नये ऐसे बोलो कठिण उत
2732.
नये ऐसे बोलो कठिण उत्तरे । सलगी लेंकुरे केली पुढे ॥१॥
अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया ॥धृपद॥
धरू धावे आगी पोळले ते नेणे । ओढिलिया होणे माते बाळा ॥२॥
तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशी असा तुम्ही ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही लेकरांनी तुझ्याशी सलगीने येऊन बोलावे आणि त्यामुळे तू आमच्याशी कठोर शब्दात बोलू नये. देवा आमच्याकडून काही अपराध घडला असेल तर आम्हाला तुम्ही क्षमा करा आणि जे उत्तम हिताचे आहे तेच तुम्ही आम्हाला शिकवा. देवा लहान मूल विस्तवाला धरु पाहते परंतू ते हातात धरल्यानंतर पोळेल हे त्याल माहित नसते ते धरायला गेले की त्याची आई त्याला मागे ओढते परंतू त्या कारणाने ते बाळ चिडून त्या मातेला मारते परंतू त्या बाळकाने मारले तरी त्याचे अपराध माता क्षमाच करते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने ज्याला जन्म दिला त्याचा भार जन्मदात्यावर असतो ही गोष्ट समजून घेण्याविषयी तुम्ही फारच चतुर आहात.
