(बाळक्रीडा अभंग)
3866.
(बाळक्रीडा अभंग)
तो या साच भाव न कळेचि इंद्रा । म्हणउनि धारा घाली मेघा ॥१॥
घाली मेघ धारा कडाडिला माथा । वरी अवचिता देखियेला ॥२॥
देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥
विचारी पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥
लागलेसे गोड न कळे त्या काळी । भेणे वनमाळी आठविती ॥५॥
आता कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥
यांचिया विचारे होणार ते काई । तुका म्हणे ठायी वेडावली ॥७॥
अर्थ :
प्रत्यक्ष भगवान गोकुळात आहे हा खरा भक्तिभाव इंद्राच्या ठिकाणी नव्हता त्यामुळे तर त्याने मेघांना गोकुळात अतिवृष्टी करण्यास सांगितले. जेव्हा गोकुळवाशीयांनी अवचितच वर पाहिले त्यावेळी अचानकच जोरात मेघवृष्टी चालू झाली. अशी मेघवृष्टी पाहून सर्व गोपाळ भ्याले व आता काय करावे हे विचारु लागले. सर्व गोकुळवाशी विचारात पडले लहान मुले खेळण्याचे विसरले आणि गोपाळ म्हणू लागले की, आपण इंद्र याग न करण्याचे ठरविले त्यामुळेच हा प्रकार घडत आहे आपण खरे तर मोठा अपराध केला आहे असे ते म्हणू लागले. इंद्रयाग बंद करताना या पोरांना फार गोड वाटले परंतु त्याचे पुढे काय परिणाम होतील याचा त्यांनी त्यावेळी काहीच विचार केला नाही आणि जसाजसा पावसाचा जोर वाढू लागला तसेतसे सर्वांना भिती वाटू वाटली व सर्वांनी वनमाळी नारायणाची आठवण करण्यास सुरवात केली. आता काय करावं, कोठे जावे आपल्या गाई, म्हशींना आसरा कोठे दयावा कसा विचार करावा हे काहीच त्यांना कळत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकारे सर्वजण विचार करु लागले परंतु यांच्या विचाराने काय होणार आहे सर्व गोकुळवाशी अतिवृष्टीने प
