बहुजन्मे सोस केला ।
2642.
बहुजन्मे सोस केला । त्याचा झाला परिणाम ॥१॥
विठ्ठलसे नाम कंठी । आवडी पोटी संचिते ॥धृपद॥
येथुन तेथवरी आता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे धाले मन । हेचि दान शकुनाचे ॥३॥
अर्थ :
मी खूप जन्मापासून ज्या गोष्टीची हाव धरली होती त्याचा आज शेवट झाला आहे. माझ्या पुण्य पूर्व संचित कर्मामुळे विठ्ठलाचे नाम मी कंठात धरले आहे आणि माझ्या ह्दयात त्याची आवड निर्माण झाली आहे आता माझ्या या जन्मापासून तर मागे जेवढे मी जन्म भोगले त्या सर्व जन्माची चिंता करण्याची गरजच राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे मन तृप्त झाले असून हरीच्या प्राप्तीचे शुभशकुनाचे दानच हे आहेत.
