वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४५. रावणवध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088137 · अभंग क्र. ४५

45.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पंचेचाळिसावा ॥
अप्सरेचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऐसे बोलता हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।
स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित कपीची ॥१॥

राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।
त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥
स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां प्रसादतः ।
एवमुक्तस्तु रामेण सुग्रीवेणांगदेन च ॥२॥
सुवेलमभिसंरुह्य संपीड्याप्लुत्य वानरः ।
जगाम सत्वरं श्रीमानुपर्युपरि सागरे ॥३॥

श्रीरामांचा हनुमंताला आशीर्वाद व आज्ञा :

सवेंचि बोले रघुराजा । सवेग उठी पवनात्मजा ।
शीघ्र करोनि यावे काजा । बंधुराजा उठवावे ॥२॥
स्वस्थ असो तुझे चित्त । स्वस्थ असो जीवित ।
अंग प्रत्यंग समस्त । कपिनाथ निजविजयी ॥३॥
स्वस्ति असो तुजलागी । कल्याण असो सर्वांगी ।
सर्वदा विजयी जगी । तनु सर्वांगी सदृढ ॥४॥
हनुमंता होई चिरजीवी । तेंही जीवित्व ज्ञानानुभवी ।
ज्ञानविज्ञानपदवी । तुझेनि व्हावी जगासी ॥५॥
आता मी तुज देवों आशीर्वाद । तंव पूर्वीच तुझे बळ अगाध ।
प्रताप कीर्ति अति प्रसिद्ध । ऐक सावध सांगेन ॥६॥
बाळपणी आकळिला भानु । तंव वज्रे इंद्रें हाणितला हनु ।
हनुमंत हे नामभिधानु । तैंपासुन तुज जाले ॥७॥
त्या रवीच्या धांवण्यासी । आले लोकपाळ वेगेंसीं ।
ख्याति लाविली तयांसी । ऐक सावकाशीं ॥८॥
कुंठित जाले इंद्रवज्र । शिवाचा शूळ जाला चूर ।
वरुणाचे पाश समग्र चकचूर पै जाले ॥९॥
तुज बाधी वरुणपाश । दुसरा आश्रमी आश्रमपाश ।
तिसरा कर्माचा कर्मपाश । तुज वीरेशा बाधीना ॥१०॥
धर्मपाश ज्ञानपाश । अहंकाराचा अहंपाश ।
परब्रह्मींचा ब्रह्मपाश । तुज सहसा बाधीना ॥११॥
तेणे वरुणपाश ते किती । तुज बांधावया मारुती ।
यमाची तेथे कोण शक्ती । तुज निश्चिती दंडावया ॥१२॥
यम निंयता सकळ जगा । पदाभिमानें लगबगा ।
दंड घेवोनिया वेगा । तुज सवेगा दंडूं आला ॥१३॥
त्या यमाचा यमदंड पाही । मोडून गेला तुझे देही ।
इतर बापुडीं कोण कायी । हनुमान पाही दंडावया ॥१४॥
अग्नि वायु कुबेर चंद्र । सर्वही झाले किंकर ।
एवढा अदट साचार । हनुमान वीर तिही लोकी ॥१५॥
आपुलियाहो प्रतापशक्ती । लाहोनि सकळांची वरदोक्ती ।
वज्रदेही ऐसी ख्याती । त्रिजगती मिरविजे ॥१६॥
कायसे माझे वरदान । आतुर्बळी वायुनंदन ।
वेगे करोनि उड्डाण । बंधुरत्‍न मज देई ॥१७॥

हनुमंताचे उड्डाण व त्याचा परिणाम :

ऐसे बोलता श्रीरामचंद्र । सकळ वानरांचे भार ।
ऐकोनी पिंजारिला कपीद्र । अति भ्यासुर भासत ॥१८॥
पिंजारिल्या रोमावळी । दिसे विक्राळ दांताळी ।
मस्तक गेला नभोमंडळी । गोळांगुळीं आवेश ॥१९॥
दोन्ही दिसती नेत्रगोळ । जैसे धगधगीत इंगळ ।
त्राहाटिता भूमीसीं लांगूळ । लोक सकळ भयभीत ॥२०॥
वळिला पुच्छाचा आंकोडा । लंघोनि सुवेळेचा कडा ।
राम स्मरोनि वेगाढा । केला गाढा भुभुःकार ॥२१॥
ऐकोनि त्याचा भुभुःकार । दचके कैलासीं शंकर ।
ब्रह्मांड हडबडिले थोर । घोरांदर मांडिलें ॥२२॥
अकाळी प्रळयो कायसा सृष्टी । प्रळयरुद्र निमती दृष्टी ।
इंद्रादिक पडिले संकटीं । प्राण कंठी दाटले ॥२३॥
कडे खचले सागरी । वृक्ष भ्रमती गगनांतरी ।
उड्डाण करिता कपिकेसरी । सुरांसुरीं आकांत ॥२४॥
सप्त सागारां खळबळा । धरा जावू पाहे रसातळा ।
आकांत जीवमात्रा सकळा । गोळांगुळाचेनि धाके ॥२५॥
करोनिया रामनामस्मरण । सवेग केले उड्डाण ।
न लागता अर्धक्षण । सागर संपूर्ण क्रमियेला ॥२६॥
उपर्युपरी गगनांतरी । सत्यलोकपर्यत वरी ।
गेली उड्डाणाची थोरी । विक्रम भारी कपीचा ॥२७॥
दिशा दुमदुमिल्या संपूर्ण । प्राणांतिक सकळ राक्षसगण ।
ते ऐकोनिया रावण । अति चिंता मन उपजवी ॥२८॥
म्हणे गेलिया कपींद्र । आणील ओषधी समग्र ।
उठविल्या सौ‍मित्र । श्रीरामचंद्र नाटोपे ॥२९॥
हे तंव एकमेकांपरीस । वीर रणयोद्धे कर्कश ।
अवघे मिळाल्या युद्धास । मग आम्हांस प्राणांत ॥३०॥
आता काय करु विचार । प्रधान मारिले समग्र ।
इंद्रजितादि अखया पुत्र । कुमरें कुमर मारिले ॥३१॥

रावणाला चिंता व कालनेमी राक्षसाला विनंती :

ऐसे चिंतितां रावणा । करु विसरला भोजना ।
विसरला उदकपाना । अति चिंता मना पीडित ॥३२॥
निद्रा न लागे शेजेसीं । करीत असे उठीबैसी ।
तंव देखिले काळनेमीसी । मग चरणासी लागला ॥३३॥
चारी मुखें सरती लाळा । दाढा विकट विकराळा ।
धगधगीत नेत्रगोळा । जैसे इंगळ खदिराचे ॥३४॥
जिव्हा मुखी समसमित । अति दीर्घ चारी हात ।
केश नीळ कठिण तेथ । उभे दिसत शूळ जैसे ॥३५॥
अति तिखट दाढा चारी । मुख समान पर्वतदरी ।
खापराऐसा काळा शरीरी । मुखें चारी समसमित ॥३६॥
वृक्ष रोंविले जैसे असती । तैसे हात पाय दिसती ।
भिंगुळवाणी शरीरकृती । देखता भीती यम काळ ॥३७॥
अति भयानक शरीर । त्या प्रार्थी दशशिर ।
तुवा जावोनि सत्वर । पर्वतेंद्र ठाकावा ॥३८॥
लवणादि सकळ समुद्र । कुशद्वीप समग्र ।
लांघोनिया क्षीरसमुद्र । पर्वतेंद्र ठाकावा ॥३९॥
तुज नभोवेगें गमन । म्हणोनि आलो तुज शरण ।
तेथे गेला कपिनंदन । त्यासी विघ्न करावे ॥४०॥
काळ्नेमी एक विनंती । लक्ष्मणा भेदलीसे शक्ती ।
उदया येता गभस्ती । सौ‍मित्र निश्चिती मरेल ॥४१॥
यालगी वायुनंदन । करोनि सवेग उड्डाण ।
दिव्योषधी आणोन । स्वये लक्ष्मण उठवील ॥४२॥
उदया न येता गभस्ती । आणोनि ओषधी समस्ती ।
वांचवावया निश्चिती । प्रतिज्ञा मारुति करुन गेला ॥४३॥
तत्काळ ओषधी आणोन । आतांचि उठेल लक्ष्मण ।
मग त्यासी जुंझेल कोण । रामलक्ष्मण आतुर्बळी ॥४४॥
अति बळिया हा वायुनंदन । कळिकाळा नाटोपे जाण ।
बलिष्ठ सकळ वानरगण । त्यांसीं कोण जुंझेल ॥४५॥
कपटेंकरुन ब्रह्मशक्ती । आकळिलाहे ऊर्मिलापती ।
तंव कार्य साधावें हातोहाती । उदया गभस्ती न येता ॥४६॥
चंद्रामृतें सदा पूर्ण । चंद्राचल म्हणती म्हणोन ।
एरवीं तो द्रोणाद्री जाण । नामभिधान विख्यात ॥४७॥
रुपा आले चंद्रामृत । अमृतसंजीवनी त्यांसी म्हणत ।
ओषधी ऐशा अनंत । पर्वती ॥४८॥
तेथे गेला कपिनंदन । बहु माया करोनि आपण ।
त्यासी करावे विघ्न । सूर्योदयो जंव न होय ॥४९॥
तेंही मायेचें लक्षण । जटाधारी वल्कलाभरण ।
सर्वांगी भस्मोधद्धूळण । असाधारण ऋषिवेष ॥५०॥
तापसवेष धरोन पूर्ण । करावा आश्रम निर्माण ।
गोंवावया कपिनंदन । माया आपण करावी ॥५१॥
सुपक्व फळे सुशीतळ जळ । सुंदर वृक्ष सुपरिमळ ।
आपण धरावें अति सुशीळ । गोळांगूळ विगुंतवावया ॥५२॥
निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान । कथेंसीं वर्णावा रघुनंदन ।
तेणे त्यासी सुख गहन । कपिनंदन विगुंते ॥५३॥
अतिथ्य करावे हनुमंता । सुरस सांगावी रामकथा ।
जेणे गुंती पडे कपिनाथा । ते ते सर्वथा करावे ॥५४॥
तेथे महाशूर राक्षसी । प्राणीमात्रा सगळे ग्रासी ।
आपण युक्ति साधावी ऐसी । जे कपींद्रासी ते गिळी ॥५५॥
ओषधी समीप सविस्तर । जळे संपूर्ण सरोवर ।
सुंदर कमळीं मनोहर । तेथे कपीद्र गोंवावा ॥५६॥

तत्र त्वया प्रहंतव्य उपायेन प्लवंगमः ।
हनूमति विनष्टे तु लक्ष्मणो न भविष्यति ॥४॥
लक्ष्मणस्य विनाशेन रोमो वै नभविष्यति ।
रामस्य च विनाशेन सुग्रीवो नभविष्यति ॥५॥
सुग्रीवस्य विनाशेन ह्यंगदो नभविष्यति ।
अंगदस्य विनाशेन क्षयं यास्यंति वानरांः ॥६॥
ध्‍रुवमस्य जयो वीर गच्छ शीघ्रं महाबल ।
अर्धराज्यं प्रदास्यामि कृते कर्मणि राक्षस ॥७॥

गमन करोनि शीघ्रगती । सर्व प्रकारें असे शक्ती ।
तेणे मरण पावे मारुती । ते ते युक्ती साधावी ॥५७॥
मी तुज सांगो कपटगती । तंव तू केवळ कपटमूर्तीं ।
तेथे माझी काय युक्ती । सर्वथा । दोघा मृत्य त्याचेनि ॥५९॥
मरण पावल्या रघुनंदन । कैसेनि वांचेल बिभीषण ।
सुग्रीवही सांडील प्राण । अर्ध क्षण न लागता ॥६०॥
नळ नीळ जांबवंत । जुत्पती मरतील समस्त ।
एवढा साधेल कार्याअर्थ । जरी हनुमंत मारिला ॥६१॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । देईन अर्ध राज्य जाण ।
चिंतासागरीं बुडता पूर्ण । तारूं आपण स्वये व्हावे ॥६२॥
मग ग्लानि भाकी बहुता । पडे चरणांवरी मागुता ।
मज होतसे प्रांणात अवस्था । जीवदाता तू होई ॥६३॥

कालनेमीचे अनिच्छेने प्रयाण :

ऐसे ऐकतांचि उत्तर । दचकला राक्षसवीर ।
हृदयी खोचिला दुर्धर । कपटप्रकार भला नव्हे ॥६४॥
कपट करिता हिरण्यकशिपु । खंडविखंड केली वपु ।
तेथे आमचा कोण प्रतापु । रुद्ररुप जिंकावया ॥६५॥
कपत साधिले अमरेंद्रें । भगीं व्यापिले शरीरें ।
कपट साधिले चंद्रें । क्षयरोगें थोर व्यापिला ॥६६॥
खाऊन जेवून घर घेणे । ऐसे मांडिलें सहस्रार्जुने ।
सांडून हस्तपाद छेदणें । शेखी प्राणें निमाला ॥६७॥
येणे रावणे जाण । सांडोनिया राजचिन्ह ।
भीक मागो गेला आपण । सीते कोरान्न देयीं माते ॥६८॥
माता म्हणे जियेसी । भोगू पाहे तियेसी ।
कपटे मेळविले धुळीसी । सपुत्रसैन्येंसीं मारविले ॥६९॥
इतरांची गति कायसी । कपटें नाडिले देवांसीं ।
ईश्वरत्व सांडोनि मानसी । स्वये भिकेसी लागला ॥७०॥
आपण होवोनियां रंक । बळीसी मागो लागला भीक ।
तेणे द्वारपाळ केला देख । पुराणे असंख्य बोलती ॥७१॥
यालागी कपटाची वार्ता । भली नव्हे गा सर्वथा ।
कपट करिता कपिनाथा । स्वघातासी करावे ॥७२॥
श्रीरामाचे निजभक्त । त्यांसीं कोणी कपत करित ।
ते स्वयेंचि मरण पावत । नरक भोगित अनिवार ॥७३॥
हनुमान श्रीरामाचा किंकर । श्रीरामभजनी अति तत्पर ।
त्यासी कपट करी जो नर । त्याचे शरीर वांचेना ॥७४॥
ऐसे जाणतो मी आपण । स्वये सांगतसें रावण ।
कपीसी जे विघ्नकरण । ते मजचि मरण ओढवले ॥७५॥
पाया पडोनि रावणे । अर्ध राज्य देईन म्हणे ।
मज निमालिया प्राणें । राज्य कोणे भोगावें ॥७६॥
आता न वचता राहों येथे । तरी रावणचि करील घाते ।
तयापरिस हनुमंते । होय आम्हांते हित कांही ॥७७॥
हनुमान सबाह्य श्रीरघुनाथ । श्रीरामप्रेमें सदा डुल्लत ।
होता त्याचेनि हाते घात । कृतकृतार्थ मी जालो ॥७८॥
ऐसे विचारोनि मनी । मान देत रावणवचनीं ।
तुझी आज्ञा उल्लंघोनी । सामर्थ्य जनी असेना ॥७९॥
ऐसा कोण आहे थोर । जो उल्लंघूं शके तुझे उत्तर ।
वेगे करोनि नमस्कार । निशाचर उसळला ॥८०॥
पर्वता पावे जंव मारुती । तंव आपण गेला शीघ्रगती ।
माया केली अति निगुतीं । तेही निश्चिती परिसावी ॥८१॥

एवमुक्तं तु तद्रक्षः प्रणिपत्य दशाननम् ।
मनोजवेन वेगेन संप्राप्तश्चंद्रपर्वतम् ॥८॥
तस्पिन्पर्वतपार्श्वे तु सोऽकार्षीन्माययाश्रमम् ।
अग्निहोत्रेण दिव्येन सोपवासकृशोदरः ॥९॥
जटामुकुतभारेण चीरवल्कसंवृतः ।
दीर्घमश्रुधरो भूत्वा तस्थौ जपपरायणः ॥१०॥
गृह्याक्षमालां हस्तेन तस्यागमनकांक्षया ॥११॥

कालनेमीची माया निर्मिती व हनुमंताची मार्गप्रतिक्षा :

तेथे जावोनी रक्षोगण । केला आश्रम निर्माण ।
फळे जळे संपूर्ण । वृक्षारोपण अति रम्य ॥८२॥
आपण घेवोनि अग्निहोत्र । तापसवेषे निशाचर ।
दिसे उपवासी निरंतर । गेले उदर खपाटी ॥८३॥
माथा जटांचा संभार । परिधान त्यासी वल्कलांबर ।
वक्त्रईं वाढले श्मश्रु फार । अदि विचित्र भासती ॥८४॥
काखबळ हात । लिंग बुडाले केशांआंत ।
वानप्रस्थरुप तेथ । जप करीत एकाग्र ॥८५॥
हाती घेवोनि जपमाळी । बुबुळें नेलीं भंवयातळीं ।
जैसी खेचरी मुद्रा लाविली । तैसी शैली दिसताहे ॥८६॥
घालोनिया वज्रासन । करोनिया एकाग्रमन ।
बकवत्धरोनि ध्यान । पाहे आगमन कपीचें ॥८७॥
उदकामाजी असे बक । जैसा कोणी सात्विक ।
जळवासी पुण्यश्लोक । ऐसा देख दिसतसे ॥८८॥
मत्स्य आलिया दृष्टीतळीं । गटकावोनि सगळा गिळी ।
तेंवी राक्षस कपटमेळीं । कपिआगमन शैली पाहतसे ॥८९॥

हनुमंताचे आगमन व दिशाभूल :

तंव दक्षिणदिशेच्या भागी । जैसी मूस ओतिली आगी ।
की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी । दिसे वेगी धांवत ॥९०॥
की बाळसूर्य उदया आला । तैसा येतसे दादुला ।
नातरी शेषफणाहूनि निष्टला । मणि निघाला चरावया ॥९१॥
ऐसे उड्डाण कपिनाथा । आले पर्वताचे माथा ।
देखता आकांत राक्षसचित्ता । धीर सर्वथा न धरवे ॥९२॥
डोळा पडली झांपडी । हाता वळली वेंगडी ।
पडली मनाची मुरकुंडी । नावेक भवंडी त्यासी आली ॥९३॥
मग सावध होवोनि पाही । विचारोनि आपलेच देही ।
म्हणे मज आले कायी । आठव नाही कार्याची ॥९४॥
सकळ जन्माचें निजसार । मज जोडों आले साचार ।
आणि मी दुश्चिंत पामर । स्वहितविचार नाठवे ॥९५॥
म्या स्वामिकार्य साधावे येथे । की मुक्त व्हावे कपिहस्तें ।
ते विसरोनि निजकार्यातें । मूर्च्छितचित्तें पडिलों असे ॥९६॥
ऐसे विचारोनि मनी । स्वस्थ बैसला आसनी ।
कपीनें देखिला दुरोनी । मग धांवोनी तेथ आला ॥९७॥
दुरोनी देखिला तापस । हर्षित कपीचें मानस ।
भरला सर्वांगी उल्लास । ऋषिनमनास तेथ आला ॥९८॥
हनुमान श्रीरामकिंकर । रामरुप चराचर ।
देखे सर्वदा साचार । प्रेमा थोर श्रीरामी ॥९९॥
ज्यासी जैसी अंतर्वत्ती । ते जगाते तैसेचि देखती ।
तेही विषयींची उपपत्ती । श्लोकसंपत्ती परिसावी ॥१००॥
सज्जनाचें मुख्य लक्षण । ब्रह्मस्वरुप स्वये आपण ।
जग देखणे ब्रह्मपूर्ण । कपटचिन्ह तो नेणे ॥१॥

नारायणमयं धीराः पश्यंति परमार्थिनः ।
जगद्धनमयं लुब्धाः कामुका कामिनीमयम् ॥१२॥

जिणोनियां काम क्रोध । दमूनि इंद्रियाचें द्वंद्व ।
खणोनि विषयाचा कंद । परमानंद पावले ॥२॥
त्यासी दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । अवघे चिद्धन भासत ॥३॥
हे सज्जनाचें लक्षण । लुब्ध जे का वित्तेषण ।
सांगो त्यांचेही चिन्ह । सावधान अवधारा ॥४॥
द्रव्यलाभ देखे ज्यापासीं । सदा ओळखे तयासी ।
अणुमात्रा नुल्लंघी वचनासी । म्हणे सर्वस्वेंसी मी दास तुझा ॥५॥
देखे धनवंत वेव्हारे । सौजन्य त्यासी अत्यादरे ।
विरक्त देखोनि एकसरें । स्वये दातारें बैसवी ॥६॥
म्हणे भगवंताची कोण सत्ता । सिद्ध ईश्वरदत्तभोग असता ।
सांडून धरली तपासता । अभाग्यता केवढी पा ॥७॥
वितैषणाचा जो नर । त्याचा ऐसा विचार ।
आता कामातुर जो नर । संक्षेपाकार सांगेन ॥८॥
स्त्रीकाम ज्यांचे चित्ती । मायबहिणींतें नोळखती ।
स्त्रीरुप झाली वृत्ती । जग देखती स्त्रीरुप ॥९॥
बापां भावासी सांगता गोष्टी । मायबहिणींचा विकल्प पोटी ।
इतरांची कायसी गोष्टी । सकळ सृष्टीमाझारी ॥११०॥
हनुमान साधुरत्‍न अगाध । साधुरत्‍ने अद्वैतबोध ।
नेणे राक्षसाचे कपट भेद । साधुत्वे शुद्ध नमू आला ॥११॥
दिव्याश्रम मनोरम । देखोनिया महोत्तम ।
नमन करिता प्लवंगम । अति सप्रेम हरिरंगें ॥१२॥
येरु स्वकार्या अति कुशळ । आला देखोनि गोळांगुळ ।
घातले लोटांगण प्रबळ । चरणकमळवंदना ॥१३॥

हनुमंताचे स्वागत :

बैसों घातले वरासन । आणिले चरणक्षाळणा जीवन ।
अर्घ्यपाद्यादि संपादन । पूजाविधान मांडिले ॥१४॥
नम्र होवोनि अत्यंत । चरण चुरावया धांवत ।
आणिली फळमूळें समस्त । कपीसी आतिथ्य मांडिलें ॥१५॥
स्वामी अंगीकारावे फळमूळ । प्राशन करावे शीतळ जळ ।
मार्गीं शिणलेती बहुळ। स्वेदकल्लोळ सर्वांगी ॥१६॥
दिसतोसी जैसा रामदूत । वानरतनुगृहीत ।
कोण कार्या त्वरित । तुम्ही येथ येणे केले ॥१७॥
म्हणाल तू काय जाणसी । मज भेटी झाली बहुत ऋषींसीं ।
त्याहीं सांगितले वार्तेसी । ऐक तुजपासी सांगेन ॥१८॥
रामलक्ष्मण बंधु दोघे । पितृवचनेंसीं निघती वेगे ।
क्रमोनिया मही स्वांगे । वना वेगे पै आले ॥१९॥
त्यांचा पुरुषार्थ अत्यद्‍भुत । परिसंता तो कपिनाथ ।
आवडी उठली बहुत । अनुच्चारित परिसावया ॥१२०॥
स्वयंवरीं भांगिलें हरकोंदंड । रावणाचे काळे तोंड ।
झाडिलें भार्गवाचें बळबंड । यश प्रचंड घेतलें ॥२१॥
सीतेसमवेत दोगे जण । वना निघाले आपण ।
मारोनि राक्षस दारुण । वाळीही जाण मारिला ॥२२॥
राज्य सुग्रीवा दिधले । वानरसैन्य आपैसें केले ।
ते वानरतनुज देखिले । म्हणोनि पुसिले उत्तर ॥२३॥
स्वागत असो गा तुज । सनाथ करावे मज ।
जरी देखसी अधिकार ओज । जीवीचें गुज तुज सांगो ॥२४॥

स्वागतेनार्थयित्वा च सोऽब्रवीत्व क्व चागतः ।
विश्रमस्व कपिश्रेष्ठ भुक्त्वा पीत्वा च गम्यताम् ॥१३॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा हनूमान्वाक्यमब्रवीत् ।
श्रुता चेद्यपि किष्किंधा वानराणां महापुरी ॥१४॥
सुग्रीवो यत्र वसति वानरेंद्रो महाबलः ।
तस्य मित्रं महाराजो रामो दशरथात्मजः ॥१५॥
तस्य भार्या जनस्थाने हृता सीतेति विश्रूता ।
मायाविना राक्षसेन रावणेन दुरात्मना ॥१६॥
तन्निमितं च लंकायां युद्धमासत्सिदारुणम् ।
तस्य भ्राता राघवस्य लक्ष्मणो नाम वीर्यवान् ॥१७॥
शक्त्यासौ ताडितो विप्र विसंज्ञो मेदिनीं गतः ।
तस्यर्थमिह संप्राप्त ओषधिं प्रति तापस ॥१८॥

रामचरित्र – श्रवणाने हनुमंताला विश्वास वाटला :

श्रीरामाची निजकथा । तापसमुखें ऐकता ।
उल्लास झाला कपिनाथा । देखोनि सादरता वानरी ॥२५॥
श्रीराम असता जनस्थानी । रावण कपटरुपें येवोनी ।
शून्याश्रम देखोनी । श्रीरामपत्‍नी चोरिली ॥२६॥
ते सीतेच्या धांवण्यासी । श्रीराम निघे वेगेंसीं ।
मार्गी आडवे होता राक्षसांसी । श्रीरामे त्यांसी मारिले ॥२७॥
वाळीनें पीडून सुग्रीवासी । हरिले स्त्री आणि राज्यासी ।
रामे मारोनि त्यासी । सुग्रीवासी स्थापिले ॥२८॥
सुग्रीवराजा महावीर । सकळ वानरांचे भार ।
झाले श्रीरामाचे किंकर । बुद्धोपकार होऊनी ॥२९॥
दोघा पडिले अति सख्य । समुद्री शिळा बांधिल्या देख ।
न लागता निमिष एक । लंकासंमुख येते झाले ॥१३०॥
युद्ध झाले घोरांदर । रावणप्रधानादि कुमर ।
मारिले सैन्य जुंझार । मारिले समग्र एक एक ॥३१॥
दुःखे खवळला रावण । घेवोनि ब्रह्मशक्ति आपण ।
हृदय सौ‍मित्राचें लक्षून । शक्ति दारुण हाणितली ॥३२॥
शक्ति भेदून हृदयासीं । निघोनि गेली भूमीसीं ।
अति विकळता सौ‍मित्रासी । पडिला क्षिती निचेष्टित ॥३४॥
वांचवावया सौ‍मित्रासी । नेवो आलो ओषधींसी ।
सूर्य न ये पा उदयासीं । मज त्वरेसीं जाणे असे ॥३५॥
सांगितले सकळ वृत्त । तू तपस्तेजें अति विख्यात ।
जाणोनी माझे मनोगत । शीग्र कार्यार्थ साधावा ॥३५॥
विलंब न करावा सर्वथा । ओषधी सांगाव्या समस्ता ।
भास्कार उदया न येता । मज तत्वता जाणे असे ॥३६॥

पानीयं पातुमिच्छामि शीघ्र भावय तस्य मे ।
येन तृप्तिं गमिष्यामि तत्कुरुष्व महातप ॥१९॥

तव दर्शने मुनिवरा । सुखानुकोटी मज कपींद्रा ।
करु पाहसी पाहुणेरा । निरोप सत्वरा मज द्यावा ॥३७॥
सेविता सज्जनगृहींचे उदक । अंतर पुनीत होय देख ।
प्राप्त होय जरी अन्नादिक । ब्रह्मसुख देख तो पावे ॥३८॥

याचयेच्छ्रोत्रियस्यान्नं तदभावे पिबेज्जलम् ॥२०॥

सज्जनाचे घरचे अन्न । घ्यावें बळेंचि मागोन ।
नाही तरी आपण । जीवन तरी मागावें ॥३९॥
आलियाही ब्रह्मादिक । सज्जनान्न न पवती देख ।
हे घडले गा प्रत्यक्ष । गोपाळ सकळ काला करिती ॥१४०॥
म्हणोनि घ्यावें फळमूळांसी । तरी मी आलो रामकार्यासी ।
न जाता स्वामिकार्य सिद्धीसीं । सर्वधा आहारासी न सेवूं ॥४१॥
सांडून स्वामिकार्यार्था । जो पुढे घालील उदरचिंता ।
तो महापापी तत्वता । अधःपाता जाय वेगी ॥४२॥
यालागी स्वामिकार्य न होता पूर्ण । न करी फळमूळभोजन ।
तुझिया आदरालागी जाण । उदकपान करीन ॥४३॥

तस्य तद्वचनं श्रुत्वा रक्षो वचनमब्रवीत् ।
श्रुयतां वचनं सत्यं त्वया मे वानराधिप ॥२१॥
इदं महत्सरो दिव्यं पानीयं पातुमर्हसि॥२२॥

हनुमंताला सरोवराकाठी पाण्यासाठी पाठविले :

ऐकोनि कपीच्या वचनासी । राक्षस सुखावला मानसी ।
अनायासें पावेल मृत्यूसी । सरोवर‍ उदकासी प्राशिता ॥४४॥
ऐसा निश्चय मानूनि पूर्ण । बोले कपीसी वचन ।
स्वामिकार्य न होता जाण । आग्रह आपण करु नये ॥४५॥
आश्रमासमीप सरोवर । अत्यंत पवित्र तेथींचे नीर ।
पान करिता अल्पमात्र । ओषधी समग्र देखसी ॥४६॥
हनुमान अत्यंत विश्वासी । कपट सर्वथा नाही मानसी ।
मानिलें त्याचिया वचनासी । निजमानसीं कपिनाथें ॥४७॥
साधुवचनी विकल्प करी । तो नर महादुराचारी ।
यश न पावे तो संसारी । चराचरी अति निद्य ॥४८॥
ऐसा निश्चय पूर्ण । मानोनि ऋषीचें वचन ।
मग दृष्टी सरोवर लक्षून । उदकपान करु आला ॥४९॥

पिबतस्तस्य पानीयं पद्मपत्रपुटेन तु ।
उदकाभ्यंतरे ग्राही पादं जग्राह दक्षिणम् ॥२३॥
ततस्तां स महाबाहुर्हनुमान्मारुतात्मजः ।
जले नयंतीं दृष्ट्वा तु नखैस्तीक्ष्णैर्व्यदारयत् ॥२४॥
निहता तत्क्षणे दिव्या आकाशेधिष्ठिताब्रवीत् ॥२५॥

हनुमंताच्या लत्ताप्रहाराने मगरीचा वध :

उदकपान हनुमंत । करावया उदकाआंत ।
रिघतांचि पाही तेथ । पायी त्वरित धरियेला ॥१५०॥
ब्रह्मशापे सबळ ग्राही । हनुमान धरिला दक्षिण पायी ।
येरु निधडा वीर पाही । भय नाही कोणाचे ॥५१॥
स्वभावे निधडा वीर । त्यावरी श्रीरामाचा किंकर ।
दमूं शके काळचक्र । ग्रह किंकर काय त्यापुढे ॥५२॥
करोनि श्रीरामनामें भुभुःकार । पाय आंसुडितां सत्वर ।
कडे पडली वेगवत्तर । दिव्य शरीर लाधली ॥५३॥
कपटें करोनि सर्वथा । श्रीरामभक्ताचे पाय धरिता ।
कळिकाळाते हाणोनि लाता । शापनिर्मुक्तता सत्संगें ॥५४॥
दंडकसुत उद्धत झाला । शापे राक्षसत्व पावला ।
तो अंगदथापा हाणितला । तत्काळ केला निर्मुक्त ॥५५॥
दक्षशाप नारदासी । दोन मुहूर्त स्थिर न राहसी ।
तो द्वारके राहे वर्षानुवर्षीं । सत्संगासीं शाप न बाधे ॥५६॥
जळचर ग्राही शापदग्ध । लागता हनुमंताचे पद ।
नखाग्रें झाली शुद्ध । सुख अगाध संतचरणी ॥५७॥
लागता कपीचे नखाग्र । सांडिलें शापजन्य शरीर ।
लाहोनि अवयव सुंदर । गगना सत्वर उसळली ॥५८॥
अंतरिक्ष गगनांतरी । राहूनि बोलत सुंदरी ।
विजयी होई कपिकेसरी । निरंतरी रामप्रेमें ॥५९॥

मां विजानीह्यप्सरसं विद्युन्मालेति विश्रुताम् ।
गच्छंत्याकाशमार्गेण स्वर्भानोर्दीप्तविग्रहा ॥२६॥
इह मे वसतिर्भद्र वर्षाणामयुतं शतम् ।
उक्ता च तेन ऋषिणा दीप्तक्रोधेन मानद ॥२७॥
अवज्ञातो मया शक्रस्तेनाहं पतिता भुवि ।
गच्छ ग्राही भवस्वेति शप्ताहं तेन वानर ॥२८॥
यदा वीरं हनूमंतं गृहीष्यसि जलेचरा ।
तदा शापाद्विमोक्षस्ते भविष्यति न संशयः ॥२९॥
दिष्ट्या त्वमिह संप्राप्तः शापाच्चैव विमोक्षिता ॥३०॥

अप्सरेचे शापमुक्ती कथन व हनुमंताचे अभिनंदन :

कर जोडोनियां वंदन । करोनी विनवी हनुमान ।
मी विद्युन्मालिनी अप्सरा जाण । स्वर्गभूषण स्वर्गींचे ॥१६०॥
सूर्यप्रभेसम विमान । करोनी विचरता गगन ।
भास्करें क्षोभोनियां जाण । ऋषिआश्रमीं विमान पाडिले ॥६१॥
तेणे क्षोभले मुनीश्वर । क्रोधा चढले दुर्धर ।
न विचारिसी पात्रापात्र । कामाचार विचरसी ॥६२॥
महाग्राह जैसा कोणी । येवोनि झोंबे दाटुनी ।
तैसी आलीसी धांवोनी । आश्रम लक्षोनी पापिणी ॥६३॥
ग्राहाऐसी धांवसी । ते तू महाग्राही होसी ।
ऐसे शापिले वेगेंसी । तेणे ग्राहत्वासी पावले ॥६४॥
त्यासी होवोनि शरणागत । म्या प्रार्थिले ते महंत ।
रवीसीं म्या केले उद्धत । दंड तदर्थ मज झाला ॥६५॥
साधूसीं जो करी छळण । अथवा करी उद्धतपण ।
किंवा करी जो हेळण । तत्काळ पतन तो पावे ॥६६॥
नव्हती पुराणींच्या कथा । माझा अनुभव प्रत्यक्ष आता ।
जे उपेक्षिती साधुसंता । त्यासी खस्ता रोकडी ॥६७॥
ऐसे विनविता ऋषिजन । तिंही होवोनी प्रसन्न ।
मज दिधले वरदान । तुझे उद्धरण हनुमंते ॥६८॥
तू राहोनि जळवासी । धरिसी कपीच्या पायांसी ।
स्पर्श होता सज्जनासीं । तेणे उद्धरसी सत्संगें ॥६९॥

न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनंत्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥३१॥

सत्संगास्तव पाही । संसार तरती ते देही ।
इतर शाप बापुडे कायी । मुक्त होईजे सत्संगें ॥१७०॥
तैपासून मी येथ । वर्षे अयुत अयुत ।
होते मी तुझी वाट पाहत । झाले निर्मुक्त तुझेनि आजि ॥७१॥
जन्ममरणावस्था । मज नाही गा सर्वथा ।
म्हणोनि कळिकाळा हाणोनि लाता । स्वरुपता पावले ॥७२॥
आपुले निजसुख पाही । निरोपावें सद्‍गुरुपायीं ।
ते मी लाधले सर्वही । झाले उतराई भवश्रमा ॥७३॥
सद्‍दुरुची स्थिती ऐसी । स्वये अनुभवणें ज्या सुखासी ।
तेंचि पावे शिष्यासीं । न्यूनाधिकासी न करोनि ॥७४॥
पित्याचे समस्त वित्त । पत्र स्वामित्वें अंगीकारित ।
तैसे सद्‍गुरुसुख समस्त । शिष्य आक्रमित भावार्थे ॥७५॥
अजातपक्ष्याची जाति पाही । नेणे माउलीवांचून कांही ।
मुख पसरोनी सर्वही । ग्रास अवघाही झेलित ॥७६॥
तेही तैसेंचि प्रेमे तेणे । विसरोनि आपुलें खाणे ।
सगळा घांस बाळका देणे । बाळकाकारणे अवंचक ॥७७॥
तूंचि माझा ईश्वरु । तूंचि माझा सद्‌गुरु ।
मज दीना उद्धारु । केला साचार तुवा एके ॥७८॥
संसारसागरीं बुडता । सद्‌गुरुवांचूनि तत्वता ।
आन नाही सोडविता । सत्य वार्ता हे माझी ॥७९॥
तुवा एकलेनि एके । उद्धरली ब्रह्मांडें अनेके ।
तेथे मजसारिखीं रंकें । कोणे लेखे लेखावीं ॥१८०॥
भवसागरीं तारक । जगी तू एकला एक ।
तुजवांचूनि आणिक । न दिसे देख त्रिजगती ॥८१॥
एका जनार्दनाचें रंकें । अंध पंगु दीन मुके ।
देखोनिया एकाएकें । सत्वर देख आलिंगी ॥८२॥
नाम एक रुप एक । वर्णाश्रमधर्म एक ।
जगी जनार्दन एक । नाम तारक त्रिजगती ॥८३॥
एका जनार्दना शरण । करोनि अप्सरा स्तव ।
सांगो पाहे पुढील चिन्ह । सावाधान परिसावे ॥८४॥
सज्जनांचा स्वभाव पूर्ण । दीनदयाळु चातकघन ।
अनाथासी देखता जाण । घेती धांवोन उचलोनि ॥८५॥
गोड लागे निजमानसी । ते वंचोनि स्वगोत्रासी ।
नेदोनि स्त्रीपुत्रासी । अनाथासी अर्पित ॥८६॥
यापरी मी अनाथ । भवदरिद्रें होतो पीडित ।
एका जनार्दनी येथ । केला सनाथ त्रिजगती ॥८७॥
जाले अप्सराउद्धरण । पुढे काळनेमीचें मर्दन ।
एका जनार्दना शरण । गोड निरुपण उरले असे ॥१८८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अप्सराउद्धरणं नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥
ओंव्या ॥१८८॥ श्लोक ॥३१॥ एवं ॥२१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग