उद्धवास आज्ञा - अभंग
266.
उद्धवास आज्ञा - अभंग २६६
उद्धवासे एकांती बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधीं सुंदरीं गोपीबाळा ।
रथी बैसोनी निघाला वेगी पावला गोकुळां । तो उद्धव देखोनी दृष्टी गोपींन वेढींला ॥१॥
उद्धवा जाय मथुरेला । आणी लौकरे हरीला ॥धृ.॥
मुखसुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठी घातिला ।
झळकती कुंडले कानी शिरी मुगुट शोभला । मुरली धरुनी अधरीं नाचे यमुना तीरीं देखिला ॥२॥
मथुरेसी राहिला हरी विसरोनी आम्हांसी । कुब्जेनें मोहिला भाळल्या तिच्या रुपासी ।
डोळे पिचके खुरडच जे चाले काय वानु मुखासी । शुद्ध भाव देखोनी तिच्या अनुसरला तियेसा ॥३॥
रासमंडली नाचे मुरारी कधी भेटेल न कळे । वेणु वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें ।
धणी न पुरे तया पाहातां मन आमुचे वेधिलें ॥४॥
हा अक्रुर कोठोन आला हरी गेला घेउनी । तोवियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी ।
घरदार सोडोनी जावे गोकुळ हे सांडोनी । उद्धवा कधी भेटविसी हरीला आणुनी ॥५॥
घडी घडी घरां येतो चोरिती श्रीहरी । तो झडकरी दाखवीं उद्धवा लौकरी ।
धन्य प्रेम तयांचें सदगदित अंतरी । एका जनार्दनी हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥
