दुखवले चित्त आजिच्या
2470.
दुखवले चित्त आजिच्या प्रसंगे । बहु पीडा जगे केली देवा ॥१॥
कधी हा संबंध तोडिसी ते नेणे । आठवूनि मने पाय असे ॥धृपद॥
आणिकाची येती अंतरा अंतरे । सुखदुःख बरेंवाइट ती ॥२॥
तुका म्हणे घडे एकाताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥
अर्थ :
देवा आजच्या प्रसंगी जगातील दुष्ट लोकांनी मला फार पीडा दिली आहे त्यामुळे माझे चित्त फार दुखावले गेले आहे. देवा दृष्ट जगाशी माझा संबंध तरी तु केव्हा तोडणार आहे ते काही मला कळत नाही मी तुझे पाय माझ्या मनात आठवून जीवन जगत आहेत. या जगाशी संबंध आला की अनेकांच्या अंतकरणाचे आणि माझी अंतकरण मिळून त्यांचे सुख दुखः बरेवाईटपणा माझ्या अंतःकरणात येते. तुकाराम महाराज म्हणतात जर एकातवास घडला तरच जगाशी संबंध होणार नाही.
