काय तुज मागे नाही जा
2731.
काय तुज मागे नाही जाणवले । माझे नाही केले हित काही ॥१॥
डोळे झाकुनिया होसी अबोलणा । तेव्हा नारायणा आता कैसा ॥धृपद॥
न कळे उचित न संगता स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥
तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा । तरि का आधी देवा वारू नये ॥३॥
अर्थ :
देवा तुला माझ्या दु:खाची जाणीव झाली नाही काय आणि झाली असेल तर माझे हित अजून तू काहीच केले नाहीस ? हे नारायणा अरे तू असा डोळे झाकून अबोलपणा म्हणजे गप्प का बसला आहेस तू पूर्वी कसा भक्तांचा उध्दार करण्यासाठी तत्पर होता परंतू आता कसा झाला आहेस. देवा तुला काहीही स्पष्ट सांगितल्याशिवाय समजत नाही असा तू क्रियानिष्ठ आहे हे आम्हाला माहित नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा घात होणार आहे हे तर तुम्हाला आधीच माहित होते तर मग तुम्ही आधीच ते नाहीसे का नाही केले ?
