ऐसे ऐकोनी नामा विचार
917.
ऐसे ऐकोनी नामा विचारी मानसी | काय द्यावे यासी प्रतिवचन ॥१॥
विठोबाचे पाय आठविले मनी | बोले अमृतवचनी तयाप्रति ॥२॥
सर्व सुख मज आहे पांडुरंगी | जावे कवणा लागी कोण्या तीर्था ॥३॥
आहिक्य परत्री मज चाड नाही सर्वथा | न लागती पुरुषार्था मुक्ति चारी ॥४॥
रंक होऊनिया पंढरी चोहटा | राखेन दारवंटा महाद्वारी ॥५॥
या सुखाकारणे शरीर कर्वती फाडीले | दुर्जय तोडिले मायाजाळ ॥६॥
त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी | जालोसे भिकारी पंढरीचा ॥७॥
कल्पतरूची छाया कामधेनूचे दुभते | संपूर्ण आईते सर्वकाम ॥८॥
विठोबाचे पायी मज काय उणे | परि वासनाचि मने गिळीली माझी ॥९॥
जन्मोनि पाळीलो पोशिलो जयाचा | विकिलो कायावाचामने त्यासी ॥१०॥
नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा | आज्ञा देईल शिरसा धरीन त्याची ॥११॥
