मागे बहुतांसि वांटिल
961.
मागे बहुतांसि वांटिले ।
पुढे आणिकाहि ठेवले ।
भावे विश्वासिते पावले ।
अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥
चतुरा चतुरशिरोमणी ।
सकळा जाणतियांचा धणी ।
करु जाणतो वांटणी ।
भाग जैसे त्यापरी ॥२॥
एका वर्णाश्रमधर्मे ।
एका यज्ञादिका कर्मे ।
एका वेदाध्ययननेमे ।
एक चतुर्थाश्रमे संन्यासे ॥३॥
एका नामस्मरणमात्रे ।
एका पढता स्तवने स्तोत्रे ।
एका गुणानुवादचरित्रे ।
वर्णिता हा तोषला ॥४॥
एका ध्याने समजाविले ।
एका पूजनेंचि वारिले ।
एका जपे बुझाविले ।
एका स्थापिले योगावरी ॥५॥
एका तीथे यात्रागमने ।
एका ब्रम्हचर्यादि अनुष्ठाने ।
एका व्रते पुरश्चरणे ।
गृहस्थाश्रमे वानप्रस्थें ॥६॥
निळा म्हणे हा सर्व जाणे ।
सर्वसाक्षी सर्वज्ञपणे ।
जयापरि तैसे देणे ।
करी हा उणे नाही यासी ॥७॥
