देवाच्या निरोपे पिटि
2631.
देवाच्या निरोपे पिटितो डांगोरा । लाजे नका थारा देऊ कोणी ॥१॥
मोडिले रांडेणे सुपंथ मारग । चालविले जग यमपंथे ॥धृपद॥
परिचारी केली आपुलीच रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाही ॥२॥
तुका म्हणे आणा राऊळा धरून । फजित करून सोडू मग ॥३॥
अर्थ :
मी देवाच्या निरोपावरुनच दवंडी पिटवित आहे की लाजेला (लज्जा) कोणीही थारा देऊ नका. कारण भक्तीचा चांगला सुपंथ मार्ग या रांडेने मोडविला असून हीने सर्व जग यमाकडे जाणा-या मार्गाकडे वळविले आहे. तिच्या पोटामध्ये किती वाईटपणा आहे हे कोणालाही माहित नाही तिने सर्वत्र आपलीच प्रतिष्ठा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोकांनो तुम्ही या लज्जेला विठ्ठलाच्या देवळात धरुन आणा मग आपण हिची चांगलीच फजिती करुन हिला सोडवू.
