हित नाही ठावे जननी ज
2653.
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥
अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥धृ॥
न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥
तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥३॥
अर्थ :
काही आई वडिलांना हित कशात आहे ते माहित नसते ते केवळ लौकिकाचार कशा प्रकारे करावा हे दाखवितात. एका आंधळयाच्या काठीला धरुन अनेक आंधळे जर चालू लागले तर पुढचा आंधळा खड्डयात पडला की मागचेही त्यात पडतो आणि एकाच वेळी मागच्या पुढच्या सगळयांचाच घात होतो. त्याप्रमाणे कोणत्याही माणसाचे वागणे पाहून आपण तसे वागू नये त्याच्यावर एकदम विश्वास टाकू नये थोडासा तरी त्याबाबतीत विचार करावा जसे माश्याला गुंतवण्यासाठी गळाला अमिषाचा तुकडा लावला जातो व त्याच अमिषापोटी मासा गळाला लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी मनुष्य आणि त्यांचे वागणे, यावरुनच त्यांचा बरोबर निवाडा केला आहे जसा कोणता घोडा आणि कोणता घोडेस्वार चांगला आहे हे जसे त्यांच्या चालीढालीवरुन कळून येते त्याप्रमाणे मी संसारिक मनुष्य पाहाताच त्यांना चांगलेच ओळखतो आहे.
