गंगा गौरी कलह - अभंग
3486.
गंगा गौरी कलह - अभंग ३४८६
जगाचा जो पिता । म्हणसी ईश्वरु नियंता । त्यासी विद्या अविद्या दोघी कांता । एकी माथा अर्धांगी ॥१॥
पाहता ईश्वर करणी । माथा बैसविली राणी । हा महिमा वेदीं पुराणीं । गाती कीर्तनी निरंतर ॥२॥
अविद्या आणि ईश्वर । दोही मांडिला घराचार । कैसी अनन्य भक्ति सधर । आवडी थोर पै देखा ॥३॥
दोघा एकची नेसणें । दोघा एक सत्ता बैसणें । एके अंगां दोनीपणे । संपादणी करिताती ॥४॥
दोघा एकची चाखणें । दोघा एकची देखणे । दोघा आनु माजी असणे । सावकाश सहजें ॥५॥
दोघा आवडी कैसा देख । येरयेरांविण नेघे उदक । दोघा मिळोनी एक सुख । अति संतोष येरयेरा ॥६॥
जै उभयां मेळविलें । तैंचि शिवा शिवत्व कळे । प्रियानें देखता सगळें । शिवत्वही सांडिजे ॥७॥
दोघा एकत्र बसणें । दोघा मिळोनी एक करणे । दोघे वर्तती एके प्राणें । दोनी दावणें एकपणी ॥८॥
शिवत्व लोपुनी शिवे । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता अहेवे । रुपे नांवे शिव पूजी ॥९॥
दोघांपासुनी जाले जग । परि न दिसे तिसरें अंग । न तुटे अनन्यमिळणी योग । भिन्न विभाग दाखविता ॥१०॥
पतीविण जे पतिव्रता । अवघीच विरे पै तत्वता । जी विण असतुची नसतां । होये सर्वथा गोसावी ॥११॥
शिव नि:संगु जो पै सदा । क्रिया करणेंविण नुसुधा । त्यासही सुखदु:खाची बाधा । या प्रमदा भोवविजे ॥१२॥
यापरी तो नोवरा । अविद्या गोंविला घराचारा । मग त्याचियाची शरीरा । अर्धांगी बैसविली ॥१३॥
गंगे न देखवे दृष्टी । सवतीमत्सरु उठिला पोटी । सद्विभागे जटाजुटीं । होती मुकुटी मौळली ॥१४॥
सविद्या गंगा मुकुटी । वैराग्याचे प्रवाह लोटी । शिवाची उपरमली दृष्टी । न करी गोष्टी भोगाची ॥१५॥
अखंड वसे ते एकांती । प्रकृति न साहे पार्वती । सांडुनी अवघी हे प्रवृत्ति । मग अद्वैतीं रहिवासू ॥१६॥
ते संधी आला नारदमुनी । देखोनि शिव शंकला मनी । मग बैसला तो ध्यानीं । म्हणे कळी हा झणी लावा ॥१७॥
गुज सांगितले प्रियेसी । वेगी लावी ऋषीसी । हासे आले नारदासी । मग कलहासी उत्पादी ॥१८॥
नारद नमी पार्वतीसी । सांगे शिव केवी गुंतले ध्यानासी । आवो तू भोळी ऐसी कैसी । तो आणिकीसी रतला ॥१९॥
मी कळीलावा हे पुढे । माझे वचन मानिसी कुडे । पैल पाहे मुगुटाकडे । दिसे रुपडे सुरेख ॥२०॥
आधींच तंव ते उताविळ । वरी नारदे चेतविली प्रबळ । मज असता कोण गे बरळ । मुकुटी सर्व मोकाट ॥२१॥
येरी म्हणे बाई तुम्ही का नेणा । शिव शिवप्रिया मी अंगना । मान राखो वडीलपणा । कोपू मना नाणावा ॥२२॥
पापें जया वसे पै गा । तेणे आलिंगिजे गंगा । ते तू जडली शिवा अंगा । नातळे लिंगा उधटे॥२३॥
माझेनी अंगे पाप पळे । हे जाणिजे आश्वनिळे । विष निस्तारिजे माझेनी मेळे । द्वेष कुटिळे सांडी पा ॥२४॥
चढला कोपाचा बासटु । गंगे तुझा बहु गे नेटु । ठकारे भुलविला निळकुंठ । माझा विठु घालिसी ॥२५॥
अगे तू गौतमें नेलीसी । निर्लज्जे मागुती आलिसी । येरी म्हणे शिव रावणा दिधलीसी । माझेनी बापें सोडविले ॥२६॥
गंगे तू नुसुधें उदक । तुजमाजीं कई रमणीय सुख । येरी म्हणे जनीं त्र्यंबक । जेणे मस्तकें धरियलें ॥२७॥
अगे तुज जवळी भगवें । आणिक बोडिकें अवघे । जट्याळ गाट्याळ तुजसवें । तेथे काय शिवे भोगिजे ॥२८॥
गिरिजे नोळखिसी पायरी । मी मस्तकें तू पायांवरी । तुझ्या अंगी दोष भारी । परि नव्हेरी भोळा हा ॥२९॥
जै गे झाले तुझे लग्न । भटा झाले वीर्यस्खलन । एव्हढें अंगीचे लक्षण । केवी मस्तक इच्छिसी ॥३०॥
गंगे तू वाजट गळदट । माथा वाहिलीसी धीट । कांहीन बोलसी नीट । विद्या उध्दट तुजमाजीं॥३१॥
अगे तुं शिवे शापिलासी । तै गे शांतनीनें नेलिसी । तैथें हिंवसुतें व्यालिसी । केवी आलिसी मस्तका॥३२॥
उमे भीतसों तुझिया कोपा । आगीं रिघोनी मारविले बापा । नरसुरां आटूं पहा पा । सुधी संतापा पै नाहीं॥३३॥
दक्षा मारविलें यज्ञिष्टा । ब्रम्हहत्या तुझा वांटा । येव्हढा अंगी दोष मोठा । झणे नीळकंठा आतळसी॥३४॥
गंगे तुजमजी खळाळ । तेणे तू गर्जसी सबळ । शिवे सोसिजे खळखळ । माझे कपाळ उठिलें॥३५॥
माझे लागता खळाळ । तरले सुरनर सकळ । तुझेंचि का कठीण कपाळ । द्वेषे छळण करितेसी॥३६॥
गंगे तुज ऐसी ओंगळ । आन न देखे मी कुश्चिळ । मच्छ कच्छ विष्टा ते जळ । आणि शेवाळ सर्वांगीं॥३७॥
ऐकोनि गंगे आले हांसें । काय बोलसी वावसे । चराचर जे दिसतसे । ते ते असे मजमाजीं॥३८॥
गंगे तू जासी सागरा पोटी । हे प्रत्यक्ष जगु देखे दिठी । पुराणी ही त्याची गोठी । गंगा सागरगामिनी॥३९॥
उमे तुझा खोटा भावो । गिरिसागर माझा देवो । शिवावांचोनि पहाहो गमनागमन मज नाहीं॥४०॥
गौरी गंगेतें म्हणे धांगडी । येरी म्हणे घर रिगालिसी आवडी । बापें बेल वहावया मिसे लाविली गोडी । तैसी फ़ुडी मी नव्हे॥४१॥
वर्मे क्रोधे चढल्या क्रोधा । नारदु हांसतु खदखदां । भलिया मिनलों विनोदा । दोहीच्या शब्दा साक्षी तो॥४२॥
तुज कुटिल जाणोनि मानसी । शिरु तारकु ब्रम्ह उपदेशी । भावों नाही त्या वचनासी । छळू जासी श्रीरामा॥४३॥
देववचनी नाही भावो । तंववरी न तुटे देहसंदेहो । कैसेनि राहे काम कलहो । न्याय अन्यायो न कळे॥४४॥
तू अविद्या सदा विन्मुख । यालागी नेणसी निज सुख । जगाचे देखसी दोख । कामे सुख मानिसी॥४५॥
आम्ही तंव शिववचनीं सन्मुख । अखंड आम्हा आत्मसुख । शिवावांचूनियां देख । आन नाही सर्वथा॥४६॥
तुझा जावयासी द्वेष । कळे भांडण्याचे मिष । कलहो अंतीं उपजे सुख । परम निर्दोष त्या नांव॥४७॥
पाहे पा मुळींच्या मिळणी । आम्ही तुम्ही एकी दोघीजणी । शिणलिसी माय गे बहिणी । द्वेषु मनी न धरावा॥४८॥
जे सांगितले सदाशिवें । ते ह्रदयी धरावें निजभावें । तेणे द्वेषाद्वेष न संभवे । पालट पावे वृत्तीशीं॥४९॥
त्याची वृत्ति परतोनी पाही । देही प्रगटेल विदेही । मग देह विदेह दोन्ही नाही । निजतत्व ठायी होउनी ठासी॥५०॥
ऐकता गंगेचें वचन । गिरिजें चालिलें स्फ़ुदंन । धांवूनि दिधले आलिंगन । समाधान पै झालें॥५१॥
ते वेळीं मिनले मनामन । उपनिषदां पडिले मौन । देखणे ठेले भिन्नाभिन्न । शिवचैतन्य अनुभवीं॥५२॥
शिव तो निजरुप सकळ । गंगा सच्छक्ति निर्मळ । येरी अविद्या चपळ । नारदु केवळ निजबोधु॥५३॥
दोही शक्तींचा फ़िटला भेदु । सकळीं सकळा शिवूचि श्रध्दु । एका जनार्दनी बोधु । परमानंदु प्रगटला॥५४॥
