बोलविसी तैसे आणी अनु
3340.
बोलविसी तैसे आणी अनुभवा । नाही तरी देवा विटंबना ॥१॥
मिठेंविण काय करावे मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥धृपद॥
संपादणीविण मिटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥
कन्यापुत्रेंविण मंगळदायके । वेचिले हे फिके द्रव्य तरी ॥३॥
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरी प्रेमभाव ॥४॥
अर्थ :
देवा तू माझ्या मुखातून जसे बोल बोलवित आहेस त्या प्रकारचा अनुभव देखील माझ्या अंगी येऊ दयावेत नाहीतर त्या बोलण्याची विटंबना होईल. मीठावाचून मिष्ठान्न असेल तर त्याचा काही उपयोग होईल काय आणि जीवावाचून एखादया प्रेताला सजवले श्रृंगारले तरी ते व्यर्थच ठरते. जर एखादे सोंग संपादन केले आणि त्या सोंगाची संपादने व्यवस्थित व चांगली करता आली नाही तर घेतलेल्या सोंगाची विटंबनाच होते तसेच एखादयाचे रुप अतिशय सुंदर आहे पण त्यामध्ये चांगले गुणच नाही तर ते रुप व्यर्थच ठरते. मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तर त्यामध्ये द्रव्य खर्च केले तर ते फलदायक ठरते परंतू बाहुला बाहुलीचे लग्न ठेवले आणि त्यामध्ये द्रव्य खर्च केले तर ते व्यर्थच ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अगदी तसेच माझे दिसत आहे मी वरवर तर भक्तीचे प्रेमाचे बोल बोलतो आहे परंतू अंत:करणामध्ये तुझ्याविषयी प्रेमभाव भक्तीभाव काही दिसून येत नाही.
