जो या गेला पंढरपुरा
3244.
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनी तो ॥१॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥धृपद॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरीची ॥२॥
बाहेर येता प्राण फुटे । रडे दाटे गहिवरे ॥३॥
दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥
मागुता हा पाहो ठाव । पंढरिराव दर्शने ॥५॥
तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
अर्थ :
जो या पंढरपूरच्या यात्रेला एकदा गेला तो इतर कोणत्याही यात्रा मानीत नाही. माझी माय म्हणजे पंढरीचा राया विठ्ठल आहे ती त्याच्या भक्तरुपी लेकरांच्या अंत:करणातील सर्व खुणा ओळखते व ती पूर्ण करते. अनेक जन्माच्या पुण्याच्या राशी असतील तरच त्या मनुष्यास पंढरीची वारी घडते. भक्त एकदा पंढरपूरला गेले विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि पंढरीतून बाहेर पडले की त्यांना रडू येते त्यांचा कंठ दाटतो ते अगदी गहिवरुन जातात. ते भक्त एकमेकाला म्हणतात की आज आपल्याला पंढरी सोडून जायचे आहे आज दही भाताचा मंगलमय जेवण करा मूरडीचा कानवला करा. आपण जर असे केले तर आपण लवकरच पुन्हा पंढरीला येवू आणि पंढरीरायाचे पुन्हा लवकरच दर्शन घेऊ अशी नितांत श्रध्दा वारकऱ्यांची असते. तुकाराम महाराज म्हणतात, भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटावर वसलेली पंढरीक्षेत्र म्हणजे भूवैकुंठच आहे.
