बराडियाची आवडी पुरे
2641.
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी ते ॥१॥
तैसे जाले माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥धृपद॥
भागलिया पेणे पावे । विसांवे ते टाकणी ॥२॥
तुका म्हणे छाया भेटे । बरे वाटे तापे त्या ॥३॥
अर्थ :
मागणारा व्यक्ती ज्या गोष्टीसाठी झुरत असतो ती त्याला भेटली की त्याची आवड पूर्ण होते. देवा त्याप्रमाणे माझ्या मनाचे झाले आहे. ते (मन) तुझ्या चरणाची इतकी आवड धरुन होते की ते (तुझे चरण) प्राप्त झाले त्यामुळे आता त्याच्यावरुन उठतच नाही. प्रवासी प्रवास करुन आपल्या ठिकाणावर ज्यावेळेस पोहोचतो तेथे तो विश्रांती घेतो. तुकाराम महाराज एखादया प्रवासाच्या उन्हाने अंग तापले आणि त्याला थंड छाया बसण्यासाठी मिळाली तर त्याला बरे वाटते त्याप्रमाणे माझ्या मनाला तुझ्या चरणाची मिठी पडली आहे त्यामुळे मलाही फार बरे वाटते आहे.
