वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ७. सुवेल पर्वतावर मुक्काम

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088176 · अभंग क्र. ७

7.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सातवा ॥
अंगदाकडून रावणाची निंदा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण :

अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला तो लंकेसी ।
प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासी ते ऐका ॥१॥

सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीमद्रावणमंदिरम् ।
ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैःसह ॥१॥
ततस्तस्याविदूरेण निपत्य हरिपुंगवः ॥२॥

सभासद व रावणावर त्याचा परिणामः

रावणसभेपुढें जाण । आले अंगदाचे उड्डाण ।
तेणे दचकला दशानन । कंपायमान भयभीत ॥२॥
पडता अंगदाची उडी । लंका अत्यंत हडबडी ।
दडाल्या वीरांचिया कोडी । जालीं बापुडीं राक्षसें ॥३॥
कराव्या अवघ्यांचा घात । पुढतीं आला रे हनुमंत ।
ऐसा वळसा लंकेआंत । अति आकांत राक्षसा ॥४॥
कपिभये भयभीत । रावणसभा पै समस्त ।
जैसे चित्रींचें लिखित । तैसे तटस्थ अवघेही ॥५॥
अंगदेसीं स्वये संमुख । बोलो न शके दशमुख ।
आणीक कोण बोले मशक । टकमक पाहती राक्षस ॥६॥
होता अंगदाचे आगमन । राक्षसा पाडिलें महामौन ।
चाकाटला दशानन । ते देखोन कपिबोले ॥७॥
मी तंव सभेचा अतीत । कोणी पुसेना स्वागत ।
भयभ्रमें अति भ्रांत । निजनिश्चित महामूर्ख ॥८॥
तुम्हा अवघ्यांसीं पडिले मौन । त्याही मौनाचें कारण ।
ते म्या लक्षिलें संपूर्ण । सावधान अवधारा ॥९॥

अंगद त्याचे कारण सांगतो :

वानरांच्या निजदळीं । श्रीराम आला आतुर्बळी ।
तेणे तुम्हा दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥१०॥
अचुकसंधानी रघुनाथ । देखोनिया छत्रपात ।
वेडावला लंकानाथ । युक्तायुक्त विसरला ॥११॥
येता देखोनि रघुनंदन । राक्षससभा आणि ।
प्रधान अवघ्या पडले महामौन । वचनावचन खुंटले ॥१२॥
असो ही श्रीरामाची ख्याती । तुम्हांसी गांगिलें मारुती ।
खुंटली हनुमंते वचनोक्ती । तेही उपपत्ती अवधारा ॥१३॥

हनुमंताच्या पराक्रमाचा प्रताप :

हनुमान अशोक वनी बळी । केली राक्षसा रवंदळी ।
तेणे तुम्हा दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥१४॥
हनुमान पुच्छाच्या निजज्वाळीं । लंका करिता पै होळी ।
तेणे बैसली दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥१५॥
अचुकसंधानी रघुनाथ बळी । कपिपुच्छाच्या निजज्वाळीं ।
केली राक्षसा रवंदळी । वचनावळी खुंटली ॥१६॥
रावणे फुकितां अग्निज्वाळी । खांडमिशां जाहली होळी ।
तेणे बैसली दांतखिळी । वचनावळी खुंटली ॥१७॥
हनुमंते राक्षसांस । रणी दिधला अति त्रास ।
तेणे वाचा पडली ओस । कोणी कोणास पुसेना ॥१८॥
लंकेसी भोवडोनि आवर्त । आतुर्बळी हनुमंत ।
कैसा असे रामकटकांत । कपिवृत्तांत अवधारा ॥१९॥

यो युष्माकमदीदहत्पुरमिदं योऽदीदलत्काननं
योऽक्षं वीरममीमरद्रिरिगुहां यौऽबीभरद्राक्षसान् ।
सोऽस्माकं कटके कदाचिदपि नो र्वरिषु संभाव्यते
दूतत्वेन इतस्ततः प्रतिदिनं संप्रेष्यते सांप्रतम् ॥३॥

जो का अशोकवनाआंत । वने उपाडी हनुमंत ।
करोनि अखयाचा घात । केला निःपात राक्षसा ॥२०॥
वनकर किंकर प्रधानपुत्र । हेही मारिले समग्र ।
गांगोनि इंद्रजित ज्येष्ठ कुमर । सैन्यसंभार निर्दाळिला ॥२१॥
रावण अपमानोनियां भारी । जाळोनिया लंकापुरी ।
मारोनियां राक्षसहारी । लंकागिरिदरी पूर्ण केली ॥२२॥
राक्षसदातांच्या राशी थोरी । हनुमान मोजी कुडवेंवरी ।
तो श्रीराम कटकामाझारी । महावीरी गणिजेना ॥२३॥
सांपेंसांपे पै देख । चिट्टीपत्रांचे पायिक ।
लंके धाडिले ते एक रंक । अति मशक हनुमंत ॥२४॥

रावणाची दुरुक्ती :

करावया अंगदाचें छळण । दुरुक्तिबोलाचें विंदान ।
स्वये अनुवादे रावण । सावधान अवधारा ॥२५॥
सांडूनि दुर्गद्वारभूमी । तू आलासी अमार्गगामी ।
यालागी तुजसी न बोलों आम्ही । मौनानुक्रमीं राहिलों ॥२६॥
अमार्गगाम्यासी संभाषण । हे तव आम्हांसी अति दूषण ।
ऐकोनि रावणाचे वचन । हास्यवदन अंगद ॥२७॥

श्लोकार्ध – सपश्यति परं दोषमात्मदोषं न पश्यति ॥४॥

अंगदाची प्रतिक्रिया, रावणाचा उपहास व बळाचा अविष्कार :

रावणा ऐक सावधान । देखती पुढिलांचे अवगुण ।
आपुलें न देखती दूषण । रासभ पूर्ण ते एक ॥२८॥
पुच्छ रासभाचे ठायी । हे तंव लांडे गधडे पाही ।
स्वधर्मविवेक ज्या नाही । ते तर भुई भारभूत ॥२९॥
वानरा आकाशगमन । हे तव आमुचे स्वधर्माचरण ।
स्वधर्मा लाविजे जे दुषण । शूकर श्वान तो एक ॥३०॥
मुख्य अधर्म तस्करपण । तेही परदारहरण ।
खतेला पापी तू रावण । काळे वदन तिही लोकी ॥३१॥
वेदबाह्य तू एक जाण । स्वधर्मकर्मीं तुज दुषण ।
महापापी तू रावण । काळे वदन तिही लोकी ॥३२॥
निकट देखोनि रावण । त्याचे करावया निर्दळण ।
आले अंगदासी स्फुरण । रोम संपूर्ण थरकती ॥३३॥
रावण मारीन मारिलिया ठायी । अवघी खंडली शिष्टाई ।
म्हणोनि सरसावला पाही । आठव कांही नाठवे ॥३४॥
अंगद खवळला देखोन ।चळीं कांपे दशानन ।
राक्षस कांपती प्रधान । दुसरे विघ्न हे आले ॥३५॥
पहिला करोनि गेला होळी । दुसरा आला त्याहूनि बळी ।
राक्षस कांपती चळाचळीं । आतुर्बळी वानर ॥३६॥
लंका निरोधी श्रीरघुनाथ । निःशंक एकला रामदूत ।
आम्हांसी करु आला अंत । चळीं कांपत राक्षस ॥३७॥
अंगदाचें दृष्टीकडे । पाहता रावण जाले वेडे ।
राक्षससैन्य ते बापुडे । येर दडे येरामागें ॥३८॥
रावणहंता श्रीरघुनाथ । यालागी न मारीच हनुमंत ।
मूर्खपणे मी उन्मत्त । लंकानाथ मारुं पाहे ॥३९॥
करिता श्रीरामनामस्मरण । समूळ पळे मूर्खपण ।
क्रोधानुवृत्तीं गिळोनि जाण । सावधान पै जाला ॥४०॥
स्वमुखें बोलिला रघुपती । अंगदाअंगीं शौर्य शांती ।
गिळोनियां क्रोधनुवृत्ती । सभेप्रति बैसला ॥४१॥

तस्य वेदवसुयोजनमानं भद्रपीठमुदवेक्ष्य सुंदरम् ।
वायुसूनुरिव पुच्छचिवृद्धिर्यातुधानसममाशु ववर्ध ॥५॥

पुच्छाचे आसनावर बैठक :

चौ‍‍र्‍यायसी संख्या योजन । उंच रावणसिंहासन ।
अंगदही तत्समान । घाली आसन ते एका ॥४२॥
जेंवी लंकादहनहेत । पुच्छ वाढवी हनुमंत ।
रावणासम आसनार्थ । पुच्छ पुरुषार्थी अंगद ॥४३॥
पुच्छ वाढवोनियां जाण । त्याचे वेळोनि पुच्छसन ।
अंगद बैसला आपण । समसमान दशमुखा ॥४४॥
दशमुखेंसीं संमुख । अंगद बैसला निःशंक ।
रावणा लागली टकमक । अति साशंक राक्षस ॥४५॥
अंगदा येथोनि परता सर । ऐसे म्हणावया दशशिर ।
न संभवे पै उत्तर । ऐसा अत्युग्र कपि भासे ॥४६॥
रावणासंमुख सिंहासनी । अंगद बैसोनि पुच्छासनीं ।
वाकुंल्या दावी फळे खाऊनी । मिचकावूनी नयनातें ॥४७॥
अंगद श्रीरामाचा दूत । एकला आलासे सभेआंत ।
तेणे राक्षसा आकांत । भयाकुळित रावण ॥४८॥

रावणाच्या प्रश्नाला अंगदाचे उत्तर :

अंगद बैसला देखोन । हळूच पुसे दशानन ।
हनुमान नव्हेसी तरी तू कोण । आगमन किमर्थ ॥४९॥
ऐसे पुसतां लंकानाथ । अंगद आपुला वृत्तांत ।
स्वये असे पै सांगत । श्रीरघुनाथ स्मरोनी ॥५०॥

दूतोऽहं कोशलेंद्रस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
वालिपुत्रोंऽगदो नाम यदि ते श्रोत्रमागतः॥६॥

अंगदाची दूताची भूमिका :

ज्याचा निर्दुष्ट पुरुषार्थ । जेणे खरदूषणा केला घात ।
त्या श्रीरामाचा मी दूत । वाळिसुत अंगद ॥५१॥
मारीच मारिला वनाआंत । ज्या संमुख न ये लंकानाथ ।
त्या श्रीरामाचा मी दूत । वाळिसुत अंगद ॥५२॥
कौसल्योदरपंचानन । कौसल्यानंदवर्धन ।
त्या श्रीरामाचा दूत मी जाण । वाळिनंदन अंगद ॥५३॥
देवा वाळी दैत्या वाळीं । सुरा असुरां दानवां वाळी ।
त्या वाळीचा अंगद बळी । आलो तुजजवळी ते ऐक ॥५४॥
रावणा सुनी काखेतळीं । सप्तसमुद्रीं केली आंघोळीं ।
त्या वाळीचा पुत्र अंगद बळी । रामे तुजजवळी धाडिलें ॥५५॥
दुंदुभी मारिला किष्किंधेजवळी । तत्पुत्र मारिला विवरसमेळीं ।
त्या वाळीचा पुत्र मी अंगद बळी । रामे तुजजवळी धाडिलें ॥५६॥
सहा मास निराहारी निरुदक । विवरी मारिले दैत्य अनेक ।
त्या वाळीचा मी अंगद देख । रामे आवश्यक मज धाडिले ॥५७॥
सीता देवोनि शरणागत । जाहल्या वांचेल लंकानाथ ।
येरव्ही त्याचा करीन घात । ऐसे रघुनाथ बोलिला ॥५८॥

रावणाची दुष्ट वाणी :

छळावया अंगदोक्ती । क्षोभे बोले लंकापती ।
रावणाच्या छळणोक्ती । अति व्युत्पत्ती अवधारा ॥५९॥

रे रे अंगद सांप्रतं तव पिता रामेण हत्वा स्वयं
सत्यं ते मम नारदेन कथितं तारार्पिता सुग्रीवे ।
दूतत्वेन कथं न लज्जसि कपे रामस्य लोकस्य
वा भूभार शृणु जीवनं कपिकुले साधर्म्यनष्टाधम ॥७॥

धिग् धिग् अंगदा तुझा पुरुषार्थ । धिग् धिग् अंगदा तुझा बळार्थ ।
जेणे पित्याचा केला घात । त्याचा दूत म्हणविसी ॥६०॥
संमुख संग्रामी न करी घात । ठकून मारिला युद्धाआंत ।
ऐसा नष्ट श्रीरघुनाथ । त्याचा दूत म्हणविसी ॥६१॥
आणिक एक अभिनव कहाणी । नारदे सांगितले मजलागूनी ।
रामे हिरोनि तुझी जननी । केली निजपत्‍नी सुग्रीवा ॥६२॥
ठकवोनि केला पित्याचा घात । मातेसी आणिक योजिला कांत ।
ऐसा नष्ट श्रीरघुनाथ । त्याचा दूत म्हणविसी ॥६३॥
अंगदा तू निर्लज्ज मूर्तिमंत । आमचेही सभेआंत ।
न लाजसी म्हणवितां रामदूत । धिक् पुरुषार्थ अंगदा ॥६४॥
पोटी पुत्र व्हावा रुढ । तेणे घ्यावा पित्याचा सूड ।
तू तंव जन्मलासि दगड । वृथा माकड श्लाघसी ॥६५॥
अंगदासारिखा निलाजिरा । पाहता न दिसे दुसरा ।
काय मुख दाविसी वानरा । रिघोनि सागरां जीव देई ॥६६॥
नातरी करी आड विहिरी । का पोटी घालीं सुरी ।
जळो तुझी वाढीव थोरी । निंद्य संसारी तू एक ॥६७॥

भेदनीतीचा अवलंब :

छळणा बोले लंकानाथ । अंगदा तू सभाग्यवंत ।
मज रावणासी जाहल्या शरणागत । अभयहस्त तुज माझा ॥६८॥
साधावया पितृकार्यार्थ । मिथ्या म्हणविसी रामदूत ।
हाही कळला तुझा वृत्तांत । शरणागत तू माझा ॥६९॥
सूड घ्यावा पिता वाळी । शरण आलासी मजजवळी ।
मी रावण आतुर्बळी । तुज तत्काळी कुढावीत ॥७०॥
मारोनि श्रीराम लक्ष्मण । करोनि रणकंदन ।
अंगदा देईन किष्किंधाभुवन । सत्य वरदान हे माझे ॥७१॥

त्यावर अंगदाची प्रतिक्रिया :

ऐसे बोलता दशानन । अंगद झाला हास्यवदन ।
कैंसें देतो प्रतिवचन । सावधान अवधारा ॥७२॥
स्वयंवरी धनुष्यी वाहता गुण । सभे पडलासी उलथून ।
तुझ्या अंगी नपुंसकपण । केंवी म्या शरण रिघावे ॥७३॥
स्वयंवरीं श्रीरामे आपण । करिता त्र्यंबक भंजन ।
रावणाचे काळे वदन । तुज म्या शरण केंवी यावे ॥७४॥
संमुख न येववे रघुनाथा । मारीचा देवोनि मरणार्था ।
सीता चोरोनि होसी पळता । शरणागता कोण न राखे ॥७५॥
नपुंसक हीन दीन रावण । त्या तुज मी केंवी रिघावे शरण ।
उलटें हाणिता चडकाण । धाकेंचि प्राण सांडिसी ॥७६॥
म्हणोनि उचलितां हात । गजबजिला लंकानाथ ।
अंगदे कोप करोनि शांत । अनुवादत रामाज्ञा ॥७७॥

रावणाच्या यापूर्वी झालेल्या अपमानित अवस्थांचा झाडा अंगद क्रमाने घेतो :

बहुत ऐकिले रावण । त्यांमाजील तू कोण ।
विविध रावणांचें लक्षण । वदे विचक्षण अंगद ॥७८॥
एका रावणाची थोरी । सहस्रार्जुनासी युद्ध करी ।
तेणे कवळोनि वामकरीं । क्षणामाझारीं धरियेला ॥७९॥

सहस्रार्जुनाकडून रावणाची शोभा :

सहस्रार्जुन कृपावंत । रावण हीन दीन अशक्त ।
नगरोद्वंधें संरक्षित । कारागृहांत न घालीच ॥८०॥
दुर्गद्वारपाळ पाचारुन । स्वमुखे सांगे सहस्रार्जुन ।
दहा मुखांचा रावण । बाहेर आपण जाऊ नेदीं ॥८१॥
नगरदुर्गोद्वंधन । पायी शृंगखलाबंधन ।
यापरी राखोनि रावण । वाहवी जीवन रेवेचें ॥८२॥
रावणाच्या दाह शिरी । देवोनियां दहा घागरी ।
जळ वाहे निरंतरी । घरोघरी उदकार्थ ॥८३॥
राजगृहींचें जे भाते । खावय न पुरें रावणातें ।
दहाही मुखें समसमितें । केले तेथे ते एका ॥८४॥
बैसोनियां जांत्यावरी । गीत गाय दहाही स्वरीं ।
कणी कचरडा झाल्यावरी । दहाही शिरी देती टोले ॥८५॥
कुटका भाकरी हाता येत । रावण धापसे तेथे नाचत ।
इफिइफि पिंगा गात । मागे भात घरोघरी ॥८६॥
दाही मुखें दोहरे गात । वीसही नाचवी हात ।
थै थै थैकार दावित । चणे मागत पसारा ॥८७॥
ताक मागावयालागूनी । श्वानवाणी रासभवाणी ।
रावण भुंके दहाही वदनी । दावी रडणी श्वानाची ॥८८॥
सहस्रार्जुने कानडदेवतेसी । राखण ठेविले नगरासीं ।
तिचे रक्षण चौपासी । अहर्निशी सावध ॥८९॥
रावण पळतां आकाशगतीं । कानडदेवता रक्षणस्थिती ।
वेताटी माथा वाजती । पडे क्षिती मूर्च्छित ॥९०॥
ऐसा सहा महिनेवरी । निर्गम न पुरेचि ते नगरी ।
नेसणे फाटल्या उघड्या टिरी । उवा लिखा शिरी बुचबुचित ॥९१॥
तेथे पौलस्ति पुत्रस्नेहेंसीं । येवोनि सहस्रार्जुनापासीं ।
मुक्त करवी रावणासी । तंव तो त्यासी नाठवे ॥९२॥
पौलस्तीस पाठवी कारागृहांत । देखे दशमुख असंख्यात ।
तेणे पौलस्ति अति विस्मित । रावण तेथ असेना ॥९३॥
तंव रावणशिरीं घागरी । थै थै नाचे नानापरी ।
चण्यावारीं घरोघरी । देखोनि दुरी पौलस्ति ॥९४॥
रावण धरोनिया हाती । पौलस्ति नेतां लंकाप्रती ।
द्वारपाळीं केली विनंती । नव्हे निर्गति अचिन्हीं ॥९५॥
पौलस्ति पुसे चिन्हसंज्ञा । काळे करोनिया वदना ।
नाकीं लाविलिया चुना । उद्वधना निर्मुक्ति ॥९६॥
राजमुद्रा घेवोनि करी । शिघ्र आलिया नगरद्वारीं ।
सुखरुप निगमाची थोरी । जाण निर्धारी ऋषिवर्या ॥९७॥
पौलस्ति आणू गेला सुद्रेसी । रावणे मसी लावोनि मुखासी ।
चुना लावोनियां नाकासी । केला द्वारेसीं निर्गम ॥९८॥
सावध ऐके लंकापती । ऐसी एक्या रावणाची गती ।
ऐक दुजियाची स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥९९॥

बळीच्या राज्यात रावणाची दुर्दशा :

दुजा रावण उन्मादबळी । सवेग रिघोनि सुतळीं ।
रणी जिणावया बळी । क्रोधानळी चालिला ॥१००॥
बळिद्वारी द्वारपाळ वामन । तेणे जावों दिधला रावण ।
बळीपुढें दशकंठ तृण । लज्जायमान राहिला ॥१॥
बळि आणि विंध्यावळी । सारिपाट खेळती सुखसमेळी ।
रावण आलिया जवळी । मशकसमेळीं । लक्षेना ॥२॥
रावण दशमुखीं किडे । किंवा आलेंसे घुंगरडें ।
हे न दिसे बळीपुढें । खेळाकडे विगुंतला ॥३॥
बळि तृणप्राय न गणी । कळलें रावणा मनी ।
त्यासी मारावें सिंतरुनी । आवांका धरोनी उभा असे ॥४॥
सारीपाट खेळतां आवेशा । हातींचा गळोनि पडिला फांसा ।
दे दे म्हणता लंकेशा । त्यासी तो सहसा उचलेना ॥५॥
एके हाती दोही हाती । चहू हाती दहाही हाती ।
वामनें आकर्षिली शक्ती । विसां हाती उचलेना ॥६॥
उचलू जाता लज्जामेळीं । फांसा आदळला कपाळीं ।
देवोनि आक्रंदे आरोळी । पडिला तळी मूर्च्छित ॥७॥
रावण पडतांचि भूतळीं । दहाही मुखी भरली धुळी ।
देखोनि हांसे विध्यावळी । पिटिली टाळी सेवकी ॥८॥
रावण पडता मुर्च्छित । कपाळीं अशुद्ध प्रवाहत ।
तेणे तो दिसताहे आरक्त । जैसे का प्रेत अहेवेचें ॥९॥
दहाही शिरें वीस हात । करंटें होणें आणिले येथ ।
याचे पडो नये रक्त । काढा म्हणे विंध्यावळी ॥११०॥
येवोनि बळीचे सेवक । अलंकार एक एक ।
वस्त्रे वस्त्रे हिरोनि देख । नेला दशमुख अति दूरी ॥११॥
अति बळेंसी कुंथत । युद्धा आला लंकानाथ ।
त्याचा निवडला पुरुषार्थ । विटंबनार्थ तो ऐका ॥१२॥
आगें लंड पिछे गांड । सेवकी केले भंडोभंड ।
रावणाचे काळे तोंड । लज्जावितंड तेणे त्यासी ॥१३॥
रावण राजा अति समर्थ । न्हावी न मिळेचि तेथ ।
केश लांब दहा हात । असे दावीत जगासी ॥१४॥
आशीर्वाद दिधला ऋषीं । केशवृद्धि जाली त्यांसी ।
जो तो रावण उपहासी । उकासाबुकसीं स्फुंदत ॥१५॥

रावणाला त्रस्त करण्यासाठी वामन प्रयत्‍नशील :

रावणाच्या निजमूळी । वामन लागला समूळी ।
तेणीं मेळविला धुळी । केली रांगोळी गर्वाची ॥१६॥
लज्जान्वित दशानन । जाऊ पाहे जीव निघोन ।
वामनें राखिलासे कोंडोन । द्वार धरोन बैसला ॥१७॥
रावण म्हणे वामनासी । तू का आता द्वंद्वा चाळिसी ।
स्फुंदस्फुंदोन रडे उकसाबुकसीं । सोडी आम्हांसी जाऊ दे ॥१८॥
वामन म्हणे मी बळीचा सेवक । राजाज्ञेवांचून देख ।
जाऊ नेदीं राव रंक । व्रत निष्टंक हे माझे ॥१९॥
वामनाते चुकावून । खेचरगती दशानन ।
जाता गगनी देखे वामन । पळे परतोन भयभीत ॥१२०॥
पाताळगती करिता गमन । धरधरुनी आणी वामन ।
भयभीत दशानन । येत परतोन माघारा ॥२१॥
राक्षसा अदृश्यगतीं गमन । अदृश्यद्रष्टा वामन ।
त्याते देखोनि रावण । पळे आपण अति धाके ॥२२॥
पूर्वपश्चिमदक्षिणदिशीं । पळो जाता उत्तरेसी ।
वामन कोंदला । वामन कोंदला आकाशी । देखे दशदिशांसी वामन ॥२३॥
रावण चिंता करिता गहन । चिंतामूळी देखे वामन ।
दहाही मुखी शंखस्फुरण । करी रावण अति भयें ॥२४॥
वामनें परविली पाठी । खुंटली निर्गमाची गोष्टी ।
जाजावोनि दशकंठी । होवोनि हिंपुटी राहिला ॥२५॥
ठकवोनियां रघुपती । पुढे चोरील सीता सती ।
तणे रागे वामनमूर्तीं । परम आपत्ती भोगवी ॥२६॥
निर्गम न लभेचि दशानन । क्षुधेने पिडिला रावण ।
चणे मागावया जाण । गेला आपण अश्वशाळे ॥२७॥
अश्ववाहकांची कथा । जरी तू लीद वाहसी माथा ।
मूठ मूठ चणे देऊं आता । मानी क्षधार्त रावण ॥२८॥
जंव लागली नाही भूक । तंव राजा दशमुख ।
वामनें चेतविली अधिक । मागवी भीक उदरार्थ ॥२९॥
दशमुकुट लंकानाथा । लीद चढती तये माथा ।
पोट न भरे चणे खातां । दुःखावस्था तळमळी ॥१३०॥
कांतन कोष्ट्यासी सांगे लंकानाथ । मज आहेत वीस हात ।
दहाही राहटीं कांतीन सूत । अन्न निश्चित मज द्यावे ॥३२॥
वाटूं जाता कापुसासी । रावण पडला तोंडघसी ।
सरक्या रिघता नासिकासी । अति लज्जेसीं सलज्ज ॥३२॥
कांताया बैसला लंकानाथ । वांकले स्वधर्माचे चात ।
तुटले सूक्ष्मत्वाचे सूत । फिसके कांत तडतडां ॥३३॥
म्हणती दशमुख खोटा । मोडिलें सत्कर्माचे रहाटा ।
पिजिला रु नाशिला सांटा । देती थापटा नरनारी ॥३४॥
नाशिला मुदलींचा सांठा । अवघे मोडिलें राहाटां ।
दशमुख पोटींचा खोटा । देती चापटा नरनारी ॥३५॥
उपाय येती अपायासी । नेणेंचि न मिळे खावयासी ।
वामने आपदा लाविली ऐसी । उकसाबुकसीं स्फुदत ॥३६॥
लंकापती दशमुखा । मागे पुढे लाविला सुडका ।
पोटेंवीण केला रोडका । वामनें देखा गांजिला ॥३७॥
पहिलें येता दशानन । वामन हीन दीन ।
आता त्याचा प्रताप गहन । तेणे त्रिभुवन व्यापिले ॥३८॥
रात्री पळतां रावण । अंधारी देखणा वामन ।
तेणे गांजिला दशानन । करी रुदन अति दुःखे ॥३९॥
सोडवावया रावणासी । पौलस्ति आला बळीपासीं ।
अति सन्मानें पूजोनि त्यासी । कार्यार्थासी बळि पुसे ॥१४०॥

पौलस्तिची मध्यस्थी :

पौलस्ति सांगे पै आपण । तुवा का रोखिला रावन ।
ऐकता ऋषिवचन । अति उद्विग्न बळि जाला ॥४१॥
बळीनें वाहिली आण । माझ्या राज्यामाजी जाण ।
रोगराईचें नाही बंधन । बंदिखान येथे कैंचें ॥४२॥
कोणे ठायी कोणे देशी । कोणे राखिलें रावणासी ।
शोधोनि आणा मजपासीं । सन्मानेंसीं सोडीन ॥४३॥
पौलस्ति स्वये पाहू जाता । लिदीच्या पाट्या दहाही माथा ।
पोट न भरे खणे खातां । भीक मागतां देखिला ॥४४॥
दहाही मुखी भुंके रावण । खंडेरायाचें होवोनि श्वान ।
हडहड करिता जन । लज्जयमान पौलस्ति ॥४५॥
भुंकिन्नला होवोनि श्वान । पौलस्ति देखता आपण ।
तेणे रावण लज्जायमान । अधोवदन राहिला ॥४६॥
पौलस्ति पुसे रावणासी । एवढ्या लावोनि आपदांसी ।
येथे का बळीने राखिलासी । अति लज्जेसीं सांगत ॥४७॥
वामनें घालोनि अटका । मागे पुढे लावोनि सुडका ।
क्षुधा तृषा केला रोडका । अति दुःखे देखा गांगिले ॥४८॥
वामनापासीं विद्या सकळ । वामनापुढें न चले बळ ।
म्यांही विद्या करिता प्रबळ । न चले छळ वामनासीं ॥४९॥
कार्य नाही बळीपासी । आज्ञा पुसिल्या वामनासीं ।
सुखेची आहे निर्गम आम्हांसी । पौलस्तिसी सांगितले ॥१५०॥
मग घेवोनिया पुत्रासी । पौलस्ति आला वामनापासीं ।
आज्ञा द्यावी रावणासी । निजनगरासी न्यावया ॥१५१॥
पौलस्ति येतांचि आपण । वामनें घातले लोटांगण ।
मस्तकी वंदोनियां चरन । धर्मवचन अनुवादे ॥५२॥
मी तंव बळीचा सेवक । द्वारपाळ प्रतिहारक ।
आज्ञेवेगळा एकाएक । राव रंक जाऊ नेदीं ॥५३॥
राजाज्ञा आणिलिया जाण । सुखेंचि मरावे गमन ।
नाही तरी केलिया चिन्ह । निर्गमन राजाज्ञा ॥५४॥

राजाज्ञा किंवा वामनाच्या अटी :

पौलिस्ता पुसे कैसे चिन्ह । वामन सांगे संतोषोन ।
दहाही मस्तकां वपन । आणि मुंडण खांडमिशां ॥५५॥
काळे करोनि दशवदन । दहाही नाकीं कवड्या बांधोन ।
वदनी श्वेत पीत लेखन । निर्गमन येचिं चिन्हीं ॥५६॥
पौलस्ति म्हणे रावणासी । जाऊ चाल बळीपासी ।
आज्ञा देईल सन्मानेंसीं । निजनगरासी जावया ॥५७॥
रावण म्हणे हेचिं बरवे । मान्य केले माझिया जीवे ।
परंतु बळीपासीं जावे । जीवे भावे मानेना ॥५८॥
मूर्च्छित पडिलो फासा देता । त्यापासी म्या मुख दाविता ।
लज्जा प्राण जाईल ताता । नये सर्वथा त्यापासी ॥५९॥

वामनाच्या अटी मान्य करुन सुटका :

युद्धा गेलों अति सत्राणे । त्या मज जाले लाजिरवाणे ।
येथेचि आता प्राण देणे । नाही येणे बळीपासीं ॥१६०॥
ऋषि म्हणे निषिद्ध राजपवन । येरु म्हणे कैचें राजलक्षण ।
सुडला लागला अति दीन । केल्या मुंडन भय काय ॥६१॥
जे जे होती बंदिनिर्मुक्त । त्यांसी पाहिजे प्रायश्चित्त ।
मज आजीच आला सिंहस्थ । निषिद्धार्थ न वदावा ॥६२॥
वामनापासून निर्मुक्ती । कदा नव्हे गा कल्पांती ।
माझेनि भाग्ये वपनोक्ती । बोलिला निगुतीं वामन ॥६३॥
ऐसे बोलोनि दशवदन । खांडमिशां मस्तकवपन ।
काळे करोनि वदनचिन्ह । आला आपण अति शिघ्र ॥६४॥
देखोनि रावणाचे चिन्ह । लाजविती सकळ जन ।
गोमयपिंडी अभिषिंचन । दिधला सोडून वामनें ॥६५॥
एका जनार्दना शरण । अंगद वक्ता विचक्षण ।
रावणातें निर्भर्त्सून । वदे आपण निःशंक ॥६६॥
पुढील प्रसंगीं रावणकथा । विचित्रवाणी अंगद वक्ता ।
अपूर्व अप्रमेय अभिनव वार्ता । द्यावे श्रोतां अवधान ॥६७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडें एकाकारटीकायां
अंगदरावणच्छलनं नाम सप्तमोऽध्यायः॥७॥
ओंव्या ॥१७६॥ श्लोक ॥७॥ एवं ॥१७४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग