॥ श्रीएकनाथमहाराजकृत
29.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय एकोणतिसावा ॥
हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन
सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया हनुमान जाण ।
गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामे ॥१॥
सीतेनें पुसिली श्रीरामकथा । तेचि सांगावया स्वरूपता ।
उल्हास हनुमंताचे चित्ता । यथार्थता सांगत ॥२॥
लक्ष्मणाचे निजलक्षण । ठाणमाण सगुणगुण ।
समूळ सांगेल आपण । सावधान अवधारा ॥३॥
सादर श्रवणार्थी स्वये सीता । तेणे आल्हाद हनुमंता ।
सावधान मिळाल्या श्रोता । वदे वक्ता आल्हादे ॥४॥
श्रीरामरूप अति स्वरूप । रूपे जिंतला कंदर्प ।
परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥५॥
राम राजीवलोचन । जगाचे नयना सादृश्य ते नयन ।
परी देखणा डोळेवीण । देखणेपण हे त्यांचे ॥६॥
दृश्य देखे हे तत्व गौण । श्रवणांत देखणे नयन ।
सर्वांगदेखणा रघुनंदन । डोळेविण देखत ॥७॥
कुंडले वर्णिती साकार । एक म्हणती मकराकार ।
श्रवणें मावळती विकार । निर्विकार निजलेणें ॥८॥
श्रीरामचेनिं श्रवणें । श्रवणा होती निजभूषणें ।
श्रवणा श्रवणचि लेणे । श्रवण देखणे परब्रह्म ॥९॥
परमार्थाचें मुख्य बीक । निरपेक्षा तेंचि नासिक ।
तेणेंवीण ते निर्नासिक । कैंचे सुख सापेक्षा ॥१०॥
श्रीरामाची नासिकस्थिती । प्राण्या प्राणें नित्य विश्रांती ।
श्रीराम जाणे प्राणगती । गतीसीं विश्रांति श्रीराम ॥११॥
श्रीरामाचा मुखमयंक । नित्यानंदें निष्कळंक ।
ब्रह्मादि देवा सुखदायक । जीवशिवा सुख श्रीरामे ॥१२॥
जीव शिव ते दोन्ही अधर । श्रीराम अधरीं जाले सधर ।
मिळणीं मिळाले एकाकार । शिवसुख साचार श्रीराम ॥१३॥
श्रीराममुखीं दंतपंक्तीं । जेंवी आकारामाजी श्रुती ।
श्रुतीस्मृतींसी निजविश्रांती । श्रीराममूर्तिमुखचंद्र ॥१४॥
श्रीरामाचे निजनिढळीं । सच्चिदानंद हेचि त्रिवळी ।
त्याचे ललाटभाग्य समेळी । लोकी सकळीं नांदिजे ॥१५॥
प्रेमकेशरसमेळा । टिळक रेखिला पिंवळा ।
निर्धार अक्षता निढळा । राम प्रेमळां पढियंता ॥१६॥
अहं मृग वधी निर्लोभेंसीं । काढिले सोहं मृगनाभीसी ।
तेंही अर्पिले श्रीरामासी । निजांगासी चर्चोनी ॥१७॥
जन विजन विवंचून । साधिले निजधैर्य चंदन ।
त्याचाही सुगंध काढून । उद्वर्तन श्रीरामा ॥१८॥
विद्याअविद्याशक्तिपडळा । त्यजोनि काढिले मुक्ताफळा ।
तेच श्रीरामाचे गळा । मुक्तामाळा शोभत ॥१९॥
ॐकार तोचि कंबुकंठ । तेथोनि वेदा वाहती वाट ।
गर्जती विधिवादे उद्भट । होती प्रकट त्रिकांडीं ॥२०॥
त्वंपदा तत्पदा अतीत । ह्रदयीं पदक सदोदित ।
साधुचिद्रत्नीं रत्नखचित । लखलखित निजतेजे ॥२१॥
म्हणती कांसे कसिला पीतांबर । श्रीरामकांसें चिदंबर ।
झांकी शून्यत्वाचे छिद्र । कांसे अच्छिद्र श्रीराम ॥२२॥
श्रीरामकांस दृढ भारी । एकपत्नीव्रतधारी ।
कांसे लागल्यातें तारी । भवसागरी तारक ॥२३॥
श्रीराम आकळे सगळा । भक्तभावार्थ कटिमेखळा ।
क्षुद्रघंटिकाज्वाळमाळा । जालिया सकळा ऋद्धिसिद्धि ॥२४॥
सूक्ष्म मध्याची रचना । अभिमान होता पंचानना ।
देखोनि श्रीराममध्यरचना । लाजोनि वना तो गेला ॥२५॥
पहावया श्रीराममध्यासी । शाहाडे जडे मेखळेंसी ।
सर्वस्वें वेधले श्रीरामासी । जावों वनासी विसरले ॥२६॥
श्रीरामचरणांची ख्याती । जड पाषाण उद्धरती ।
श्रीराम सकळांची गती । गतींस सद्गति श्रीराम ॥२७॥
श्रीरामचरणांचेनि भूषणे । वांकीनें वेदांसी आणिले उणें ।
ते तंव धरोनि ठेले मौने । हरिकीर्तन हे गर्जे ॥२८॥
चहू वाचांसी अगोचर । चरणी गर्जती तोडर ।
श्रीराम चिदचिन्मात्र । परात्पर परब्रह्म ॥२९॥
लक्षितां श्रीरामांचे मन ठाण । त्यासी ठेंगणें दिसे गगन ।
पाहता श्रीरामाचे मन । पडिले मौन श्रुतिशास्त्रां ॥३०॥
पाहता श्रीरामाचे गुण । सगुणीं दिसे निर्गुण ।
रामनामे हरे त्रिगुण । निजनिर्गुण श्रीरामा ॥३१॥
लक्षिता श्रीरामलक्ष्मण । जो लक्षी तोचि सुलक्षण ।
ऐसा श्रीराम विचक्षण । लक्ष्यलक्षण त्या नाही ॥३२॥
श्रीराममुखींचीं अक्षरे । क्षराक्षरातीत परें ।
सभाग्य सेविती श्रवणद्वारें । सर्वांगी सुभरे स्वानंद ॥३३॥
देखता श्रीरामांचे श्रीमुख । फिके होय समाधिसुख ।
स्वप्नी न देखिजे दुःख । हरिखें हरिख कोंदाटे ॥३४॥
कोंदाटल्या परब्रह्म । ब्रह्मरूप क्रियाकर्म ।
हरपले धर्माधर्म । जाला उपरम वेदवादा ॥३५॥
ऐसा श्रीराम नेटका । तैसाचि सौमित्र निजसखा ।
दोघा अभिन्नत्व देखा । भिन्न आवाका दिसताहे ॥३६॥
घालोनिया लोटांगण । तुज कुशळ कल्याण ।
स्वये पुसे लक्ष्मण । पुसे कल्याण श्रीराम ॥३७॥
ऐसे हनुमंते सांगता । तटस्थ ठेली श्रीरामकांता ।
आपआपणा विसरे सीता । हनुमंताचेनि बोले ॥३८॥
हनुमंताचे बोलाआंत । अवघा आणिला श्रीरघुनाथ ।
तेणे सीतेचा मनोरथ । सदोदित स्वानंदे ॥३९॥
हर्ष न माये पोटी । होत हर्षाचिया कोटी ।
तेणे हर्षे सीता गोरटी । घाली मिठी हनुमंता ॥४०॥
वानर वदे मनुष्यवाणी । श्रीरामकथा त्याचे वदनी ।
ज्या कथेच्या निजश्रवणीं । भवबंधनीं निर्मुक्त ॥४१॥
ऐकोनि वानराच्या गोष्टी । सत्य श्रीरामी जाली भेटी ।
निरसोनिया दुःखकोटी । ओतली सृष्टी सुखरूप ॥४२॥
हरिखाच्या लवलाह्या । स्वानंदे पसरोनि बाह्या ।
आलिंगिलें कपिराया । जेंवी का माया प्रियपुत्रा ॥४३॥
सीतेसी सुख जाले गाढे । पुत्रसुख तृण त्यापुढे ।
हनुमंत वाडेंकोंडे । प्रेमपडिपाडें पढियंता ॥४४॥
त्यामुळे सीतेचा आनंद व तितकेच हनुमंताचे कौतुक
श्रीराम भर्ता लक्ष्मणा देवर । दोघे सुखरूप महावीर ।
ऎं ऐकतांचि उत्तर । सुख अपार मज जाले ॥४५॥
मज येथे सामासांपाठी । श्रीरामाची कथा गोष्टी ।
अजि ऐकली तुझे वाक्पुटी । धन्य सृष्टी हनुमंता ॥४६॥
मरतया अमृतपान । सुकतया मीना मिळे जीवन ।
दुकळलिया मिळे मिष्टान्न । तेंवी तुझे वचन हनुमंता ॥४७॥
श्रीरामस्वरूपाची कथा । जेंवीं वदलासी हनुमंता ।
ते मुखी ब्रह्मसायुज्यता । नये तुकितां तुकेसीं ॥४८॥
श्रीरामकथाअनुवादन । तेणे मी जाले सुखसंपन्न ।
तुज मी वदते वरदान । सावधान अवधारी ॥४९॥
हनुमंता होईं चिरंजीवी । तेंही जीवित्व ज्ञानानुभवी ।
नित्य नवा सुखसंभवी । श्रीरामपदवीवैभवें ॥५०॥
तुज कळिकाळ कांपे चळीं । ऐसा होशील आतुर्बळी ।
यश पावसी भूमंडळी । नामसमेळीं श्रीरामे ॥५१॥
निरसोनिया ज्ञानाज्ञान । श्रीरामभजने प्रबुद्ध प्राज्ञ ।
ज्ञेय मुके जाणपण । श्रीरामस्मरणाचेनि बळे ॥५२॥
शतयोजन सिंधु अगाध । तुवा लंघिला जैसा गोष्पद ।
त्यापुढे कायसे माझे वरद । प्रज्ञाप्रबुद्ध हनुमंत ॥५३॥
तुज म्हणो नये वानर । सुरासुरा तू दुर्धर ।
धांडोळिलें लंकानगर । निशाचरें गांजोनी ॥५४॥
एकला एक हनुमंत । रावणाचे सभेआंत ।
करोनि राक्षसा आकांत । लंकानाथ गांजिला ॥५५॥
लंकेमाजी कडोविकडी । गांजिल्या राक्षसांच्या कोडी ।
रावणाची सभा उघडी । केली रोकडी तुवा एके ॥५६॥
एवढा करितांही आकांत । येथे आलासी हनुमंत ।
नाही कळले लंकेआंत । ऐसा समर्थ तू एक ॥५७॥
रावणमंदोदरीएकांत । तिचा ऐकोनि स्वप्नवृत्तांत ।
आलासी अशोकवनाआंत । अति समर्थ तू एक ॥५८॥
श्रीरामास आणण्याची विनंती :
ऐसा प्रताप शिरोमणी । पावलासी अशोकवनी ।
तूंचि जनक तूंचि जननी । राम घेवोनि शीघ्र यावे ॥५९॥
तुझी होईन मी दासी । चरण झाडीन निजकेशी ।
शीघ्र आणावें श्रीरामासी । म्हणोनि पायांसी लागली ॥६०॥
तुवा वंदिले माझे चरण । म्या काय व्हावे उत्तीर्ण ।
आले हनुमंतासीं स्फुरण । भेटवीन श्रीरामा ॥६१॥
हनुमंताची सीतेला पाठीवरून नेण्याची तयारी
तुज येवढी अवस्था । विलंब कायसा वो आता ।
शीघ्र भेटवीन श्रीरघुनाथा । बैसे आता मम पृष्ठीं ॥६२॥
माझे पृष्ठीं बैसल्या सीता । येचि क्षणी श्रीरघुनाथा ।
तुज भेटवीन मी आता । विलंब वृथा करू नको ॥६३॥
शुद्धि सांगावया रघुनाथा । तुज मज सांडोनि जाता ।
मागे राक्षसी केलिया घात । शुद्धि वृथा होय माझी ॥६४॥
येथे मजचि देखता । रावण मारू आला होता ।
दैवे चुकविलें अनर्था । सांडोनि जाता मज नये ॥६५॥
सांडोनि जाणे न घडे गोष्टी । वेगी बैसे माझे पाठी ।
करीन श्रीरामेंसी भेटी । विकल्प पोटी धरूं नको ॥६६॥
शूर्पणखा केली नकटी । तुझा राग तिच्या पोटी ।
तुज मारील उठाउठी । महा खोटी राक्षसी ॥६७॥
लंकात्रिकूट महागिरी । उपडोनियां बळेंकरीं ।
एके उड्डाणे समुद्री । नेईन परतीरीं जानकिये ॥६८॥
करोनि एकचि उड्डाण । तुज भेटवीन रामलक्ष्मण ।
वाहतो श्रीरामाची आण । करी आरोहण पृष्ठिभागीं ॥६९॥
तुज म्या नेतां अति त्वरेंसी । राक्षसवीरां महासुरांसी ।
वेगे न येववे मजपासीं । त्या मशकांसी केंवी ढाके ॥७०॥
आलिया इंद्रजित कुंभकर्ण । त्यासी रणी विभांडून ।
रावणातेंही गांजोन । भेटवीन श्रीरामा ॥७१॥
ब्रह्मलिखिताची व्युत्पत्ती । पूर्वसंवाद सीतामारूती ।
रामे परिसावया हनुमत्कीर्ती । नायुक्ती लिहिली असे ॥७२॥
अनेक अडचणी सीतेने सांगितल्या
सीता म्हणे अवधारी । बैसता तुझे पृष्ठीवरी ।
तुझ्या उड्डाणवेगेंकरीं । पडेन सागरी हिसळोन ॥७३॥
पडतांचि सागराप्रती । मत्स्य मगर मज गिळिती ।
तेव्हा तू पडसी आवर्तीं । केंवी मारूती म्या यावे ॥७४॥
का धांवणे आलिया लागवेगीं । तू परतसी युद्धालांगीं ।
झगडा देता युद्धभागीं । मी रणरंगीं पडेन ॥७५॥
मज पडताच क्षिती । क्रोधे राक्षस मज मारिती ।
हेही न घडे गा युक्ती । केंवी मारूती म्या यावे ॥७६॥
मज मारिलियापाठीं । जरी तुवा मारिल्या राक्षसकोटी ।
सुख नव्हे श्रीरामाच्या पोटी । हे बुद्धि खोटी हनुमंता ॥७७॥
सीतें ऐके सावध गोष्टी । मज न लगे युद्धअटाटी ।
माझे पुच्छ कोपल्यापाठी । मारील कोटी राक्षसा ॥७८॥
तुज मी सुखी राखीन स्वस्थ । माझे पुच्छ प्रतापवंत ।
करील राक्षसांचा घात । अर्बुदांत जरी आले ॥७९॥
सीता म्हणे तू अल्प मारूती । तुझे पुच्छ तंव ते किती ।
केंवी राक्षसा लावील ख्याती । सत्यत्व चित्ती मानेना ॥८०॥
सीतेला मारूतीचे उत्तर :
सीते म्हणती वानर किती । कायसी पुच्छाची शक्ती ।
पाहे माझी स्वरूपस्थिती । म्हणोनि मारूती वाढला ॥८१॥
विंध्य मेरू आणि मंदार । त्याहून वाढला वानर ।
जैसा प्रलयकाळाग्निरूद्र । तैसा दुर्धर भासत ॥८२॥
सीते नेणसी माझे सत्व । पाहे माझे स्वरूप प्रभाव ।
देव दानव आणि मानव । राक्षस सर्व गांजीन ॥८३॥
माझे पुच्छा पाहे प्रतापवंत । राक्षसदळणीं अति समर्थ ।
सगळी लंका तुजसमवेत । निमेषार्धांत नेईन ॥८४॥
विकल्प सांडोनिया पोटी । सीते बैस माझे पृष्ठीं ।
करीन श्रीरामासी भेटी । सुखसंतुष्टी स्वानंदे ॥८५॥
परपुरूषाचा स्पर्श वर्ज असे तिचे उत्तर :
परपुरूषीं आरोहण । हेंचि परिव्रतेसी दूषण ।
ऐकोनि सीतेचे वचन । पूर्वकथन कपि सांगे ॥८६॥
मारूती आपला सद्भाव तिला पटवितो :
राम सर्वार्थीं सर्वज्ञ । गर्भीं ब्रह्मचर्यकौपीन ।
माझी श्रीराम देखोन । धाडी आपण तुजपासी ॥८७॥
माझी जाणोनि समूळ स्थिती । स्त्रियेंसी भेटी एकांती ।
ऐसे जाणोनि श्रीरघुपति । मज तुजप्रती धाडिले ॥८८॥
तुझा विकल्प जावया जाण । निजमुद्रा देवोनि खूण ।
श्रीरामे धाडिलें आपण । अपत्य जाण मी तुझे ॥८९॥
आणिक सांगितली खूण । कैकेयी वल्कले परिधान ।
तुज नेसतां न येती जाण । श्रीरामे आपण नेसविलीं ॥९०॥
खूण सांगता हनुमंता । चित्ती चमत्कारली सीता ।
विकल्प सांडोनि तत्वता । गुज एकांत पूसत ॥९१॥
श्रीरामे आणविलें शुद्धीसीं । किंवा आणविलें सीतेंसी ।
हे सत्य सांगे मजपासीं । त्या कायासी मी करीन ॥९२॥
श्रीरामे आणविली सीता । तरी आतांच येईन हनुमंता ।
ऐसे सीतेचे पुसतां । आला कपिनाथा गहिंवर ॥९३॥
आपुला दावोनि पुरूषार्थ । शीघ्र नेईन म्हणे हनुमंत ।
अगाध सीतेचे महिमासामर्थ्य । पुसे इत्यर्थ आज्ञेचा ॥९४॥
सावध अवधारी वो माते । असत्य न बोले मी येथे ।
श्रीरामे आणविलें शुद्धीतें । हेचि निश्चिते रामाज्ञा ॥९५॥
सीता म्हणे हनुमंता । विलंब न करावा सर्वथा ।
शीघ्र जावोनिया आता । श्रीरघुनाथा सांगावे ॥९६॥
मजवरी कृपा आहे हनुमंता । तरी जावोनि शीघ्रता ।
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । चरणी माथा ठेविला ॥९७॥
सीतेनें करिता नमस्कार । पायावरी लोळे वानर ।
अहो मी तुझे रंक किंकर । आज्ञाधर नेमस्त ॥९८॥
श्रीरामसेवक जो जो कोणी । तो मज मुकुटमणी ।
त्याचे चरणी लोटांगणी । सत्य वाणी हनुमंता ॥९९॥
ऐकता सीतासद्भाववचन । आले हनुमंता स्फुरण ।
आतांचि देवों आपली खूण । शीघ्र गमन मी करितो ॥१००॥
सत्य मानावया वानरा । खूण म्या आणिली श्रीराममुद्रा ।
तूंही खूण दे श्रीरामचंद्रा । सत्य कपींद्रा मानावया ॥१०१॥
ऐकता कपीचें वचन । सीता खूण दे कळवळोन ।
कैसी दिधली खूण । सावधान अवधारा ॥१०२॥
आपली खूण म्हणून सीता मारूतीला चूडामणी देते :
उकलोनियां निजवेणीं । खुणेसीं दिधला चूडामणी ।
खूण सांगितली मुखवचनीं । श्रीरामालागोनी सांगावया ॥१०३॥
श्रीरामे स्वहस्तें स्वलीळा । उगाळोनि मनशिळा ।
माझे कपाळीं लाविला टिळा । गोळांगूळा हे खूण सांगे ॥१०४॥
चित्रकूट पर्वतांत । काकें मज क्षतविक्षत ।
करिता कुचाग्रीं रक्ताक्त । तेणे रघुनाथ क्षोभला ॥१०५॥
कोपे इषीकास्त्र सोडितां । काग तिही लोकी पळतां ।
शिवशक्र यम विधाता । कोणी रक्षिता नव्हेचि ॥१०६॥
नारदवचने तो मागुता । शरण आला श्रीरघुनाथा ।
डाव्या डोळ्या करोनि घाता । होय रक्षिता श्रीराम ॥१०७॥
ऐसी दिव्यास्त्रें तुजपासी । तरी का मज उपेक्षिसी ।
मृगामागे धाडिलासी । तेणे रूसलासी श्रीरामा ॥१०८॥
महापापीण मी सीता । स्वामीवरी केली सत्ता ।
तेणे आतुडले लंकानाथा । अधर्मता महादोषें ॥१०९॥
लक्ष्मण ठेविला त्वा रक्षण । त्याचेंही म्या केले छळण ।
ऐसी पापिणी मी जाणोन । सोडवण न करिसी ॥११०॥
सकळ दोष श्रीरघुनाथा । क्षमा करी कृपावंता ।
ऐसे हनुमंतासी सीता । अति दीनता अनुवादे ॥१११॥
हनुमंत निघतेवेळी सीतेचा त्याच्याबरोबर सर्वांना निरोप
हनुमंतासी संभाषण । करून सीता दीनवदन ।
चिंतामणी ह्रदयीं धरोन । रामलक्ष्मण अति दुःखी ॥११२॥
श्रीरामासी आले रुदन । अश्रुधारा स्त्रवती नयन ।
मस्तकमणी ह्रदयीं धरून । करी स्फुंदन कृपाळु ॥११३॥
वारिज समुद्रमणी । युद्धी इंद्रें संतोषोनी ।
दिधला दशरथालागोनी । नमुचि जै रणी पराभविला ॥११४॥
तो हा दशरथें महामणी । दिधला कौशल्ये प्रियपत्नी ।
तिने दिधला सीतेलागोनी । प्रथमदर्शनीं सूनमुखीं ॥११५॥
मणि देता हनुमंता । माता पिता प्रियकांता ।
तिघें भेटलीं तत्वता । ऐसी मज चिंता होतसे ॥११६॥
मणि मजपासीं देता । प्रत्यक्ष भेटलीसे सीता ।
ऐसा आल्हाद श्रीरघुनाथा । हनुमंता आलिंगी ॥११७॥
आलिंगूनी पुसे हनुमंता । पुढे काय वदली सीता ।
ते ते सांगे समूळ वार्ता । ऐके सादरता श्रीराम ॥११८॥
ऐसे पुसतां श्रीरघुनंदन । हनुमान घाली लोटांगण ।
पुढील सीताअनुवाद । वाची लक्ष्मण ब्रह्मलिखित ॥११९॥
सीतेची चिंता :
समुद्रलंघीं दिसे अभावो । स्वये सीतेसी हा संदेहो ।
तोचि हनुमंतासी पहाहो । स्वयमेव पूसत ॥१२०॥
ऐक बापा हनुमंता । माझे पोटी परम चिंता ।
समुद्रलंघनीं तिघांची सत्ता । न देखे चौथा पुरूषार्थीं ॥१२१॥
गरूड बायो की हनुमंता । दुर्धर समुद्र येरा समस्ता ।
नरवानरसह श्रीरघुनाथा । केंवी येथे आता येववे ॥१२२॥
नुल्लंघवें गा हा सागर । न आणवे वानरांचा भार ।
येवो न शकती राम सौमित्र । केंवी दशवक्त्रा मारवे ॥१२३॥
हनुमंताचे उत्तर वा आश्वासन :
ऐकोंनि सीतेचे वचन । हनुमान जाला हास्यवदन ।
श्रीरामाचे नेणसी महिमान । बाणप्रेरण अनिवार ॥१२४॥
श्रीरामभातां दुर्धर शर । बाणी वाहोनि नरवानर ।
उतरोनियां परपार । निशाचर मारील ॥१२५॥
निर्दळोनि निशाचर । विध्वंसोनि लंकापुर ।
मारोनियां दशशिर । तुझा उद्धार करील ॥१२६॥
ऐसे उत्तर ऐकता । सुखे उल्लासली सीता ।
वेगी जाई बां हनुमंता । शीघ्र रघुनाथा आणावया ॥१२७॥
राक्षसांची कुरापात काढण्याची युक्ती :
न करिता युद्धकंदन । न करिता राक्षसांचे दमन ।
न करिता लंकादहन । उगा येथोन मी ना वचे ॥१२८॥
मी काय आलो नाटिकार । मी नेऊ ते प्रतिउत्तर ।
लंकेमाजी करीन क्षेत्र । दशवक्त्र गांजीन ॥१२९॥
राक्षसांचे बळ किती । किती सैन्य शस्त्रशक्ती ।
अवघी तुकीन मी मारूती । रणव्युत्पत्ती भिडेन ॥१३०॥
राक्षसांसी करावया झगडा । मुख्य मूळ वनउपाडा ।
हनुमान बुद्धिवंत गाढा । केले पुढा ते ऐका ॥१३१॥
हनुमंताची सीतेला विनंती :
ऐसे विचारी जंव आपण । सीता म्हणे करी बा गमन ।
हनुमान घाली खालती मान । लज्जायमान बोलेना ॥१३२॥
भेटावया श्रीरघुनाथा । उल्लास न देखे हनुमंता ।
ऐसी प्रबळ कोन चिंता । ते मज तत्वता सांगावी ॥१३३॥
माझे सांगता निजवृत्तांता । तुज लागेल अति चिंता ।
शोध तुझे हो न करिता । अन्नपानता मज नाही ॥१३४॥
नाही अन्न नाही जीवन । क्षुधेने जावों पाहे प्राण ।
न करवे समुद्रलंघन । अति उद्विग्न तेणेंसीं ॥१३५॥
कपीचें वचन ऐकता । गहिवरे रूदन करी सीता ।
महापापीण मी तत्वता । धाडीं हनुमंता भुकेलें ॥१३६॥
हे माझे करकंकण । लंकेमाजी जावोनि आपण ।
घेवोनि चतुर्विधा अन्न । करी भोजन यथेष्ट ॥१३७॥
हनुमान पुसे सीतेसी । अन्नाची चव आहे कैसी ।
सीता म्हणे हनुमंतासी । काय तुम्हांसी भक्षणें ॥१३८॥
आम्ही वानर वनचर । वनवासी निरंतर ।
नित्य वनफळांचा आहार । अन्नमात्र स्पर्शेना ॥१३९॥
माझे मोडोनि कंकण । लंकेमाजी फळे संपूर्ण ।
आवडे ते घेवोनि आपण । फळभोजन करी बापा ॥१४०॥
फळे खाण्याची अनुमती :
ऐक वो माते माझे शीळ । मी तंव स्वयंपाकी केवळ ।
ज्यासी मनुष्याचा विटाळ । ते मज फळ अपवित्र ॥१४१॥
हाटवटींचें विक्रित अन्न । जेंवी न घेती सुब्राह्मण ।
तैशींच फळे विक्रीत जाण । मजलागून अपवित्र ॥१४२॥
ऐकोनि कपीचिया मता । साशंकित जाली सीता ।
हनुमंतासी आहारार्था । काय म्या आता अर्पावें ॥१४३॥
याचि अशोकवनाआंत । फळे आहेत अत्यद्भुत ।
यांसी लावितांचि हात । करितील घात राक्षस ॥१४४॥
कपे तुझा करितील घात । तोच माझा प्राणांत ।
साधिला प्रयत्न होय व्यर्थ । स्वामिकार्यार्थ नासेल ॥१४५॥
हनुमान म्हणे असो वृत्तांत । जाईन भुकेला कुंथत ।
क्षुधा नव्हे हा कल्पांत । आला प्राणांत मजलागी ॥१४६॥
बोलता बोलता गेला चाचरीं । मूर्च्छित पडला धरणीवरी ।
दोही डोळा लाविली चंद्री । सीता सुंदरी गजबजली ॥१४७॥
थापटोनिया हनुमंता । स्वये सावध करी सीता ।
कोणासही कळो न देता । गुप्त आहारार्था तू सेवीं ॥१४८॥
जोंवरी होय क्षुधाहरण । पडली फळे खांवी आपण ।
घालितें श्रीरामाची आण । फळे तोडोनि न खावी ॥१४९॥
ऐकोनि सीतेचे वचनासी । हनुमान खाजवी दोन्ही कुसी ।
मग आला वनवृक्षांपासीं । निजमानसीं विचारी ॥१५०॥
सीतावचन अति प्रमाण । पाळोनि श्रीरामाची आण ।
वृक्ष उपटोनि झोडीन । फळे खाईन पडली ती ॥१५१॥
श्रीरामांचे कौतुक
ऐकोन हनुमंताचे वृत्त । श्रीराम गदगदा हांसत ।
सुग्रीवादि कपि समस्त । स्वये हांसत सौमित्र ॥१५२॥
श्रीराम म्हणे गा सौमित्रा । कपीनें दमिलें निशाचरा ।
लंकेमाजी केले क्षेत्रा । त्या ब्रह्मपत्रा वाचीं वेगी ॥१५३॥
कैचे विध्वंसिले वन । कैसे केले राक्षसकंदन ।
इंद्रजित गांजिला दशानन । ब्रह्मलेखन ते वाचीं ॥१५४॥
एकाजनार्दना शरण । हनुमंताचे लंकादहन ।
श्रोता श्रीराम सावधान । वक्ता लक्ष्मण ते ऐका ॥१५५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमत्प्रतापब्रह्मलेखनपत्रवर्णनं नाम एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः ॥२९॥
॥ ओव्या १५५ ॥ श्लोक २६ ॥ एवं संख्या १८१ ॥
