिले :
शत्रुछाया सैन्यावरी । हे तंव मज लज्जा भारी ।
रागे धनुष्य सज्जोनि करी । बाण सांवरी साटोपे ॥९०॥
रामःश्यामः कमलनयनस्तत्र धन्वी सरोषं ।
लंका पश्यन्भ्रमयति शरं पाणिना दक्षिणेन ॥२९॥
नवजलदघनतन । कांसे पीतांबर विराजमान ।
श्रीराम राजीवलोचन । बाहु आजानु सांगद ॥९१॥
मुकुट कुंडले वनमाळा । कंठी पदक कटी मेखळा ।
तोडर गर्जे चरणकमळां । तेणे कळिकाळा अति धाक ॥९२॥
वीरकंकणें करी मुद्रिका । दशावतारी सुरेख टीका ।
धनुष्य सज्जोनिया देखा । पाहे लंका सरोष ॥९३॥
दक्षिण करी भ्रमे बाण । जीवे मारावया रावण ।
दुश्चिता मारुं आपण । छत्रछेदन करावे ॥९४॥
श्रीरामांच्या अचुक शरसंधानाने रावण मोहितः
चमत्कारे सोडून बाण । दहाही छत्रे पै छेदून ।
लंकेबाहेर पडोन । शर परतोन रिघे भातां ॥९५॥
देखोनिया छत्रसंपात । रिपुगुणा रिझला लंकानाथ ।
परम धार्मिक श्रीरघुनाथ । शिरसंपात न करीचि ॥९६॥
संमतीचे वाक्यः - शत्रोरपि गुणा गाह्याः
त्याचा रावणावर झालेला गंभीर परिणामः
जेणे छेदिलीं दाही छत्रे । तो क्षणे छेदिता दहाही शिरें ।
अधर्मा न करिजे रघुवीरे । दशशिरें गुण घेइजे ॥९७॥
गुणा रिझतां दशानन । प्रहस्त बोलिला प्रधान ।
दुसरा सुटलिया बाण । करील कंदन लंकेशा ॥९८॥
ऐकोनि प्रहस्ताचे वचन । श्रीरामाच्या बाणाभेण ।
रावण गेला पळोन । अचुक मरण चुकविलें ॥९९॥
अचुकसंधानी श्रीरघुनाथ । लक्ष भेदोनि जेथींचा तेथे ।
बाण परतोनि भातां येत । अत्यद्भुत धनुर्वाडा ॥१००॥
मूळींच झाले छत्रच्छेदन । हाचि मुख्य अपशकुन ।
रणी मरेल रावण । लंकाजन जल्पती ॥१॥
श्रीरामाच्या अनुसंधानां । देखोनि वानरांची सेना ।
कल्पांत मांडला दशानना । छत्रभंजन अपशकुन ॥२॥
एका जनार्दना शरण । पुढे गोड निरुपण ।
कपट करील रावण । त्यांचे निर्दळण श्रीरामे ॥३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणच्छत्रभंगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥
ओंव्या ॥१०३॥ श्लोक ॥२९॥ एवं ॥१३२॥
