चोविसा-मूर्तीसी आसन-
412.
चोविसा-मूर्तीसी आसन-मुद्रा-ध्यान ।
हा पांडुरंग जाण निर्गुणरूप ॥१॥
ज्याचे पायी जन्म देवा आणि तीर्था ।
ते मूर्ती तत्त्वता विठोबाची ॥२॥
वेदा आणि शास्त्रा ॐकार हा मूळ ।
सर्वांचे समूळ पांडुरंग ॥३॥
विटेचा संकेत पाचवी अवस्था ।
ब्रह्मसायुज्यता निखळरूप ॥४॥
कटी हात दोन्ही खुणाची दाखवी ।
अनेक एकत्वी पहा कैसे ॥५॥
बहेणि म्हणे तया लोधले हे मन ।
धन्य जया खूण कळो आली ॥६॥
