पूर्णबोधे धाले आत्मर
184.
पूर्णबोधे धाले आत्मराम धाले । निखळ वोतले पूर्णतत्त्वे ॥१॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ । गयनि कल्लोळ तुषार आम्हा ॥२॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण । पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥३॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा । ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥४॥
अर्थ:
माझ्या आत्माला गुरुकृपेने पुर्ण बोध झाल्याने मला आत्मरामाचे दर्शन घडले. आमचे पुर्वपुण्य चोख असलाने श्री गुरुनी नामामृत कल्लोळाचे तुशार आम्हावर उडवले.त्यामुळे आम्ही आकाशाचे पांघरुण व पृथ्वीचे आंथरुण करुन चंद्र सुर्याचा प्रकाश सर्वकाळ भोगतो. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथ धडफुडा म्हणजे खरे गुरु असल्याने त्या ब्रह्मांडाचे अनंत स्वरुप मला समजले.
