(बाळक्रीडा अभंग)
3865.
(बाळक्रीडा अभंग)
देव त्या फावला भाविका गोपाळा । नाही तेथे कळा अभिमान ॥१॥
नाडली आपल्या आपणचि एके । संदेहृदायके बहुफार ॥२॥
फार चाळविली नेदी कळो माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥
विश्वासावांचुनि कळो नये खरा । अभक्ता अधीरा जैसा तैसा ॥४॥
जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरी देतो घेतो ॥५॥
अर्थ :
देव श्रीकृष्ण भोळया भाविक गोपाळांवर प्रसन्न झाला होता कारण त्यांच्या ठिकाणी कोणताही अभिमान नव्हता. आपल्याच ठिकाणी असलेल्या संशयानेच आपण अडचणीत पडलो आहोत. देवाचा देव आदी देव विश्वंभर याने ज्याच्या ठिकाणी संदेह आहे त्याला चांगल्याच प्रकारे चाळविले आहे व आपली माया त्याला कळू दिली नाही. अभक्त आणि अधीर लोकांना विश्वासावाचून खरा देव समजत नाही म्हणजे जसा देव आहे तसा त्यांना समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा जसा भक्तिभाव असेल तसा त्याच्यासाठी देव जवळ दूर आहे व त्याला देखील हरी, त्याचे प्रेम घेऊन, त्याच प्रकारचे त्याला फळ देतो.
