॥ श्रीएकनाथमहाराजकृत
60.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय साठावा ॥
रावणाने रामांचा ध्वज तोडला
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मातलीचे रथासह आगमन व श्रीरामांना वंदन :
मातलि सारथि विचक्षण । घातले इंद्रा लोटांगण ।
येरें देता आज्ञापन । करी संयोजन रथाचे ॥१॥
रावण दुरात्मा चांडाळ । बंदी घातले सुर सकळ ।
तेणे अत्यंत तळमळ । लागली प्रबळ मातलीसी ॥२॥
आपुला स्वामी सुरपती । सेवा घेतो त्याचे हाती ।
तेथे येराची कवण गती । लंकापति भला नव्हे ॥३॥
तेणे क्रोधे करोनि जाण । केले रथसंयोजन ।
शस्त्रास्त्रे सकळ भरुन । सामग्री दारुण घातली ॥४॥
कवचें खड्गें अत्य्द्भुत । मंत्र तंत्र क्रियायुक्त ।
रणसामग्री समस्त । रथ त्वरित सिद्ध केला ॥५॥
आज्ञा पुसोनि इंद्रासी । मातली निघाला वेगेंसीं ।
ठाकून आला शीघ्रतेसीं । मृत्युलोकासीं रणभूमी ॥६॥
हाती घेवोनि धनुष्यबाण । रणी उभा रघुनंदन ।
तंव इंद्राचा रथ घेऊन । मातलि आपण तेथे आला ॥७॥
देखोनि श्रीरामासी । सुख झाले मातलीसी ।
आनंद भरला सर्वांसी । निजोल्लासीं डुल्लत ॥८॥
पाहता श्रीरामाकडे । यम काळ ते बापुडे ।
रावण दहा तोंडांचें किडे । बाणझडाडें मरेल ॥९॥
हे निश्चित माजे वचन । तथापि स्वामीचे आज्ञापन ।
श्रीरामासी रथनिवेदन । करोनि रावण मारावा ॥१०॥
श्यामकर्ण अति शोभत । श्वेत वारुवीं जुंपिला रथ ।
विचित्राभरणीं अति मंडित । वारु गर्जत शत्रुनिधने ॥१९॥
चाकें नीळाचीं अति कठिण । सुवर्णबंदी शोभायमान ।
आंख वज्राचा सुलक्षण । रथचक्री पूर्ण बोलिला ॥१२॥
धुरा वैडूर्याच्या सुरखा । सांटा पाचुबंदी नेटका ।
मरकताचा ध्वज देखा । लोला पताका शोभती ॥१३॥
ज्वाळमाळाकिंकणी । घंटा वाजती गजरें करोनी ।
खणणिला रत्नाभरणीं । श्रीरामालागूनी आणिला ॥१४॥
तं रथं समुपादाय मातलिः शक्रसारथिः ।
अभ्यद्रवत काकुत्स्थमवतीर्य त्रिविष्टपात् ॥१॥
अब्रवीदग्रतो रामं सप्रतोदो रथे स्थितः ।
प्रांजलिर्मातलिर्वाक्यं सहस्त्राक्षस्य सारथिः ॥२॥
सूर्यप्रभेसमान । सायुध रथ सांगत्राण ।
मातलि घेवोनि आला जाण । रघुनंदन जेथे होता ॥१५॥
हाती आसूड वागोरी असता । रथाखाली नुतरतां ।
नमन केली रघुनाथा । अति चतुरता सारथ्याची ॥१६॥
मातलीचे निवेदन व युद्धसाहित्य समर्पण :
सारथ्याची धर्म ऐसा आहे । रणामाजी निघोनि पाहे ।
साश्वरथ सोडूं नये । नमिता होये वरुनचि ॥१७॥
ऐक स्वामी रघुनाथा । तुझा अवतार सुरकार्यार्था ।
वधावया लंकानाथा । रणा तत्वता आलासी ॥१८॥
देव घातले बांदवडी । देखोनि त्यांची करुणा गाढी ।
धांविन्नलासी निजप्रौढी । अति कडाडीं रघुनाथा ॥१९॥
रणामाजी लवडसवडी । निवटिल्या राक्षसकोडी ।
नाचविली रणधांगडी । अर्धघडी न लागता ॥२०॥
आता निवटिल्या रावण । मग आमचें कार्य कोण ।
साह्य न होऊंचि रघुनंदन । सहस्रनयना अति लज्जा ॥२१॥
म्हणोनि दास्यालागीं तत्वता । रथ पाठविला रघुनाथा ।
यावरी बैसोनियां आता । लंकानाथा निवटावें ॥२२॥
रावण रथी राम पदाती । हे न साहेचि देवांप्रती ।
म्हणोनिया रघुपती । रथ तुजप्रती पाठविला ॥२३॥
तुज न लागे रथ सारथी । निजांगें करोनि ख्याती ।
निवटावया लंकानाथाप्रती । निमेषगती लागेना ॥२४॥
ऐसे जाणतसों सकळिक । तरी इंद्र सेवेलागीं देख ।
रथ पाठवी सुरनायक । बैसोनि दशमुख निवटावा ॥२५॥
तुज विजयालागीं रघुपती । सकळ शस्त्रास्त्रसंपत्ती ।
पाठविली अमरपती । लंकापती निवटावया ॥२६॥
इदमैंद्रं महाचापं कवचं चाग्निसन्निभम् ।
शराश्चादित्यसंकाशाः शक्तयो विमलाः सिताः ॥३॥
आरुह्य च रथं राम राक्षसं जहि रावणम् ।
मया सारथिना सार्धं महेंद्र इव दानवान् ॥४॥
हे घे इंद्राचे महाधनुष्य । शत्रुनिर्दळणीं कर्कश ।
ओढी काढोनि सावकाश । दशमुखास निवतावें ॥२७॥
अग्निप्रभेसमान जाण । हे घे अंगत्राण ।
आंगी घालोनि आपण । शत्रुनिर्दळण करावे ॥२८॥
सूर्यप्रभेसमान शूर । रुक्मपुंखी सपरिकर ।
चापीं सज्जोनि वेगवत्तर । दशवक्त्र निवटावा ॥२९॥
अति मोहका विमलशक्ती । रणी दुर्धर शत्रुघाती ।
तुज पाठविल्या अमरपती । रघुपति महावीरा ॥३०॥
मजसमवेत रघुपती । बैसोनियां इंद्ररथीं ।
महेंद्र निवटी दानवपंक्ती । तेंवी लंकापती निवटावा ॥३१॥
रामाची मनःस्थिती, बिभीषणाची विनंती :
ऐकता मातलीचें वचन । हांसोनि बोले रघुनंदन ।
रथसारथियाचें कार्य कोण । मजलागून रणरंगी ॥३२॥
रावण बापुडे मशक । दहा मुखांचें किडे देख ।
त्यासाठी काय साधक । न लागता निमेख निवटीन ॥३३॥
म्हणोनि राम हास्यवदन । ते जाणोनिया चिन्ह ।
पुढे झाला बिभीषण । अति विचक्षण बोलका ॥३४॥
जाणे श्रीरामाचे बळ । रणसंग्राम रणशीळ ।
न लागता अर्ध पळ । राम निवटील रावणासी ॥३५॥
तरी इंद्राचे मनोगत । रक्षावें जी निश्चित ।
म्हणोनिया अति विनीत । स्वये प्रार्थित श्रीरामा ॥३६॥
करकमळ जोडूनि पाही । मस्तकांजळी लवलाही ।
लागला श्रीरामाच्या पायी । विनंती कांही परिसावी ॥३७॥
रथारुढ रघुपती । रणामाजी रणख्याती ।
करिता देखावा अति प्रीती । ऐसे चित्ती बहुतांचे ॥३८॥
राम अलंकारा भूषण । राम रथा रथगति जाण ।
सस्त्रास्त्रांचे मारकपण । स्वये आपण श्रीराम ॥३९॥
ज्यासी नाही नांवरुप । वेदांसी न कळे स्वरुप ।
तेणे आम्हांसाठी धरोनि रुप । भक्तसंकल्प पुरवित ॥४०॥
निजभक्तांचें मनोगत । संरक्षावे यथातथ्य ।
हे श्रीरामाचे निजव्रत । निश्चितार्थ वेदवाणी ॥४१॥
आपुले निजच्छंदे । निजभक्त कल्पिती विनोदें ।
तितुके अंगीकारी स्वानंदे । अद्वैतद्वंद्वें घेवोनी ॥४२॥
लाडकिया भक्तांची स्थिती । युक्तायुक्त नेणती ।
तरी अंगीकारी रघुपती । भक्तप्रीतीं भूलला ॥४३॥
अनावरासी अधिष्ठान । सर्वगतासी आवाहन ।
चिदंबरा प्रावरण । मूर्ख जन कल्पिती ॥४४॥
अधिष्ठानासी आसन । कल्पिती अबळ भक्तजन ।
तथापि लाजेना रघुनंदन । पीतवसन अंगीकारी ॥४५॥
श्रीरामा सकळांचा शेवट । त्यासीही कल्पिती कुकुट ।
आभाळासी मळवट । श्रवणपाठ अश्रोत्रा ॥४६॥
विश्वमुखासी संख्यात्मक । वाणीचें कल्पिती मुख ।
एक्या अवदाने तृप्ति देख । मानिती आवश्यक नित्यतृप्ता ॥४७॥
विश्वबाहूसी परिमित हात । विश्वहृदय हृदयी रिघत ।
स्रक् चंदनादि समस्त । भोग अर्पिती निजावडीं ॥४८॥
ज्यामाजी अनंत ब्रह्मांड खेळे । तो भक्तभावार्थमेखळे ।
माजी सकळा आकळे । निजभक्तलळे पाळित ॥४९॥
श्रीराम सकळांची गुह्यराशी । झांकावया त्याच्या गुह्यासी ।
पीतांबर अर्पिती प्रेमेंसीं । येरु आवेशी ओढित ॥५०॥
आचरण कल्पिती चरण । जे त्रिवेणीचे जन्मस्थान ।
तेथे घालिती वाणीचें जीवन । चरणक्षाळण करावया ॥५१॥
श्रीराम लेणियांचें लेणें । त्यासी देती रत्नभूषणें ।
त्या अंगिकारिसी प्रेमे जेणे । रथ भावे तेणे अंगिकारी ॥५२॥
सुग्रीव, अंगद आणि मारुती वगैरेंची विनंती :
म्हणोनि घातले लोटांगण । देखोनि राम हास्यवदन ।
वेगे उठोनि आपण । हृदयी धरोन आलिंगिला ॥५३॥
अति चतुर बोलका होसी । म्हणोनि धरिला पोटासीं ।
अंगीकारोनि वचनासी । आरोहणासी सरसावला ॥५४॥
तंव सुग्रीव राजा सुबुद्धी । अलंकार अर्पिले उदधी ।
ते आणिले तेच संधी । स्वामी हे आधी अंगीकारी ॥५५॥
तंव अंगदही उठावला । लोटांगण घालोनि वहिला ।
श्रीराम स्वये विनविला । ऐकावे बोला सकाळांच्या ॥५६॥
तव विनविले मारुती । जे विनविताती जुत्पती ।
ते ऐकावे रघुपती । वचन मानिती श्रीराम ॥५७॥
श्रीरामांचा अंगीकार व तेजस्विता :
अंगीकारोनि भूषणां । रथासी घालोनि प्रदक्षिणा ।
नमन करोनिया जाणा । केले आरोहणा रथावरी ॥५८॥
इत्युक्त्वा स परिक्रम्य रथं तमभिवाद्य च ।
आरुरोह रथं रामस्तदा लक्ष्म्या विराजयन् ॥५॥
ततोऽभवन्महद्युद्धं सर्वेषा रोमहर्षणम् ।
राघवस्य महाबाहो रावणस्य च रक्षसः ॥६॥
सालंकार रघुपती । बैसतांचि इंद्ररथीं ।
बाणली वीरश्री पुरती । दुर्धर शक्ती भासत ॥५९॥
वानरांचा आनंद व त्यांचे श्रीरामास वंदन :
प्रकास पडला सोज्ज्वळ । दिशा उजळल्या सकळ ।
उजळलें नभोमंडळ । सुर सकळ आनंदले ॥६०॥
रथचक्रांचा घडघडाट । वारुंचा वाजिन्नला साट ।
हाक फुतली अचाट । रजें अंबर कोंदले ॥६१॥
भारें मेदिनी दाटली । वराहाची दाढ तडकली ।
फडा शेषाची दडपली । लवविली मान कूर्मे ॥६२॥
होते सुरवरांचे चित्ती । ते संपादिलें रघुपती ।
आनंदमय झाली वृत्ती । तेणे डुल्लती आनंदें ॥६३॥
रणी विराजमान रघुपती । तेणे आनंदमय झाली वृत्ती ।
हनुमान येवोनि शीघ्रगती । जीवे रघुपती ओंवाळिला ॥६४॥
इटिमिटी घे बिभीषण । अंगदे केले निबलोण ।
सुग्रीवे येवोनियां जाण । श्रीरामचरण वंदिले ॥६५॥
नळ नीळ जांबवंत । जुत्पती हरिखले समस्त ।
पर्वत घेवोनि झेलित । रावणघात करावया ॥६६॥
श्रीरामांचे क्रोधाविष्करण :
युद्धी जिंकोनि परशुरामासी । रामे पाठवितां तपासी ।
क्रोध होता तयापासी । तो श्रीरामासी अर्पिला ॥६७॥
श्रीराम शांतीचे कल्याण । त्यासी क्रोध कैंचा जाण ।
परशुरामे अर्पिला आपण । तेणे रघुनंदन सक्रोध ॥६८॥
जमदग्नीच्या तपःसामर्थे । परशुरामाच्या पुरुषार्थे ।
अनुसरोनि श्रीरामाते । राक्षसनिधनातें खवळला ॥६९॥
तेणे क्रोधे रघुविर । दिसे जैसा काळग्निरुद्र ।
तैसा भासत भ्यासुर । दशवक्त्र निवतावया ॥७०॥
रामरावणांचे अस्त्र युद्ध :
तैसाच रावण महावीर । क्रोधे खवळला दशवक्त्र ।
सिंहनादे गर्जे थोर । रहंवर प्रेरिला ॥७१॥
पाचारोनि श्रीरामासी । बाण वर्षला वेगेंसी ।
मेघीं आच्छादिलें पर्वतासी । तेंवी श्रीरामासी झांकिलें ॥७२॥
श्रीरामे करोनिया लाघव । बाणे बाण निवारिले सर्व ।
तेणे क्षोभोनि दशग्रीव । मानी अपूर्व लघुवेग । ॥७३॥
मग विचारिलें मानसी । अहाच कळी न चले यासी ।
मग समंत्र अस्त्राते हातवसी । श्रीरामासी भिडवया ॥७४॥
अभिमंत्रोनि पन्नागास्त्र । रुक्मपुंख काढिले शर ।
संख्यारहित अनिवार । चापीं सत्वर सज्जिले ॥७५॥
ते सधान देखोनि दुरोनी । श्रीराम नेटका विंदानी ।
गरुडास्त्र योजिले गुणीं । केली भंगाणी पन्नगांची ॥७६॥
निरसोनि पन्नगांचे भार । गरुडे गिळिले विखार ।
झडपूं लागला निशाचर । करीत संहार सैन्याचा ॥७७॥
राक्षसमुंडें धरणीहूनी । गरुड खुडोनि ने गगनी ।
चकित झाला दशाननी । अभिनव करणी देखोनी ॥७८॥
अत्यंत क्षोभला लंकापती । अग्निशस्त्र काढिले निगुतीं ।
अभिमंत्रोनि मंत्रोक्ती । लाविले सीती अति वेगे ॥७९॥
गुणीं ओढोनि कानाडी । बाण सोडिता झडाडी ।
डोळियां पडली झांपडी । अग्नि धडाडी देखिला ॥८०॥
भडके उठले प्रबळ । ज्वाळीं व्यापिले अंतराळ ।
गरुड जाळिले सकळ । अग्नि प्रबळ खवळला ॥८१॥
शिखा वाढल्या अलोलिक । जाळूं पाहती सत्यलोक ।
ते देखोनि रघुकुळटिळक । सत्वर देख सरसावला ॥८२॥
भडभडा जळती वानर । ते स्मरती श्रीरामचंद्र ।
सैन्य निमाले समग्र । अझूनि विचार तो कायी ॥८३॥
म्हणोनि खवळला रघुपती । कंकपत्री बाण निगुतीं ।
काढोनि लाविला सीतीं । मंत्रशक्तीसमवेत ॥८४॥
बाणी योजिले पर्जन्यासी । क्षणे विझविलें अग्नीसी ।
त्याहीमाजी युक्ति कैसी । वानरांसी उल्हास ॥८५॥
अमृतवृष्टि वानरा । तेचि राक्षसा वज्रधारा ।
श्रीराम लाघविया खरा । वानरभारा वांचविलें ॥८६॥
एकेचि संधानें रघुपती । नवल केली युद्धख्याती ।
एका मुक्ति एका विश्रांति । समान प्राप्ती अरिमित्रां ॥८७॥
पर्जन्यवृष्टि वज्रधारा । तेणे मोक्ष निशाचरां ।
तेचि अमृतवृष्टी वानरा । नवल रघुवीराचे करणे ॥८८॥
नाम स्मरतां रघुवीर । ताप निमाला समग्र ।
वानर विश्रांति बाह्यांतर । करीत भुभुःकार ऊठिले ॥८९॥
भुभु या शब्दाचा अर्थ । पुनः पुनः रघुनाथ ।
अनिमेषें जे स्मरत । ते नित्यमुक्त संसारी ॥९०॥
त्यांसी वर्तती देहगेहीं । संसारभय अणुमात्र नाही ।
सकळ विषयांच्या ठायी । निर्विषय पाही विचरत ॥९१॥
हा वानरांचा निश्चय पूर्ण । म्हणोनिया रामस्मरण ।
अहर्निशी करिता जाण । क्षण क्षण सावध ॥९२॥
येरीकडे रावणकटक । पर्जन्यें निमाले सकळिक ।
वज्रपाय थेंबुटा एकैक । लागता देख निमतातई ॥९३॥
ऐसे बहुसाल सैन्य मरता । अति चिंता लंकानाथा ।
जे ते शस्त्र जाते वृथा । श्रीरघुनाथा केंवी जिंको ॥९४॥
रावणाने वाय्वस्त्र सोडल्यावर मारुतीचे वायूला आव्हान :
अति वृष्टि व्हावया दूरी । रावण वाय्वस्त्र प्रेरी ।
हाक देवोनि दशशिरी । रणामाझारीं गर्जत ॥९५॥
मेहुडें उडालें तत्काळ । वायु सुटला प्रबळ ।
उडवित आला वानरदळ । गोळांगूळ त्रासिले ॥९६॥
दोही डोळा भरली धुळी । गात्रें कांपती चळचळीं ।
नेट न धरवे पायांतळी । वानर अंतराळीं उडविले ॥९७॥
आवर्त सुटला भारी । वानर भ्रमती गगनांतरी ।
ते देखोनि कपिकेसरी । कोपेंकरी खवळला ॥९८॥
करोनि नामाचा भुभुःकार । पुढे होवोनि हनुमान वीर ।
पितृस्नेहें कळवळिला थोर । काय उत्तर बोलत ॥९९॥
वायु हनुमंताचा पिता । तेणे त्यासी तो म्हणे ताता ।
वैभव नेणता रघुनाथा । निजघाता पावसी ॥१००॥
श्रीरामे सोडोनियां बाण । उडविलें शून्याचें शून्यपण ।
तेथे तुम्हांसी वांचवी कोण । गमनागमनसंचार ॥१॥
तू आमुचा निजपिता । म्हणवोनि भीड रघुनाथा ।
नाही तरी करिता तुझ्या घाता । क्षणही तत्वता लागेना ॥२॥
ताता पूर्वसंकल्प तुझा । जे सेवेलागीं रघुराजा ।
युद्धी भिडता राक्षससमाजा । प्रतिकूळ सहजा मी त्यासी ॥३॥
ते तू नाठविसी जरी । श्रीरामाच्या बाणदारीं ।
तुझी होईल बोहरी । क्षणमाझारी प्रभंजना ॥४॥
वायुचे उपशमन व प्रतिक्रिया :
ऐकता हनुमंताचे उत्तर । मंत्रदेवता वेगवत्तर ।
येवोनि नमिला रघुवीर । फिरली सत्वर रावणावरी ॥५॥
सोडून वानर सकळ । आकळिले राक्षसदळ ।
आवर्त सुटला सबळ । प्राणांत केवळ मांडला ॥६॥
वायुबळें सबळ प्राण । तो वायु क्षोभला आपण ।
आता राक्षसा राखे कोण । दशानन सचिंत ॥७॥
उफराटे झाले कोडे । माझींचि शस्त्रे मजकडे ।
फिरोनियां वाडेंकोंडे । सैन्य निवाडे निवटीत ॥८॥
ते देखोनि श्रीरामासी । हांसों आले निजउल्हासीं ।
अतर्क्य युक्ति हनुमंतासी । म्हणोनि पोटेंसीं धरियेला ॥९॥
रावणाचे आश्चर्य व पर्वतास्त्रप्रयोग :
येरीकडे वीर रावण । मरता देखोनिया सैन्य ।
वायु निवारावया आपण । पर्वतास्त्र पूर्ण आड घाली ॥११०॥
तेणे बुजोनि सांडिला वारा । सावध करिता निशाचरा ।
श्रीराम लाघविया खरा । योजिले वज्रास्त्रा विनोदे ॥११॥
श्रीराम वज्रास्त्र आणि विषुचिका सोडतात :
सोडूनि विषूचिकास्त्र । त्यांत योजिले वज्रास्त्र ।
वज्रे पर्वत करोनि चूर । रणी समग्र त्रासिले ॥१२॥
विषूचिकेचें बळ दुर्धर । घोळसिला राक्षसभार ।
तरळा झालिया वेगवत्तर । वीरे वीर पडियेले ॥१३॥
त्याचे परिणम :
हागी ओकी सुटली रणी । वीर सरती दोही वदनी ।
वस्त्रे घाणती पोहणीं । उठली घोंगाणी रणरंगी ॥१४॥
एक गडबडा लोळती । एक डोळे वटारिती ।
एक हात पाय ताणिती । सकळ जुत्पती हांसती जेव्हा ॥१५॥
हांसतसे बिभीषण । हांसतसे लक्ष्मण ।
हांसतसे वायुनंदन । नवल काय श्रीरामी ॥१६॥
हरिखल्या वानरकोडी । राम निजयोद्धा निजगडी ।
रणी नाचविली रणधांदडी । राक्षसकोडी निवटिल्या ॥१७॥
तेणे खळवळिला रावण । ते विषूचिका धांवोन ।
वेगी आली ठाकून । दशानन जेथे होता ॥१८॥
तेणे झाला वमनोद्गार । ताणताती वीसही नेत्र ।
वमनउसळीची धार । लागली थोर दशमुखा ॥१९॥
विकळ होता दशानन । वेगे स्मरला त्रिनयन ।
तेणे विषुचिका निरसोन । केले सावधान रावणा ॥१२०॥
उभयतांचे झालेले अस्त्रयुद्ध :
सवेंचि खवळोनी दशशिर । एके वेळे शस्त्रसंभार ।
वर्षता झाला अपार । श्रीरघुवीर लक्षोनी ॥२१॥
दंडास्त्र आणि खंडास्त्र । वितंडास्त्र आणि प्रचंडास्त्र ।
घातनास्त्र आणि पातनास्त्र । दशवस्त्र वर्षला ॥२२॥
एके वेळे शस्त्रकल्लोळ । रणी उठला हलकल्लोळ ।
खळबळिलें वानरदळ । प्रळयकाळ मांडला ॥२३॥
शस्त्रे कडाडिलीं आकाशी । अग्निज्वाळा ।
दशदिशी । प्रळय मांडिला सकळांसी । अंतकासी आकांत ॥२४॥
वानर पळती दशदिशा । एकाचा दाटला घसा ।
एकी सांडियेला धिंवसा । रणी लंकेशा देखोनी ॥२५॥
घालिती येरयेरा मिठी । झोंबती हनुमंताचे कंठी ।
आम्हा सोडवी रणसंकटी । प्राण कंठी उरलासे ॥२६॥
जरी प्रार्थू श्रीरामासी । तरी भीड न वचे आम्हांसी ।
प्रार्थोनिया राघवासी । अस्त्रघातासी निवारीं ॥२७॥
ऐसे बोलोनि वानरवीर । भयातुर झाले समग्र ।
मिळोनि जुत्पती थोर थोर । देती धीर कपींसी ॥२८॥
ते देखोनि रघुनाथ । क्रोधे झाला पै कृतांत ।
निवारावया अस्रघात । लाघव करित ते ऐका ॥२९॥
संधानामाजी संधान । करिता झाला रघुनंदन ।
अस्त्रे अस्त्र निवारुन । धनुष्य जाण छेदिलें ॥१३०॥
अदंडें दंडिलें दंडासी । अखंडें खंडिलें खंडासी ।
संजीवनें घातनासी । अस्त्रे अस्त्रासी दंडिलें ॥३१॥
रावणशस्त्रें अति अवघड । वितंडास्त्र आणि प्रचंड ।
त्यावरी घातले अकांडकांड । केले खंडविखंड पै तेणे ॥३२॥
राम रावणाची धनुष्ये तोडतात :
राम धनुर्वाडा विचक्षण । दारुणास्त्रें निवारुन ।
रावणाचे धनुष्य जाण । न लागता क्षण छेदिलें ॥३३॥
अद्वैत साधोनि विंदान । पातनासी केले पतन ।
पतनी पडावया जाण । रितें गगन असेना ॥३४॥
तेणे तळमळी रावण । वृथा गेले अस्त्रसंधान ।
हातींचें छेदिलें धनुष्यबान । राम दारुण रणयोद्धा ॥३५॥
रागे दोनी हात चुरी । आणिक धनुष्य दिधले करी ।
ते छेदिलें झडकरीं । बाणधारी श्रीरामे ॥३६॥
आणीक धनुष्य आणवित । तेंही छेदी श्रीरघुनाथ ।
संख्या झाली शते शत । धनुष्यें समस्त वेंचिली ॥३७॥
तेणे तळमळी दशाननी । वाया गेली उग्र करणी ।
शंख करी दशवदनीं । राम रणी नाटोपे ॥३८॥
हरिखेला वानरभार । अवघे करिती भुभूःकार ।
स्वर्गी मिळोनी सुरवर । जयजयकार करिताती ॥३९॥
दुष्ट दुराचारी रावण । श्रीराम रणयोद्धा दारुण ।
अप्रतिम मल्ल दोघे जण । दोघे विचक्षण रणरंगी ॥१४०॥
त्यांचे पहावया रण । यक्ष गंधर्व सिद्ध चारण ।
स्वर्गी मिळाले सुरगण । पुष्पवृष्टी जाण तिही केली ॥४१॥
वानर नाचती पै रणी । उडती उलट्या किराणीं ।
श्रीराम विजयी रणांगणी । दशवदनी निवटिला ॥४२॥
अवघे करिती जयजयकार । नामे गर्जती वानर ।
तेणे दुखावला दशशिर । लाज थोर पै झाली ॥४३॥
रावण गुरुदत्त परिघाचा प्रयोग करितो :
दांत करकरा खात । रागे दोनी हात दुरित ।
परिग घेतला गुरुदत्त । लक्षून रघुनाथ हाणावया ॥४४॥
तंव गुरुचाही निजगुरु । राम परात्पर सद्गुरु ।
तयावरी शस्त्रसंहारु । मूर्ख दशशिर करु पाहे ॥४५॥
तरी नीतीची नीति रघुनंदन । राम शास्त्रीं शास्त्रार्थ पूर्ण ।
गुरुनाम ऐकता जाण । शस्त्रप्रहार आपण आवरिला ॥४६॥
जगद्गुरु जनीं जनार्दन । व्यापक गुरुनामे म्हणेन ।
ते ऐकता रघुनंदन । अवज्ञा हेळण न करीचि ॥४७॥
जेथे गुरुआज्ञापरिपाळण । तेथे सर्वदा विजय पूर्ण ।
गुरु संरक्षिता आपण । निजगणा विघ्न शिवों नेदी ॥४८॥
देवादिकांना चिंता : परिघ सोडिता रावण । कडाडिलें त्रिभुवन ।
आकांतले सुरगण । विमाने तुटोन पडों पाहती ॥४९॥
उमा शंकरातें आकळी । दिग्गजांची बैसलीं टाळीं ।
प्रळयकाळा दांतखिळी । झांपडी पडली सुरसिद्धा ॥१५०॥
इतुके देखोनि विंदान । उगाच पाहतो रघुनंदन ।
गुरुअवज्ञा न करीच जाण । शस्त्रे दारुण असतांही ॥५१॥
परिघ येवोनि तत्वता । ओवाळोनि रघुनाथा ।
ध्वजीं आदळोनि अवचितां । पडिला खालता आज्ञाबळें ॥५२॥
परिघ ज्ञाता संपूर्ण । उभयआज्ञा संरक्षण ।
इंद्राचा ध्वज छेदून । तळी आपण पडियेला ॥५३॥
तंव झाला हाहाकार । खळबळिला वानरभार ।
सुरवरा आकांत थोर । चिंतातुर सहस्राक्ष॥५४॥
सकळीं संतोष मानिला होता । राग निवटील लंकानाथा ।
बंदिमोचन समस्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥५५॥
ते झाले वाताहत । परिघ पातला कंदन करित ।
केंवी वांचेल रघुनाथ । थोर आकांत सकळिका ॥५६॥
ध्वज तोडोनियां तरी । परिघ परतो हा झडकरी ।
श्रीराम वांचे जीवे जरी । तरी मारील रावणा ॥५७॥
श्रीराम रणदिवाकर । रणी उगवता प्रकाशकर ।
रावणराहु वेगवत्तर । येवोनि सत्वर गिळियेला ॥५८॥
आमची पुण्यसामग्री जितकी । श्रीरामा पावों असकी ।
राम पडिला रावणमुखीं । तो एकाएकी सुतावा ॥५९॥
ऐसे झाले चिंतातुर । तंव परिघें वेगवत्तर ।
नमियेला श्रीरामचंद्र । अस्त्रा अस्त्र श्रीराम ॥१६०॥
राम शस्त्रास्त्रांचें निज । राम मंत्रांचें निजबीज ।
राम वीराधिराज । राम सहज परब्रह्म ॥६१॥
परिघाचे श्रीरामांस नमन :
राम चैतन्याची मूर्ती । राम शस्त्राची मारक शक्ती ।
तो राम असता रथी । रावण ते किती बापुडे ॥६२॥
परी कृपाळु भक्तजना । खेळवीतसे रावणा ।
हावभरी जाणा । दशवदना निवटील ॥६३॥
एका जनार्दना शरण । श्रीरामरथींचा ध्वज जाण ।
वेगे छेदोनि रावण । करीत गर्जन ऊठिला ॥१६४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रघुनाथध्वजच्छेदनं नाम षष्टितमोऽध्यायः ॥६०॥
ओंव्या ॥१६४॥ श्लोक ॥६॥ एवं ॥१७०॥
