उपजल्या काळे शुभ का
2753.
उपजल्या काळे शुभ का शकुन । आता आवरोन राहिलेती ॥१॥
नाही मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥धृपद॥
सत्याविण काय उगीच लांबणी । करियाची वाणी येर भूस ॥२॥
तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनी पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
देवा ज्यावेळी मी परमार्थ करण्यास सुरवात केली त्यावेळी मला तुमची प्राप्ती होईल असे शुभशकुन होऊ लागले परंतू आता तर तुम्ही तोंड लपून बसला आहात. देवा केवळ शब्दानुशब्द जोडून अभंगाची रचना करण्याचे आणि वरवर केवळ निष्कामता दाखवण्याचे तुम्हाला मागितले नव्हते. परमार्थामध्ये सत्य वागण्याला महत्व आहे सत्याविणा केवळ सोंग दाखवणे कार्याची लावणी करण्यात काय अर्थ आहे आणि आपल्या वाणीने जे काही बोलू ते कार्य सफल झाले तर चांगले, नाहीतर आपली वाणी ही व्यर्थ भूशासारखी ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा अशा प्रकारची फसवणूक कोणाची करावी व कोणाची नाही करावी हे तुम्ही तुमच्या मनाशीच विचार करुन का नाही पाहात.
