पाहता तुझे चरण हरली
1613.
पाहता तुझे चरण हरली भवव्यथा | पुढती एक चिंता वाटतसे ॥१॥
झणी मुक्तिपद देसी पांडुरंगा | मग या संतसंगा कोठे पाहू ॥२॥
मग हे पंढरी आनंद सोहळा | कवणाचे डोळा पाहू देवा ॥३॥
मग हे हरिकथा अमृत संजीवनी | कवणाचे श्रवणी ऐको देवा ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीची सोये | अनंत जन्म होये याचिलागी ॥५॥
