॥ श्रीएकनाथमहाराजकृत
25.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय पंचविसावा ॥
श्रीराम - अंगद संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीत
म्हणून श्रीरामास चिंता वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला
वानर गेले दक्षिणेसी । मर्यादा लोटली तयांसी ।
कोणी नाणिती सीताशुद्धीसी । श्रीरामासी अति चिंता ॥१॥
मजसी करूनि एकांत । मुद्रा घेवोनि गेला हनुमंत ।
तो का नयेचि पा त्वरित । अति संचित श्रीराम ॥२॥
हनुमंत कार्यकर्ता । मजही हा भरंवसा होता ।
तोहि न येचि वाट पाहातां । परम चिंता लागली ॥३॥
ऐसी श्रीरामाची चिंता । कळो सरली त्या हनुमंता ।
शुद्धि सांगावया सीता । होय निघता अति शीघ्र ॥४॥
श्रीरामाची परम चिंता । सांगता अंगदा जांबवंता ।
घांसा आड येऊ नये हनुमंता । घेवो दे आता धणी आम्हा ॥५॥
वानरे पीडलीं अति दीन । भाग्ये मिळाले मधुपान ।
त्यासी तुवों न करावे विघ्न । तू सज्ञान दीनदयाळ ॥६॥
विषयरसभोगापुढें । परमार्थ समूळ उडे ।
वानर मद्यपानें जाले वेडे । श्रीरामाकडे न चलती ॥७॥
वानर गुंतले मद्यपानांत । मद्यपानें बोधेना परमार्थ ।
ऐसे जाणोनिया हनुमंत । निघे त्वरित एकाकी ॥८॥
वानरी सेविले मधुपानासी । सीताशुद्धि साधली त्यांसी ।
निश्चयो मानला सुग्रीवासी । सौमित्रासी सांगत ॥९॥
सौमित्रि सुग्रीव अति हर्षेसीं । सीताशुद्धि सांगती रामासी ।
श्रीरामे देखिले हनुमंतासी । येता आकाशी अति शीघ्र ॥१०॥
येता देखोनि हनुमंता । अति उल्लास श्रीरघुनाथा ।
धांवोनि आकाशहीपरता । सीताशुद्यर्थ पुसो पाहे ॥११॥
ऐसे जाणवले हनुमंता । उठों नेदिता श्रीरघुनाथा ।
दुरोनि सीताशुद्ध्यीची कथा । होय सांगता ते ऐका ॥१२॥
दूरूनच श्रीरामचंद्रास सीता-शुद्धि व तिच्या स्थितीचे कथन
उठों नेदिता रघुनाथा । दुरोनि सांगणे हनुमंता ।
तुझिये कृपे म्या तत्वता । देखिली सीता जनकात्मजा ॥१३॥
समुद्रामध्यें महागिरी । त्यावरी वसे लंकापुरी ।
रावणाच्या निजमंदिरीं । सीता सुंदरी रक्षिलीसे ॥१४॥
केवळ नाही रावणाघरी । अशोकवाटिकेमाझारी ।
रक्षण विक्राळ खेचरी । त्यांमाझारी जानकी ॥१५॥
एकवस्त्रा भूमियाशी । मलिनांबरा मलिनदेही ।
मंगलस्नान करणे नाही । मस्तकी पाही दृढ जटा ॥१६॥
जैसा तू श्रीराम जटाधारीं । ते व्रत चालवी सीता सुंदरी ।
स्नेह दृष्टीचा हाती न धरी । जटाधारी जानकी ॥१७॥
नेघे अंजनादि चंदन । न करी भोजन रसपान ।
केवळ तिसी उपोषण । जळप्राशन तीस नाही ॥१८॥
नित्यतृप्तीचे अवदान । ब्राह्मणां नेदिता ब्रह्मौदन ।
सीता न पाहे सर्वज्ञ । निंद्य म्हणोन नातळे ॥१९॥
परपुरूषाचे घ्यावें अन्न । ते परदारा जाली जाण ।
सीतेनें सांडिलें थुंकोन । जैसे वमन श्वानाचें ॥२०॥
रामवियोगाचें अन्न । ते श्वानविष्ठेसमानं ।
रजस्वलेचे रूधिरपान । तत्समान रसभोग ॥२१॥
तुजवांचोनि श्रीरघुपती । जळ स्पर्शेना ते हाती ।
किती सांगो उपपत्ती । सीता सती पतिव्रता ॥२२॥
चंद्रग्रहणीं हीनकळा । तैसी हीन दीन जनकबाळा ।
स्वये देखिली म्या डोळा । वीरवेताळा श्रीरामा ॥२३॥
नेघे अन्न ना जीवन । कैसेनि तिचे वांचले प्राण ।
श्रीराम पुसे कळवळोन । दीनजनकृपाळु ॥२४॥
निजसखया हनुमंता । कैसेनि वांचली माझी कांता ।
हे मज सांगावे तत्वता । होत पुसतां श्रीरामा ॥२५॥
हनुमान अति विचक्षण । सीतासतीनिजजीवन ।
कैसे सांगेल आपण । सावधान अवधारा ॥२६॥
ह्रदयीं श्रीराम चिन्मूर्ति । मुखी रामनाम अहोरात्री ।
राम न्याहाळी सर्वा भूतीं । श्रीराम चित्ती अहर्निशी ॥२७॥
राम धराधारक पूर्ण । श्रीराम जीवना जीवन ।
रविचंद्रा दीप्ति गहन । विराजमान श्रीराम ॥२८॥
श्रीराम वायूचा निजप्राण । श्रीराम गगनाचें चिद्गमन ।
श्रीराम बुद्धिचें समाधिधन । प्राणपोषण श्रीराम ॥२९॥
श्रीराम अहंसोहंनिमग्न । श्रीराम मनाचे उन्मन ।
श्रीराम चित्तचैतन्य । जीवा जीवन श्रीरामा ॥३०॥
ऐसऐसिया निजस्थिती । मीतूंपणाहोनि परती ।
सीताजीवन श्रीराममूर्तीं । सत्य रघुपति बुद्धि माझी ॥३१॥
निर्विकल्प भजनविधी । कायावाचामनोबुद्धी ।
म्या आणिली सीताशुद्धी । सत्य त्रिशुद्धि श्रीरामा ॥३२॥
श्रीरामनाम परमामृत । अमृतपानें अमर मरत ।
रामनाम ज्यासी प्राप्त । मरण मरत त्याचेनि ॥३३॥
रामनामी श्रद्धा अढळ । त्यासी बाधेना हळाहळ ।
पोळू न शके प्रळयानळ । द्वद्वें सकळ निर्द्वंद्व ॥३४॥
ऐसे श्रीरामनामामृत । तेंचि सीतेचे जीवन नित्य ।
श्रीराम जाणे सत्य सत्य । श्रीरघुनाथ सर्वज्ञ ॥३५॥
श्रीरामांचा आनंद व हनुमंताचे अभिनंदन व हार्दिक कौतुक
ऐकोनि हनुमंताचे वचन । श्रीरामचंद्र संतोषोन ।
परमानंदे बाहु पसरोन । दिधले आलिंगन निजऐक्यें ॥३६॥
स्वामित्व विसरे रघुनाथ । दासत्व विसरे हनुमंत ।
परमानंदे सदोदित । जगाआंत कोंदले ॥३७॥
अहंकोहंसोहंज्ञान । ते समरस गेले विसरोन ।
हारपलें मीतूंपण । सुखसंपन्न स्वानंदे ॥३८॥
दोघें होता सुखसंपन्न । विरोन गेले ज्ञानाज्ञान ।
खुंटला बोल तुटले मौन । चैतन्य घन कांदले ॥३९॥
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ।
ध्येय ध्याता आणि ध्यान । गेले विरोन स्वानंदी ॥४०॥
देव देवपणें दाटला । भक्त भावार्थे आटला ।
परमानंद प्रगटला । तटका तुटला आशेचा ॥४१॥
भजनआवडी भावार्थ । भक्तें गिळिला रघुनाथ ।
नामे गिळिले देवभक्त । मुख्य परमार्थ या नांव ॥४२॥
ऐसा पावोन परमार्थ । श्रीरामी भजें हनुमंत ।
भजनें सदा यशवंत । द्वंद्वनिर्मुक्त हरिभजनें ॥४३॥
पावोनिया स्वरूपप्राप्ती । ज्यासी अखंड सद्गुरूभक्ती ।
देव वानिती त्याची कीर्ती । त्यासी वंदिती शिवादि ॥४४॥
ऐसी दाटुगी भगवद्भक्ती । भक्तीच्या दासी चारी मुक्ती ।
भगवद्भजन सर्वांभूतीं । ब्रह्मप्राप्तीं हरिनामें ॥४५॥
ऐसी हनुमंताची स्थिती । भक्ति कीर्ति विनयवृत्ती ।
तिही की विजयख्याती । सूक्ष्मशांति श्रीरामे ॥४६॥
सूक्ष्मशांतीचे लक्षण । मारिता कोट्यनुकोटि रण ।
शांति न मोडे अणुप्रमाण । दुजेनविणें संग्राम ॥४७॥
बुद्धिबळाचे खेळाकडे । तेथे मारिता हस्ती घोडें ।
मारित्यासी हिंसा न घडे । तेणे पाडे संग्राम ॥४८॥
ऐसी हनुमंताची गती । साधुजन अनुलक्षिती ।
येरा भासे वानरवृत्ती । दुर्धरशक्ती श्रीरामे ॥४९॥
हनुमान आणि रघुनंदन । अनन्य भावे पडले आलिंगन ।
पूर्ण पावोनि समाधान । जाले अभिन्न देवभक्त ॥५०॥
सीतामस्तकींचा मणी । ठेवोनिया श्रीरामचरणीं ।
हनुमंत घालोनि लोटांगणी । कर जोडोनि राहिला ॥५१॥
वानरसमूह मदोन्मत्त । पुढे गेला हनुमंत ।
अंगद नळ नीळ जांबवंत । हा वृत्तांत नेणती ॥५२॥
हनुमंते वंदोनि रघुनाथ । सांगोनि सीतेचा वृत्तांत ।
सवेंचि मधुवनांत । पूर्वस्थित तैसाचि ॥५३॥
जावोनि आला हनुमंत । हे नेणे अंगद जांबवंत ।
इतरांची काय मात । कपिवृत्तांत जाणावया ॥५४॥
सुग्रीव सौमित्रास सांगत । आम्हा देखता आला हनुमंत ।
सांगता सीतेचा वृत्तांत । श्रीरघुनाथ आलिंगी ॥५५॥
दोघे देता आलिंगन । परस्परें जाले लीन ।
नाही देखिले होता भिन्न । धन्य महिमान हनुमंता ॥५६॥
हनुमान नांदे श्रीरामांत । श्रीराम नांदे हनुमंतांत ।
ऐसी ऐकतांचि मात । पडे मूर्च्छित सौमित्री ॥५७॥
जैसी रामभक्ति हनुमंतासी । तैसे भजनलक्षण लक्ष्मणासी ।
एकात्मता त्या तिघांसी । येरयेरांसी अभिन्न ॥५८॥
ऐसे देखोनि अनन्य भजन । सुग्रीव घाली लोटांगण ।
श्रीरामे दिधले आलिंगन । समाधान सुग्रीवा ॥५९॥
अनन्यभक्तीचा वृत्तांत । सुखकारी श्रीरघुनाथ ।
भजनभावें भाविक मुक्त । नामे निर्दोष महादोषी ॥६०॥
एक एक श्रीरामनाम । ब्रह्मप्राप्ति सुगम ।
चहू मुक्तींचा उडवोनि भ्रम । नामेंचि परम परमार्थ ॥६१॥
सुग्रीव सौमित्री तये वेळीं । निवोनियां सुखकल्लोळीं ।
परमानंदे पिटोनि टाळी । श्रीरामाजवळी राहीले ॥६२॥
येरीकडे सीताशुद्ध्यर्थ । सव्यें साधोनि इत्यर्थ ।
मुख्य करोनि हनुमंत । अंगद समवेत युवराजा ॥६३॥
दधिमुख येवोनि जाण । घालोनिया लोटांगण ।
कथा सांगे सुखसंपन्न । सावधान अवधारा ॥६४॥
सीताशुद्धिपुढें जाण । मधुवन तृणासमान ।
सुग्रीव बोलिला आपण । जीवे निंबलोण करू पाहे ॥६५॥
शरीर चर्माचे मोचे । केलिया उत्तीर्ण नव्हे तुमचे ।
परम भाग्या अंगदाचे । कपिवंशाचे उद्धरण ॥६६॥
अंगद कपिवंशमंडण । अंगद कपिवंशभूषण ।
अंगद कपिवंशतारण । वदला आपण सुग्रीव ॥६७॥
ऐकता दधिमुखवचनार्थ । वानरी स्मरिला श्रीरघुनाथ ।
श्रीरामनामें गर्जत । उल्लासयुक्त निघाले ॥६८॥
सर्व वानरांचे आगमन व श्रीरामास वंदन
नमस्कारावया रघुवीर । गगनी उसळलें वानर ।
रामनामाचा गजर । केला भुभुःकार महावीरी ॥६९॥
हनुमंताची विजयवृत्ती । उल्लासले उपरमले जुत्पत्ती ।
नामे गर्जती त्रिजगती । किष्किंधेप्रती पातले ॥७०॥
वानरांचा गिरागजर । नादे कोंदलें अंबर ।
दणाणिलें गिरिकंदर । शैलशिखरे दुमदुमिलीं ॥७१॥
कपिकुळांची नादोक्ती । नादामाजी सीता सती ।
भेटो आलीसे आइती । ऐसा रघुपति सुखावे ॥७२॥
ऐकता अंगदादिकांचा गजर । सुखावें सुग्रीव कपींद्र ।
पुच्छ थरकोनि समग्र । केला भुभुःकार वानरी ॥७३॥
ऐकोनि सुग्रीवभुभुःकार । किष्किंधाभूतळी वानर ।
उतरले पै समग्र । हर्षनिर्भर उल्लासें ॥७४॥
श्वेत सुनीळ पीत आरक्त । सुवाससुमनीं सुफळित ।
अंगदसेनासंभारांत । टके शोभत वृक्षांचे ॥७५॥
किंशुक फुलले मनोहर । शाल ताल तमाल थोर ।
विचित्र पताका अनुकार । तेंवी वानर झेलिती ॥७६॥
असों वनवृक्षप्रकार । वानरा पुच्छी शाखा विचित्र ।
गुढिया उभविल्या समग्र । तेणे अंबर शोभत ॥७७॥
सुग्रीवाकडून अंगदाचे कौतुक :
अंगद युवराज वीर विख्यात । नळ नीळ जांबुवंत ।
मुख्य मुखरणी हनुमंत । यशवंत त्याचेनि ॥७८॥
ऐसा अंगदसंभार । शोभा शोभे मनोहर ।
हर्षे नाचती वानर । करीत गजर नामाचा ॥७९॥
देखोनि अंगदाचा यावा । सुखसंतोष सुग्रीवा ।
परम सुख श्रीराघवा । सुख सर्वा अंगदे ॥८०॥
अंगद देखोनिया दृष्टी । लक्ष्मणासी आनंदकोटी ।
अति उल्लासें टाळी पिटी । सीता गोरटी साधिली ॥८१॥
भेटावया श्रीरामचंद्रा । अंगदहनुमंतादि धुरा ।
उल्लास समस्ता कपींद्रा । बहु वानरा आल्हाद ॥८२॥
प्रस्त्रवणनामें महागिरी । तेथे वस्ती श्रीरामचंद्री ।
वने काननें साजिरी । यावा वानरी तेथे केला ॥८३॥
संमुख देखोनि रघुनंदन । स्त्रवती अश्रुधारा लोचन ।
अंगदे हनुमंते संपूर्ण । लोटांगण घातले ॥८४॥
मस्तकी धरिले दृढ चरण । श्रीरामे दिधले आलिंगन ।
कोटिजन्मांचें श्रमहरण । दोघे जण पावले ॥८५॥
सवेंच वंदिला लक्ष्मण । मस्तकी धरिले त्याचे चरण ।
सौमित्रीने दिधले आलिंगन । कुमित्रपण निमाले ॥८६॥
सुमित्र जाले निजमन । सुमित्र चित्त चैतन्यघन ।
सुमित्र जाला अभिमान । मति चिद्धन सुमित्र ॥८७॥
श्रीरामभजनी तत्पर । इंद्रियें जालीं सुमित्र ।
जिव्हा रामनामी एकाग्र । वाचा सुमित्र स्वये जाली ॥८८॥
हरिदासाचें आलिंगन । ऐसे सबाह्य करी पावन ।
अभागी देखती दोषगुण । सभाग्य पूर्ण सद्भावे ॥८९॥
साधूंचें जे दर्शन । तेंचि परम अनुष्ठान ।
साधूंचें जे भाषण । तपश्चर्या पूर्ण पूर्णत्वे ॥९०॥
साधूंचें चरणस्पर्शन । कैवल्य त्यापुढे तृण ।
अगाध साधूचे चरण । जेणे पावन महादोषी ॥९१॥
सज्जनासी आलिंगन । तेणे सर्वांग पावन ।
देहचि होय चैतन्यघन । कृपा सज्जन जै करिती ॥९२॥
साधुसज्जनसंगती । सभाग्य भाग्यातें पावती ।
सत्संगें भवनिर्मुक्ती । वेदशास्त्रांसी संमत ॥९३॥
सज्जनांचे पादस्पर्शे । तेणे कर्माकर्म निरसे ।
जन्ममरण सकळ नासे । त्या रहिवास परी ब्रह्मी ॥९४॥
सौमित्र साधु श्रीरामभक्त । त्यास आलिंगन पै देत ।
अंगद आणि हनुमंत । आनंदभरित स्वये जाले ॥९५॥
हाती धरोनि अंगदासी । हनुमान आला सुग्रीवापासीं ।
सप्रेम वंदितां तयासी । तोही उल्लासीं आलिंगी ॥९६॥
सुग्रीव म्हणे हनुमंता । तुझेनि अंगदासी श्लाघ्यता ।
तू समस्तांसी जीवदाता । संरक्षिता आम्हांसी ॥९७॥
जांबुवंतादि वानरवीर । तिही वंदोनि श्रीरामचंद्र ।
करोनि सुग्रीवासी जोहार । सभा सादर बैसली ॥९८॥
श्रीरामांच्या सूचनेवरून अम्गद वृत्तांत सांगतो
सीताशुद्धीचा इत्यर्थ । स्वये पुसे श्रीरघुनाथ ।
येथोनि कैसा क्रमिला पंथ । समूळ वृत्तांत मज सांगे ॥९९॥
ऐसे पुसतां रघुनंदन । हनुमंते धरिले मौन ।
तेव्हा अंगद आपण । सांगे गौण सीताशुद्धि ॥१००॥
घेवोनि स्वामीचें आज्ञापन । शतधा शोधिली दक्षिण ।
सीताशुद्धीचें लक्षण । अणुप्रमाण न लभेची ॥१०१॥
पुढती करावया शोधन । वानरी केली आंगवण ।
ब्रह्मशापे उपहत वन । तेथे उड्डाण पडियेल ॥१०२॥
नाही पाला नाही फळपान । शोधिता न मिळे जीवन ।
वृक्ष ठेले खरकडोन । पडिले लंघन वानरा ॥१०३॥
दंडी नामा ऋषी समर्थ । वेदशास्त्रसंपन्न त्याचा सुत ।
विद्ध्यागर्वे अति उन्मत्त । त्याचा केला घात वनदेवतीं ॥१०४॥
तो विद्ध्यागर्वें अति उन्मत्त । वादी ब्राह्मणांसी निर्भर्त्सित ।
तो ब्रह्मराक्षस जीवे जींत । यालागी घात भूमीं केला ॥१०५॥
जाणोनि पुत्राचें निधन । ऋषीनें शापिले ते वन ।
तेथे ज्याचे आगमन । नव्हे निर्गमन प्राणांती ॥१०६॥
आम्हांसी पडतांचि ते वनी । प्राण जाते तत्क्षणीं ।
वांचलो रामनामस्मरणीं । संकटीं रक्षी श्रीराम ॥१०७॥
वनी नाही मुंगी मासी । ठाव नाही श्वापदांसी ।
तृणशलाका नाही भूमींसीं । पडे वानरांसी लंघन ॥१०८॥
ते त्यजावया दुष्ट वन सबळ । बळे करोनि किराण ।
करी तेथेंचि ये उड्डाण । नव्हे निर्गमन ब्रह्मशापे ॥१०९॥
त्या ऋषीचा ऋषिसुत । ब्रह्मराक्षस त्या वनाआंत ।
भक्षूं आला वानरांते । त्याचा निःपात आम्ही केला ॥११०॥
हनुमंतादेखता मरण । ब्रह्मराक्षसा उद्धरण ।
रामनामाचा प्रताप पूर्ण । जडतारण श्रीरामे ॥१११॥
जाले पुत्राचे उद्धरण । तेव्हा दंडी ऋषि संतोषोन ।
शापोन्मुक्त केले वन । हे महिमान हरिभक्तांचें ॥११२॥
जेथे जाती श्रीरामभक्त । ते वन पुण्याश्रम म्हणत ।
ऐसे अंगद सांगत । सुखे डुल्लत श्रीराम ॥११३॥
ऐकोनि कृपाळु रघुनाथ । सौमित्री स्वानंदे स्फुंदत ।
वानरसभा पै तटस्थ । जाला विस्मित सुग्रीव ॥११४॥
वन मुक्त केले द्विजवरीं । वानरा लंघनें पडली भारी ।
निघवेना वनाबाहेरी । येती लहरी क्षुधातृषेच्या ॥११५॥
हनुमंते तिये काळी । वनबिल्ववृक्षातंळी ।
विवर देखिले सफळ जळीं । आम्ही ते बिळी प्रवेशलो ॥११६॥
पुढे करोनि हनुमंत । विवरी रिघतां समस्त ।
तेथे मांडला प्राणावर्त । रक्षी हनुमंत श्रीरामतेजे ॥११७॥
विवरी गुडुप अंधार । स्वये स्मरेना स्वशरीर ।
उबेनें निर्बुजलें वानर । पडले समग्र अचेतन ॥११८॥
मज अंगदासमवेत । नळ नीळ जांबुवंत ।
विवरी अचेतन समस्त । सावधान हनुमंत श्रीरामे ॥११९॥
क्षुधेने आमचा क्षीण प्राण । तेणे विसरलो रामस्मरण ।
हनुमंत असे सावधान । सबाह्य पूर्ण श्रीराम ॥१२०॥
श्रीराम हनुमंताचा प्राण । सर्वेंद्रियें श्रीराम आपण ।
श्रीरामतेजे देखणे नयन । अंधारी पूर्ण देखणा रामे ॥१२१॥
निधडा वीर हनुमंत । पुच्छे बांधोनि कपी समस्त ।
शतयोजनें विवरांआंत । नेले मूर्च्छित निजांगें ॥१२२॥
पाचारोनि पिता पवन । हनुमान गुज सांगे संपूर्ण ।
वांचवीं वानरांचे प्राण । रघुनंदन सुखार्थ ॥१२३॥
ऐसे सांगतांचि जाण । वानरांसी आला प्राण ।
अवघे जाले सावधान । वीर देखोन विस्मित ॥१२४॥
ते महेमविवरभुवनीं । भेटली सुरसा तपस्विनीं ।
तिने हनुमंता देखोनी । जाली मनी विस्मित ॥१२५॥
सुरसा पुसे तू कोण येथ । हनुमान सांगे रामभक्त ।
विवरी आलो सीताशुद्ध्यर्थ । समवेत वानरांसी ॥१२६॥
सुरसा म्हणे तुम्ही श्रीरामभक्त । तरीच तुम्हा येववलें येथ ।
येरांसी हे स्थळ न प्राप्त । मी सनाथ तुमचेनि ॥१२७॥
ब्रह्मवरद मज येथ । तुज भेटतील श्रीरामभक्त ।
तेणे तू होसील निर्मुक्त । ते भाग्य प्राप्त मज आजी ॥१२८॥
विकळ देखोनि वानरांसी । सुरसा ते सज्ञान कैसी ।
जेणे विश्रांति होय आम्हांसी । त्या उपायासी आदरिलें ॥१२९॥
दिधले विश्रांतिरसपान । जीवन दिधले स्वानंदघन ।
सुखस्वादिष्ठ फळे संपूर्ण । रामस्मरणेंसीं सेविती ॥१३०॥
ग्रासोग्रासी रामस्मरण । रसपान हरिचिंतन ।
वानरी सेविता जीवन । गडगर्जन नामाचे ॥१३१॥
क्षुधा निमाली नित्यतृप्ती । निद्रा निमाली सुखसंवित्ती ।
सुखस्वानंदें हेलावती । परम विश्रांति वानरा ॥१३२॥
रामनामे तृप्त वानर । नामे कोंदलें विवर ।
नामे व्यापिले चराचर । नामे कपींद्र गर्जती ॥१३३॥
नामे कोंदलें वैकुंठपीठ । नामे डुल्लत श्रीनीलकंठ ।
सुरसेचें भाग्य वरिष्ठ । हनुमंत श्रेष्ठ सभाग्य ॥१३४॥
हरिभक्तांचिया संगतीं । जढ मूढ उद्धरती ।
सुरसा सभाग्य वानू किती । हनुमंती विश्वास ॥१३५॥
हनुमंतनिष्ठारामस्मरण । कळिकाळाची बोळवण ।
नामे जन्ममरणा मरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥१३६॥
वानरा जाली नित्यतृप्ती । सुरसा पावली अति विश्रांती ।
हनुमंताचिये संगतीं । अवघे डुल्लती स्वानंदे ॥१३७॥
ऐकता अंगदाच्या गोष्टी । श्रीरामा सुखानुकोटी ।
हरिखें त्याची पाठी थापटी । स्वानंदपुष्टी डुल्लत ॥१३८॥
ऐकता भक्तांची निजकथा । परम सुख श्रीरघुनाथा ।
त्यांमाजी हनुमंत पढियंता । त्याची कथा अतो गोड ॥१३९॥
अंगदासी म्हणे रघुवीर । पुढील सांगे समाचार ।
आवडे हनुमंताचा पुरूषार्थ थोर । रामा निरंतर ऐकावया ॥१४०॥
अंगद म्हणे श्रीरघुपती । वानरा जाली विश्रांती ।
शोधावया सीता सती । स्वये पुसती हनुमंता ॥१४१॥
नाही रविचंद्रविलासा । विवरी स्वयंप्रकाशीं ठसा ।
तेथे लक्षेना दक्षिणदिशा । शुद्धीस धिंवसा काय करू ॥१४२॥
सुरसा सांगे हनुमंताप्रती । ब्रह्मवरदें गतिनिर्गती ।
मीच जाणे विवरस्थिती । तुमच्या शक्ती न निघवे ॥१४३॥
सुरसा विनवी हनुमंताप्रती । शुद्धि पावेल सीता सती ।
यश पावाल परम कीर्ती । सत्य वचनोक्ती हे माझी ॥१४४॥
हनुमान सांगे सुरसेसी । वेगी काढी वानरांसी ।
येरी लागली पायांसी । सांगेल तैसी स्थिती कीजे ॥१४५॥
डोळे उघडें असता । बाहेरी न काढवे सर्वथा ।
डोळे झाकिलिया समस्ता । निमेषार्धात काढीन ॥१४६॥
डोळे झांकितां वानर । पुढे गडगर्जे समुद्र ।
मागे न दिसे विवर । विस्मयो थोर वानरा ॥१४७॥
संपातीची भेट व हनुमंताचे लंकेकडे उड्डाण
डोळे झांकितां वानरी । ना कदिये ना धरिले करी ।
अवघे विवराबाहेरी । समुद्रतीरी स्वये उभे ॥१४८॥
रामनामाचे आवर्ती । सुरसेसहित विवरोन्मुक्ती ।
वानर विवरातें पाहती । तंव तेथे व्यक्ती लक्षेना ॥१४९॥
असो हे नव्हेचि सीताशुद्धी । पुढे अडविलें उदधी ।
मागे जावे तरी लोटला अवधी । वानरमांदी संचिंत ॥१५०॥
मागे जाता अपमान । सुग्रीव दंडील दारूण ।
पुढे समुद्र नव्हे गमन । द्ध्यावया प्राण सिद्ध जालो ॥१५१॥
लक्षोनिया समुद्रतीर । पडता प्रायोपवेशीं वानर ।
संपाती पक्षी महाथोर । आला समग्र भक्षावया ॥१५२॥
करोनि बहुकाळ लंघन । मग वानरी त्यजावा प्राण ।
श्रीरामे कृपा केली संपूर्ण । सद्ध्य:मरण पक्षिभक्षा ॥१५३॥
व्यर्थ देहो द्ध्यावा समुद्रतीरी । अति उल्लास वानरी ।
देह लागला परोपकारी । स्मरतीं गजरी श्रीरामा ॥१५४॥
होता श्रीरामनामस्मरण । फिटले संपातीचें मूढपण ।
त्यासी उपजलें परम ज्ञान । सावधान अवधारा ॥१५५॥
जेथे श्रीरामनामस्मरण । तेथे कल्पांती न रिघे मरण ।
संपाती घाली लोटांगण । तुम्ही धन्य कोण कोणाचे ॥१५६॥
ज्याचे स्मरणी श्रीरामनाम । सफळ जन्म सफळ कर्म ।
सफळ त्याचा देहधर्म । भाग्ये परम भेटलेति ॥१५७॥
श्रीरामनाम स्मरतां येथ । अवघे आलेति किमर्थ ।
देह त्यागावया उदित । तुम्ही किमर्थ ते सांगा ॥१५८॥
ऐकोनि संपातीचें वचन । अंगद म्हणे करी भक्षण ।
संपाती म्हणे सत्य संपूर्ण । न रिघे मरण रामस्मरणे ॥१५९॥
ऐकोनि संपातीचा वृत्तांत । बोलता जाल हनुमंत ।
आम्ही श्रीरामाचे भक्त । सीता शुद्ध्यर्थ येथे आलो ॥१६०॥
शोधिता दक्षिण समुद्र समग्र । कोठे न भेटे सीता सुंदर ।
लोटली श्रीरामर्यादामेर । मरणीं तत्पर यालागी ॥१६१॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । संपाती जाला हास्यवदन ।
मज आहे सीतेचे ज्ञान । सावधान अवधारा ॥१६२॥
सिंधुमर्यादा शतयोजन । तेथे आहे लंकाभुवन ।
त्यामाजी आहे अशोकवन । सीता चिद्रत्न तेथे वसे ॥१६३॥
मज असती पक्षगती । तरी आणितों सीता सती ।
ऐसे बोलता संपातीसी । पक्षप्राप्ती पावला ॥१६४॥
सूर्यवरद संपातीसी । भेटलिया श्रीरामभक्तांसी ।
निर्विकल्प पक्ष पावसी । सीताशुद्धीसी सांगता ॥१६५॥
निर्विकल्प पक्षप्राप्ती । सांडोनि त्रिगुण गुणवृत्ती ।
संपाती पावला गुणातींतीं । पुनरावृत्ती खंडली ॥१६६॥
श्रीरामभक्तांसी संगती । उद्धरले नेणो किती ।
आतांचि उद्धरला संपाती । धन्य संगती संतांची ॥१६७॥
सिंधुमर्यादा शतयोजन । वानरा न करवे उल्लंघन ।
एके उड्डाणे पै जाण । गेला आपण हनुमंत ॥१६८॥
स्वये उडतां बळेचिकरीं । गिरि कडे खचलें सागरी ।
शिखरें उडविली अंबरीं । आपांपरी पशुपक्षियां ॥१६९॥
आम्ही वानर बलवंत । दक्षिणे राहता होईल अनर्थ ।
उत्तरभागीं ठेवी हनुमंत । धरोनि पर्वत राहिलो ॥१७०॥
हनुमंत उडतां बळेंकरीं । कडे खचले सागरी ।
जळ उसळलें अंबरीं । आपांपरीं विमानां ॥१७१॥
श्रीरामबाणाचिया गती । सवेग गेला पै मारूती ।
जे जे लंकेसी केली ख्याती । ते ते रघुपति पुसावे ॥१७२॥
ऐसे अंगद सांगत । सुखावला श्रीरघुनाथ ।
त्यासी धरोनि ह्रदयांत । स्वये हनुमंत पाचारी ॥१७३॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतप्रताप संपूर्ण ।
ब्रह्मलिखित अनुसंधान । गोड गहन श्रोत्यांसी ॥१७४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
अंगद श्रीरामसंवादो नाम पंचविंशतितमोऽध्यायः ॥२५॥
॥ ओव्या १७४ ॥ श्लोक ८ ॥ एवं संख्या १८२ ॥
