॥ श्रीएकनाथमहाराजकृत
40.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय चाळीसावा ॥
सेतुबंधनाची पूर्णता
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश :
नळहस्ते सेतुबंधन । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।
वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन स्वये गेला ॥१॥
ऐकोनि समुद्राचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
नळासी संमुख आपण । प्रीतिवचन बोलत ॥२॥
प्रीतिप्रेमाचें वचन । नळासी बोले रघुनंदन ।
सखा माझा तू जीवप्राण । सेतु निर्माण करी आता ॥३॥
समुद्रें सांगितले आपण । तुझेनि हातें सेतुबंधन ।
घेवोनिया वानरगण । सेतु निर्माण करी आता ॥४॥
स्वयेंची श्रीरघुनाथ । स्वमुखें सुग्रीवासी सांगत ।
प्रधान जुत्पती समस्त । मुख्य हनुमंत आदिकरोनी ॥५॥
नळहस्ते सेतुबंधन । समुद्रें सांगितले आपण ।
राजा सुग्रीव ससैन्य । सेतुविधान करावे ॥६॥
सेतु बंधाची सामग्री । सवेग आणावी वानरी ।
देवोनि नळाच्या करी । सेतु सागरी बांधावा ॥७॥
परम आल्हादे हर्षयुक्त । परमानंदे सांगे श्रीरघुनाथ ।
तेणे सुग्रीवा सुख अद्भुत । जुत्पतियुक्त उठियेला ॥८॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । सुखावले वानरगण ।
आणावया पर्वत पूर्ण । केले उड्डाण शतसहस्त्री ॥९॥
वानर सेतुबंधनार्थ । जाता देखोनि समस्त ।
स्वये सुग्रीवाविचारित । विलंब येथे नये करू ॥१०॥
विलंबे सेतुबांधितां । जरी कळेल लंकानाथा ।
तरी तो करील सेतुघाता । अतर्क्यता साटोपे ॥११॥
ते खेचर आम्ही भूचर । मध्ये भरलासें सागर ।
युद्धी प्राप्त वानर । सेतु सत्वर बांधावा ॥१२॥
ऐसे बोलोनिया जाण । सुग्रीव राजा अंगे आपण ।
उठिला बाहु आफळोन । सेतुबंधनशीघ्रता ॥१३॥
अंगें न उठता स्वये धूर । सेवकासेवकीं वानर ।
सेतुबंधन नव्हे शीघ्र । उठिला सत्वर स्वये राजा ॥१४॥
धुरेवांचोनि वृथा कर्षण । धुरेंवांचुनीं वृथा रण ।
धुरेंवांचुनि सेतुबंधन । अति शीघ्र जाण साधेना ॥१५॥
हेंचि आवडे श्रीरघुनाथा । सेतु बांधोनि शीघ्रता ।
वधोनिया लंकानाथा । स्वानंदे सीता आणावी ॥१६॥
ऐसी आवडी श्रीरामापोटीं । यालागी स्वये सुग्रीव उठी ।
सेतु बांधावया जगजेठी । वानरकोटीसमवेत ॥१७॥
सुग्रीव उठतांचि जाण । सवेग उठिले वानरगण ।
मुख्य मुख्य धुरा दारूण । ते कोण कोण अवधारा ॥१८॥
नळ नीळ जांबवंत । गज गवय गवाक्षयुक्त ।
शरभ गंधमादन समस्त । निघाले त्वरित सेतुबंधा ॥१९॥
अंगद युवराजा आपण । अंगें उठतांचि जाण ।
उठावले वानरगण । संख्या कोण करी तेथे ॥२०॥
तर तरळ मैंद व्दिविद । कोट्यनुकोटी अर्बुद अर्बुद ।
वानर झेंपावती निर्बुद । सेतुबंध बांधावया ॥२१॥
नळ बैसला सेतुबंधासीं । वृद्ध देखोनि जांबवंतासीं ।
सुग्रीवे ठेविले नळापासी । समविषमासी सांगावया ॥२२॥
सेतुबंधासीं सत्वर । असंख्य निघाले वानर ।
वानरी व्यापिले अंबर । दिगंतर कोंदलें ॥२३॥
बाहु आफळोनि वानर । करोनि श्रीरामनामगजर ।
सवेग निघाले सत्वर । करिती भुभुःकार नामाचा ॥२४॥
’किलकिल’ या शब्दाची व्युत्पत्ती :
किलकिल शब्द वानरजाती । किलकिल म्हणजे निर्धार स्थिती ।
श्रीरामनामें नित्य गर्जती । शब्दव्युत्पत्ति इत्यर्थ ॥२५॥
यालागी किलकिल शब्द । रामनामे अति शुद्ध ।
वानरा परम आल्हाद । सेतुबंध बांधावया ॥२६॥
पांच कोटींचिया हारी । दक्षिणबाहूंसी वानरी ।
पर्वत देती नळाच्या करी । त्वरेंकरीं अति शीघ्र ॥२७॥
वामबाहूच्या सेतुप्रकारीं । पांच कोटी वानरहारी ।
पर्वत वृक्ष देती गजरीं । त्वरेंकरी अति शीघ्र ॥२८॥
नळे मांडिले शुद्ध शीळ । साठी जण अति कुशळ ।
नळाजवळी सर्व काळ । सामग्री प्रबळ देतीत ते ॥२९॥
नळाची परम ख्याती । सेतुबांधी दोही हाती ।
तेथे जाली विपरीत गती । पर्वत बुडती समुद्री ॥३०॥
नळे लाविलिया हात । पर्वत स्वये समुद्री बुडत ।
तोही राहिला तटस्थ । सेतुबंधनार्थ चालेना ॥३१॥
समुद्रें सांगितले येथ । नळाचें हातें पर्वत तरत ।
शेखी त्याचेचि हाते बुडत । दुःखाभिभूत सुग्रीव ॥३२॥
नळहस्ते पर्वत बुडत । हिंवसला कपिनाथ ।
वृत्तांत श्रीरामासी सांगत । सेतुबंधनार्थ चालेना ॥३३॥
ऐकोनि वानरांचि मात । हासिन्नला श्रीरघुनाथ ।
सेतुबंधनाचा गुह्यार्थ । सांगेल हनुमंत ते करा ॥३४॥
हनुमंताचे निदान व त्याचा अनुभव :
हनुमान सांगे नळ वरदोक्ती । श्रीरामापुढें त्या न चालती ।
जेंवी खद्द्योत हरपती । सूर्यदीप्तिप्रकाशें ॥३५॥
श्रीरामप्रतापापुढें । समुद्रा कायसे बापुडे ।
नळ केवळ ते किडे । वरदोक्तिवेडें अभिमानग्रस्त ॥३६॥
माझेनि हाते तरती पाषाण । ऐसा नळासी वरदाभिमान ।
अभिमानें ते पर्वत निमग्न । सेतुबंधन चालेना ॥३७॥
अभिमान वसला ज्यांचे माथा । ते तंव बुडाले तत्वता ।
युक्ति सांगेन मी आता । सेतुबंधनार्थ अति शुद्ध ॥३८॥
पर्वत अथवा वृक्षपाषाण । ज्यासी लागे श्रीरामचरण ।
तयासी समुद्री घडे तरण । सत्य जाण सुग्रीवा ॥३९॥
श्रीरामचरणींचे पर्वत । तेचि समुद्री तरत ।
तेचि सेतुसिद्ध्यर्थ । गुह्य हनुमंत बोलिला ॥४०॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । वानरा पावली जीवींची खूण ।
पुढती करावया सेतुबंधन । हनुम्याचे चरण वंदिले ॥४१॥
लागतांचि चरणकमळा । अहल्या उद्धरली दुःशीळा ।
श्रीरामपदीं पर्वतशिळां । समुद्रजळा सुखे तरती ॥४२॥
श्रीरामचरणांचा महिमा :
श्रीरामचरणांचे महिमान । अवघे ऐकोनि सावधान ।
उल्लासें सांगे वायुनंदन । प्रतापपूर्ण हरिचरणीं ॥४३॥
श्रीराम चरणींचे शिळापर्वत । समुद्री घालिता हनुमंत ।
त्याते वानरदळ बुडवित । तरी ते तरत न बुडोनी ॥४४॥
एकएका पर्वतावरी । बैसले वानर लक्षांतरी ।
तरी न बुडती समुद्री । तारिती सागरी वानरा ॥४५॥
स्वये बुडोनि आणिकां बुडविती । ऐसी पाषाणांची जाती ।
तेही सागरी तरती । आणि तारितीं वानरा ॥४६॥
नव्हे पाषाणाचा गुण । नव्हे समुद्राचे लक्षण ।
नव्हे ऋषीचें वरदान । श्रीरामचरणप्रताप ॥४७॥
श्रीरामचरणींचें पर्वत । पुष्पप्राय उचलित ।
येर जडत्वे जे डोलत । ते बुडत सागरी ॥४८॥
श्रीरामचरणाचें महिमान । सिद्धी पावे सेतुबंधन ।
स्वये हनुमंत सांगता जाण । पावली खूण वानरा ॥४९॥
हनुमंताचे अभिनंदन :
ऐकोनि हनुमंताचे वचन । सुग्रीवे दिधले आलिंगन ।
अंगद घाली लोटांगण । वंदिले चरण वानरी ॥५०॥
हनुमंते विघ्नाचें निर्विघ्न । हनुमंते सेतुबंधन ।
हनुमंते भवाब्धितरण । अवघे जाण वानिती ॥५१॥
सुग्रीव बोले संतोषोन । अगाध श्रीराममहिमान ।
अति गुह्य गुप्त ज्ञान । जाणे संपूर्ण हनुमंत ॥५२॥
करोनि हनुमंताची स्तुती । सेतु बांधावया पुढती ।
वानर चालिले शीघ्रगती । भुभुःकार करिती श्रीराम नामे ॥५३॥
सेतुबंधनाचे कार्य चालू. सर्व भूतसृष्टीला तो अपूर्व चमत्कार :
सुग्रीव सांगे स्वये गर्जोन । पूर्व पश्चिम दिशा दक्षिण ।
तेथील बुडती पाषाण । ते आपण नाणावे ॥५४॥
उत्तरेचे जे पर्वत । तेचि आणावे सेतुबंधार्थ ।
ऐसा ऐकोनि इत्यर्थ । वानर समस्त चालिले ॥५५॥
उत्तरेचे जे पर्वत । वृक्षपाषाण शिळा समस्त ।
श्रीरामपायीं अति पुनीत । सेतुबंधातें शीघ्र आणा ॥५६॥
जैसे आकाशी विखुरती टोळ । तैसे चालिलें वानरदळ ।
सेतु बंधनार्थ सकळ । प्रतापी प्रबळ चालिले ॥५७॥
गगनी नक्षत्रे पै थोडीं । तैशा वानरांच्या कोडी ।
सेतुबंधनाची तातडी । कपि कडाडी चालिले ॥५८॥
सेतु बांधावया सत्वर । हावे अहंपूर्व अहंपूर्व ।
वानरी घेवोनिया धांव । आणिती सर्व गिरिवर ॥५९॥
वानर अति बळे समर्थ । समूळ उपडोनियां पर्वत ।
घेवोंनी येती सेतुबंधार्थ । कैसे शोभत ते ऐका ॥६०॥
पर्वतमाथा खर्जूरीवृक्ष । अर्जुनवृक्ष ते असंख्य ।
शाल ताल तमाल तिलक । घटकवृक्ष वृथ तेथ ॥६१॥
आणिक पर्वत असंख्यात । आणिती शिखरांसमवेत ।
नाना जातींचे वृथ तेथ । फल पुष्पित आणिले ॥६२॥
माथा घेवोनि पर्वत । शतसहस्त्र असंख्यात ।
आणिती शिखरांसमवेत । गात नाचत स्वानंदे ॥६३॥
श्रीराम जय राम या गजरी । आणिती पर्वतांच्या हारी ।
सवेंचि घालिती सागरी । आल्हाद भारी सेतुबंधा ॥६४॥
लांबी संख्या शतयोजन । रूंदी दशयोजन जाण ।
ऐसे सेतूचें निर्माण । करी नंदन विश्वकर्म्याचा ॥६५॥
पडती पर्वतांच्या कोडी । दोरी धरोनि अति निवाडीं ।
नळ पर्वतें पर्वत जोडी । रिती सवडीं उरो नेदी ॥६६॥
पर्वत घ्यावया उठाउठी । नळाजवळी दहा कोटी ।
वानर ठेविले जगजेठी । अधिक साठी अति कुशळ ॥६७॥
पर्वतांच्या कोट्यनुकोटी । वानर आणिती जगजेठी ।
सवेंचि धांवती उठाउठी । गिरिकोटी आणावया ॥६८॥
पर्वत पडता उपराउपरीं । गाहाळू न करावा सागरी ।
नांवे लिहिती पर्वतावरी । कपि नखाग्री कोरोनी ॥६९॥
नवल वानरांची कथा । संख्या सांगावया रघुनाथा ।
नावें लिहिती पर्वतमाथां । सेतुबंधार्था अभिनव ॥७०॥
सेतुबंधन समुद्रजळी । श्रीरामा बांधी आतुर्बळी ।
स्वर्गमृत्युसप्तपाताळी । पिटिळी टाळी अति गजरें ॥७१॥
सेतुबंधनाचा क्रम पहिले दिवशी चौदा योजने :
प्रथम दिवशी समुद्रांतु । बुडाला पर्वतपर्वतु ।
तेणे खोळंबला सेतु । अल्प कार्यार्थु चालिला ॥७२॥
दुसरे दिवशी सव्वीस :
चवदा योजने नेमस्तु । प्रथम दिवशी बांधिला सेतु ।
सुग्रीव श्रीरामा सांगतु । हर्षयुक्त स्वानंदे ॥७३॥
अति सज्ञान हनुमंतु । तेणे चालता केला सेतु ।
आमचा पाहे पा पुरूषार्थु । बांधू सेतु अति शीघ्र ॥७४॥
आजि माझे कौतुक पाहे । सेतु बांधीन लवलाहें ।
म्हणोनि आफळोनि बाहे । उडाला स्वये शीघ्रत्वें ॥७५॥
श्रीरामासी सुखार्थ । पंचयोजन पर्वत ।
सुग्रीवे उपटोनि त्वरित । समुद्रांत निक्षेपी ॥७६॥
अर्धयोजन महाथोर । विंध्याद्रीचे दीर्घ शिखर ।
सुषेणें उपटोनि थोर । समुद्री गिरिवर निक्षेपी ॥७७॥
नीळे मलयाद्रिशिखर । बळे उपटिलें महाथोर ।
त्यावरी वृक्ष शरसहस्त्र । टाकिले सत्वर सागरी ॥७८॥
चंदनवृक्षेंसीं गिरिवर । सुगंधपुष्प तरूवर ।
मैंद व्दिविद दोघे वीर । समुद्री शीघ्र टाकिती ॥७९॥
गज गवाक्ष गवययुक्त । शरभ गंधमादन अद्भुत ।
पांच जण पांच पर्वत । समुद्रांत निक्षेपिती ॥८०॥
आणिकही वानरवीर । पर्वत आणिती थोर थोर ।
सेतु बांधावया सत्वर । गिरी वानर वर्षता ॥८१॥
वानरे अति उल्लासीं । सेतुबंधन दुसरे दिवसीं ।
सव्वीस योजने नेमेसीं । श्रीरामापासीं सांगती ॥८२॥
तंव जाला अस्तमान । परतले ते वानरगण ।
रामापासी येवोनि जाण । आंगवण सांगती ॥८३॥
हनुमंताचा विक्रम :
साटोपे बोलती वानर । आम्ही आणिले पर्वत थोर ।
एक म्हणती थोर थोर । आम्ही गिरिवर आणिले ॥८४॥
एक म्हणती न बोला वृथा । नामे लिहिलीं पर्वतमाथां ।
ते ते पाहोनि श्रीरघुनाथा । कपिपुरूषार्था वानावें ॥८५॥
एक साटोपे सांगती गोष्टी । आणिल्या पर्वतांच्या कोटी ।
स्वामीनीं येवोनि उठाउठी । सेतु निजदृष्टी पहावा ॥८६॥
व्यर्थ का बोला पुरूषार्थ । जाणतो सर्वज्ञ श्रीरघुनाथ ।
सुग्रीवे सांगोनि वृत्तांत । कपिउक्त स्वये परिसे ॥८७॥
सवेग आणिता पर्वत । वानर कष्टले समस्त ।
कोणासी जाणवेना तो अर्थ । निद्राभिभूत कपिकुळें ॥८८॥
कोणा नुघडवे दृष्टी । कायशा जागरणाच्या गोष्टी ।
वानर निजले कोट्यनुकोटी । शिळांसंपुष्टीं सुषुप्त ॥८९॥
चाळीस योजने संख्यागोष्टी । वानरी बांधिला सेतु संकटीं ।
पुढे उरला योजने साठी । सहसा कांठी पावेना ॥९०॥
श्रीरामांचे मनोगत । जाणोनिया हनुमंत ।
दडोनि राहिलासे तेथ । व्हावया प्रभात पहातसे ॥९१॥
कायसी सेतुबंधसांकडी । बांधीन न लागता अर्ध घडी ।
परी सूर्योदयाचें सांकडी । देवोनि दडी राहिलासे ॥९२॥
अरूणोदय होता प्राप्त । सवेग उठोनि हनुमंत ।
पूर्वाण्हिक क्रिया करोनि तेथ । सेतुबंधनार्थ उडाला ॥९३॥
न पुसता श्रीरामासी । कळो न देता वानरांसी ।
न पुसतां सुग्रींवासी । अति वेगेंसी उडाला ॥९४॥
पुढे गेला रे हनुमंत । एकोनि वानर समस्त ।
पूर्वाण्हिकें करोनि तेथ । शीघ्र धांवत दशदिशा ॥९५॥
महावीर हनुमंत । उपटोनि पर्वत समस्त ।
एकैक योजन संख्या सप्त । घेऊनि येत उल्लासे ॥९६॥
दोन पर्वत दोही हाती । दोन दोही काखेंप्रतीं ।
एक मस्तकी स्वामीकार्यार्थीं । पुच्छावर्ती पै एक ॥९७॥
एक पर्वत हनुवटीतळीं । आकळोनि महाबळी ।
गात नाचत नाममेळी । सेतुजवळीं स्वये आला ॥९८॥
घेवोनिया सप्त पर्वत । येता देखोनि हनुमंत ।
श्रीरामा जाला अति विस्मित । बळे अद्भुत मारूती ॥९९॥
प्रभाती नळे आवेश धरोन । सेतु बांधिला एक योजन ।
सप्तपर्वतेंसीं संपूर्ण । आले उड्डाण हनुमंताचे ॥१००॥
सात योजनांचे सात पर्वत आणून एकूणपन्नास योजने
एकट्याने काम केले ते पाहून सर्वांना परमाश्चर्य :
पर्वत टाकितां उद्भट । ध्वनि उठला कडकडाट ।
सागर गर्जे घडघडाट । नांदे वैकुंठ कोंदले ॥१०१॥
पर्वत सांडितां सागरी । नादें कोंदला कैलासगिरी ।
ध्यान सांडोनि ते अवसरी । पाहे बाहेरी नीलकंठ ॥१०२॥
समुद्री पाषाण तारित । देखोनि श्रीरामचंद्राचा सेत ।
हरिखें सदाशिवा डुल्लत । श्रीरघुनाथ परब्रह्म ॥१०३॥
सप्त पर्वती समस्त । हनुमंते सिद्धि नेला सेत ।
आला रावणासी अंत । शिव सांगत शिवेसी ॥१०४॥
पर्वत सांडितां सिंधूसीं । जळ उसळलें आकाशी ।
भिजवोनियां ध्रुवमंडळासी । सत्यलोकासी आदळले ॥१०५॥
बाप बळिया हनुमंत । स्वर्ग केला सचैल स्नात ।
देवा देतसे प्रायश्चित । आले हास्य सुरवरा ॥१०६॥
रावणबंदी देव निर्मुक्त । सोडविले पै समस्त ।
अवश्य पाहिजे प्रायश्चित । सचैल स्नान हनुमंत करवी ॥१०७॥
घालिता सप्त पर्वत पूर्ण । एकुणपन्नास योजन ।
हनुमंते केले सेतुबंधन । विस्मित मनें विरींचि ॥१०८॥
राहिलेले दहा योजन सेतू बांधून पूर्ण केला :
विस्मय करिती सुरवर । विस्मय करिती ऋषीश्वर ।
विस्मय करिती नरवानर । श्रीराम सौमित्र विस्मित ॥१०९॥
आतुर्बळी हनुमंत । देवदुंदुभि स्वर्गी गाजत ।
सुर सुमने वर्षत । नृत्यान्वित अप्सरा ॥११०॥
तंतीवीणास्वरयुक्त । स्वर्गांगना नृत्य करित ।
हर्षे वानर नाचत । सेतु समास श्रीरामे ॥१११॥
तृतीय दिवसाचा वृत्तांत । सुग्रीव श्रीरामा सांगत ।
तुझा निजभक्त हनुमंते । सेतु समाप्त त्याचेनि ॥११२॥
आमचा वाढवावया सन्मान । राखिला दशयोजनें न्यून ।
एर्हवीं करिता संपूर्ण । अर्ध क्षण न लागता ॥११३॥
वानरी आणोनियां पर्वत । दशयोजनें उर्वरित ।
नळ स्वानंदे सेतु बांधित । हर्षयुक्त वानर ॥११४॥
एकोणपन्नास योजने सेतु । भरोनि गेला हनुमंतु ।
दश योजने उर्वरीतु । नळ बांधितु पुढारा ॥११५॥
तंव नळासी सांगिजे वानरी । हनुम्यानें बांधिला जैशा परी ।
त्यासमान अवघा करी । धरोनि दोरी कपि पाहती ॥११६॥
हनुमंताचे क्रियेसम । तुझी क्रिया दिसे विषम ।
बराबर करी समान सम । त्यांसीं सम करविती ॥११७॥
बांधिला बांधिला सेतु समग्र । सिंहानुवादें गर्जे अंबर ।
स्वर्गी गर्जती सुरवर । सेतु समग्र बांधिला ॥११८॥
समुद्री सेतु अति दुर्धर । वानरी बांधिलो समग्र ।
स्वये बोलती ऋषीश्वर । थोर थोर देवऋषी ॥११९॥
वानरवीर कोट्यनुकोटी । पर्वत आणिती उठाउठी ।
त्यांते वारिती कपि जेठी । सेतु परतटीं पावला ॥१२०॥
सेतुबंधन पूर्ण झाले म्हणून भेरींचा निनाद व निशाणे फडकाविली :
सेतु सिद्ध जाला संपूर्ण । कटकीं त्राहाटिले निशाण ।
ते ऐकोनि वानरगण । टाकिती पाषाण पर्वत ॥१२१॥
पर्वत पाषाणांच्या हारी । वानरी टाकिल्या धरेवरी ।
सेतुबंधन यात्रेकरी । अद्द्यापवरी देखिजेती ॥१२२॥
रूंदी संख्या दशयोजन । लांबी समग्र शतयोजन ।
नळे केले सेतुबंधन । श्रीरघुनंदनप्रतापें ॥१२३॥
सेतुबंधना मूळ मलयाद्री । तेथोनि लंकामूळवरी ।
नळे बांधिला बरव्यापरीं । मंदारगिरिसमप्रभ ॥१२४॥
सेतु पावले परतटीं । रामनामे वानरकोटी ।
गजगर्जोनि नाचती सृष्टी । न समाती पोटी नभाच्या ॥१२५॥
येरयेरांवरी किराण । हर्षे नाचती वानरगण ।
श्रीरामापुढें येवोनि जाण । लोटांगण घालिती ॥१२६॥
येरयेरांते गुदगुली । येरयेरांतें वांकुली ।
श्रीराम आमची माउली । संतोषली सेतुबंधें ॥१२७॥
सेतु जाला समाप्त । वानरवीर हरिखें गर्जत ।
श्रीरामापासीं आले समस्त । हर्षोन्मत्त स्वानंदे ॥१२८॥
समुद्री सेतुबंधनस्थिती । देखोनि सुरवर बोलती ।
श्रीरामाची अगाध कीर्ति । त्रिजगती विस्तारली ॥१२९॥
सेतु पावतां समाप्ती । नळे येवोनि शीघ्रगती ।
नमस्कारिला श्रीरघुपती । श्रीरामे अति प्रीती आलिंगिला ॥१३०॥
आलिंगोनि सुखसमेळी । पाठी थापटी वेळोवेळीं ।
तंव वानरी पिटिली टाळी । दिधली आरोळी अंगदे ॥१३१॥
अंगदाचा हर्ष व प्रतिज्ञा :
सिद्धि पावले सेतुबंधन । कायसे बापुडे रावण ।
इंद्रजित आणि कुंभकर्ण । निर्दळण राक्षसा ॥१३२॥
नरांतक सुरांतक । अतिकायादि कुमर अनेक ।
रणी मारीन एक एक । युद्धी सन्मुख दशमुखा ॥१३३॥
महोदर प्रहस्त जाण । महापार्श्व शुक सारण ।
रणी देखता दशानन । करीन कंदन प्रधानां ॥१३४॥
निर्दाळोनि लंकानाथा । अर्धक्षणे श्रीरघुनाथा ।
तुझी आणीन मी सीता । उल्लांसतां गर्जत ॥१३५॥
मज म्हणो नको लेंकरू । मी तंव वाळीचा कुमरू ।
करीन सीतेचा उद्धारू । दशकंधरू वधोनि ॥१३६॥
आडवा होता जंव सागर । तंव विरालें होते वानर वीर ।
आता घ्यावया लंकापुर । अति सत्वरा उपरमती ॥१३७॥
अवघे मिळोनि मर्कट । छेदावया दशकंठ ।
तुझीच पाहती वाट । भट उद्भट वानरं ॥१३८॥
सर्व वानरसैन्यांचा आवेश :
सेतु पावला लंकामूळीं । वानरी पिटिली टाळी ।
नामे गर्जतीं आतुर्बळीं । सुखसमेळी नाचती ॥१३९॥
रामनामाचा गजर । वानरी केला भुभुःकार ।
देवी करोनी जयजयकार । सुमनसंभार वर्षती ॥१४०॥
एकाजनार्दना शरण । सिद्धि पावले सेतुबंधन ।
पुढे गोड निरूपण । श्रीरामगमन लंकेसी ॥१४१॥
नाबदेचा पडिवाड । जों जों चाखिजे तो तो गोड ।
तैसे रामायणी कथागोड । सुखसुरवाड स्वानंदे ॥१४२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
सेतुबंधन समाप्तिर्नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥
॥ ओव्या १४२ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १७९ ॥
