न घडे मायबापे बाळकाच
3188.
न घडे मायबापे बाळकाचा घात । आपणा देखत होऊ नेदी ॥१॥
का मी मनी चिंता वाहू भय धाक । काय नव्हे एक करिता तुज ॥धृपद॥
वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तहान भूक वाहे कडिये खांदी ॥२॥
तुका म्हणे तू गा कृपावंत भारी । ऐसे मज हरी कळो आले ॥३॥
अर्थ :
आपल्या बालकाचा घात आईबाप कधीही करत नाहीत आणि आपल्या देखत देखील आपल्या बालकाचा घात होऊ देत नाहीत. त्यामुळे देवा मी माझ्या मनामध्ये उगाचच प्रपंचाची चिंता आणि काळाचे भय किंवा धाक व्यर्थ कशासाठी करत बसू अरे तू ठरवले तर काय करु शकत नाहीस ? आईबाप आपल्या मुलाचे हित कशात आहे, त्याच्या हिताचा उपाय नेमका कोणता, त्याच्या हिताचे वर्म कोणते हे सर्व जाणतात त्याची तहान भूक सर्व जाणतात चालताना आपले बालक थकले तर त्याला कडेवर खांदयावर घेऊन ते चालतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी तू देखील असाच खूप कृपावंत आहेस हे मला कळले आहे.
