॥ श्रीएकनाथमहाराजकृत
14.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय चौदावा ॥
रावणपुत्र अखयाचा मारूतीकडून वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ऎंशी हजार किंकर, चौदा हजार बनकर व संपूर्ण
वनाचा मारूतीने विध्वंस केला म्हणून रावणाचा संताप
किंकर मारिले ऐशी सहस्त्र । चवदा सहस्त्र बनकर ।
वन विध्वंसिले मनोहर । तेणे दशशिर कोपला ॥१॥
वानर जाणोनि महाबळी । प्रहस्तसुत जंबुमाळी ।
रावणे पाचारोनि जवळी । गुज त्याजवळी सांगत ॥२॥
मारिले किंकर बनकर । विध्वंसिले मनोहर ।
तो तुवा मारावा वानर । युद्धी दुर्धर गांजोनी ॥३॥
वानर न मरतां देख । तुज परतल्या एकाएक ।
तरी तुवा हारविलें नासिक । नपुंसक राक्षसांत ॥४॥
वानरा न करो मर्दन । तेव्हांचि तुझे काळे वदन ।
रासभारोहण अपमान । मूतें वपन मस्तका ॥५॥
ऐसी ऐकवोन वचनावळी । युद्धा धाडिला जंबुमाळी ।
तो ही वीर आतुर्बळीं । क्रोधानळी चालला ॥६॥
युद्धांतून माघारी आल्यास अपमान करण्याची धमकी
देऊन प्रहस्त प्रधानाचा पुत्र जंबुमाळी याला पाठविला
महाखरीं जुंपिला रथ । शस्त्रसामुग्री घालोनि समस्त ।
धनुष्य घेवोनि अत्यद्भुत । आला युद्धार्थ जंबुमाळी ॥७॥
टणत्कारोनियां मेढा । क्रोधे गर्जे वानरांपुढां ।
किंकरां बनकरांच्या सुडा । घ्यावया रोकडा मी आलो ॥८॥
हनुमान सांगे गोड गोष्टी । तुम्ही चोरिली सीता गोरटी ।
मारीन राक्षसांच्या कोटी । अवघ्यांशेवटीं रावण ॥९॥
जंबु तुझी आवड मोठी । किंकरां बनकरांसीं भेटी ।
तुज मी करीन उठाउठी । रथसंपुटीसमवेत ॥१०॥
अर्धचंद्रबाणसमेळीं । हनुमान विंधिला कपाळी ।
बाण हिसळोनि ते काळी । लागला निढळीं जंबूच्या ॥११॥
लागता बाणाचा आघात । जंबुमाळी पडला मूर्च्छित ।
हनुमान गदगदा हांसत । विपरीतार्थ येथे जाहला ॥१२॥
सावध होवोनि जंबुमाळी । वर्षलासे बाणजाळी ।
बाण कोंदले नभ : स्थळीं । भूमंडळी शरजाळ ॥१३॥
रामस्मरणे अति समर्थ । बाणांमाजी हनुमंत ।
रणधेंडा स्वये नाचत । अंगी आघात लागेना ॥१४॥
पंचक्रोश शिळा सोज्ज्वळी । कपीनें हाणिली जंबुमाळी ।
येरें विंधोनि बाणजाळी । केली रांगोळी शिळेची ॥१५॥
कोपोनिया हनुमंते । विशाळ वृक्ष घेवोनि हातें ।
वेगे हाणिता जंबूतें । बाणे वृक्षातें छेदिलें ॥१६॥
लागवेगाचेनि लवलाहें । चौ बाणी विंधोनि पाहे ।
वृक्ष केला तिळप्राये । जाहलें आश्चर्य हनुमंता ॥१७॥
जीवे घ्यावा हनुमंत । निर्वाण परिघ घंटायुक्त ।
रागे काढिला धगधगित । करावया अंत वानरा ॥१८॥
परिघ घेवोनि करतळी । गर्जिन्नला जंबुमाळी ।
वानरा तुझी करीन होळी । घावो सांभाळी हनुमंता ॥१९॥
माझ्या परिघाचा आघात । निश्चये निमाला हनुमंत ।
कैसेनि राखेल रघुनाथ । रणवृत्तांत पाहो याचा ॥२०॥
रावणे नेमिलें आहे माते । जीवे मारावें वानरातें ।
कोण निवारील माझ्या परिघातें । हनुमंताते वांचवावया ॥२१॥
परिघ येता अति वेगेंसी । हनुमान जाणे लघुलाघवासीं ।
अंग चुकविलें घायासीं । वेगे आकाशी उडाला ॥२२॥
शस्त्रदेवता पै लाठी । परिघ गेला हनुमत्पाठीं ।
पुच्छे परिघा घातली मिठी । चेपिली घाटी देवतेची ॥२३॥
देवता म्हणे गा हनुमंता । तुज मी शरण आलियें आता ।
शस्त्रशक्ति ज्या समस्ता । शरणागता तुज होती ॥२४॥
शस्त्रशक्ती भूतशक्ती । आणिक मंत्रांच्या मंत्रशक्ती ।
अवघ्या तुज शरण येती । मज मारूती वांचविलिया ॥२५॥
सोडोनि पुच्छाचे बंधन । शस्त्रदेवता वांचवोन ।
शक्तिमंडळा लोटांगण । घाली आपण हनुमंत ॥२६॥
मारू नये शरणागता । म्हणोनि वांचविली शस्त्रदेवता ।
भूतीं भजावे श्रीरघुनाथा । या बुद्धि समस्ता शक्ती वंदी ॥२७॥
तंव त्या शक्ती पै समस्ता । ओंवाळिती हनुमंता ।
करिता राक्षसांच्या घाता । आम्ही युद्धार्था तुज साह्य ॥२८॥
सीता आमुची आद्यशक्ती । तीस गांजितो लंकापती ।
राक्षसा विमुख याचि अर्थीं । साह्य सर्वार्थीं रामभक्ता ॥२९॥
हनुमान म्हणे पुच्छा जगजेठी । युद्धी माझी राखिजे पाठी ।
साह्य शक्ती कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं मज जाहल्या ॥३०॥
ऐसे पुच्छांचें स्तवन । करोनि पुच्छाचे लालन ।
देवोनि पुच्छासी चुंबन । जाहला सावधान युद्धार्थी ॥३१॥
परिघ घेवोनिया हाता । येता देखोनि हनुमंता ।
जंबु पावला परम चिंता । माझे शस्त्र मज घाता प्रवर्तलें ॥३२॥
रावणा परदारा अधर्म । पापें शक्ती क्षोभल्या परम ।
नासला आक्रम पराक्रम । मरणानुक्रम राक्षसा ॥३३॥
करावया वानरांचे घाता । राक्षसें परिघ सोडिला होता ।
तो आला हनुमंताचे हाता । जंबूचा माथा छेदावया ॥३४॥
कोप आला हनुमंता । परिघ भोवंडिला साटोपता ।
लक्षोनि जंबूचिया माथा । होय हाणिता ते ऐका ॥३५॥
वेगी उडोनियां अंबरा । दांत खादले करकरा ।
परिघ भोवंडिला गरगरा । रहंवरा ठोकिलें ॥३६॥
निधडी हनुमंताची शक्ती । ना त्या शरीर ना त्यास अस्थी ।
हातपाय न दिसती । न दिसे व्यक्ती राक्षसा ॥३७॥
ना तो रथ ना तो वारू । ना ते धनुष्य ना शस्त्रसंभारू ।
वानरे केला अव्यक्त मारू । न दिसे गोचरू राक्षस ॥३८॥
दुर्धर हनुमंताचा घात । जीव मारोनियां तेथ ।
घायवट न दिसे प्रेत । केला भस्मांत राक्षसा ॥३९॥
आधी हनुमंत महाबळी । ऐशियापरी जंबुमाळी ।
परी घाये मेळविला धुळी । रणरांगोळी करोनी ॥४०॥
द्वंद्वयुद्धात जंबूच्या परिघानेच त्याचा घात :
जंबु मारिला तयीं मारूती । प्रहस्त बोंबले दोही हस्तीं ।
द्यावया मंत्राग्नी पुरती । शोधिता अस्थी न लभेचि ॥४१॥
पावोनिया पुत्रशोक । येवोनि रावणासंमुख ।
प्रहस्त करी महाशंख । दुर्धर दुःख घोटेना ॥४२॥
झोटीं सुटली मोकळी । प्रहस्त लोळे क्षितितळीं ।
ज्येष्ठ पुत्र जंबुमाळी । वानरे धुळी मेळविला ॥४३॥
युद्धी पडला प्रहस्तकुमर । इतर प्रधानांचे पुत्र ।
वेगी मोकली दशशिर । रणी वानर मारावया ॥४४॥
रावणाची सभेआंत । प्रधानपुत्र अति गर्वित ।
महा वीरांतें दृष्टी न गणित । बळोन्मत्त प्रतापें ॥४५॥
ऐसे बलदर्प अतिदृप्त । शस्त्रास्त्रीं निपुण नित्य ।
येरयेरा नापेक्षित । अति समर्थ युद्धार्थी ॥४६॥
युद्धाग्रणी प्रधानसुत । निवडोनिया समस्त ।
हनुमंतासी युद्धार्थ । धाडी लंकानाथ साक्षेपे ॥४७॥
तुमचे अंगी युद्धक्रम । नित्य वानितां पराक्रम ।
वन विध्वंसी प्लवंगम । त्यासी संग्राम करावा ॥४८॥
तुम्ही अवघे बुद्धि समर्थ । बांधोनि आणावा हनुमंत ।
नातरी करावा त्याचा घात । पाहो पुरूषार्थ तूमचा ॥४९॥
थोर वाढिवेची मात । नित्य सांगा सभेआंत ।
तोच दावावा पुरूषार्थ । युद्धी हनुमंत जोंकोनी ॥५०॥
ऐसे सांगता लंकानाथ । प्रधानपुत्र समस्त ।
वेगी संजोगोनी रथ । शीघ्र युद्धार्थ निघाले ॥५१॥
हेमरत्नमाळा विराजित । शृगांरिले अश्वरथ ।
ध्वज पताका डोलत । रथ शोभत अति शोभा ॥५२॥
मारिल्यावांचोनि हनुमंत । परते तो मातृगामी येथ ।
ऐसी करोनिया शपथ । आले समस्त युद्धार्थीं ॥५३॥
रथारूढ धनुष्य हाती । पुढे वाजंत्रें गाजती ।
मागे माता शंख करिती । पुत्रसंतती निमाली ॥५४॥
जंबुमाळीच्या मातांचा आक्रोश :
प्रहस्तदुःखासमान । दुःखी करावया प्रधान ।
हट्टी पेटला दशानन । युद्धी संतान मोकलिले ॥५५॥
प्रहस्तपुत्र महाबळी । रणी मारिला जंबुमाळी ।
किंकरांची केली होळी । केली रांगोळी बनकरां ॥५६॥
तेथे किती प्रधानसंतान । आजिच जाहलें निःसंतान ।
वानर नव्हे महाविघ्न । आले निदान राक्षसा ॥५७॥
स्त्रिया सुह्रद तळमळिती । माता पिता शंख करिती ।
वधूं धाडिता मारूती । पुत्रसमाप्ती वानरे ॥५८॥
मारूतीवर सर्वांकडून एकत्रित प्रहार :
येरीकडे कडकडाटा । प्रधानपुत्र घनदाट ।
रथचक्राचा घडघडाट । आले निकट हनुमंता ॥५९॥
देवालयाचे महाद्वारीं । बैसला होता तोरणावरी ।
देखोनि प्रधानपुत्रहारी । उल्लास भारी हनुमंता ॥६०॥
जैसे पतंग दीपावरी । तैशा प्रधानपुत्राच्या हारी ।
लोटल्या हनुमंताचेवरी । शरधारीं वर्षती ॥६१॥
बाण सुटती सणसणा । शस्त्रे वाजती खणखणां ।
बाण विंधिती झणझणां । कालकंडना मांडिली ॥६२॥
समकाळ शरसंपात । हनुमान बैसला सावचित्त ।
बाण चुकवी पिलंगत । अमात्यसुत मारावया ॥६३॥
बाण वर्षले अत्यद्भुत । जैसे मेघ पर्वतांत ।
अचुकहस्ती आम्ही समस्त । मारा हनुमंत विंधोनी ॥६४॥
एक म्हणती विंधा शिरी । एक म्हणती विंधा उरीं ।
एक म्हणती करा कांडोरी । चरणा करां चुरा पै ॥६५॥
एक म्हणे विंधा पोटी । एक म्हणे विंधा पाठी ।
एक म्हणे विंधा कंठी । फोडू घाटी याची पै ॥६६॥
एक म्हणती माझे संधान । याचे नासिक मी छेदीन ।
एक म्हणे छेदीन दोनी कान । पुच्छ छेदीन म्हणे एक ॥६७॥
त्या सर्वांना पुच्छात गुंडाळून त्यांचा एकदम अंत :
ऐशा ऐकोनिया गोष्टी । हनुमान हांसिन्नला पोटी ।
मग उठोनिया जगजेठी । लांगूल त्राहटी सत्राणे ॥६८॥
देता भुभु:कार उद्भट । अवघ्या झाला ह्रदयस्फोट ।
पुच्छे कवळोनि एकवट । केले पिष्ट निजघातें ॥६९॥
उडी टाकितां हनुमंत । अवघ्या एकचि प्राणांत ।
धडधडां पडती पृथ्वीआंत । समवेत रथघोडी ॥७०॥
प्रेते नुरती भूतळा । अतळ वितळ ना सुतळा ।
हनुमान निजबळे आगळा । रसातळा ते नेले ॥७१॥
लागता हनुमंताचा घावो । प्रेतपणा नुरेचि देहो ।
रसातळीं न मिळे ठावो । धाडी महाबाहो वैकुंठा ॥७२॥
लंकेत विलाप :
ऐसियापरी हनुमंत । निर्दळिले प्रधानसुत ।
बोंब सांगावया नुरे तेथ । केले निर्मुक्त अवघेही ॥७३॥
दुरोनि पाहती सुह्रदलोक । अवघे करिती महाशंख ।
प्रधानपुत्र एकाएक । रणी निःशंक मारिले ॥७४॥
हाकाबोंबाचा कल्लोळ । लंकेमाजी हलकल्लोळ ।
रावणा आली काळवेळ । करील निर्मूळ राक्षसा ॥७५॥
प्रहस्तादिक मुख्य प्रधान । रावणापासी येवोनि जाण ।
अवघे करिती शंखस्फुरण । निःसंतान त्वा केले ॥७६॥
तो वानर नव्हे केवळ । सीताकोपाग्निकल्लोळ ।
वनी वाढलासे प्रबळ । राक्षसकुळ निर्दळावया ॥७७॥
रावणाचा संताप :
प्रधानपुत्रसंतती । रणी मारिली मारूती ।
ते ऐकोनि लंकापती । चिंता चित्ती अनिवार ॥७८॥
जो जो धाडी युद्धाप्रती । त्याची कपि करी समाप्ती ।
मग रावणे पांचही सेनापती । संग्रामार्थी पाठविले ॥७९॥
यूपाक्ष, विरूपाक्षादि पाच प्रमुख सेनापती मारुतीवर रावणाने धाडलें :
यूपाक्ष विरूपाक्ष दोघे जण । दुर्धर प्रघस भासकर्ण ।
हे सेनानी वीर दारूण । पांच जण दृढ योद्धे ॥८०॥
रावण त्यांसी सांगे युक्ती । तुम्ही दुर्धर वीर पुरूषार्थी ।
वानर धरावा युद्धशक्तीं । तुम्ही समस्ती मिळोन ॥८१॥
संमुख येता प्रधानसुत । त्यांचा वानरे केला घात ।
तुम्ही बुद्धिबळें प्रतापवंत । युद्धे प्रशस्त करावे ॥८२॥
चौघे राहूनि चौ दिशांप्रतीं । एके रहावे नभस्थिती ।
दावोनिया निजशक्ती । युद्धी मारुती धरावा ॥८३॥
युद्धी धरिता नये हाता । तरी करावे त्याच्या घाता ।
ऐसे सांगोनि समस्ता । होय धाडिता लंकेश ॥८४॥
रथपताका डोलायमान । पांच जण युद्धी प्रवीण ।
पांचा ठायी विखरोन । युद्ध दारूण मांडिले ॥८५॥
पांचां ठायी पांच जण । हनुमंताते वेढोन ।
युद्धा झगटले दारूण । शस्त्रास्त्री संपूर्ण हाणित ॥८६॥
दुर्धर पंचमुख पंचबाण । मस्तकी विंधिले संमुख येऊन ।
पाठीशी तो भासकर्ण । हाणी दारूण गदाघात ॥८७॥
दक्षिणबाहू यूपाक्ष । वामांगी विरूपाक्ष ।
शूळ हाणिती प्रत्यक्ष । कुक्षोपकुक्ष लक्षोनी ॥८८॥
घ्यावया हनुमंतासी घस । गगना चढला तो प्रघस ।
बाण वर्षे असमसाहस । जेंवी आकाशी मेघधारा ॥८९॥
पांचांची उडी अवचितीं । आली हनुमंताभोंवतीं ।
तेव्हा पुच्छे केली ख्याती । साह्य युद्धार्थी सर्वदा ॥९०॥
भोंवतां पुच्छाचा आवर्त । त्यांच्या शस्त्रां करोनि घात ।
पांचही आकळिले पुच्छाआंत । वीर विख्यात सेनानी ॥९१॥
जेंवी योगिया आपण । स्वये निरोधी पंच प्राण ।
तेंवी पुच्छे पांचही जण । आकळोन राखिले ॥९२॥
जेंवी काळ प्रळयांत । पंचभूतांकरी आवर्त ।
तेंवी पांचही पुच्छाआंत । बांधी हनुमंत वधार्थी ॥९३॥
जेंवी विवेकी साधुजन । पंचही विषयां करिती दमन ।
तेंवी वीर पांचही जण । पुच्छे गोंवोन राखिले ॥९४॥
कोपे वानर अति आरक्त । बाळसूर्यासम भासत ।
रागे उपडोनि पर्वत । करील कल्पांत पांचांही ॥९५॥
पांचही विषय जै निर्दळिती । तै सुख पावे परमार्थी ।
वधोनी पांचही सेनापती । सुखे मारूती उल्लासे ॥९७॥
श्रीरामभक्ताचें आघाती । अस्थिमांस ना गुणव्यक्ती ।
अवघे नेलें गुणातीतीं । धन्य मारूती सुखमरण ॥९८॥
श्रीरामभक्तांचे कौतुक । मारून द्यावे परम सुख ।
कोटि जन्मांचे हरोनि दुःख । सुखदायक संग्रामी ॥९९॥
त्यानंतर भुभु:कार करून मारुती मंदिरावर बसला :
निर्दळोनि पांचही जण । भुभुःकारें देवोनि किराण ।
देवालयाचें तोरण । धरोन स्थान बैसला ॥१००॥
पंचभूतांची निवृत्ती । साधका परमानंदप्राप्ती ।
वधोनि पांचही सेनापती । सुखे मारुती उल्लासे ॥१०१॥
ते रावणास कळल्यावर आपला पुत्र अखयाकुमाराची योजना :
मारिले पांचही सेनापती । बोंब गेली लंकेप्रती ।
दचकलासे लंकापती । वानरे ख्याति लाविली ॥१०२॥
पारखे केले अशोकवन । सहजें सीता नेईन हिरोन ।
क्रोधे कांपे दशानन । पाहे आपण कोन धाडू ॥१०३॥
तंव देखिला समोर । जो का लाडका अखया कुमार ।
त्यासी सांगे दशशिर । मारीं वानर प्रतापे ॥१०४॥
आज्ञा देता दशशिर । वेगे निघाला अखया कुमार ।
छत्र पताका ध्वज मनोहर । रहंवर रत्नाढ्य ॥१०५॥
आठ वारूं शिरोमणी । हेमबाण सचाप तूणी ।
पाठीसी राजकुमारश्रेणी । निपुण रणी रणयोद्धे ॥१०६॥
अंगी बळाचा गर्व थोर । रथी बैसोनि अखया कुमार ।
जेथे आहे हनुमान वीर । तेथे सत्वर पै आला ॥१०७॥
प्रधान आप्त थोर थोर । रावणासी करिती मरमर ।
मरों धाडिला अखया कुमार । बळे दुर्धर वानर ॥१०८॥
या योजनेबद्दल प्रधानदिक सर्व आप्तस्वकियांचा असंतोष :
चवदा सहस्त्र बनकरां । पुच्छे बांधोनियां भारा ।
मत्स्यमगरां दिधला चारा । आणि किंकरां मारिले ॥१०९॥
प्रधानपुत्र गर्वभरित । आति बळे सदा कुंथत ।
त्या अवघ्यांचा केला घात । केला निःपात जंबूचा ॥११०॥
घालोनि पुच्छाच्या आवर्ती । पांच मारिले सेनापती ।
अखया बापुडे ते किती । क्षणे मारुती मारील त्या ॥१११॥
तुझा हा लाडका कुमार । जाणोनि हनुमंत करील मार ।
रावणा तू चुकलासी थोर । तेथे का कुमार धाडिला ॥११२॥
अखयाशिवाय दुसर्या कोणालाही पाठविण्याची विनंती :
दृष्टी पडिलिया हनुमंता । अखया परतेना मागता ।
त्याचे रक्षणीं लंकानाथा । वीरां समर्था धाडावे ॥११३॥
रावणे निवडोनियां चोखट । रणरंग दाडिले वीर उद्भट ।
महायुद्धाचा कडकडाट । आले निकट हनुमंता ॥११४॥
रावणे चतुरंग एकवट । निधडे धाडिले महाभट ।
अश्व गज रथी घडघडाट । आले निकट हनुमंता ॥११५॥
न येता मागिले वीरांसी । अखया भिडला हनुमंतासीं ।
लघुलाघवे शरधारांसीं । हनुमंतासी आच्छादी ॥११६॥
अमित बाणी विंधिला शिरी । दो बाणी विंधिला भुजांवरी ।
बाण विंधले स्तनावरी । सर्वांग शरीं व्यापिले ॥११७॥
तेचि समयी मागील वीर । वर्षती शस्त्रसंभार ।
तेणे आच्छादिला वानर । दिवाकर जेंवी अभ्रीं ॥११८॥
गर्जगर्जोनि पर्जन्यधारा । कदा न रूपती गिरीवरा ।
तेंवी राक्षसशरसंभार । अंगी वानरा न बाधती ॥११९॥
निधडी हनुमंताची शक्ती । बाण लागता पिष्ट होती ।
शस्त्रे भंगोनि पडता क्षिती । रणी मारूती नाटोपें ॥१२०॥
व्यर्थ करोनि शत्रुशस्त्रांसीं । हनुमान उडाला आकाशी ।
अखयाची शक्ती कैसी । रथ आकाशी चालविला ॥१२१॥
मारूती आणि अखयाचे आकाशात युद्ध :
कुमार आणि हनुमान वीर । दोघे भिडती निराधार ।
बळ वानिती सुरवर । चक्राकार संग्रामी ॥१२२॥
रथाचिया गतिविगती । तैसाची पिलंगत मारूती ।
क्षणैक नभी क्षणैक क्षिती । दुर्धर शक्ती दोघांची ॥१२३॥
अखया मारू पाहे हनुमंत । त्यासी तो घाय नाढळत ।
कपि कुमाराचा करिता घात । त्यासी तो रथ नाटोपे ॥१२४॥
क्षणैक रथ दिसे भूतळीं । क्षणैक दिसे नभ : स्थळीं ।
क्षणैक दिसे समुद्रजळी । त्रिकूटाचळीं एकक्षण ॥१२५॥
अखया कुमार अति समर्थ । वेडाविला हनुमंत ।
तेणे वानर अति विस्मित । कैसेनि घात करू याचा ॥१२६॥
तंव बोलती सैन्यसंभार । निधडा योद्धा अखया कुमार ।
जाणोनि धाडी दशशिर । घाये वानर मारील हा ॥१२७॥
ठाकोनियां अखया कुमार । पळो जाता हा वानर ।
आम्ही धांवोनि संग्राम थोर । तीरमार करू यासी ॥१२८॥
मारूतीने शेपटीच्या साहाय्याने अखयाचा रथ, ध्वज, सारथी यांचा नाश केला :
रणी नाटोपे अखया कुमार । त्यासी मारावयाचा विचार ।
हनुमान विचारी साचार । गुप्त प्रकार तो ऐका ॥१२९॥
कैसेनि मारू अखयासी । ऐसे विचारिता मानसी ।
कोप आला पुच्छासी । राजपुत्रासी वधावया ॥१३०॥
कामग रथ अखयासी । रणी नाटोपें तो आम्हांसी ।
पुच्छ लागोनी पाठीसी । रथ चौपासी बांधिला ॥१३१॥
स्वर्ग मृत्यु कैलासपृष्ठीं । रथ पळवितां संकटीं ।
पुच्छे पुरवोनियां पाठी । कडकडाटीं बांधिला ॥१३२॥
लाता हाणोनि छत्रपात । करतळें ध्वजासीं घात ।
तालवृक्षाचा आघात । भंगिला रथ ते काळी ॥१३३॥
आंख चक्र रथकुबरू । पोंवळवेलीच्या धुरा थोरू ।
आठही वारू सारथि वीरू । केला चकचूरू एके घाये ॥१३४॥
पुच्छ नाचविलें धांदडीं । रथ उपडिला कडाडीं ।
अखया कुमारें लवडसवडी । घातली उडी अतिवेगें ॥१३५॥
वोडण खांडें घेवोनि करी । मारावया खड्गधारी ।
धांविन्नला हनुमानावरी । गिरागजरीं गर्जोनी ॥१३६॥
राहे साहें हनुमंता । तुझ्या करीन मी घाता ।
रणी भंगिले माझ्या रथा । झणी श्लाघ्यता मानिसी ॥१३७॥
धाके थरकत चमकत । वोडणें धडकोनि धांवत ।
खड्ग लघुविद्या तळपत । आला त्वरित अति बळे ॥१३८॥
अखयास धरून, गरगरा फिरवून शिळेवर आपटला, त्यातच त्याचा अंत झाला :
कुमार आणि वानरांसी । क्षण भूमी क्षण आकाशी ।
युद्ध होता अति आक्रोशी । येरयेरांसी वधावया ॥१३९॥
वानर मारावयाठायीं । अखया उपरमे लवलाही ।
हनुमंते वायुवेगें पाही । धरिला पायी लघुवेगें ॥१४०॥
हनुमान अति आवेशी । भोवंडितां अति आक्रोशी ।
भोवंडी दाटली तयासीं । देहभावासी विसरला ॥१४१॥
वोडण पडिले त्रिकूटावरी । खड्ग पडिले सागरी ।
मुकुट पडिला सभेमाझारी । अपांपतीं भूषणे ॥१४२॥
आवांकूनी महाबळी । आपटितां शिळातळीं ।
लंकादुर्ग कांपे चळीं । निधा पाताळीं ऊठिला ॥१४३॥
दिग्गजा टाळी बैसलीं कानी । पन्नगां पाताळी पळणी ।
मेरू पडला तुटोनी । कांपे अवनी येणे माने ॥१४४॥
हनुमान श्रीरामभक्त चिद्रत्न । युद्धामाजी कृपाळू पूर्ण ।
अखया न देखे जन्ममरण । ऐसा संपूर्ण मारिला ॥१४५॥
अखया राखावयासाठीं । रावणे धाडिले कोट्यनुकोटी ।
अश्वगज रथ पळता थाटीं । पुच्छे पाठी पुरविली ॥१४६॥
ऐसा केला कोंडमार । वानरे करोनि शिळामार ।
रणी पाडिले वीर वीर । धरणी रूधिर प्रवाहे ॥१४७॥
हनुमंतेम ऐशिया रीती । केली अवघ्यांची समाप्ती ।
सुरनर ऋषीश्वर वर्णिती । अगाध किर्ती हनुमंताची ॥१४८॥
सुर वर्षती सुमनीं । जयजयकार ऋषिजनीं ।
कीर्ती पावन त्रिभुवनी । धन्य अंजनीनिजसुत ॥१४९॥
एकाजनार्दना शरण । जाहलें अखायानिर्दळण ।
पुढे इंद्रजितहनुमंतां रण । सावधान अवधारा ॥१५०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमदक्षवधो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
॥ ओव्या १५० ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥
