रुपी गुंतली मानसे ।
304.
रुपी गुंतली मानसे ।
ध्यानी मुनिजना ज्याचे पिसे ।
तेचि हे सुंदर स्वरुप कैसे ।
धरिले भक्त कैवारा ॥१॥
अंगी चंदनाची उटी ।
तुळशी माळाहार कंठी ।
बुका शोभला लल्लाटी ।
रत्ने मुगुटी झळकती ॥२॥
कर्णी कुंडले सुढाळे ।
नेत्र उत्फुल्लीत जैसी कमळे ।
दंत हिरियची व्दिदळे ।
सोलींव तैसे झळकती ॥३॥
कंठी कौस्तुभ आणि पदके ।
श्रीवत्सलांछन ह्रदयी निके ।
एकावळी त्यावरी झळके ।
मुक्तमोतिये वाटोळी ॥४॥
हात ठेंवुनी कटावरी ।
कासे पितांबराची परी ।
नाना ठसे उमटले वरी ।
मेखळा रत्ने बरवंटा ॥५॥
चरण सकुमार साजिरे ।
पाउले अत्यंत गोजिरे ।
वाकी घुंगरु झणत्कारे ।
करिती चेइरे आनंदा ॥६॥
संतसमुदाये देवढे ।
गर्जती गुणनाम पवाडे ।
वैष्णव नाचती बागडे ।
ब्रम्हानंद पीकला ॥७॥
राही रुक्मिणी सत्यभामा ।
परिवारवेष्टित पुरुषोत्तमा ।
अगाध पंढरीये हा महिमा ।
देव विमानी दाटले ॥८॥
निळा म्हणे पुरला हेत ।
ठेविले पायांपाशी चित्त ।
सांठवुनिया हदयात ।
रुप पावलो विश्रांती ॥९॥
