नेत्र झांकविले ते हर
116.
नेत्र झांकविले ते हरी ।
कारण इतुलेचि अभ्यंतरी ।
मज विराट झालियावरी ।
छळतील हे देखता ॥१॥
तव ते भावार्थी चोखडे ।
त्याणी देखिले ते निवाडे ।
मग नाचती कृष्णापुढे ।
कीर्ति त्याची वर्णित ॥२॥
म्हणति मागेंही याचिपरी ।
केली चरित्रे तुवा हरी ।
शेषिली पूतना निशाचरी ।
अघाबकांते चिरिले ते ॥३॥
तुझिये अंगी सर्व कळा ।
नेता ब्रम्हायाने आम्हा सकळा ।
तैसेचि होऊनिया गोपाळा ।
दोही ठाई रक्षिले ॥४॥
आजी कळला तुझा महिमा ।
नेणतिया गोवळा जी आम्हा ।
करी अपराध आमुचे क्षमा ।
तुज उच्छिष्टे चारिली ते ॥५॥
बेटया म्हणोन बोभाइले ।
शिव्या देउनी आळविले ।
खेळता डावहि मागितले ।
भांडण केले नेणता तुज ॥६॥
निळा म्हणे सहस्त्रवरी ।
नमस्कार केले ऐसे हरी ।
तेणेचि तोषोनिया उत्तरी ।
बोले तुम्ही सखे माझे ॥७॥
