स्फुंदत स्फुंदत नामा
1763.
स्फुंदत स्फुंदत नामा उभा महाद्वारी | दृष्टि पायावरी विठोबाच्या ॥१॥
देखोनि केशवे उभारिल्या बाहे | पालवितु आहे पीतांबरे ॥२॥
संवसारी रुसलासे नामा | दाटलासे प्रेमा ओसंडत ॥३॥
येई नाम्या तुज धरीन पोटाशी | कोणे गांजिलासि दुराचारे ॥४॥
ऐके वो रुक्मिणी अंजारूनि तुम्ही | वोसंगा घेऊनि आळवावा ॥५॥
जगत्र जननी संभ्रमे करुनि | प्रीतिपान्हा स्तनी वोसंडला ॥६॥
वोरसला नामा घेतलासे करी | मुख पितांबरे पुसीतसे ॥७॥
कवणे तुझे चित्ती लावियेला चाळा | न देखता डोळा स्फुंदतसे ॥८॥
बुझाविला नामा दाटलासे प्रेमा | हांसे सत्यभामा काय जाले ॥९॥
कोण कुळी नामा काय लोभ याचा | तू स्वामी दीनाचा पांडुरंग ॥१०॥
