कैसे भले देवा अनुभवा
2766.
कैसे भले देवा अनुभवा का नये । उशीर तो काय तुम्हापाशी ॥१॥
आहे ते मागतो दिसते जवळी । केल्यामध्ये कळि कोण साध्य ॥धृपद॥
नाही सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करी ॥२॥
तुका म्हणे हात आवरीला गुंती । माझे तव चित्ती नाही दुजे ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही इतके दिवसापासून तुझी भक्ती करतो तरी देखील आम्हाला तुझ्या दर्शनाचा अनुभव देखील अजून येऊ नये हे चांगले आहे काय अहो आम्हाला दर्शन देण्याकरता तुम्हाला एवढा उशीर होत आहे ? देवा मला तुमच्याजवळ जे दिसते आहे तेच मी मागत आहे आणि यामध्ये देताना भांडण निर्माण करुन तुम्हाला काय साध्य होणार आहे ? देवा तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी मी तुमच्या सेवेची मर्यादा ओलांडीत नाही आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जो लोकांना धंदा करण्याचा उपदेश लावला आहे तो मी नित्य करीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही नको त्या भानगडीत पडलात म्हणून हात आवरला आहे परंतू माझ्या चित्तात तुमची सेवा आणि तुमच्यावाचून दुसरे काहीही नाही.
