॥ श्रीएकनाथमहाराजकृत
22.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बाविसावा ॥
वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कुंभकर्ण नारदाची उक्ती सांगतो :
नारदसंवाद–लक्षण । समूळ मूळीचें रामायण ।
रावणासी कुंभकर्ण । स्वये आपण सांगत ॥१॥
शृणुष्वेदं महाराज मम वाक्यमरिंदम ।
यदर्थं तु पुरा सौम्य नारदाच्छुतवानहम् ॥१॥
षण्मासाद हमुत्थायअशित्वा भक्ष्यमुत्तमम ।
नच तृप्तोऽस्मि राजेंद्र ततोऽहं प्रस्थितो वने ॥२॥
बहूनि भक्षयित्वाहं सत्वानि विविधानि वै ।
भुवत्वा चाप्रीणनं कृत्वा शिलातलमुपाविशत ॥३॥
शत्रुदमनीं अति समर्था । ऐके बापा लंकानाता ।
नारदमुखें मी ऐकिली कथा । सावधानता अवधारी ॥२॥
कुंभकर्ण – नारद भेट :
सहा मासां मज जागेपण । खातां उत्तम अन्नपक्वान्न ।
तृप्ती न पवेचि संपूर्ण । मग मी आपण वना गेलो ॥३॥
जावोनिया वनाप्रती । भक्षितां जींव नानाजाती ।
तेणे मज जाली तृप्ती । अति विश्रांती पावलों ॥४॥
अति विस्तीर्ण शिळातळ । वरी छाया सुशीतळ ।
तेथे बैसलो मी निश्चळ । नभोमंडळ निरीक्षोनि ॥५॥
तंव ब्रह्मवीणाझणत्कार । करीत रामनामाचा गजर ।
येता नारदमुनीश्वर । नभी स्तवर म्या देखिला ॥६॥
दिव्य चंदनाची उटी । त्रिपुंड्र रेखिला ललाटीं ।
दिव्य वनमाळ कंठी । स्वानंदपुष्टीं डुल्लत ॥७॥
शिलातलस्थोऽपश्यं वै नारदं शशिसमप्रभम् ।
आकाशेन दुतं यांतं मां च दृष्ट्वा स तु स्थितः ॥४॥
अवतीर्णश्च सहसा मया चैवाभिवादितः ।
उपविष्टः शिलायां तु ततोऽहं तु तमब्रुवम ॥५॥
कुत आगम्यते ब्रह्मन्कुतो वा प्रतिगम्यते ।
एवमुक्तो महाराज नारदो मामुवाच ह ॥६॥
देवानाभालयं मेरुं गतोऽहं देवसंसदि ।
युष्मत्तो भयभीतानां समाजस्तत्र सम्बभौ ॥७॥
मेरुपर्वतावर झालेल्या देवसभेचा वृत्तांत :
तपस्तेजें देदिप्त । तेजे शशिसूर्य लपत ।
नारद नभोमंडळी येत । अकस्मात देखिला ॥८॥
मज नारदे देखोनि नयनी । क्षणैक स्थिरावला गगनी ।
सवेंचि उतरोनि अवनी । आला मुनि मजपासीं ॥९॥
मग म्या उठोनि आपण । मुनीस घातले लोटांगण ।
मस्तकी वंदोनियां चरण । शिळातळीं बैसविला ॥१०॥
शिळातळी बैसविल्या जाण । मुनीसी म्या पुसिला प्रश्न ।
कोठोनि तुमचे आगमन । पुढारे गमन ते कोठे ॥११॥
ऐसा पुसतां प्रश्न । नारद हांसे गदगदोन ।
मग साक्षेपे आपण । सकारण गुज सांगे ॥१२॥
मेरुगिरीवर देवसभेंत । तुमचेनि भये भीत ।
समाज मिळाला समस्त । रावणांतउपाय ॥१३॥
देव दानव मानव । यक्षोरग ऋषि गंधर्व ।
ब्रह्मा विष्णु सदाशिव । सर्व समुदाय मिळाला ॥१४॥
मंत्रं संमंत्रिरे तत्र वधे रक्षः कुलस्य च ।
देवराजो निबद्धश्च यमः संख्ये पराजितः ॥८॥
जितौ तु सबलौ संख्ये कुबेरवरुणावपि ।
यज्ञा विध्वंसिताः विध्वंसिताः सर्वे धर्मिष्ठाश्च हता नृपाः ॥९॥
देवोद्यानानि भग्नानि स्त्रियो नीता यथेप्सितम् ।
चिंतयध्वं वधोपायं रावणस्य दुरात्म्नः॥१०॥
एवमुक्ते तु वचने ब्रह्मा देवानुवाच ह ।
अवध्यत्वं मया दत्तं दैवदैत्यैश्च राक्षसैः॥११॥
मानुषेभ्यो भयं तस्य वानरेभ्यश्च देवताः॥१२॥
रावणाच्या अतिक्रमणाबद्दल देवांच्या सभेत वाटाघाट :
तेथे मिळोनि देवसमुदाय । रावणवधाचा उपाव ।
मुख्य रावणाचा अन्याव । साभिप्राव तो ऐका ॥१५॥
मुख्य इंद्र घातला बांधवडी । आणीक देव तेहतीस कोडी ।
कुबेर जिंतला रणधांदडीं । केलीं बापुडीं यमवरुणें ॥१६॥
विध्वंसिले याज्ञिक यज्ञ । मारिले धार्मिक जन ।
मारिले अग्निहोत्री ब्राह्मण । अन्याय संपूर्ण लंकेशा ॥१७॥
चैत्रवन नंदनवन । विध्वंसूनि देवोद्यान ।
येणे वाढविलें अशोकवन । स्त्रियांसी रमण रमावया ॥१८॥
देवस्त्रिया असुरस्त्रिया । नागकन्या पद्मिनी प्रिया ।
बळेंचि आणिल्या धरोनिया । मुख्य अन्याया हे मूळ ॥१९॥
परदारांचें जे हरण । हाचि अन्याय अति दारुण ।
यालागी रावणाचे जे मरण । अवघे जाण चिंतिती ॥२०॥
तेथे बोलिला ब्रह्मदेव । माझ्या वचनाचा अभिप्राव ।
मिळाल्या सुरसमुदाव । तरी दशग्रीव अवध्य ॥२१॥
दारहरणकैवारा । करु आल्या नरवानरां ।
तत्काळ मरण दशशिरा । सत्य साचार ब्रह्मवाणी ॥२२॥
सुरासुरसमूहेऽपि वधस्तस्य विद्यते ।
तस्मादेष हरिर्देवः पद्मनाभस्त्रिविक्रमः॥१३॥
पुत्रो दशरथस्यास्तु चतुर्व्यहः सनातनः।
भवंतो वसुधांगत्वा विष्णोरस्य महात्मनः॥१४॥
वानराणां तनु धृत्वा सहायत्वं करिष्यथ ।
एवुमक्त्वा ततो ब्रह्मा तत्रैवांतरधीयत॥१५॥
एतदाख्यातवान्मह्यं नारदो भगवानृषिः ।
यथातत्त्वमशेषण ततो यातः सुरालये॥१६॥
सोऽयं विष्णुः सुरैः सार्द्धं वानरत्वमुपागतैः ।
तन्मह्यं रोचते सीता रामाय प्रतिदीयताम्॥१७॥
नमस्व रामं राजेंद्र रक्ष चात्मानमात्मना।
योग्यश्च राघवो मित्रं संधिश्चैवोत्तमो भवेत्॥१८॥
ब्रह्मवराने सुरासुरी अवध्यता आणि वानर
मानवांकडुन रावण वध होईल असा वृत्तांत :
सुरासुरी अवध्यता । ब्रह्मवरदे लंकानाथा ।
नरवानर याच्या घाता । होय सांतता स्वयंभू ॥२३॥
पद्मनाभ विष्णु विख्यात । तो होईल दशरथाचा सुत ।
रामलक्ष्मणशत्रुघ्न भरत । व्यूह चतुर्थ पुरुषार्थे ॥२४॥
रणी गांजावया दशशिर । सकळ जे का सुरवर ।
होती दुर्धर वानरभार । निशाचर मारावया ॥२५॥
वानर साह्य श्रीरामासी । श्रीराम रक्षिता वानरांसी ।
ऐसे ब्रह्मयाने देवांपासी । निश्चयेंसी नेमिलें ॥२६॥
मिळोनिया वानरभार । रणी मारिती निशाचर ।
श्रीराम मारील दशशिर । सबधुंपुत्र ससैन्य ॥२७॥
परम कपटी इंद्रजित । अभिचारी निकुंभळेआंत ।
त्याचा सौमित्री करील घात । निजपुरुषार्थप्रतापें ॥२८॥
नरवानर मिळोन । करितील राक्षसा निःसंतान ।
ऐसे विरंचिवरदान । ब्रह्मवचन नव्हे मिथ्या ॥२९॥
वर वदोनियां स्पष्ट । ब्रह्मा जाला अदृष्ट ।
ते हे नरवानर सुभट । आले यथेष्ट लंकेसी ॥३०॥
रामांना सीता परत करुन शरण जावे
अशी कुंभकर्णाची रावणाला सूचना :
आमच्या नाशासी कारण । समुद्री तरती पाषाण ।
रावणा निश्चयेंसी जाण । आले मरण आम्हांसी ॥३१॥
मिथ्या न होय नारदवचन । जाले प्रत्यक्ष प्रमाण ।
ते हे वानर जाण । आले गर्जोन लंकेवरी ॥३२॥
राक्षस मरती कपि न मरती । तुवांचि सांगितले मजप्रती ।
काळ साह्य रघुनाथीं । जाण निश्चिती लंकेशा ॥३३॥
श्रीराम परमात्मा ब्रह्ममूर्ती । विरोध न करावा त्याप्रती ।
त्यासी अर्पून सीता सती । सुखसंवित्ती भोगावी ॥३४॥
राक्षस मरती कपि न मरती । हे आत्मत्वाची निजप्रातीती ।
समुद्री पाषाण तरती । दुजी प्रतीती ईश्वरत्वाची ॥३५॥
जेणे भंगिले शिवचाप । त्यासी न चले गा प्रताप ।
देखता विरोधे श्रीरामरुप । येतो चळकांप सर्वांगी ॥३६॥
श्रीरामासी करिता रण । प्रणांते जालासी क्षीण ।
रणी रामे दिधले जीवदान । त्यासी का शरण न रिघावे ॥३७॥
आत्मसत्ता ईश्वरसत्ता । नित्य अधीन श्रीरघुनाथा ।
त्यासी न ये विरोध करिता । अर्पून सीता करी सख्य ॥३८॥
घालोनिया लोटांगण । सीता करोनि रामार्पण ।
श्रीरामासी रिघाल्या शरण । सुखसंपन्न सर्वदा ॥३९॥
श्रीरामासी रिघोनि शरण । मुख्यत्वें वांचवीं निजप्राण ।
तोचि सकळ कुळा संरक्षण । आमचेंही मरण चुकेल ॥४०॥
श्रीरामासी रिघाल्या शरण । स्वप्नी नाही जन्ममरण ।
विघ्नाचें होय निर्विघ्न । सुखसंपन्न सर्वदा ॥४१॥
सती श्रीरामाची सीता । स्वये श्रीरामासी अर्पिता ।
तुज संदेह कोण लंकानाथा । विरोध वृथा का करिसी ॥४२॥
कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
तूष्णींभूतश्चितयित्वा ततो वाक्यमुवाच ह ॥१९॥
कुंभकर्णमहाप्राज्ञ कुरुष्व वचन मम ।
कोऽसौ विष्णुरिति ख्यातो यस्मात्वं तात बिभ्यसे ॥२०॥
दैवत्वेन न मन्येऽहं तथान्ये देवदानवाः ।
मानुषत्वं गते तस्मिन्किं भयं त्वामुपस्थितम ॥२१॥
नित्यमाहारभूतास्तु मानुषाःस्म सदाबलाः ।
खादयित्वा तु यं पूर्वं कथं पश्चान्नमाम्यहम् ॥२२॥
प्रणम्य मानुषं रामं सीतां दत्वा तु तस्य वै ।
हास्यस्पदत्वं लोकानामनुयास्यामि पृष्ठतः ॥२३॥
कुंभकर्णाची सूचना रावणाला अमान्य :
ऐकोनि कुंभकर्णाचे वचन । रावणा पडियेलें मौन ।
महादूःखें आंदोलायमान । अति उद्विग्न सचिंत ॥४३॥
ज्याचेनि बळे करावे रण । तोचि कुंभकर्ण आपण ।
सीता श्रीरामासी अर्पून । रिघावे शरण सांगत ॥४४॥
बिभीषण येच अर्थी। नाना परींचिया उपपत्ती ।
चाळूनियां सर्व युक्ती । शरण रघुपती रिघा म्हणे ॥४५॥
संमुख लक्षोनि कुंभकर्ण । सरोष बोले रावण ।
झोंपें जालासि सज्ञान । बोलसी वचन चापल्यें ॥४६॥
रावणाची विचारसरणी :
विष्णु विष्णुपणें असता । मज संमुख न येचि युद्धार्था ।
तो नीचत्वे आला मनुष्यता । त्याची सभयता ते किती ॥४७॥
मनुष्य विष्णु स्वये सांगती । सांगसागों स्वये भिसी ।
शेखी मजसी भेडसाविसी । थोर जालासी पुरुषार्थी ॥४८॥
मनुष्य आमचें खाजुकें । सगळीं भक्षूं यथासुखें ।
तू भितोसी त्याचेंनि धाके । थोर तवकें पुरुषार्थी ॥४९॥
अति धाके धाकोनि थोर । अजासी वंदितां लाजे व्याघ्र ।
तेंवी म्या वंदितां श्रीरामचंद्र । लज्जा थोर मज माझी ॥५०॥
मनुष्य आमचा आहार । त्यासी म्या करावा नमस्कार ।
तै मज हांसती सुरासुर । निशाचर उपहासिती ॥५१॥
रणी इंद्र आणितां बांधोन । बंदी घालिता सुरगण ।
विष्णु लपता भेण । न करीच रण अतिं धाके ॥५२॥
विष्णूसकट इंद्रादि देव । दैत्य दानव मानव ।
म्या तृणप्राय केले सर्व । त्या मज भय मनुष्याचें ॥५३॥
श्रीराम मनुष्यमात्र जाण । सीता अर्पून रिघावे शरण ।
हे मज लज्जा अति दारुण । भय कोण रामाचे ॥५४॥
सर्पें वंदावे मुषकासी । गरुडे वंदावे सर्पासी ।
तेंवी भक्ष्यभूत श्रीरामासी । केंवी म्या त्यासी वंदावे ॥५५॥
पूर्वी भक्षिले मनुष्यांसी । तेंचि मनुष्यत्व श्रीरामासी ।
मज शरण रिघतां त्यासी । उपहासासी पावेना ॥५६॥
श्री रामाचे शरणपणें । नित्यावृत्ती त्यांचे होणें ।
पाठीसी चालता रावणे । लाजिरवाणे तिही लोकी ॥५७॥
यदि वा राघवो विष्णुर्व्यक्तं ते श्रोत्रमागतः ।
देवतानां हितार्थाय प्रविष्टो मानुषीं तनुम् ॥२४॥
अत्यंतं वैरिणं रामं यं नमस्कर्तुमिच्छसि ।
अस्मान्हंतुं किलायातः स संधेयः कथं मया ॥२५॥
यदि रामः स्वयं विष्णुर्लक्ष्मणः शेषसंमितः ।
स वानराणां राजानं सुग्रीवं शरणं गतः ॥२६॥
अहोस्य सदृशं सख्यं तिर्यग्योनिगतैः सह ।
वीर्यहीनस्तु कि विष्णुर्योगतो ऋक्षवानरान् ॥२७॥
रावणाची दर्पोक्ती :
श्रीराम विष्णु तत्वता । मुनि मुखें त्वा ऐकिली कथा ।
तो देवांचियां हितार्था । आमुच्या वधार्था मनुष्य जाला ॥५८॥
विचारिता निजनिर्धारी । श्रीराम आमुचा अत्यंत वैरी ।
त्यांसी अर्पूनि सीता सुंदरी । म्हणसी तू करी नमस्कार ॥५९॥
आमुच्या वधाकारणें । श्रीरामे मनुष्यत्व धरणे ।
त्यासी म्या सख्य करणे । जीवे प्राणें घडेना ॥६०॥
सर्पा मुंगसासीं सौजन्य । करीवी ऐसा आहे कोण ।
तेंवी राम आण रावण । सख्य संपूर्ण घडेना ॥६१॥
श्रीरामासी सौजन्य । करुनि देता अलिंगन ।
खेंवा सवेंचि मी गिळीन । मनुष्यभक्षण ते आम्हा ॥६२॥
केळें दिधल्या वानरा करी । ते काय आठ प्रहर धीर धरी ।
तत्काळचि गटका करी । तेंवी खेंवामाझारीं श्रीराम ॥६३॥
श्रीराम विष्णु जरी आपण । सौमित्र शेषावतार संपूर्ण ।
तरी का सुग्रीवा गेला शरण । शुद्ध्यर्थ जाण सीतेच्या ॥६४॥
श्रीरामासी विष्णुत्व कदा न घडे । सीतेलागीं होवोनि वेडें ।
वनी रडे पडे झडे । विष्णुत्व घडे कैसेनि ॥६५॥
तिर्यग्योनी जे वानर । पालेखाइरे वनचर ।
त्यांच्याशीं सख्य करी रामचंद्र । तो राघवेंद्र अति नीच ॥६६॥
विष्णुसीं नाही पुरुषार्थ । बळींसीं न करीच युद्धार्थ ।
छळणें झाला तो अतीत । यज्ञ समयी याचक ॥६७॥
स्वये वामनरुपें मागोन । त्रिविक्रमाक्रमें घेता जाण ।
समुद्रमेखळा पृथ्वी दान । करोनी छळण घेतली ॥६८॥
पृथ्वी घेवोनिया दान । सवेंचि कैसा कृतघ्न ।
दैत्यासीं लाविले बंधन । कपटी पूर्ण श्रीविष्णु ॥६९॥
पुढिलासी करिता छळ । सदाचें अपेशी कपाळ ।
बळीनें केला द्वारपाळ । सर्व काळ तिष्ठत ॥७०॥
कुडा कपटी हीन दीन । विष्णूसी नाही आंगवण ।
त्यांतही आले मनुष्यपण । आम्ही का शरण रिघावे ॥७१॥
उपकार अपकार करणे । याच परी विष्णूचे जिणें ।
त्यासी म्या शरण रिघणें । लाजिरवाणे तिही लोकी ॥७२॥
यदा मे निर्जिता देवाःस्वर्गं गत्वा त्वया सह ।
तदा कि नास्ति विष्णुत्वं तस्य देवस्य राक्षस॥२८॥
सांप्रतं कुत आयातः स विष्णुर्येन बिभ्यसि ।
शरीररक्षणार्थाय ध्रुवं ते वाक्यमिदृशम्॥२९॥
नायं क्लीबयितुं कालःकालो युद्धे निशाचर ।
आयुःपितामहात्प्राप्तं त्रैलोक्यं च वशीकृतम्॥३०॥
रागवं प्रणमे कस्माद्धीनवीर्यपराक्रमम् ।
गच्छ स्वशयनीयाय शश्वत्वं विजतज्वरः॥३१॥
शयानं न च हन्यात्वां राघवो लक्ष्मणस्तदा ॥३२॥
कुंभकर्णाचा धिक्कार करुन रावणाची सिद्धता :
पूर्वी तुजसमवेत म्या जाण । स्वर्गी जिंतिले देवगण ।
तै का विष्णु न करी रण । आता आंगवण त्या कैंची ॥७३॥
विष्णूस असतें विष्णुपण । तै मजसी न करीच रण ।
आता आले मनुष्यपण । त्यांसीं कुंभकर्ण भयभीत ॥७४॥
श्रीरामासी करवे रण । आपुला वांचवावया प्राण ।
रघुनाथा रिघावे शरण । भय संपूर्ण आम्हा सुचविसी ॥७५॥
क्लीब आणि दिससी लाठा । वृथा वाढलासी काग दिवटा ।
हीन दीन तू मांसमोठा । अति करंटा नपुंसक ॥७६॥
आपुलिया मरणाभेण । श्रीरामा रिघा म्हणसी शरण ।
हे तुझे भ्याडपण । मज संपूर्ण कळो सरले ॥७७॥
आजिंचा युद्धकाळ दारुण । तुवा सांडिली आंगवण ।
आता जावोनि करी शयन । अनुद्विग्न सुचित ॥७८॥
तुज निजलिया जाण । निद्रितासि रामलक्ष्मण ।
सर्वथा न मारिती जाण । निजावें आपण सुचित्त ॥७९॥
तुझी थोर आस होती देख । तिसी म्या दिधले तिळोदक ।
दावू नकों काळे मुख । जाय आवश्यक करी निद्रा ॥८०॥
दीर्याय दिधले ब्रह्मयानीं । ते म्या वश केली अवनी ।
तुवा निजोनि दीर्घशयनीं । केली हानि आयुष्या ॥८१॥
कुंभर्णा भागलासी । निदसुरा तू डुकली जासी ।
जाऊन करावे पूर्ण निद्रेसीं । रण रामासी मी करीन ॥८२॥
अहं रामं वधिष्यामि ससुग्रीवं सलक्ष्मणम् ।
वानरांश्च वधिष्यामि ततो देवान्महारणे ॥३३॥
विष्णुं चैव वधिष्यामि ये च तस्यानुयायिनः ।
गच्छ गच्छ स्वकं धाम चिरंजीव सुखी भव ॥३४॥
जानामि सीतां धरणीप्रसुतां जानामि रामं मधुसूदनं वा ।
अहं हि जाने स्वयमस्यवध्य् स्तेनाहृता मे जनकात्मजैषा ॥३५॥
न कामाच्चैव न क्रोधात्यजामिजनकात्मजाम् ॥३६॥
करोनिया रणकंदन । मुख्यत्वें श्रीरामे वधीन ।
सुग्रीव वधीन सहलक्ष्मण । वानरगण रणमारे ॥८३॥
सुरवरांच्या साह्यासीं । राम आला मृत्युलोकासी ।
श्रीराम विष्णु सुरवरांसी । मृत्युपासीं धाडीन ॥८४॥
सुरवरांचिया थाटी । रणी मारीन उठाउठी ।
मग लागोनि विष्णूच्या पाठी । रिघोन वैकुंठी मारीन ॥८५॥
जे विष्णूचे उपासक । आणि विष्णूचे सेवक ।
रणी शोधशोधोनि देख । एक एक मारीन ॥८६॥
असो हे वाढिवेची कथा । कोण श्रीराम कोण ते सीता ।
हे मज कळलें तत्वता । सावधानता अवधारी ॥८७॥
धरणीपासाव प्रसूता । अयोनिजा सती सीता ।
परब्रह्मत्व रघुनाथा । मजही तत्वता कळलेंसे ॥८८॥
श्रीरामाचे स्वबोधबाण । त्यांसी म्या अर्पिला जीवप्राण ।
तरी सीता देवोनि आपण । श्रीरामा शरण रिघेंना ॥८९॥
अभिलाषिता जनकदुहिता । श्रीराम करील माझ्या घाता ।
तरी श्रीरामा अर्पून सीता । शरण रघुनाथा रिघेंना ॥९०॥
सीता अभिलाषिता मज मरण । जाणोनि केले सीताहरण ।
सीता न करी रामार्पण । न रीघें शरण श्रीरामा ॥९१॥
राज्यलोभसकामता । न सांडीं मी जनकदुहिता ।
श्रीराम आला सक्रोधता । तरी मी सीता सोडींना ॥९२॥
देहलोभसभयता । मृत्युभय वाजता माथा ।
तरी मी न सोडी गा सीता । निजपरमार्थाचेनि लोभे ॥९३॥
ऐके कुंभकर्णा सावधान । तुझ्या अंगी भेडसपण ।
वांचवावया निजप्राण । निगावें शरण श्रीरामा ॥९४॥
सेविता श्रीरामाचे पाय जाण । तुज बाधेना जन्ममरण ।
नित्य निर्भय व्हावया जाण । रिघावे शरण श्रीरामा ॥९५॥
सेविता श्रीरामाचे पाय तुज । बिभीषण होईल साह्य ।
यालागी तू शीघ्र जाय । शरण लवलाहें श्रीरामा ॥९६॥
आता जावोनी करी शयन । का श्रीरामा रिघे शरण ।
ऐसे गर्जता रावण । कुंभकर्ण क्षोभला ॥९७॥
कुंभकर्णः पुनर्वाक्यं साश्रुपूर्णमभाषत ।
अलं राक्षसशार्दूल संतापमुपगम्य हि ॥३७॥
रोषशोकौ परित्यज्य स्वस्थो भवितुमर्हसि ।
अवश्यं तु हितं वाच्यं सर्वावस्थं महीपतिम् ॥३८॥
बंधुवादादभिहितं भ्रातुः स्नेहाच्च पार्थिव ।
सदृशं यत्तु कार्येऽस्मिन्कर्तुं स्निग्धेन बंधुना ॥३९॥
अनभिज्ञा हि शास्त्राणां बहवः पशुबुद्धयः ।
कूर्खमंत्रिगणोपेतो भ्राता मे पापबुद्धिभिः ॥४०॥
वस्त्रांतेनाहरन्नग्निं पापैर्न प्रतिषेधितः ॥४१॥
रावणाचा धिक्कार ऐकून कुंभकर्णाला क्रोध, परंतु वस्तुस्थिती सांगतो :
रावणाचे कठिण वचन । ऐकोनिया कुंभकर्ण ।
कोपे नेत्री अश्रुपूर्ण । तरी शांत वचन अनुवादे ॥९८॥
ऐके सुबंधो सावधान । परापवादानुवादन ।
तेणे तुज सुख कोण । करिसी गर्जन दशमुखें ॥९९॥
इतरांची गोष्टी कायसी । मजचि सख्या निजबंधूसीं ।
वर्मी वाग्बाण विंधिसी । अति क्षोभेंसी क्षोभोनी ॥१००॥
विनंती ऐके दशानना । कोप आंवरुन मना ।
स्वस्थ बैसोनि सावधान । कार्यकारणा विवंची ॥१॥
बंधूनें बधूच्या होतोत्की । न पुसतां सांगाव्या भूपती ।
ऐसी आहे स्नेहाची जाती । तू का तदर्थीं कोपसीं ॥२॥
निजबंधूचें निजहित । स्वये सांगती कालोचित ।
आप्तवादे निग्रहांत । नेमून सांगत बंधुत्वें ॥३॥
बिभीषणें हित सांगता । वृथा क्षोभलासी लंकानाथा ।
त्यासी हाणोनिया लाता । शरण रघुनाथा धाडिला ॥४॥
त्याचि बिभीषणाच्या वचना । प्रतीति आली दशानना ।
आता करितोसी रुदना । स्वहितज्ञाना नेणसी ॥५॥
माझा बिभीषण येथे असता । तरी तो चुकविता अनर्था ।
ऐसे बोलसी लंकानाथा । शेखी स्वहिता नेणसी ॥६॥
राजा रावण तू अगाध । सहावा बंधूचा अपराध ।
स्वहित मानूनि विरोध । सखा बंधु दवडिला ॥७॥
स्वये राजा तू अज्ञान । प्रधान पशुबुद्धिसमाना ।
रामे करिता सेतुबंधन । तै का विघ्न न करीचि ॥८॥
सेतु बांधिता रघुनाथा । गर्वें न कळलें लंकानाथा ।
प्रधान अति उन्मादता । कोणे स्वहिता लक्षावें ॥९॥
लावोनियां भेरी निशाण । लंके आला रघुनंदन ।
देखोनि वानरांचे सैन्य । आता उद्विग्न होतसां ॥१०॥
अग्नि बांधोनि वस्त्रांसी । जेंवी नेसविजे शरीरासी ।
तैसी दशा रावणासीं । केली पापराशी प्रधानीं ॥११॥
आणितां श्रीरामपरदारा । कोणी निषेधिना लंकेश्वरा ।
अनुमोदून दशशिरा । पापाचारा प्रवर्तविलें ॥१२॥
सीताकोपतेजानुवृत्तीं । राक्षसांची शौर्यशक्ती ।
निःशेष गेली गा भस्मांतीं । उरले दिसती निर्वींर्य ॥१३॥
अभिलाषिता सीता सती । रावणाची यशःकीर्ती ।
अवघी जाली गा अपकीर्ती । जग निंदिती नष्टत्वें ॥१४॥
रावण भोगी सीतारत्न । आम्ही रामासी करु रण ।
ऐसे बोलिले प्रधान । काळे वदन तयांचें ॥१५॥
तुमची यश कीर्ति शौर्यवृत्ती । जळाली सीताक्रोधानुवृतीं ।
अवघियांची क्षीण शक्ती । रणी मारुति न जिंकवे ॥१६॥
एकला एक हनुमंत । तेणे मारिला अखया सुत ।
इंद्रजित करोनि हताहत । केला निःपात सैन्याचा ॥१७॥
ते काळी कपींसीं रण । करावया नाही आंगवण ।
पळाले सैन्येंसी प्राधान । जीव घेऊन लंकेशा ॥१८॥
येथे आणिली सीता सती । तुमची भस्म जाली शक्ती ।
रणी न ये यश कीर्ती । जाण निश्चिती लंकेशा ॥१९॥
कुभकर्णाला रावणाची युद्ध करण्याविषयी विनंती :
रावण म्हणे कुंभकर्ण बंधु । किती लाविसी गतापराधु ।
पुढा ओढवला युद्धसंबंधु । आला सन्नद्ध कपितभार ॥२०॥
ऐकोनि रावणाचे वचन । कुंभकर्णा आले स्फुरण ।
करावया रणकंदन । काय गर्जोन बोलत ॥२१॥
नैवमर्हसि वत्कुं त्वं मयि जीवति पार्थिव ।
तमहं शासयिष्यामि यत्कृते परितष्यते ॥४२॥
शत्रुणां कदनं पश्य क्रियमाणं मयानघ ।
अद्य पश्य महाबाहो मया समरमूर्द्धनि ॥४३॥
हतं रामं सह भ्रात्रा द्रवंतीं कपिवाहिनीम् ।
अद्य रामस्य दृष्ट्रवा त्वंमया नीतं रणे शिरः ॥४४॥
सुखी भव महाराज सीता भवतु दुःखिता ।
अद्य रामस्य निधनं पश्यंतु सुमहत्प्रियम् ॥४५॥
कुंभकर्ण युद्धावर जाण्याची तयारी दाखवितो :
त्रिसत्य सत्य नारदवचन । श्रीरामबाणीं आम्हा मरण ।
हेंचि बोलता आपण । दुःखी रावण होतसे ॥२२॥
आम्हा अवश्य आले मरण । दुःखी न करावा रावण ।
जेणे पावे सुख संपूर्ण । तैसे आपण अनुवादे ॥२३॥
कुंभकर्ण म्हणे रावणा । मज जीवे जिता जाणा ।
तुज मी जाऊ नेदीं रणा । रघुनंदनासी युद्धार्थी ॥२४॥
मी घरचा सेवक निजबंधु । असता स्वामींसीं युद्धसंबंधु ।
पडो देता सेवक मंदु । परम बाधु सेवकत्वा ॥२५॥
स्वये करावया जाईन रणा । ऐसे न बोलावें वचना ।
तुझ्या शत्रूचे मर्दना । मी करीन लंकेशा ॥२६॥
ज्याचा धाक अहोराती । नित्य वाहसी लंकापती ।
ते म्या मारिले रणख्याती । मानी निश्चिती लंकेशा ॥२७॥
राम लक्ष्मण निधडे दोनी । मी मारीन रणांगणी ।
मारीन वानरांच्या श्रेणी । रणभंगाणी कपिकुळा ॥२८॥
रणी मारिले राम सौमित्र । हे बोलणे अनुमानकर ।
दोहींचें देईन आणूनि शिर । तरी मी साचार सेवक ॥२९॥
आणिल्या श्रीरामाचे शिर । सुखी होईल दशशिर ।
दुःखी होईल सीता सुंदर । ऐसा रणमार करीन ॥३०॥
रणी पाडिले राम सौमित्र । स्वर्गी देखती सुरवर ।
भूतळीं देखती नर किन्नर । ऐसा रणमार करीन ॥३१॥
अद्य रामं ससौमित्रिं ससुग्रीवं समारुतिम् ।
सर्वानेकायने हन्मि प्रतिज्ञा मे तवाग्रतः ॥४६॥
कुंभकर्णाची आत्मप्रौढी :
गर्जोनि बोले कुंभकर्ण । आजिंचे माझे मुख्य रण ।
शत्रु मारोनि संपूर्ण । आंगवण दावीन मी ॥३२॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अंगद सुग्रीव हनुमान गहन ।
अवघे मारीन वानरगण । एकला जाण मी एक ॥३३॥
रणप्रवीण दोघे येथ । सौमित्री आणि रघुनाथ ।
त्यांसी भिडेन रणाआंत । जंव पुरुषार्थ पुरे त्यांचा ॥३४॥
दोघे मारुन रणाआंत । वानर भक्षीन समस्त ।
सुग्रीव अंगद हनुमंत । लोणच्यार्थ खाईन ॥३५॥
एकला एक मी आपण । ऐसे करीन रणकंदन ।
रावणा वाहतो तुझी आण । परम प्रमाण हे माझे ॥३६॥
म्हणसी ऐसे कोणे काळी । आजचि आता ये वेळीं ।
मर्दून शत्रूंची समफळी । तुजजवळी येईन ॥३७॥
सायुध सज्ज सन्नद्ध जाण । युद्धा निघतां कुंभकर्ण ।
मंदोदरी आली आपण । रणकंदन वारावया ॥३८॥
युद्धा जाता कुंभकर्ण । क्षणार्धे राम घेईल प्राण ।
रणी निमाल्या कुंभकर्ण । शिष्टाई पूर्ण चालेना ॥३९॥
श्रीरामासी करिता रण । अवश्य मरेल कुंभकर्ण ।
रावणातें निवारावया जाण । आली आपण मंदोदरी ॥४०॥
एका जनार्दना शरण । पुढे गोड निरुपण ।
मंदोदरी आणि रावण अनुवादन निजगृह्य ॥४१॥
स्त्रीपुरुषांचा एकांत । विवादामाजी परमार्थ ।
बाप लाघवी रघुनाथ । वैरियां देत सायुज्य ॥४२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां रावण
कुंभकर्णसंवादो नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥
ओंव्या ॥१४२॥ श्लोक ॥४६॥ एवं ॥१८८॥
23.
