वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ९०. बिभीषणाचे लंकेला प्रयाण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088177 · अभंग क्र. ९०

90.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय नव्वदावा ॥
बिभीषणाचे लंकेला प्रयाण -

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामांनी बिभीषणाला लंकेत जाण्यास सांगितले :

तदुपरी दुसरे दिवशी । सारोनिया नित्यकर्मासी ।
बैसोनि अंतरसभेसी । बिभीषणासी बोलाविले ॥१॥
सीता आणि त्रिवर्गबंधु । उभे राहिले अति स्तब्धु ।
मग मांडिला उब्दोधु । बिभीषणालागूनी ॥२॥
बिभीषणासी म्हणे श्रीरघुपती । मज कळली तुझी मनोवृत्ती ।
आता असावे अयोध्येप्रती । माझ्या स्नेहा लागोनियां ॥३॥

वचन पाळण्याची परंपरा :

तरी लौकिकी माझी वार्ता । लंका दिधली शरणागता ।
ते हिरोनि सलोभता । बिभीषण अयोध्ये ठेविला ॥४॥
तरी हे थोर जधन्य । सूर्यवंशा येईन ऊन ।
स्वगी हरिश्चंद्रादि आपण । अधःपतन पावतील ॥५॥
म्हणोनि वचनाकरणें । पूर्वजीं प्राणांत करणे ।
परी अन्यथा होऊं न देणे । वचन आपुलें सर्वथा ॥६॥
यालागी म्या आपण । सोसिलें कष्ट दारुण ।
चौदा वर्षे वनप्रयाण । तिघीं आम्ही भोगिलें ॥७॥
आतांही तैसेचि घडेल । परी वचन अन्यथा न होईल ।
स्वये ब्रह्मांडही खचेल । तरी अन्यथा करू न शके ॥८॥
याचिलागीं पै जाण । स्वये शंकरे आपण ।
करोनिया कोप शमन । त्रैलोक्य जाण रक्षिलें ॥९॥
लंकेश म्हणे श्रीरामासी । कैसे घडले न कळे मजसी ।
कृपा करोनि विस्तारेंसीं । मज प्रीतीसी सांगिजे ॥१०॥

केवळ तुझ्याकरिता मी त्रैलोक्याचे रक्षण केले असे श्रीराम बिभीषणाला सांगतात :

श्रीराम म्हणे रावणवधांती । माझ्या कोपे जळेल त्रिजगती ।
तंव देव येवोनि काकुळती । श्रीउमापति प्रार्थिला ॥११॥
तेणे येवोनि ते अवसरी । स्तवोनि कोपातें आंवरी ।
ते वेळी लक्ष्मण चरण धरी । म्हणे आठवी वचन आपुलें ॥१२॥
स्वामीनें शरणागता । लंकाराज्य दिधले तत्वता ।
ते होऊं पाहे अन्यथा । विश्वप्रळयी निमाल्या ॥१३॥
मग कैंची लंका कैंचा बिभीषण । देवांसी मग रक्षील कोण ।
कृपाब्धि हे वचन । सांग कैसैनि उरेल ॥१४॥
याचि वचना- साठीं । तुजनिमित्तें ब्रह्मसृष्टी ।
हे जाणोनि राक्षसकिरीटीट्ट । लंकागमन करावे ॥१५॥

रामाज्ञेप्रमाणे बिभीषण लंकेला परत जाण्यास तयार होताच
रामांनी विश्वकर्म्याला पूर्वीसारखीच लंका सुंदर करण्यास आज्ञा केली :

बिभीषण म्हणे श्रीरामासी । आला वंदोनियां शिसी ।
मी जाईन लंकेसी । प्रयाणवचनासी स्वामीचिया ॥१६॥
ऐकोनि श्रीराम संतोषला । स्नेहेंकरोनि उचंबळला ।
बिभीषण पोटेंसीं धरिला । परम भक्त म्हणोनी ॥१७॥
करोनि विश्वकर्म्याचें स्मरण । येरू पातला धरी चरण ।
श्रीराम म्हणे लंकेशालागून । करी उपवनें पूर्विल्याऐसी ॥१८॥
त्रैलोक्याची संपत्ती । आणोनि ठेवी लंकेप्रती ।
सांप्रत उद्वस जाहली होती । ते करी पुन्हा यथास्थित ॥१९॥
दुर्गां करोनि उभवणी । रत्‍नखचित करी सुवर्णी ।
हार्ट बिदिया चौबारांनीं । शोभायमान अपूर्व ॥२०॥
राजमदिरें सर्व । प्रधानादि गृहें अपूर्व ।
पूर्विल्याहूनि गौरव । शोभावैभव अति रम्य ॥२१॥
अशोकवन करी बरवे । पुष्पकविमान निर्मावें ।
मागेल ते पुरवाचे । बिभिषणालागूनी ॥२२॥
सुवेळेपुढे रणांगण । रावणासहित रक्षोगण ।
यांचें झाले पूर्ण कंदन । रक्तमांस धरेवरी ॥२३॥
अस्थींचे झाले डोंगर । वने झाली बीभत्साकार ।
ती करावीं मनोहर । जैसी पूर्वी होती तैसी ॥२४॥

बिभीषणाला सर्वतोपरी साहाय्य करण्याची सर्वांना रामांची आज्ञा :

बोलावोनी लोकपाळांसी । तुम्ही सख्य करावे बिभीषणासीं ।
रावणाघरी संपत्ती जैसी । त्याहून विशेषी पुरवाची ॥२५॥
बोलावोनि अष्टमहासिद्धी । तुम्ही साह्य व्हावे बिभीषणा आधी ।
तुम्हासी सांगतो सद्‌बुद्धी । स्वहित सिद्ध करावे ॥२६॥
सवेंचि पाचारिले ऋषिगण । तुम्ही आशीर्वाद द्यावा संपूर्ण ।
निकुंभिळेसी करील होम जाण । तो सिद्धी पावावा ॥२७॥
गणपति दुर्गा क्षेत्रपाळासी । श्रीराम सांगे आदरेंसी ।
मनोरथ पुरवावे बिभीषणासीं । कल्पतरुकामधेनूसीं समृद्धि ॥२८॥
प्रार्थोनिया ब्रह्मदेवासी । तुम्ही कल्पावें राक्षसांसी ।
पुत्रसुहृदयसंबंधासी । पूर्विल्यापेक्षांही करावे ॥२९॥
रथ गज वाजी अनेक । चतुरंगसेना सकळिक ।
नाना वाद्ये अलोलिक । लंकेशाते पुरवावी ॥३०॥
धन धान्य खिल्लारे वस्त्रे । उत्तम वास परिकरे ।
तांबूलसुगंधादि सह परिवारे । बिभीषणासी पुरवावी ॥३१॥

जग सुखी करावे असा बिभीषणाला रामांचा उपदेश :

रावण गेलियानंतर । उणे न दिसावे अणुमात्र ।
सुख द्यावे सर्वत्र । लंकापुरवासियां ॥३२॥
श्रीराम म्हणे बिभीषणासी । रावणे पीडिलें त्रैलोक्यासी ।
तैसे न करावे विश्वासी । करी जगासी सुखरूप ॥३३॥
हिंसा न करावी सर्वथा । विधिप्राप्त यज्ञ करी तत्वता ।
मानोनिया शास्त्रसंमता । साचारता वर्तावे ॥३४॥
करोनि श्रीशंकरार्चन । देवीचे करावे पूजन ।
स्मरोनियां नारायण । नित्यावर्ती जाण वर्तावे ॥३५॥
तुज म्हणती राक्षसजाती । परी तुझी नव्हे तैसी मती ।
जाणोनि माझी प्रकृती । तैसी वर्तणूक करावी ॥३६॥
न करी अभिचारी कर्म । नाचरावे दुष्ट धर्म ।
उचित काळ राजधर्म । नित्यावर्ती वर्तावे ॥३७॥

श्रीरामाचे वरदान :

राज्यीं न घडे अभिचार । अल्पायुषी नव्हती नारी नर ।
धन्य होती समग्र । मदनुग्रहेंकरोनी ॥३८॥
उदार होई सर्वशक्तीं । शरण आलिया रक्षी निश्चिती ।
समरांगणीं शौर्यवृत्ती । हे हो तुजप्रती असो दे ॥३९॥
चौदा विद्या चौसष्ट कळा । ज्ञान व्हावे राक्षसपाळा ।
हेंही पावसी आता स्वलीळा । ममाज्ञा करोनिया ॥४०॥
करोनि सकळांसी प्रार्थना । पाठविले स्वस्थाना ।
देवोनि मंत्रबीजखुणा । सर्व शक्ति जाणा दीधल्या ॥४१॥

लंकेतील आचरण कसे असावे ते श्रीराम सांगतात :

मागुती म्हणे बिभीषणासी । प्रतिवर्षी भरवीं यात्रेसी ।
करोनिया महोत्साहासी । माझे स्थानासी पूजावें ॥४२॥
प्रति इंदुवारी आपण । घ्यावें रामेश्वरदर्शन ।
पूजा करोनि संपूर्ण । माझे ध्यान करावे ॥४३॥
ऐसा नानापरींच्या युक्ती । शिकवोनि लंकापती ।
पुढती सांगे अतिनिगुती । स्वात्महितीं रघुवीर ॥४४॥
रावणाचिये घरी । तुवा रहावे निर्धारी ।
स्वपुत्र ठेवावा गृहाभीतरीं । यौवराज्य देवोनियां ॥४५॥
उर्वरित३ रावणाचिया अंतुरी । त्या ठेवाव्या इंद्रजिताचे घरी ।
सर्वस्व सांभाळावे बरवेपरी । आपुल्या अपत्यासमान ॥४६॥
शुद्ध करोनि कुंभकर्णमदिर । तेथे ठेवावे माझे चाप शर ।
त्यांची पूजा करोनि परिकर । नित्य कर्तिनगजर करावा ॥४७॥
शतकोटी रामायण । करावे हे नित्य श्रवण ।
आपण करोनि माझे मूर्तिपूजन । विश्व लावावे स्वधर्मा ॥४८॥
करावे षडक्षरपुरश्चरण । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठा करून ।
केशवादि मातृका संपूर्ण । दशविध न्यास करावे ॥४९॥
ते बोलिले अगस्तिसंहितेसीं । आणि अथर्वण उत्तरतापिनासीं ।
करोनिया यंत्रोद्धारासी । ममार्चनासी करावे ॥५०॥
सिद्धियुक्त चातुर्मास्थादि व्रत । ते बोलिलें वराहसंमत ।
शयनी बोधिनी व्रतत्रय व्रत । विप्रदीक्षा प्रकटावी ॥५१॥
न करावी निंदा कोणाची । स्तुति येऊ नेदीं इच्छेची ।
वार्ता नाणी परांगनेची । स्वप्नीं माते न विसरावे ॥५२॥

बिभीषणाला द्वीपे, रथ, हत्ती दिले :

श्रीरामे धरोनिया पोटेंसीं । बैसविला आपणांपासी ।
पाचारोनि शुक्रासी । मग मुहुर्तासी पूसिलें ॥५३॥
येरू म्हणे सुनिश्चित । उदयिक आहे सुमुहूर्त ।
साधोनियां अभिजित । भोजनयुक्त धाडावा ॥५४॥
याउपरी श्रीरामे । प्रधान बोलविले अनुक्रमे ।
लंकेसमीप द्वीपें उत्तमें । बिभीषणालागीं दीधलीं ॥५५॥
शत रथ सहस्र हस्ती । तुरंग उत्तम सालंकृती ।
लंकेशासी विधियुक्ती । अति प्रीती दीधले ॥५६॥

श्रीरामांनी जानकीकडून बिभीषणपत्‍नीची पूजा करवून दोघांची लंकेला पाठवणी केली :

जानकीस पाचारोनि रघुनंदन । कानी सांगोनि वचन ।
पूजा करोनि संपूर्ण । बिभीषणपत्‍नी पाठवावी ॥५७॥
आज्ञा वंदोनि शिरी । पूजा करोनि यथोपचारीं ।
वस्त्रालंकारपरिकरी । शिबिकारूढ पाठविली ॥५८॥
ऐसे रीती रघुपती । सिद्ध करोनि लंकापती ।
सवे देवोनि प्रधान सुमती । लंकेप्रती गमन करावी ॥५९॥
येरीकडे विश्वकर्मा आपण । करोनि लंकेसी गमन ।
आज्ञेप्रमाणें रचोनि पूर्ण । श्रीरामचरण वंदिले ॥६०॥
आज्ञेप्रमाणें आपण । ब्रह्मा रची सृष्टि संपूर्ण ।
लोकभरोनि विविधजन । अष्टादशवर्ण नांदवी ॥६१॥
तैसेचि येती सकळ । समृद्ध करोनि लंकामंडळ ।
वंदोनियां भूपाळ । स्वस्थानासी निघाले ॥६२॥

ऋषींना बिभीषणाला राज्याभिषेक करण्याची विनंती :

पाचोरोनि सकळ ऋषी । अति नम्रत्वे बोले तयांसी ।
तुम्ही जावोनि लंकेसी । बिभीषणासी स्थापावे ॥६३॥
माझा बिभीषण आपण । ते माझे निजस्थान ।
अग्रगणी वैष्णव पूर्ण । मी तयाधीन सर्वस्वें ॥६४॥
ऐसे राहविले एक मास । प्रत्यहीं आदराचा विलास ।
आनंदें करोनि समरस । परस्परें स्नेहेंकरोनी ॥६५॥

नित्योत्सव :

प्रातःकाळी श्रीरामचरण । देखती डोळेभरी पूर्ण ।
मध्यान्हीं करोनि शरयूस्नान । पंक्ती भोजन यथारुचि ॥६६॥
सायंकाळी रघुनंदन । देखता आनंदें नीराजन ।
भाट गर्जती संपूर्ण । श्रीरामगुण वाखाणिती ॥६७॥
प्राप्त झालिया निशी । यथाविधि सुमनचंदनासीं ।
शय्याविधीची उपमा कैसी । ब्रह्मसदनासीं समानत्वें ॥६८॥
एके दिवशी वनक्रीडेसी । जाऊनि करिती सहपरिवारेंसीं ।
तैसेंचि राजगृही संपभ्रमेंसीं । अति आनंदेंसी भोगिती ॥६९॥
सवेंचि येती गोपुरासी । मग पाहती गजयुद्धासी ।
रचून सकळ संन्यासी । निशी अग्नियंत्रासी दाविती ॥७०॥
राजगृहीं तांबूलसन्मान । मग पावती आपुले स्थान ।
भोग भोगिती संपूर्ण । जे रघुनंदन निर्मिले ॥७१॥
गंधर्व येती घरासी । नानापरी दाविती कर्मासी ।
लाहोनि यथोचितासी । मग सेजेसी पहुडती ॥७२॥
तेथे येवोनि उर्वशीचे शत । सेवेलागीं तिष्ठत ।
परी त्यांचे मन नव्हेचि कामासक्त । की हरिभक्त म्हणोनी ॥७३॥
ऐसा करिता गदारोळ । आनंदें भरिला भूगोळ ।
कीर्ती स्कूटों पाहे दिङ्‌मंडळ । राम रायाचेनि धर्मे ॥७४॥
सुखरत सर्व अहोरात्र । काळ पळे झोकोनि नेत्र ।
इतराचा लेखा किंमात्र । श्रीरामराज्य करिता स्वामी ॥७५॥
देव येवोनि तेहतीस कोडी । करी धरोनि कुरवंडी ।
गावोनि सांडिती रामरायाची प्रौढी । मग ओवाळोनि सांडिती ॥७६॥
होतो अरुणोदय प्राप्त । स्तुतिवादें बोधिती श्रीरघुनाथ ।
प्रतिपाळीं विश्व समस्त । प्रातर्बोध करिते झाले ॥७७॥
मग उठोनि सकळांसी । शौचविधी यथान्वयेंसीं ।
घालोनिया मृद्रासनासी । मूर्ति ध्यानासी अणिती ॥७८॥
येवोनि सकळ जन । घेती श्रीरामदर्शन ।
मग करोनि शरयूस्नान । संध्याहोम संपादिती ॥७९॥
करोनि देवतार्चन । घेवोनि वस्त्रे भूषण ।
परस्परें अर्पोनि सुमन चंदन । राजद्वारा जाण स्वये येती ॥८०॥
काय वानू हाटवटिया । जाणो मूर्तिमंत निधी ठेलिया ।
किंवा वोळंगणे आलिया । सकळ संपत्ती समवेत ॥८१॥
अंतरसभा विसर्जून । बाहेरी आला रघुनंदन ।
तंव वानिती बंदिजन । अति पुरुषार्थ चार ते ॥८२॥
ऐसा नित्यानित्य उत्साव । करिता झाला रामराव ।
आनंदाचा गौरव । ब्रह्मादिका दुर्लभ ॥८३॥
यापरी बिभीषण एकांती । प्रबोधोनि बहुता युक्ती ।
आणोनि कौसल्येप्रती । चरणावरी घातला ॥८४॥

बिभीषणाचे कौसल्यादि मातांना वंदन व मातांचे त्याला आशीर्वाद :

माता म्हणे बिभीषणासी । तू माझा रामाचा सखा होसी ।
मग देवोनि आशीर्वचनासी । सुमित्रे कैकयीसी भेटविला ॥८५॥
सात शते माता समस्त । डोळा पाहती सुग्रीव लंकानाथ ।
सकळासहित हनुमंत । त्रिजगतींत तत्सम असेना ॥८६॥
चौघी सुना येवोनि ते वेळीं । पाहती बिभीषण वानरमंडळी ।
हाडपियां करी तांबोली । देवोनियां धाडिले ॥८७॥
सभेसी येती ऋषिगण । देवोनि वेदोक्त आशीर्वचन ।
येरी देवोनि सन्मान । समीप जाण बैसविले ॥८८॥

रावणवधाचे प्रायश्चित कोणते घ्यावे असा रामांचा ऋषींना प्रश्न :

श्रीराम पुसे तयांसी । विनंती आहे मानसी ।
मज सांगावे निश्चयेंसी । धर्मनीतीसी अनुकूल ॥८९॥
आम्ही मारिला रावण । तरी हे तंव देवकार्य जाण ।
तरो पावला कृतकल्याण । परी दूषण ते आम्हा ॥९०॥
हा विधात्याचा पणतू । पौलस्तीचा सुतू ।
ब्राह्मणोत्तम निश्चितू । सकळ वेदार्थू जाणता ॥९१॥
यासी मारिले समरांगणीं । दोष नाही क्षात्रधर्मालागूनी ।
तथापि स्वामींच्या वचनी । अति विश्वास आमुचा ॥९२॥
तरी आता यथार्थ । वदावे जी प्रायश्चित ।
ते करोनि विधिधुक्त । धर्मस्थापन करावे ॥९३॥
तंव बोलती ऋषीश्वर । पुससी गौरवोनि विचार ।
तू सकळांचा ईश्वर । कृपाकर आमुतें ॥९४॥

शिवलिंग स्थापना करावी, विषांना वर्षासने द्यावीत असे ऋषींनी संगितले :

तरी आता ऐसे कीजे । स्थलमाजी लिंग प्रतिष्ठिजे ।
तीर्थस्थापन करविजे । संपादिजे शिवाचा ॥९५॥
कृष्णा गोदा भागीरथी । उभयतीरी लिंगप्रतिष्ठा निश्चिती ।
येणे ब्रह्महत्येची निर्मुक्ती । वेदप्रयुक्ती बोलिली जे ॥९६॥
आणिक एक असे कारण । ब्राह्मणासी द्यावे अग्रहार दान ।
पत्र द्यावे वर्षासन । पुष्टी शशि सूर्य जंव आहे ॥९७॥
वंदोनि ऋषींचे चरण । करोनि चरणक्षाळण ।
भक्तियुक्त करोनि पूजन । मग स्वाश्रमा जाण धाडिले ॥९८॥

त्याप्रमाणे करण्याची प्रधानांना रामांची आज्ञा :

आला करोनि प्रधानासी । एक भाग देवांसी ।
दुजा भाग द्विजांसी । तिजा राज्यासी चालवी ॥९९॥
आज्ञेप्रमाणें शिवालयें । लिंगप्रतिष्ठा यथान्वये ।
संपादोनि शीघ्र मजप्रति ये । सुखवार्ता सागावया ॥१००॥
आला वंदोनि शिशीं । वंदोनियां भरतासी ।
मुद्रा लाहोनि पत्रासी । मग दूतासी धाडिलें ॥१०१॥
चमत्कारे करोनि नमन । आज्ञेप्रमाणे संपादून ।
त्रिमासांत पातले गण । श्रीरामचरण वंदावया ॥१०२॥
तडीतापडी संन्यासी । योगी बैसले योगाभ्यासी ।
त्यांची वार्ता आणोनि मानसी । यथोपचारांसी पाठविले ॥१०३॥
अंधपंगु हीन अंगे । दरिद्रें पीडिले वातयोगे ।
गृहअन्नवस्त्र संयोगें । अति स्नेहे रक्षिले ॥१०४॥
भरतासी म्हणे श्रीराम । राज्यभार चालवी निःसीम ।
जे असेल दुर्जय दुर्गम । ते मजप्रति नेमे सांगावे ॥१०५॥
त्यानंतर सभाविसर्जन । सवे बिभीषणात्मज घेऊन ।
मग पातला जानकीभुवन । परिचारक जनसमवेत ॥१०६॥
अंतगृहा नेवोनि त्यासी । भेटविले जानकीसी ।
तिणें अर्पून कंठाभरणासी । स्वाश्रमासी धाडिलें ॥१०७॥
भरतें येवोनि भद्रासीं । पाचोरोनि सर्व प्रधानांसी ।
आला नेमी समस्तांसी । प्रति सभेसी शीघ्र यावे ॥१०८॥
उदयीक सकळांसी प्रयाण । स्वये करवील रघुनंदन ।
सदन्नें करोनि निर्माण । सिद्ध करणे उपचाराते ॥१०९॥
श्रीरामसंकेतलाघवता । निर्माण करावे चौ पुरुषार्था ।
जे जे अपेक्षा ज्याचे चित्ता । त्या त्या पदार्था पुरवाचे ॥११०॥
एका जनार्दना शरण । झाले बिभीषणा समाधान ।
पावोनिया रामवरदान । राजनीति जाण संपादिली ॥१११॥
हे बिभीषण आख्यान । कर्ता श्रीगुरु आपण ।
तेणेंचि संपवूनि निरूपण । अकर्तेपणे राहिला ॥११२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
बिभीषणप्रयाणं नाम नवतितमोऽध्याय ॥९०॥
ओंव्या ॥११२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग