निशी दिवस दोघे लोपले
428.
निशी दिवस दोघे लोपले ते ठायी ।
निरंजन ते ठायी लक्षनी पाहा ॥१॥
रवी शशी ज्याचे तेजे प्रकाशले ।
नवल म्या देखिले एक तेथे ॥२॥
नारी पुरूष दोघे एक रूपे दिसती ।
देखणे पारूखे तया ठायी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शिव तेचि शक्ती ।
पाहता व्यक्ती व्यक्त नाही ॥४॥
अर्थ :
रात्र व दिवस असा भेद ज्याच्या ठिकाणी नाही. कारण ते स्वरूप तेजरूप म्हणजे ज्ञानरूप आहे. ते ब्रह्म तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. ज्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्यादिकाना प्रकाश मिळतो. अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्त्री पुरूष असा भेद नाही व पाहाणाराही त्यामध्ये लोपून जातो. याचे मला मोठे आश्चर्य वाटते. शिवशक्ती एकरूप असल्यामुळे त्यांचामध्ये व्यक्त अव्यक्त असा भेद नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
