चौथा जन्म सांगो पाचव
161.
चौथा जन्म सांगो पाचवा सहावा ।
आणि तो सातवा योगभ्रष्ट ॥१॥
गौळियांचे घरी कन्याचि होऊनी ।
गाई संरक्षणी वर्ततसे ॥२॥
नाम-संकीर्तन काळाची क्रमणा ।
संगती ते जाणा वैष्णवांची ॥३॥
आवडती देव तीर्थ क्षेत्र यात्रा ।
ब्राह्मणा सर्वत्रा पूजा करी ॥४॥
गाईंचे रक्षण अरण्यात वास ।
तव जाला सहवास संन्याशाचा ॥५॥
देखोनी तयासी करी नमस्कार ।
जाणूनी संस्कार कृपा केली ॥६॥
सातवे जन्मीचा सांगेन वृत्तांत ।
मागिलाचा प्रांत सांडियेला ॥७॥
परी गौळियांचे घरी गायीचे रक्षण ।
करूनी कीर्तन देह पोषी ॥८॥
मग भेटले ते सिद्ध आत्मज्ञानी ।
तेही वोळखोनी नेले मज ॥९॥
म्हणती योगभ्रष्ट आहे हे विरक्त ।
दास्यत्वे सारी काळ बहु ॥१०॥
विरक्तीचे अंगी ज्ञानाचा अभ्यास ।
करि रात्रंदिवस एकनिष्ठे ॥११॥
सासष्टी वरूषे सातविये जन्मी ।
क्रमूनिया धर्मी प्रवर्तलीये ॥१२॥
अभ्यास करूनी टाकिले शरीर ।
तुज हा प्रकार सांगितला ॥१३॥
बहेणि म्हणे जन्म पुढे उरले साही ।
प्रसंगेची तेही सांगतसे ॥१४॥
