भाव शुद्ध तरी मोक्ष
240.
भाव शुद्ध तरी मोक्ष तया शुद्ध ।
यासी ग्वाही वेद पाहा तुम्ही ॥१॥
अशुद्ध भावर्थ करी घात सर्व ।
अंगी वसे गर्व तयाचिया ॥२॥
भक्ति तेचि मोक्ष भक्ति तेचि मुक्ति ।
मुक्ति ते विरक्ति सत्य खरी ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे सुदृढ ।
मग तया गूढ कासयाचे ॥४॥
