वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ८६. भरताला अभिषेक

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088175 · अभंग क्र. ८६

86.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय शहाऐंशिवा ॥
भरताला अभिषेक -

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामे प्रार्थिता बहुत रीती । राज्य न घेचि ऊर्मिलापती ।
तेणे तटस्थ सुरपंक्ती । वानर चित्ती विस्मित ॥१॥

सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगम् ।
नियुज्यमाजो भुवि यौवराज्ये ततोऽभ्यषिंचत्‌भरतं महात्मा ॥१॥

यौवराज्यपद स्वीकारण्याची भरताला सर्वांची विनंती :

भरत शत्रुघ्न बिभीषण । सुग्रीवादि वानरगण ।
इंद्रब्रह्मादि सुरगण । प्रार्थितां लक्ष्मण राज्य न घे ॥२॥
वसिष्ठादि रघुपती । तिही प्रार्थिला बहुत रीती ।
राज्य न घे ऊर्मिलापती । विस्मित चित्ती सुरसिद्ध ॥३॥
तेणे काळे भरतासी । सकळीं प्राथिलें प्रीतीसी ।
सौमित्र न घे यौवराज्यासी । तू विनंतीसी अंगीकारीं ॥४॥

त्यामुळे रामभक्तीत अंतर पडेल म्हणून भरताचा नकार :

ऐकोनि सकळांचे वचन । भरत विवंची आपण ।
अति कुशल सुमित्रानंदन । राज्यग्रहण न करीचि ॥५॥
राज्यीं असता निमेषगती । अंध होवोनि ठाके वृत्ती ।
कैचा राम कोण भक्ती । उन्मत्त स्थिति राज्यमद ॥६॥
याचि कारणे लक्ष्मण । स्वये न घे अभिषिंचन ।
बाप सौमित्राचें ज्ञान । अनवच्छिन्न निर्लोभ ॥७॥
ऐसे विचारोनि मनांत । भरत राहिला तटस्थ ।
युक्ति खुंटल्या समस्त । निश्चितार्थ योजेना ॥८॥
कांही न देववे प्रत्युत्तर । निवांत राहिला भरतवीर ।
तेणे काळे रघुवीर । पाहे सत्वर सद्‌गुरूकडे ॥९॥

वसिष्ठांचा भरताला उपदेश :

जाणोनि श्रीरामाचे मनोज्ञ । सद्‌गुरु बोलती आपण ।
भरता ऐके सावधान । राज्यशासनकर्तव्यता ॥१०॥
जेणे कारणे तटस्थ । तू राहिलासि निवांत ।
ते सकळ मनोगत । आम्हा साद्यंत कळो आले ॥११॥
अंगीकारिता राज्यस्थिती । अंध होवोनि ठाके वृत्ती ।
सर्वथा नाठवे रघुपती । निमग्र वृत्ति मोहपंकी ॥१२॥
तेचिविशीं श्रीरामकृपा । सावध ऐके भरत बापा ।
श्रीरामनामेंचि पहा पा । भस्म पापाचें होय ॥१३॥
मोह निजपापाचें फळ । सेविता रघुकुळपाळ ।
केंवी राहती पापमळ । नामेंचि केवळ भस्म होती ॥१४॥
ज्याचेनि नामे पाप पळे । त्याचेनि भजनें वृत्ति मळे ।
ऐसे न मानावे राउळें । निजभजनबळें उद्धरी ॥१५॥
निजभजनाचिया प्रीती । भक्त उद्धरी रघुपती ।
तेच श्रीरामाची वचनोक्ती । सावध चित्ती परियेसीं ॥१६॥

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्‌व्यपाश्रय: ।
मत्प्रसादादवाप्तोति शाश्वतं पदमव्यमू ॥२॥

रामभक्ताला विषयाधा होत नाही असे वसिष्ठांनी भरताला सांगितले :

श्रीरामाचे वचन । भक्ताप्रति सनातन ।
भरता ऐके सावधान । अति गहन निजनिष्ठा ॥१७॥
माझ्या ठायी ठेउनी मन । सर्वकर्मी वर्तता जाण ।
माझे स्वरूप सनातन । न लागता क्षण तेथे पावे ॥१८॥
स्वधर्माच्या चोखाळीं । सर्वात्मक मूर्ति भली ।
निजप्रीतीच्या कल्लोळी । सर्व काळी पूजित ॥१९॥
जेवढी माझी व्याप्ती । तेवढी करोनि चित्तवृत्ती ।
नित्य नवी चढती प्रीती । माते भजती मी होउनी ॥२०॥
माझा आश्रयो मी होऊन । ऐक तयाचे लक्षण ।
सांडोनिया आपुलेपण । आश्रय कवण जळा जेंवी ॥२१॥
का सर्वत्र प्रभंजन । गगनी विचरे आपण ।
भागोनि जेथे होय लीन । गगनी गगन होवोनियां ॥२२॥
तैसा कार्ये मनें वाचा । माझ्या निजात्मस्वरूपाचा ।
निश्चयो करोनि साचा । मद्‌भजनाचा आदर ॥२३॥
तो मज आंतबाहेरी । मी तया सबाह्मभ्यंतरी ।
त्यासीही गत्यंतराची परी । बोलता निर्धारी जीभ तुटे ॥२४॥
त्यासी बाध्यबाधकसंबंध । कैचा विधि कैंचा निषेध ।
सबाह्य सच्चिदानंद । स्वरूप शुद्ध स्वये होती ॥२५॥
ऐसे मी होवोनि माते भजती । ते देहांतीं माते पावती ।
इतका विलंब कोणाप्रती । मुळीच असती मद्‌रूप ॥२६॥
तो आमुचे देवतार्चन । आम्ही त्याचे करू पूजन ।
तो आमुचे ध्येय पूर्ण । करू ध्यान आम्ही त्याचे ॥२७॥
ऐसा निजभक्ता रघुनाथ । सर्व कर्मी संरक्षित ।
तुज भय काय येथ । आज्ञा निश्चित अंगीकारीं ॥२८॥

श्रीरामांचे मनोगत वसिष्ठमुखाने ऐकल्यावर भरताची अनुमती, भरताचा अभिषेक सोहळा :

ऐसे श्रीरामाचे मनोज्ञ । सद्‌गुरुमुखें निरूपण ।
भरत जाणोनी संपूर्ण । मस्तकी वचनार्थ वंदिला ॥२९॥
जैसा श्रीराम अभिषेक । त्याहूनि भरता केला विशेख ।
अभिषेकिता रघुकुळटिळक । अलोलिक निजसोहळा ॥३०॥
सुमनें चंदनें गंधार्चनें । टिळेमाळा विचित्रभरणे ।
चिदंबराचीं प्रावरणें । अलंकार चिद्रत्‍ने जडित ॥३१॥
भावार्थाचें सिंहासन । चैतन्य मृदोलिया सुलक्षण ।
आनंदाचे वोठांगण । भरता रघुनंदन अर्पित ॥३२॥
सिंहासनी अति सत्वर । भरता बैसवी श्रीरामचंद्र ।
तन्मयाचे धरी छत्र । व्यजन चामर बोधाचे ॥३३॥
चिद्‌रत्‍नांची नित्य दीप्ती । भरता उदयप्रकाशस्थिती ।
स्वये अर्पिली रघुपती । अगाध स्थिति भाग्याची ॥३४॥
सच्चिदानंद पदें तिन्ही । भरतीं सांडिली निंबलोणीं ।
तेही विषींची विनवणी । सावधानीं अवधारा ॥३५॥
असताचे निराकरणें । निजवस्तुसी सत् म्हणणे ।
जडाच्या विवंचनें । चिद् म्हणणे वस्तुतें ॥३६॥
सुखाची करिता व्यावृती । आनंदमय वस्तुसी म्हणती ।
एवं त्रिपदाची स्थिती । अपवादभ्रांती वस्तूची ॥३७॥
त्रिगुण त्रिमात्रातीत पर । त्रिपदें निरसोनि साचार ।
अभिषेकिला भरतवीर । कृपा अपार भक्ताची ॥३८॥
ऐसे अभिषेकिता भरता । कार्यकारणकर्तव्यता ।
जितुकी श्रीरामाची सत्ता । आली हाता भरताच्या ॥३९॥
न सांगता रघुनंदन । राज्यभारकार्यकारण ।
भरत संपादी संपूर्ण । नित्य सावधान श्रीरामी ॥४०॥
ऐसा श्रीरामे अभिषेकिता । मंत्रस्वरमंत्राक्षता ।
ऋषीं अभिषेकिले भरता । विबुधी तत्वता सुमनाभिषेक ॥४१॥
त्राहाटिल्या सुरदुंदुभी । जयजयकार झाला नभी ।
सिद्ध नाचती निजवालभीं । पद्यनाभीं निजराज्य ॥४२॥
श्रीराम देव भरत भक्त । दोनी अभिषेकांची मात ।
अति अद्‌भुत चरितार्थ । त्रैलोक्यांत उत्सावो ॥४३॥
जयजयकार सिद्धांचा । दुंदुभिनाद विबुधांचा ।
मंत्रोच्चार द्विजांचा । धन्य भाग्याचा वीर भरत ॥४४॥
भुभुःकार वानरांचा । नादस्वर गंधर्वांचा ।
नृत्यगजर अप्परांचा । श्रीरामाच्या निजराज्यीं ॥४५॥
देवभक्तांच्या अभिषेकीं । सुर सिद्ध नागलोकी ।
आनंदमय त्रिलोकी । सत्यलोकी आनंद ॥४६॥

श्रीरामप्रतापप्रौढी :

रामनामाच्या निजगजरीं । नाद कोंदला अंबरीं ।
कैलासीं सत्यलोकवरी । वैकुंठावरी नाद भरला ॥४७॥
ब्रह्मांडी नाद भरला पूर्ण । नादे भरले आवरण ।
चालिले स्वानंदजीवन । अभिषेक पूर्ण तेणे केला ॥४८॥
श्रीराम स्वानंदाची मूर्ती । स्वानंदाभिषेक रघुपती ।
स्वानंदमय त्रिजगती । श्रीरघुपतिनिजराज्यें ॥४९॥
दुरात्मा अहंरावण । बंदीं घातले सुरगण ।
तो एकचि बाणे निर्दाळून । सुरगण सोडविले ॥५०॥
तेणे आनंदे पूर्ण भरित । श्रीरामाभिषेका त्वरित ।
विबुध आले धांवत । स्वस्थानी रघुनाथ त्यांसी धाडी ॥५१॥
अहंरावणबंदीतून । रामे सोडविले सुरगण ।
स्वपदीं स्थापिले संपूर्ण । ऐका लक्षण तयाचे ॥५२॥
ब्रह्मा पूर्ण वेदपीठ । वेदी स्वानंद यथेष्ट ।
रावणे हरोनियां स्पष्ट । शांतिपाठ नित्य पढवी ॥५३॥
स्वानंद हरितला रावणे । म्हणोनि लोलंगतें झालीं ब्राह्मणे ।
करिती नीचाचीं याजनें । पोट भरणें तरी नव्हे ॥५४॥
श्रेय देता गायत्रीचें । तरी दुर्भर न भरे साचे ।
हेंचि रावण-बंदींचें । लागले पिसे द्विजांसी ॥५५॥
बुद्धीच्या ठायी ब्रह्मयाची वस्ती । रावणे त्याची बोधशक्ती ।
हरूनि केली अंधवृत्ती । बुद्धी आत्महितीं नाठवे ॥५६॥
सांडोनि चिदानंदस्फूर्ती । ब्रह्मा उपार्जी लंकापती ।
स्वसुखत्यागें रावणाप्रती । नित्य पढती शांतिपाठ ॥५७॥
न मागतां देती आशीर्वचन । करिती नीचाचें सेवन ।
हाता यावया उपाध्येपण । द्वारी संमार्जन यजमानाच्या ॥५८॥
तो निवटोनि दुर्बुद्धी । ब्रह्मा स्थापितां निजपदी ।
नित्यानंदचिदानंदीं । नित्य समाधी पावला ॥५९॥
मनी चंद्रम्याची वस्ती । नित्य असावे निर्विकल्पस्थितीं ।
ते हरितलें लंकाप्रती । चंचळवृत्ती तळमळी ॥६०॥
आपुले निजानंद अमृत । चंद्र भोगू न शके मनांत ।
तुषार सेवी लंकानाथ । फळले व्रत क्षयरोगी ॥६१॥
नित्यानंदपरिपूर्ण । पूर्णचंद्राचे लक्षण ।
ते हरिता दशानन । क्षयरोगें पूर्ण जन्ममृत्यु ॥६२॥
त्या निवटून लंकनाथा । चंद्र निजपदीं स्थापितां ।
मनी बाणली उन्मनी अवस्था । नित्यमुक्तता श्रीरामे ॥६३॥
अहंकारी रुद्राची वस्ती । शिव कल्याण ज्यातें म्हणती ।
वचने जड जीवां मुक्ती । पुराणे गर्जती आनंदवनी ॥६४॥
ते हरिता लंकापती । क्षणे झाली विपरित वृत्ती ।
बुडाली निजानंदस्थिती । वाढली स्फूर्ति अहंदेहो ॥६५॥
निजात्मत्व विसरोनि कोडे । अहंदेहो हेंचि वाढे ।
विषयभोगीं हांव चढे । तंव ते उडे अहंभोगें ॥६६॥
कोटिवेळां विषयस्थिती । विविध भोग भोगिजती ।
कदा काळे नव्हे तृप्ती । न मनी निश्चिती हे मिथ्या ॥६७॥
मागे मृगजळ प्राशना । हांव बांधे गगनसुमना ।
स्वप्नीचें षड्रस जाणा । मागे भोजना कांसवघृत ॥६८॥
ऐसे केले लंकापतीं । त्यासी निवटोनि श्रीरघुपती ।
स्वये स्थापिला निजस्थिती । झाली प्रतीती अहंआत्मा ॥६९॥
इंद्रयमादि कुबेर । रावणबंदी समग्र ।
तळमळिती निरंतर । दुष्ट दशवक्त्रनिजसेवा ॥७०॥
सकळ भोग सकळ समृद्धी । नित्य वोळंगती सकळ सिद्धी ।
अपार वैभव इंद्रपदीं । बोलता शब्दी अनिर्वाच्य ॥७१॥
कल्पतरू चिंतामणी । कामधेनूचीं दुभणीं ।
ते सकळही विसरोनी । करी याचणी यागाची ॥७२॥
रावणाचे परिचारकपण । बंदिपणे वोळगे जाण ।
विश्रांति नाही अर्धक्षण । नित्य वणवण शमेना ॥७३॥
तो निवटोनियां लंकापती । रामे सोडविला अमरपती ।
स्वपदीं स्थापितां निश्चिती । पावला विश्रांती निजानंदें ॥७४॥
वायु पीडिला रावणे । मंद सुशीतळ अनुदिन ।
भोगी श्रम निवारणें । पुंडो झाडणे विषयांचे ॥७५॥
गदळल्या बिदी राहता । रावण दंडी सुबुद्धता ।
तो रामे वधोनि तत्वता । निजमुक्तता वायूसी ॥७६॥
सोडविला प्रभंजन । तेणे झाला सुखसंपन्न ।
सेवावया रघुनंदन । आला शरण वेगिया ॥७७॥
शिवादिक सिद्ध पाही । अखंड राम त्यांचे हृदयी ।
वायु जडोनि तथे ठायी । श्रीरामपायीं विनटला ॥७८॥
स्वभावे प्राण अंगुळें बारा । निगमागमसंचारा ।
अखंड पिडे नासिकाद्वारा । तेणे रघुवीरा सेविले ॥७९॥
जडोन सिद्धांच्या हृदयी । निर्गमागमसंचार पाही ।
सांडोनिया लवलाही । श्रीरामापायीं सुस्थिर ॥८०॥
कुबेर संपन्न निजधनें । त्यासी दंडोनियां रावणे ।
कामग विमान नेले तेणे । राखिला प्राणें बंधुत्वें ॥८१॥
त्या निवटोनि रावणासी । विमान देवोनि त्याचे त्यासी ।
स्वपदीं स्थापिले धनदासी । ख्याति ऐसी रामाची ॥८२॥
देवगुरु बृहस्पती । धरोनि आणिले लंकापतीं ।
उपन्यास नित्य करिती । युक्तिप्रयुक्तिपर्यायें ॥८३॥
न विचारिता काळाकाळ । युक्ति वाढविता प्रबळ ।
रावण त्यासी दंडी सबळ । का युक्तिजाळ बरळसी ॥८४॥
ब्रह्मांडी श्रेष्ठ गुरूची युक्ती । ते न मानी लंकापती ।
विषयोन्मत्त झाली वृत्ती । अपमानिती गुरूसी ॥८५॥
तो निवटोनि अहंरावण । स्वपदीं देवगुरु स्थापून ।
प्रकाशे देदीष्यमान । मान्य वचन त्रिलोकीं ॥८६॥
सकळ सिद्धींचा दाता । विघ्नहर रासभें राखतां ।
विषयाभिलाषाचिया लाता । बहु सोशितां शिणला ॥८७॥
गणेशाची आत्मसिद्धी । रावणे हरिली त्रिशुद्धी ।
म्हणोनि श्रीरामे कृपानिधी । निजानंदी उद्धरिला ॥८८॥
आत्मसिद्धि हिरोनि पूर्ण । जीवे जीता रावण ।
षिषयरासभें राखवी पूर्ण । श्रम दारुण तेणे झाला ॥८९॥
जे जे काळी इच्छा जैसी । ते ते पावता वेगेंसी ।
रावण त्याते सुबुद्ध घुमसी । कासाविसी बहु तेणे ॥९०॥
चिंतामणि मोरेश्वरा । तुज आणिले लंकापुरा ।
माझ्या नगरींच्या समग्रां । अपेक्षित वरां सिद्धि देई ॥९१॥
ऐसे अहंरावणवचन । ऐकतांचि संकोचमन ।
बहुत पीडिला गजानन । विषयाभिलाषण करोनिया ॥९२॥
बाईल दग गा मोरया । बेल शेतालागोनियां ।
जात्यश्व पै बैसावया । लवलाह्मा दे आम्हा ॥९३॥
आवारेभरी असावे कण । कोट्यनुकोटी असंख्य धन ।
पुत्रपौत्रादि संतान । संतति गहन दे आम्हासी ॥९४॥
ऐशा विषयलाता अद्‌भुत । तेणे पीडिला गणनाथ ।
तो निवटोनि लंकानाथ । शंकरसुत सोडविला ॥९५॥
देवोनियां निजात्मसिद्धी । स्वये स्थापिली निजपदीं ।
तेणे प्रकाशली आत्मबुद्धी । निजानंदीं जग निववी ॥९६॥
काळ आतुडला रावणासी । त्रिकाळ वोळंगत समयासी ।
काळातरींच्या कर्मासी । अकाळेसी करीतसे ॥९७॥
प्रत्यवायाचे भय नाही । दोष दंडिता यम पाही ।
तराळ झाली त्याच्या ठायी । दंड तो कायी कोणासी ॥९८॥
काळाचा काळ तो रघुनाथ । काळे वधोनि लंकानाथ ।
काळ सोडविला त्वरित । सुखें वर्तत यथाकाळे ॥९९॥
यम नियंता सकळ जगा । कर्मभोगें दंडी पै जगा ।
त्यासी रावण दंडी वेगा ॥ वाहवी टोणगा जीवन ॥१००॥
तुटतां विषयांचें जीवन । यमासी दंडी क्षणक्षण ।
तो निवटोनियां रावण । धर्मसंस्थापन निजपदीं ॥१०१॥
रावणबंदीं अग्नि पूर्ण । स्वप्रकाशतेज आच्छादून ।
मळ धूतसे आपण । रजरागे पूर्ण कवळिजे ॥१०२॥
रावणवनिता कामे उन्मत्त । पक्षपक्षा रजा स्रवत ।
तितुके अग्नि शुद्ध करित । डाग फेडित काटाचे ॥१०३॥
अल्प डाग राहता । सोटे वाजती अग्नीचे माथा ।
त्या निवटोनि लंकानाथा । अग्नि तत्वता सोडविला ॥१०४॥
देखोनिया निजतेजदीप्तीं । अग्नि स्थापिला स्वपदाप्रती ।
बाप कृपाळू रघुपती । बंदिमुक्ती सुरवरा ॥१०५॥
रावणबंदीं असता वरुण । सेवा करी अनुदिन ।
विषप्राय विषय पूर्ण । सुरस करोन त्यास पुरवी ॥१०६॥
वरुण रसांचा अधिष्ठातां । रावण उन्मत्त भोगी असता ।
जो जो रस आवडे चित्ता । तो न पावता दंडिजे ॥१०७॥
त्यासी निवटोनि रघुनाथे । निजपदी वरुणाते ।
तृप्ति करोनिया परमामृते । निजनिश्चितें स्थापिले ॥१०८॥
काम भुलवी चराचरां । तो आतुडला दशवक्त्रा ।
वेगे करोनि कामारां । निजसेजारा झाडवी ॥१०९॥
विविध भोग भोगिजेती । सवेंचि क्षणे सरोनि जाती ।
कदाकाळें नव्हे तृप्ती । वणवण चित्ती निजबंदी ॥११०॥
रामे निवटोनि रावण । कामा निष्कामीं स्थापन ।
स्वये करोनि आपण । सावधान पावविला ॥१११॥
वसंत रावणकारागृहीं । नित्य नूतन वन रंगारी ।
पुष्पे फळे कामाचारी । न पावता भारी दडिजे ॥११२॥
त्याचे करोनि निःसंतान । निजानंदे करोनि पूर्ण ।
निजपदी संस्थापून । केला सुखसंपन्न वसंत ॥११३॥
तेणे हरिखें दोघेही जण । सेवावया रघुनंदन ।
काम वसंत आपण । अयोध्याभुवन वसविले ॥११४॥
श्रीरामभक्त नित्य निष्काम । त्यासी अनुसरोनि काम ।
सेवावया रघुत्तम । भजनधर्म वाढवित ॥११५॥
विषयकर्दमीं शिणला । तृप्ति न पवेचि वहिला ।
श्रीरामभक्तांसी विनटला । सुख पावला श्रीरामे ॥११६॥
श्रीराम नित्यानंदे निर्दोष । क्रियामात्र न रिघे देख ।
भक्त झाले तदात्मक । रधुकुळटिळकनिजभजनें ॥११७॥
तेथे कामे नवलपरी । रिघोनि भक्तांचे अंतरी ।
भजन करित नानापरी । निजनिर्धारी परियेसीं ॥११८॥
अनावरा आवरित । अमूर्ताची मूर्ति घडित ।
अगोचरातें पाहत । संभावित असंभाव्या ॥११९॥
अचिंत्याचे नित्य चिंतन । अध्येयाचे नित्य ध्यान ।
अनाम्याचें नामकीर्तन । गुणवर्णन अगुणाचें ॥१२०॥
अनर्च्यातें नित्य अर्चित । चिदंबरा पांघरवित ।
सर्वालंकारा अलंकारित । संभावित अंसंभाव्या ॥१२१॥
चित्सच्चिदासी ओवाळणी । सर्वगंगळा मंगलश्रेणी ।
विचित्र पूजाच्या भरणी । प्रीति करोनि अर्पित ॥१२२॥
संतोषावया श्रीराघव । ऐसा कामे योजिला भाव ।
तंव वर्तले अपूर्व । निजलाघव रामाचे ॥१२३॥
सेवा करिता पै हरिखें । म्हणे उतराई कवतुके ।
कांही झालो यथासुखे । तंव आपुलें देखे पूर्णत्व ॥१२४॥
जेथे मनाची नखी नलगे । चित्त चिंतितां दाटी उबगे ।
बुद्धि बोधामागे रिघे । अहं उगे थोटावे ॥१२५॥
रिघता इंद्रियां सांकडे । तेथेही म्या निजानंदमूढे ।
अखंडाची करोनि खंडे । पूजाबंडें वाढविली ॥१२६॥
ऐसी निजकर्माची खंती । कामे मानोनियां चित्ती ।
स्वये पावोनिया उपरती । विरे रधुपतीमाझारीं ॥१२७॥
लंकाबंदींचा वसंत । रामे सोडविला त्वरित ।
सेवावया रघुनाथ । आला धांवत अयोध्येसी ॥१२८॥
श्रीरामाराम मूर्तु । वसंत पावला तेथु ।
एके काळे सकळ ऋतु । आले त्वरित पूर्वीच ॥१२९॥
नीरसें वोळलीं रसभारें । उलोनि खवती रसधारे ।
सकळ सारांचे निजसार । गोडी अपार अनिर्वाच्य ॥१३०॥
केवळ शुष्क निरंकुरें । ते पाल्हेजती भजनांकुरें ।
लसलसीत प्रेमभरें । मनोहरे देखता ॥१३१॥
श्रीरामआवडीचें फळ । जन्मांतरीं नेणती अबळ ।
तींही फुली आली सकळ । आमोद बहळ प्रेमाचा ॥१३२॥
श्रीरामभजनाचें फळ । कल्पांती नेणती अबळ ।
श्रीरामागमनें पे सकळ । अफळ ते सफळ होवोनि ठेले ॥१३३॥
धर्म अर्थ कामसेवा प्रबळ । चौथें मोक्ष फळ केवळ ।
ते निवटूनियां सकळ । आनंदफळ रामराज्यें ॥१३४॥
बंधमोक्षातीत । श्रीरामफळ सेविता भक्त ।
चहू फळासी विटावित । वांकुल्या दावित सुरसिद्धा ॥१३५॥
ऐसे देखोनिया वसंता । लाज आली निजव्रता ।
तेथे मी काय सेवा करिता । जडला तत्वता चरणकमळीं ॥१३६॥
ऐसे कामवसंतादि जाण । सकळ सुरवर आपण ।
श्रीरामराज्यसुखसंपन्न । श्रीरामे पूर्ण गौरविले ॥१३७॥
वस्त्रे भूषणे परिकर । देवोनियां सुंदर ।
रामे गौरविले समग्र । धाडी समग्र निजपदा ॥१३८॥
तेथे मिळोनिया सुरमादी । विचार करिती निजात्मबुद्धीं ।
आम्ही गौरविलें निजपदीं । परी शेष नेदी श्रीराम ॥१३९॥
श्रीरामशेष न येता हाता । स्वपद न राहे सर्वथा ।
क्षणे जाईल विकल्पता । होय विचारिता पै ब्रह्मा ॥१४०॥
भक्ता गौरविलें रघुपती । शेष देईल तयांप्रती ।
युक्ति साधू त्याचिया पाती । प्रजापतीं नेमिलें ॥१४१॥
घ्यावया स्वामीचे शेष । एक अंगवला सेवक ।
का लडिवाळ बाळक । अंकस्थ देख धाकुटें ॥१४२॥
या बुद्धी चतुरानन । भक्तांमाजीं रिघोनि जाण ।
श्रीरामशेषालागून । स्वये विंदान साधिले ॥ १४3 ॥
भरत शनुम बिभीषण । सुग्रीव अंगद वायुनंदन ।
जांबवंतादि वानरगण । गौरव पूर्ण पाहू यांचा ॥१४४॥

शत्रुघ्नाला सेनापती करावे अशी भरताची रामांना प्रार्थना :

भरत पुढे होवोनि जाण । घालोनिया लोटांगण ।
विनविला रघुनंदन । स्वामी विनवण परिसावी ॥१४५॥
राउळेंनकेलें वनाभिगमन । तेंचि मज व्रतग्रहण ।
तुमचे राज्यपरिपाळण । शत्रुघ्ने आपण स्वये केले ॥१४६॥
निद्रालस्य सांडोनि दूरी । रामभजनीं प्रीति भारी ।
सत्सेवेसी निरंतरी । सांडणे करी जीवित्वाचें ॥१४७॥
राज्यलोभ नातळे चित्ता । सत्संगति रामकथा ।
शत्रुघ्नासी उल्लास चित्ता । अतिसावधता उभयार्थी ॥१४८॥
नित्य यौवराज्यपालन । तेणे माझे राखे मन ।
स्वहितार्थी कुशल पूर्ण । सावधान सेवेसीं ॥१४९॥
श्रीरामआज्ञेनें राज्यशासन । ते श्रीरामाचे भजन ।
ऐसा निश्चय मानोनी पूर्ण । सावधान सेवेसी ॥१५०॥
सर्वकाळ सर्वावस्थीं । स्मरे शत्रुघ्न रघुपती ।
कर्माकर्माच्या निश्चिती । चित्तवृत्ति भेदेना ॥१५१॥
स्वामी आलिया निजराज्यासी । अति उल्हास शत्रुघ्नासी ।
अति कुशळ भजनासी । करावे यासी सेनानी ॥१५२॥
ऐशी ऐकोनि भरतवाणी । राम संतोषला मनी ।
हृदयी धरिला आलिंगोनी । होते मनी तेंचि झाले ॥१५३॥
श्रीरामाचे मनोगत । युवराजा पै भरत ।
शत्रुघ्न सेनानी निश्चित । आणि सुमंत प्रधान ॥१५४॥
तेंचि भरते सांगितले । सकळांचे मनास आले ।
वसिष्ठेंहि आज्ञापिले । भरतबोलें वर्तावे ॥१५५॥

सर्वाच्या इच्छेप्रमाणे रामांनी शत्रुघ्नाला सेनापती व सुमंताला प्रधान केले :

सकळांची मनोगतें । सेनानीपण शत्रुघ्नाते ।
प्रधानत्व सुमंतातें । श्रीरघुनाथे अभिषेकिले ॥१५६॥
जैसी भरताची पूजा । तैसिया रीती पूजिलें वोजा ।
बाप कृपाळू रघुराजा । निजगणां वोजा पूजित ॥१५७॥
सात शते निजमाता । रामे गौरविल्या समस्ता ।
कैकेयी कौसल्या सुमित्रा । समानता गौरविल्या ॥१५८॥
सकळ सैन्य अति प्रीतीसी । आदिकरोनि दासदासी ।
गौरवितां निजमानसीं । श्रीरामासी आल्हाद ॥१५९॥
आनंद श्रीरघुनाथा । निजदासांतें पूजितां ।
आश्चर्य सुरवरा समस्ता । वर्षती माथा सुमनभार ॥१६०॥
भरतादि बंधु जाण । सुमंतादि सकळ प्रधान ।
दीन जे का अकिंचन । रामे संपूर्ण गौरविले ॥१६१॥
एका जनार्दना शरण । झाली सकळांची गौरवण ।
सुग्रीव आणि बिभीषण । कपिसैन्य विसरला ॥१६२॥
ऐसे न मानावे श्रोतां । राम न विसरे सर्वथा ।
निजभक्तांची पूजा करिता । उल्हास चित्ता रामाच्या ॥१६३॥
ते अति गोड निरूपण । सकळ तृप्तीचें कारण ।
भोजनी जेंवी दध्योदन । तेंवी पूजन भक्तांचे ॥१६४॥
भक्तांमाजी मुखरी । हनुमंताची प्रीति थोरी ।
त्याच्या पूजनाची आवडी भारी । प्रीति रघुवीरी अतिशय ॥१६५॥
अति गोड निरूपण । देवा भक्ता प्रेम पूर्ण ।
एका जनार्दना शरण । जगदुद्धरण रामकथा ॥१६६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
भरताभिषेको नाम षडशीतितमोऽध्यायः ॥८६॥
ओंव्या ॥१६६॥ श्लोक ॥२॥ एवं १६८ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग