सांगेन तो जन्म आठवाव
162.
सांगेन तो जन्म आठवावे ऐक ।
धरूनी विवेक निश्चयाचा ॥१॥
वेरूळ ते तीर्थ शिवलाय क्षेत्र ।
शास्त्रज्ञ समर्थ ब्रह्मवेत्ता ॥२॥
तयाचे ते नाम धर्मदत्त क्षेत्री ।
पूज्य तो सर्वत्री जनामाजी ॥३॥
तयासी सुंदरा पतिव्रता भली ।
कीर्ती फार केली पतिधर्मे ॥४॥
तयांचिये पोटी मज जाला जन्म ।
कन्येचा उत्तम शांतिरूप ॥५॥
अठरा वरूषे क्रमिली आपण ।
करूनी श्रवण भागवत ॥६॥
लग्न केले परी भ्रतार नासला ।
हितावह झाला तोही मज ॥७॥
नववे ये जन्मी तेथेची जन्मले ।
नव वरूषे केले स्थान तेची ॥८॥
तेचि मातापिता तेचि बंधुवर्ग ।
अनुष्ठान सांग तेचि आम्हा ॥९॥
दहाविया जन्मी कौशिक ब्राह्मण ।
अग्नीचे सेवन त्याचे घरी ॥१०॥
नित्य हरिकथा वेदान्तश्रवण ।
नित्य करी स्नान शिवालयी ॥११॥
देवाचे दर्शन नित्य सेवाविध ।
आत्मज्ञाने बोध शांत देह ॥१२॥
कन्येचिया रूपे जन्म म्या घेतला ।
काळ तो क्रमिला काही तेथे ॥१३॥
पितयाने लग्न केले कन्यादान ।
पाहोनी ब्राह्मण शुक्ल दीक्षा ॥१४॥
ब्रहमणाची भिक्षा करिता कोरान्न ।
गाईंचे पाळण घरी तया ॥१५॥
बेचाळीस वरूषे आयुष्य घातले ।
तेथे पुत्र जाले तीन मज ॥१६॥
पहिला पुत्र तेथे तूचि रे जालासी ।
आणिक विशेषी दोन पुत्र ॥१७॥
तुझा माझा गुरू संन्यासी केशव ।
तेणे विद्या सर्व प्रबोधिली ॥१८॥
तयावरी तेथे ठेविले शरीर ।
दहा जन्म-सार सांगितले ॥१९॥
बहेणि म्हणे आता तीन जन्म शेष ।
सांगेन परिस ज्ञानवंता ॥२०॥
